प्रसिद्ध सायकल कंपनी ‘अॅटलस’ला टाळे

प्रसिद्ध सायकल कंपनी ‘अॅटलस’ला टाळे

३ जून रोजी आंतरराष्ट्रीय सायकल दिवस साजरा केला जात असताना देशातील सर्वाधिक लोकप्रिय सायकल कंपनी अॅटलसने आपला उ. प्रदेशातील साहिबाबाद येथील सर्वात मोठा सायकल उत्पादन कारखाना अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ३ जूनला सकाळी नेहमी प्रमाणे या कंपनीतले कामगार कारखान्यात आले असताना त्यांना बाहेर गेटवर कारखाना बंद झाला असून सर्व कामगारांना वेतन मिळणार नसल्याची नोटीस पाहायला मिळाली. अॅटलस कंपनीने यापूर्वी मध्य प्रदेशातील मालनपूर व हरियाणातील सोनीपूर येथील सायकल उत्पादन बंद केले आहे.

भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर कराचीतील एक उद्योगपती जानकी दास कपूर यांनी अॅटलस कंपनी सुरू केली होती. १९८९मध्ये या कंपनीने साहिबाबाद येथे आपला सर्वात मोठा सायकल निर्मिती कारखाना सुरू केला होता.

३ जूनला कंपनीच्या गेटवर लावलेल्या नोटीसीमध्ये कंपनीची आर्थिक परिस्थिती नमूद करण्यात आली होती. गेले २ वर्षे कंपनी तोट्यात सुरू असून कोणतीही नवी गुंतवणूक झालेली नाही आणि दैनंदिन खर्च चालवण्याइतपतही कंपनी व्यवस्थापनाकडे पैसा नसल्याने अनिश्चित काळापर्यंत कंपनी बंद ठेवण्यात येईल पण कंपनीने कर्मचार्यांना नोकरीवरून काढून टाकलेले नसून त्यांना वेतन मिळणार नाही असेही या नोटीसीत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. कंपनीची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे व त्यांच्याकडे उत्पादनासाठी पैसा उपलब्ध नाही, पण त्यासाठी कामगारांना नोकरीहून काढून टाकण्यात आलेले नाही तर त्यांना पगार मिळणार नाही. प्रत्येक कामगाराने त्याची साप्ताहिक सुटी वगळता रोज हजेरी पत्रकावर आपली हजेरी नोंदवणे आवश्यक असल्याचेही या नोटीसीत म्हटले आहे.

साहिबादमधील साइट-४मध्ये अॅटलस कंपनीचे कायम व कंत्राटी स्वरुपाचे सुमारे १ हजार कामगार काम करतात. या कारखान्यात दरवर्षी सुमारे ४० लाख सायकलींचे उत्पादन केले जात होते. अॅटलस कंपनीच्या एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक सायकलींचे उत्पादन याच कारखान्यातून केले जात होते.

जेव्हा कारखाना बंद झाल्याची नोटीस पाहिल्यानंतर अनेक नाराज कामगारांनी गेटबाहेर घोषणाबाजी केली. काही कामगार नेत्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. गेटवर पोलिस आल्यानंतर कामगारांना तेथून हटवण्यात आले.

या कंपनीत २० वर्षाहून अधिक काम करणारे बहुसंख्य कामगार आहेत. लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्याने या वयात दुसरीकडे कोण काम देणार असा सवाल बहुसंख्य कामगार उपस्थित करत होते.

एनडीटीवीने दिलेल्या वृत्तानुसार मार्च व एप्रिल महिन्यातले वेतन कामगारांना देण्यात आले होते. १ जूनला कारखाना सुरू होता. पहिले दोन दिवस काम सुरू होते. पण ३ जूनला अचानक कारखाना बंद केल्याने कामगार युनियनला धक्का बसला. युनियनने असाही आरोप केला की, कोणतीही पूर्व सूचना न देता कंपनी व्यवस्थापनाने कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी या प्रकरणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. कामगारांचा रोजगार जात असून सरकारने या संदर्भात आपले धोरण स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय सायकल दिनाच्या दिवशीच सायकलचा कारखाना बंद केला जातो व हजाराहून अधिक कामगार बेरोजगार होतात. सरकार पॅकेजच्या घोषणा करत असते, एमओयू केल्याचे सांगत असते, रोजगार निर्माण करत असल्याचा प्रचार करत असते पण प्रत्यक्षात रोजगार नष्ट होत असून कारखाने बंद पडत असून सरकारने आपले धोरण जाहीर करावे असे त्यांनी ट्विट केले.

उ. प्रदेशातील अॅटलस कंपनी बंद झाल्याने या कारखान्याला लुधियानातून सुटे भाग पुरवणार्या अनेक छोट्या व्यावसायिकांमध्ये चिंता पसरली आहे.

मूळ बातमी

COMMENTS