अयोध्याः स्वैर टीव्ही वृत्तांकन व चर्चांवर निर्बंध

अयोध्याः स्वैर टीव्ही वृत्तांकन व चर्चांवर निर्बंध

नवी दिल्लीः येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत होणाऱ्या भव्य राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याच्या थेट टीव्ही वृत्तांकन व पॅनल चर्चांवर अयोध्या जिल्हा प्रशासनाने काही अटी घातल्या आहेत.

या अटीत प्रत्येक टीव्ही न्यूज चॅनेलला त्यांच्या चर्चेत एकाही वादग्रस्त भाष्यकाराला निमंत्रित करू नये तसेच या भूमीपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमात कोणत्याही धर्मावर, जाती-जमाती-समुदायावर, पंथ वा व्यक्तीवर टीका करण्यास मनाई करण्यात आली आहे. जर अशा कार्यक्रमामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला तर त्या संदर्भात संबंधित टीव्ही न्यूज चॅनेलच्या प्रमुखाला जबाबदार धरण्यात येणार आहे. या अटीची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक टीव्ही न्यूज चॅनेलच्या प्रमुखाकडून एक लिखित पत्र जिल्हा प्रशासनाला पाठवणे बंधनकारक केले आहे. या पत्रात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी म्हणून माझे प्रयत्न असतील, जर त्यामध्ये बिघाड झाला तर त्याची जबाबदारी सर्वस्वी माझी असेल अशा मसुद्यावर सही करण्यास सांगण्यात आले आहे.

न्यूज चॅनेलनी सर्व चर्चा स्टुडिओमध्ये कराव्यात, त्या स्टुडिओबाहेर, सार्वजनिक करू नये अशीही अट घालण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमात फक्त भाष्यकार उपस्थित असतील त्यामध्ये प्रेक्षकांचा समावेश करण्यास मनाई घालण्यात आली आहे.

दरम्यान अयोध्या जिल्हा प्रशासनाच्या या आदेशांबाबत एकाही न्यूज चॅनेलने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या मतस्वातंत्र्यावर गदा येत असल्याबद्दल नाराजी वा निषेध व्यक्त केलेला नाही.

मूळ बातमी

COMMENTS