प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन

प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन

बासू चटर्जी यांनी ‘रजनीगंधा’, ‘छोटी सी बात’ या चित्रपटांबरोबर ‘चितचोर’, ‘उस पार’, ‘खट्टा मीठा’, ‘बातो बातो में’, ‘शौकीन’, ‘एक रुका हुआ फैसला’, ‘चमेली की शादी’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले होते.

गली बॉयचे संगीत स्ट्रीट रॅपिंगचे श्रेय हिरावून घेत नाही!
गीतांजली श्रींच्या ‘टॉम्ब ऑफ सॅन्ड’ या कादंबरीला बुकर पारितोषिक
हिंदी: हिंदुत्ववाद्यांच्या हातातील ध्रुवीकरणाचे नवीन शस्त्र

मुंबई – महानगरीय मध्यमवर्गीय जग आणि सोबतीला खुसखुशीत विनोद पेरत ७० च्या दशकात ‘रजनीगंधा’, ‘छोटी सी बात’ यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक व पटकथाकार बासू चटर्जी यांचे गुरुवारी मुंबईतील सांताक्रुझ येथे त्यांच्या राहत्या घरात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते

बासू चटर्जी यांनी ‘रजनीगंधा’, ‘छोटी सी बात’ या चित्रपटांबरोबर ‘चितचोर’, ‘उस पार’, ‘खट्टा मीठा’, ‘बातो बातो में’, ‘शौकीन’, ‘एक रुका हुआ फैसला’, ‘चमेली की शादी’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले होते.

७० च्या दशकात ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून अमिताभ बच्चन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीचा पडदा ताब्यात घेतला होता. पारंपरिक नायकाची प्रतिमाही बदलली होती. मारधाड सिनेमांचे युग सुरू झाले होते, अशा काळात बासू चॅटर्जी यांनी आपल्या चित्रपटातून मुंबईतील मध्यमवर्गीय जाणीवा, प्रेम, नवविवाहितांचे, पती-पत्नीचे जग अशा विषयांना मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे चित्रपट थेट जळजळीत वास्तवावर भाष्य करणारे नव्हते पण महानगरीय आयुष्यातील ताण तणावातून जाणार्या सुशिक्षित मध्यमवर्गीय प्रेक्षकाला त्यांनी आपल्याकडे आकृष्ट केले. त्यामुळे हा प्रेक्षक चार घटका आनंद मिळवण्यासाठी, हसण्यासाठी व विरंगुळ्यासाठी बासू चटर्जी यांच्या चित्रपटाला हटकून हजेरी लावत होता.

७० व ८० च्या दशकात पडद्यावर मध्यमवर्गीय जाणीवा, रोमान्स, विनोद पडद्यावर आणण्यात जेवढे हृषिकेश मुखर्जी व बासू भट्टाचार्यांचे योगदान होते तेवढेच योगदान बासू चटर्जी यांचेही होते.

बासू चटर्जी यांचे वेगळेपण असे की त्यांनी हिंदी चित्रपटाला मध्यमवर्गीय जाणीवांचा नायकही दिला. हा नायक फारसा महत्त्वाकांक्षी नसलेला, कमी आत्मविश्वास असलेला, हिंसेला आपल्या जगण्यापासून चार हात लांब ठेवणारा होता. त्याचे प्रत्यंतर त्यांच्या गाजलेल्या ‘छोटी सी बात’, ‘बातो बातो मे’ व ‘चितचोर’ या चित्रपटांतून दिसते. या चित्रपटांनी अमोल पालेकर हा नवा नायक उदयास आला आणि प्रेक्षकांनी अमिताभ सोबत या नव्या नायकालाही डोक्यावर घेतले.

पण बासू चटर्जी यांनी आपल्या मूळच्या दिग्दर्शन शैलीला धक्का देणारे ‘एक रुका हुआ फैसला’ व ‘कमला की मौत’ असे वेगळ्या सामाजिक आशयाचे चित्रपट दिग्दर्शित करून हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आपले वेगळेपणही नोंदवले.

१० जानेवारी १९३०मध्ये अजमेर येथे बासू चटर्जी यांचा जन्म झाला. त्यांच्या कारकिर्दीची सुरूवात मुंबईतून प्रसिद्ध होणारे टॅब्लॉयड ‘ब्लिट्ज’मधून सुरू झाली. ते ब्लिट्जमध्ये इलेस्ट्रेटर व कार्टुनिस्ट होते. तेथे १८ वर्षे काम केल्यानंतर त्यांनी चित्रपट क्षेत्राकडे आपले लक्ष वळवले.

१९६६मध्ये राज कपूर व वहिदा रेहमान यांच्या ‘तिसरी कसम’ या चित्रपटासाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. या चित्रपटाने त्यावेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता. नंतर १९६९मध्ये त्यांनी स्वतः ‘सारा आकाश’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाला सर्वश्रेष्ठ पटकथाकार श्रेणीतला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाचे त्यावेळी कौतुकही झाले होते.

बासू चटर्जी यांनी ८० च्या दशकात देशभरात वेगाने पसरणार्या टीव्ही माध्यमाशीही स्वतःला जोडून घेतले. ९० च्या दशकातील त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘व्योमकेश बक्षी’ व ‘रजनी’ या मालिकांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. आजही लॉकडाऊनच्या काळात या दोन मालिकांना प्रेक्षकांनी पुन्हा उदंड प्रतिसाद दिला.

बासू चटर्जी यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे चित्रपट नायक किंवा नायिकाप्रधान नव्हते. तो एक कौटुंबिक सोहळा असायचा. पक्की पटकथा, अप्रतिम अशा काव्यरचना व सुश्राव्य संगीत त्यांच्या चित्रपटाचे वैशिष्ट असायचे. त्यामुळे ७०-८० च्या काळातले अनेक प्रसिद्ध अभिनेते त्यांच्या चित्रपटात झळकले होते. मिथुन चक्रवती व रती अग्निहोत्री यांना एकत्र घेऊन त्यांनी ‘शौकीन’ सारखा लोकप्रिय चित्रपट बनवला. नंतर विनोद मेहरा, मौसमी चटर्जी यांचा ‘उस पार’, जीतेंद्र नीतू सिंह यांचा ‘प्रियतमा’, देव आनंद व टीना मुनीम यांचा ‘मनपसंद’, राजेश खन्ना व नीतू सिंह यांचा ‘चक्रव्यूह’, धर्मेंद्र व हेमा मालिनी यांचा ‘दिल्लगी’ व अमिताभ बच्चन यांना घेऊन ‘मंजिल’ या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते.

१९९२मध्ये त्यांच्या ‘दुर्गा’ या चित्रपटाला सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

बासू चटर्जी यांच्या चित्रपटांनी अनेक अवीट अशी गाणी जन्मास घातली. त्यांच्या गाजलेल्या काही चित्रपटांची गाणी योगेश यांनी लिहिली होती. याच गीतकार योगेश यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले होते. ‘रजनीगंधा’ चित्रपटातील ‘कई बार यूं ही देखा है’, ‘मंजिल’मधील ‘रिमझिम गिरे सावन,,,,’ ‘छोटी सी बात’मधील ‘न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ…’, ‘बातों बातों में’मधील ‘न बोले तुम न मैंने कुछ सुना’ व ‘जानेमन जानेमन तेरे दो नयन..’, ही गाणी आजही ४० वर्षांनंतर रसिकांच्या मनात कायम रुंजी घालत असतात.

बासू चटर्जी यांनी काही बंगाली चित्रपटांचेही दिग्दर्शन केले. ‘होथाठ बृष्टि,’ ‘होच्चेता की,’ व ‘होथाठ शेई दिन’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0