बाबा रामदेव यांच्या पतंजलीची बाजारात घसरण

बाबा रामदेव यांच्या पतंजलीची बाजारात घसरण

कंपनीच्या आर्थिक अहवालानुसार, पतंजली उत्पादनांच्या विक्रीमध्ये १०% ने घट होऊन ती रु. ८१ अब्ज इतकी झाली आहे.

तीन वर्षापूर्वी योग गुरू आणि उद्योजक बाबा रामदेव हे यशाच्या शिखरावर होते. ते सहसंस्थापक असलेली नित्योपयोगी वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी पतंजलीने २०१४ मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडीनंतरची हिंदू राष्ट्रवादाची लाट पकडली आणि व्यवसायाचा वेगाने विस्तार केला. त्या काळात ग्राहक पतंजली आयुर्वेदची परवडणारी, भारतात बनवलेली खोबरेल तेल आणि आयुर्वेदिक औषधांसारखी उत्पादने मोठ्या प्रमाणात खरेदी करत होते. त्यामुळे भारतातील बाजारपेठेवर विसंबून असणाऱ्या परदेशी कंपन्यांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते.

“आमच्या टर्नओव्हरच्या आकड्यांमुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांना कपालभाती करावे लागेल,” असे विधान भगवे कपडे परिधान करणारे रामदेव यांनी २०१७ मध्ये घोषित केले होते. त्यानंतर मार्च २०१८ पर्यंतच्या वर्षात विक्री दुप्पटीपेक्षा जास्त होऊन २०० अब्ज रुपये ($२.८४ अब्ज) उलाढाल होईल असेही त्यांनी छातीठोकपणे सांगितले होते.

पण त्यांच्या वार्षिक आर्थिक अहवालानुसार, तसे न होता उलट पतंजलीची विक्री १० टक्क्यांनी कमी होऊन ८१ अब्ज रुपये इतकी झाली.

आणि मागच्या वित्तीय वर्षात ती आणखी कमी झाली असावी, असे कंपनीचे स्रोत आणि विश्लेषक म्हणतात. तात्पुरत्या डेटामध्ये डिसेंबर ३१पर्यंतच्या नऊ महिन्यात विक्री केवळ ४७ अब्ज रुपये आहे, असे पतंजलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केअर रेटिंग्ज यांनी म्हटले आहे.

सध्याच्या आणि माजी कर्मचारी, पुरवठादार, वितरक, स्टोअर व्यवस्थापक, आणि ग्राहक यांच्याशी बोलल्यानंतर असे जाणवते की चुकीची पावले उचलल्याने पतंजलीच्या महत्त्वाकांक्षेला ठेच लागली असावी.

विशेषतः ते गुणवत्तेत सातत्य नसल्याचे प्रकर्षाने दाखवून देतात. पतंजली फार वेगाने विस्तार करत आहे हे त्यामागचे कारण आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जलद विस्तारामुळे काही सुरुवातीच्या समस्या आल्या हे खरे आहे, पण त्यांनी त्यांचे निराकरण केले आहे.

पतंजलीला, इतर अनेकांप्रमाणेच, नोटाबंदी आणि जीएसटी यांचा फटका बसला आहे. या घटनांमुळे त्यांच्या आर्थिक विस्ताराला खीळ बसली.

“समस्या अपेक्षितच होत्या” 

पतंजली म्हणते, त्यांच्याकडे ३,५०० वितरक आहेत जे भारतभरातील ४७,००० किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानांना पुरवठा करतात. पतंजली ब्रँड झपाट्याने मध्यमवर्गात रुपांतरित होत असलेल्या ग्रामीण भारतीयांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या दुकानांमध्ये मँगो कँडीसारख्या खाद्यपदार्थांपासून ते सांधेदुखी बरी करण्याचा दावा करणाऱ्या आयुर्वेदिक औषधांपर्यंत अनेक गोष्टी विकल्या जातात.

बाबा रामदेव यांचे टीव्हीवरील योगासनांचे कार्यक्रम लाखो लोक पाहतात. त्यामुळे २००६मध्ये ती स्थापन झाल्यापासून पतंजलीचा लोकांसमोर येणारा चेहरा तेच आहेत. तेच तिचे ब्रँड अँबेसिडर आहेत – भारतातल्या गावागावांमध्ये असलेले बिलबोर्ड आणि होर्डिंगमधून त्यांचा दाढीवाला चेहरा दिसत असतो.

पण कंपनीची मालकी त्यांचे व्यावसायिक भागीदार आचार्य बालकृष्ण यांची आहे. ते बाबा रामदेव यांना तीस वर्षापूर्वी संस्कृत शाळेत भेटले आणि २०१८ मधील कंपनीने फाइल केलेल्या माहितीनुसार पतंजलीचे ९८.५५% शेअर त्यांच्याकडे आहेत.

४६ वर्षे वयाच्या बालकृष्ण यांची एकूण संपत्ती फोर्ब्सच्या माहितीनुसार $४.९ अब्ज इतकी आहे. एप्रिलमध्ये हरिद्वार जवळच्या पतंजलीच्या एका योग केंद्रामध्ये एका मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी कंपनीच्या आरोग्याबद्दलच्या बातम्या फेटाळून लावल्या.

“आमचा अचानक विस्तार झाला आहे, आम्ही तीन-चार नवीन युनिट सुरू केली आहेत. त्यामुळे समस्या येणे अपेक्षितच होते. आम्ही ती नेटवर्क समस्या आता सोडवली आहे,” डिलिव्हरीवर परिणाम करणाऱ्या सप्लाय चेन समस्यांबाबत बालकृष्ण यांनी “सेट-अप आणि नेटवर्किंगमध्येच सगळ्या समस्या एकवटल्या होत्या”, असे अधिक स्पष्टीकरण न देता सांगितले.

पतंजलीत काम करणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्याने सांगितले की, वाहतूकदारांशी दीर्घकालीन करार नसणे हाही एक प्रश्न आहे. त्यामुळे नियोजन जटिल होते आणि खर्च वाढतो. पतंजलीच्या अधिकाऱ्यांकडे विक्रीचा मागोवा घेण्यासाठी चांगले सॉफ्टवेअरही नाही, असे अन्य एका माजी कर्मचाऱ्याने सांगितले.

बालकृष्ण यांनी मागच्या किंवा सध्याच्या वित्तीय वर्षाकरिता कोणतेही विक्री अंदाज देण्याचे नाकारले पण त्यांनी भविष्यातील कंपनीची घोडदौड “अधिक चांगली” असे सांगितले.

या बातमीचा पाठपुरावा करण्यासाठी रॉयटर्सने पतंजलीचे पब्लिक रिलेशन्स ऑफिसर के. के. मिश्रा यांना काही प्रश्न पाठवले. ते म्हणाले, हे प्रश्न एका विशेष समितीकडे पाठवण्यात आले आहेत. बालकृष्ण यांच्या मदतनीसाला या संदर्भात केलेले कॉल व पाठवलेले संदेश यांना काहीही उत्तर मिळाले नाही.

पुरवठादार

पतंजलीने आपल्या उत्पादनांची संख्या २,५०० वस्तूंपर्यंत वाढवल्यामुळे गुणवत्तेपेक्षा वस्तूंची संख्या अधिक झाली. काही उत्पादने अन्य पुरवठादारांकडे सोपवण्यात आली. त्यामुळे गुणवत्ता खालावली असे दोन माजी कार्यालयीन कर्मचारी आणि एका पुरवठादाराने सांगितले.

२०१७मध्ये, नेपाळच्या औषध निरीक्षकांना असे आढळले की, पतंजलीच्या सहा वैद्यकीय उत्पादनांमध्ये नियामकांद्वारे स्थापित केलेल्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक सूक्ष्मजीव होते. नेपाळच्या डिपार्टमेंट ऑफ ड्रग अँडमिनिस्ट्रेशनचे एक अधिकारी संतोष के. सी. म्हणाले की इतर पतंजली उत्पादनांमध्ये काही दोष नव्हते.

गुणवत्तेचा प्रश्न असल्याचे बालकृष्ण नाकारतात आणि पतंजलीच्या केंद्रीय प्रयोगशाळेला भारतातील राष्ट्रीय प्रयोगशाळा प्रमाणपत्र मंडळाकडून मान्यता मिळालेली असल्याचेही ते नमूद करतात. “आमच्या उत्पादनांची गुणवत्ता ही समस्या नाही,” असेही ते स्पष्ट करतात. बालकृष्ण म्हणाले, केवळ ‘काही उत्पादने’ ज्यामध्ये गहू, डाळी आणि भाताचा समावेश होतो, बाहेरून आणली जातात.

आयुर्वेदिक औषधे म्हणून विकली जाणारी पतंजलीची उत्पादने, २०१४मध्ये आयुर्वेदासह सर्व पर्यायी चिकित्सांना प्रोत्साहन देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आयुष मंत्रालयाच्या नियामक कार्यक्षेत्रामध्ये येतात. पतंजलीच्या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत टिप्पणी करण्याची विनंती केली असता या मंत्रालयाने प्रतिसाद दिला नाही. तर भारताचे अन्नपदार्थ क्षेत्रातील नियामक प्राधिकरण एफएसएसएआय पतंजलीच्या प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांवर लक्ष ठेवते. या संस्थेने गुणवत्ता चाचण्यांवरील डेटा देण्यास नकार दिला. केवळ सुरक्षाविषयक प्रश्न असतील तरच ते तसे करतात असेही या संस्थेने सांगितले.

रॉयटर्सने मुंबई येथील पतंजली दुकानातील ८१ पतंजली उत्पादने तपासली आणि त्यापैकी २७ उत्पादने आंशिक किंवा संपूर्णपणे इतर भारतीय उत्पादकांनी तयार केलेली होती. या इतर उत्पादकांनी प्रश्नांची उत्तरे देण्याचे नाकारले किंवा काही प्रतिसाद दिला नाही.

पतंजलीच्या स्वतःच्या कारखान्यांमध्ये उत्पादनामध्ये मोठे विलंब होत आहेत. अनेक प्रकल्प एकाच वेळी चालू केल्यामुळे असे होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रामध्ये एप्रिल २०१७ मध्ये सुरू होणार असलेला एक अन्नपदार्थांचा प्रकल्प आणि दिल्लीच्या बाहेर २०१६मध्ये सुरू होणार असलेला वनौषधींचा कारखाना हे आता पतंजलीने दिलेल्या माहितीनुसार २०२० मध्ये सुरू होतील.

पुरवठादारांना पैसे दिले जात नाहीत, जाहिराती कमी होत आहेत

रॉयटरने कंपनीच्या तीन पुरवठादारांच्या मुलाखतीमध्ये घेतल्या, तसेच काही पुरवठादारांनी कंपनीला पाठवलेल्या पत्रांचाही आढावा घेतला. त्यातून असे समोर आले की पैसे न मिळालेले काही पुरवठादार कंपनीला पुरवठा करणे बंद करत आहेत. एक रसायनांचा पुरवठादार म्हणाला की २०१७ पासून पतंजलीने पैसे देण्याला एखाददुसरा महिना उशीर करायला सुरुवात केली. २०१८पर्यंत पैसे मिळण्याला होणारा विलंब सहा महिन्यांपर्यंत गेला आहे.

मुंबईस्थित एका बड्या भारतीय रिटेलर स्टोअरचे दोन व्यवस्थापक आणि दोन छोट्या दुकानांचे मालक, म्हणाले, मागणी कमी होत असल्यामुळे ते आता पतंजलीची थोडीच उत्पादने दुकानामध्ये ठेवत आहेत.

पतंजलीकडून निर्माण झालेल्या आव्हानाला तोंड देण्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हर आणि कोलगेट पामोलिव्ह इंडिया लि. या कंपन्यांनी स्वतःची आयुर्वेदिक उत्पादने बाजारात आणली आहेत, ज्यामुळे पतंजलीला स्पर्धा निर्माण झाली आहे.

दरम्यान, पतंजलीने जाहिरातींवरील खर्च कमी केला आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल इंडियाच्या डेटानुसार २०१६ मध्ये, ते भारतीय टेलिव्हिजनवरील तिसऱ्या क्रमांकाचे जाहिरातदार होते. पण मागच्या वर्षात ते पहिल्या १० मध्येही नव्हते. पतंजलीची मुख्य जाहिरात एजन्सी, मुंबई स्थित वर्मिलिऑन यांनी काही टिप्पणी करण्यास नकार दिला.

ब्रोकर एडेलवीस येथील वरिष्ठ विश्लेषक अबनीश रॉय म्हणाले, याचा परिणाम म्हणून पतंजलीचा बाजारातील हिस्सा कमी होण्याची शक्यता आहे.

२०१४ मध्ये रामदेव यांनी मोदींना जोरदार पाठिंबा दिला होता. एक टीव्ही सेलिब्रिटी म्हणून असलेल्या त्यांच्या स्थानाचा त्यांनी चांगला उपयोग करून घेतला होता, मतदारांमध्ये प्रचार केला होता. मोदींच्या हिंदू राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षाशी जुळणारी वक्तव्ये ते करत होते.

मे २०१७ मध्ये रॉयटर्सने उघड केले होते की पतंजलीला भाजपशासित राज्यांमध्ये जमीन अधिग्रहणाकरिता अंदाजे $४६ पेक्षा अधिक सवलतींचा लाभ झाला होता. मात्र अलीकडे रामदेव मोदींच्या बाबतीत जरा मौन बाळगून असतात.

२०१७-२०१८च्या आर्थिक विवरणामध्ये पतंजलीने तक्रार केली की निश्चलनीकरणामुळे ‘लोकांच्या खर्चाच्या सवयींवर परिणाम झाला,” आणि विक्री करामुळे “इनपुट आणि उत्पादनांचा खर्च आणि किंमती यांच्यावर परिणाम झाला”.

या वर्षी सुरुवातीला रामदेव यांनी पत्रकारांना सांगितले की ते आता राजकारणापासून बाजूला झाले आहेत. पण एप्रिल-मे निवडणुकांमध्ये ते अचानक भाजपला पाठिंबा देण्यासाठी प्रचारमोहिमेत सामील झाले. ते म्हणाले, मोदी हे भारतमातेचा अभिमान आहेत.

त्यांच्या या धरसोडीमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही जण नाराजही झाले. “बाबा रामदेव इतकी वेगवेगळी विधाने करतात की त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण होते,” असे एका ज्येष्ठ आरएसएस पदाधिकाऱ्याने मत व्यक्त केले.

अँपचे अपयश

पतंजलीचे निष्ठावंत आणि टीकाकार दोघांच्याही मते पतंजलीची व्यवस्थापनाची पद्धत ही नेहमीच्या कॉर्पोरेट संस्कृतीपासून फारच दूर आहे. पतंजलीच्या हरिद्वार येथील प्रमुख खाद्यपदार्थांच्या कारखान्यातील कर्मचारी रोज सकाळी “ओम” म्हणण्यासाठी एकत्र जमा होतात. वरिष्ठ व्यवस्थापकांनी पांढरेच कपडे घालणे सक्तीचे असते. कपड्यांचे नियम न पाळणे आणि उशीरा कामावर येणे यासाठी पगार कापला जातो असे सध्याच्या व माजी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सुमारे २५,००० लोकांना नोकरी दिल्याचा दावा करणाऱ्या पतंजलीने मागील वर्षी सेल्समनच्या नोकरीकरिता भारतभरात जाहिरात दिली. परंतु एका माजी कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार २०१७ च्या मध्यापासून त्यांनी शेकडो जागा कमी केल्या आहेत. याबाबतच्या प्रश्नांना कंपनीने प्रतिसाद दिला नाही.

पतंजलीने सिम कार्ड, सोलर पॅनल, बाटलीबंद पाणी, फोन आणि जीन्स यांचीही विक्री करणार असल्याची घोषणा केली आहे.

बालकृष्ण म्हणाले उत्पादनांमध्ये आणलेली ही विविधता लाभदायक ठरत आहे.

“सोलर चांगले चालू आहे. आमचा कपड्यांचा विभाग सुरू आहे…जैव-सेंद्रीय उत्पादनांसाठी आमच्याकडे मोठ्या योजना आहेत,” ते म्हणाले.

२०१७ मध्ये, संगणक शास्त्रज्ञ असलेल्या अदिती कमल यांनी भारतीय बनावटीचे मेसेजिंग ऍप तयार करण्याची कल्पना रामदेव यांच्यापुढे मांडली.

“मी जेव्हा त्यांना व्हॉट्सॅपचे उदाहरण दिले तेव्हा ते म्हणाले, हे चांगले आहे, आम्ही याचा आधीच का विचार केला नाही?” कमल सांगतात.

कमल म्हणाल्या त्यांना नियुक्त केले गेले आणि सहा महिन्यांनंतर त्यांच्या हाताखाली १०० कर्मचारी होते.

पण २०१८ मध्ये लाँच झालेल्या किंभो नावाच्या या ऍपमध्ये गोपनीयताविषयक समस्या होत्या आणि पतंजली यांनी तो प्रकल्प थांबवला.

“आम्ही पूर्णपणे तो प्रकल्प गुंडाळलेला नाही, फक्त थांबवला आहे,” बालकृष्ण म्हणाले.

मूळ लेखयेथे वाचा.

COMMENTS