‘सायकल टू वर्क’

‘सायकल टू वर्क’

कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रमाणात ऑरेंज, रेड, ग्रीन झोन घोषित केले आहेत. अशा काळात नोकरीवर जाण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सायकल प्रवास हा योग्य व फायदेशीर आहे. तो सुरक्षितही आहे.

प्रसिद्ध सायकल कंपनी ‘अॅटलस’ला टाळे
मुंबईतील सागरी किनारपट्टीचा रस्ता – एक घोडचूक
कोरोनाः मजुरांच्या जप्त सायकली विकून २३ लाख कमावले

आम्ही काही दिवसांपूर्वी ‘सायकलटूवर्क’ म्हणजेच ‘कोविड-१९ लॉकडाऊनमध्ये व लॉकडाऊननंतर सायकल या माध्यमाचा प्रभावी वापर यासाठी’ स्थानिक शासकीय यंत्रणेला खुलं पत्र लिहिले होते. या पत्राचा आशावाद हा होता की, कोविड-१९ च्या लॉकडाऊनमधून हळूहळू परिस्थिती पूर्वपदाकडे येत जाईल तेव्हा सायकल आपणा सर्वांना सुरक्षित, निरोगी राखण्यास मदत करेल आणि अर्थव्यवस्थेला हळू का असेना मदत करेल.

देशात व राज्यात आता जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या भागात संवेदनशील विभाग वगळून लाॅकडाऊनला वेगवेगळ्या प्रमाणात शिथिलता दिली आहे. दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील विविध बांधकामे तसेच इतर उद्योग वेगवेगळ्या अटींवर सुरू करण्याचे निर्देश व सूचना दिल्या होत्या. पण या सूचनात असंघटित कामगार, श्रमिक कामाच्या ठिकाणी कसे पोहचणार याविषयी प्रशासन काय सुविधा देणार याबाबत स्पष्टता नव्हती. त्याचबरोबर कामगार त्यांच्या कारखान्यात, कामाच्या ठिकाणी पोहचले तेथे त्यांच्या राहण्याची, आरोग्याची, जेवण्याची काय सोय करावी याबाबतही प्रशासनाने काही निर्देश दिले नव्हते.

या घडीला सार्वजनिक परिवहन व्यवस्था जोपर्यंत पूर्णपणे रुळावर येत नाही तोपर्यंत #cycletowork म्हणजेच दैनंदिन वापराला, कामावर घरापासून ते इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी व परत येण्यासाठी सायकल हा एकमेव साधा, सहज मार्ग आहे. सध्याच्या काही ठिकाणी लाॅकडाऊनमध्ये अंशत: शिथिलता देण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रमाणात ऑरेंज, रेड, ग्रीन झोन घोषित केले आहेत. अशा काळात नोकरीवर जाण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सायकल प्रवास हा योग्य व फायदेशीर आहे. तो सुरक्षितही आहे.

आमदनी बुडल्याने लाखो श्रमिकांकडे पैसे नाहीत अशावेळी पैसे देऊन महागड्या सार्वजनिक सुविधांचा वापर करण्यापेक्षा कामावर जाण्यासाठी सायकल हा स्वस्त मार्ग आहे. अशा साथीच्या काळात अनेक ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शेवटच्या ठिकाणापर्यंत उपलब्ध नसते. त्याला उपाय म्हणून सायकल सेवा सुरू करता येऊ शकते.

सायकल हे साधे, विनाइंधन कामावर पोहोचायला उत्तम वाहतुकीचे साधन आहे. शिवाय या काळात सायकल वापराने इंधन, निरनिराळे येजा करण्याचे परवाने आणि संबंध व्यवस्थेवर येणारा ताण नक्कीच कमी होवू शकतो यात दुमत नसावे.

जो रुग्ण आजारी ताप, सर्दी अशा लक्षणाने ग्रासला आहे तो सायकल चालवू शकणार नाही त्यामुळे तो आपोआपच सोशल डिस्टन्सिंग पाळेलही, हा पर्याय नक्की आजमावयला हवा.

सायकलटूवर्क या वेबसाईटवर सायकल वापराविषयी व त्याच्या उपयोगाविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे. शिवाय लॉकडाऊनच्या काळात आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने- डब्ल्यूएचओने देखील सायकलिंगची शिफारस केली आहे. सायकलच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना नेमके काय म्हणते ते खालील मुद्द्यांवरून लक्षात येईल.

१) कोविड महासाथीनंतर उत्तम प्रतीचे सायकल इन्फ्रा व सायकल हे अर्थव्यवस्थेस मदत करेल.

२) सायकल चालवल्याने सार्वजनिक आरोग्याची आणि मानवी जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते.

३) सायकल चालवण्यायोग्य पायाभूत सुविधांमुळे भविष्यात शहरे कोणत्याही आपत्तीत सापडली तरी त्या आपत्तींचा सामना करण्याची क्षमता व लवचिकता त्या शहरांमध्ये अस्तित्वात असणार आहे.

४) सायकल वापरामुळे प्रदूषण कमी होईल.

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात सायकलवरून जाणार्यांना पासची गरज नसावी, सायकलस्वाराने शासनाचे सर्व निर्देश पाळल्यास त्याला सायकल चालवण्याची परवानगी द्यावी यासाठी एक जाहीर पत्र १ मे रोजी शासनास पाठवले आहे. या पत्रात काही उपाय योजना व मुद्दे मांडले आहेत.

१. लॉकडाऊन दरम्यान सायकलींना पासमधून सूट देणे व सायकलीस वैयक्तिक परिवहन म्हणून विना पासशिवाय परवानगी देणे.

२. कोरोना नियंत्रित होईपर्यंत वर्दळीचे महामार्ग, राज्य महामार्ग, मोठे रस्ते यांवर सायकल चालण्यास परवानगी द्यावी किंवा सायकलींसाठी वेगळा मार्ग घोषित करावा.

३. सायकल विक्री दुरुस्तीची दुकाने एक अत्यावश्यक सेवा म्हणून विचारात घ्यावी आणि लॉकडाऊन दरम्यान त्यांना सूट द्यावी.

नागरिकांना आमची विनंती आहे की,  

१) कारमधून/ मोटर सायकलवरून प्रवास टाळा किंवा मोटार वाहन ऐवजी आत्ताच सायकल वापरून पहा आणि लॉकडाउननंतरही चालू ठेवा.

२) आपल्याकडे एकापेक्षा जादा सायकली असतील तर तुमच्या मित्राला जो सायकल चालवत नाही आणि त्याला / तिला चालवण्यास मार्गदर्शन व मदत करा.

३) इतरांना सोशल मीडियावर प्रेरणा द्या,

४) लॉकडाऊनचे सर्व निर्देश पाळा.

तसेच विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, एनजीओ, सायकल कंपन्यांना आमची विनंती आहे की,  

१) तुम्ही सायकल प्रसाराकडे आपल्या परीने हातभार कसा लावता येईल ते पाहा.

२) येणा-या काळात आणि गेल्या काही महिन्यात विविध मॅरॅथॉन, सायकल रॅली कोविड-१९ मुळे होऊ शकल्या नाहीत त्याऐवजी सायकल साधन म्हणून वेगवेगळ्या समूहांना कशा पुरवू शकाल ते पाहा.

३) सायकल चालवण्यायोग्य पायाभूत सुविधांमुळे शहरांना मदत होऊ शकते, यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करा.

अभिजीत कुपटे, हे सायकलचा दैनंदिन जीवनात अधिक वापर व्हावा यासाठी ते जनजागृतीचे काम करत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0