वाळू वेगाने खाली यावी…

वाळू वेगाने खाली यावी…

एक पक्ष म्हणून स्वतःचे राजकीय अस्तित्व राखण्याची जेवढी निकड काँग्रेसला आहे त्याहून अधिक काँग्रेसी विचारांची निकड या देशाला आणि समाजाला आहे. ज्यांना आज हे कळत नाही त्यांना हे कळेल तोवर मोठी पडझड किंवा नुकसान झालेले नसेल एवढीच अपेक्षा आपण आज करू शकतो.

नियमनाच्या अभावामुळे खाजगी रुग्णालयांद्वारे रुग्णांचे शोषण
इंग्रजीतून शिक्षण हा केवळ उच्चभ्रूंचा अधिकार असू नये
मुसलमान परके कसे?

राजकीय उलटापालटीचा आणि उलथापालथीचा खेळ हा लोकशाही काय किंवा कोणत्याही राजकारणाचा, राजकीय व्यवस्थेचा एक अपरिहार्य भाग असतो. काँग्रेस आणि भाजप ही या व्यवस्थेत एकमेकांच्या शेजारी ठेवलेली दोन वाळूची घड्याळे आहेत. काँग्रेसच्या घड्याळातील वरच्या  अर्धगोलातली संपूर्ण वाळू मधल्या पोकळीतून खालच्या अर्धवर्तुळात पडलेली आहे. भाजपच्या घड्याळातला वरचा अर्धा गोलाकार वाळूनं गच्च भरलेला आहे. काळाच्या ओघात भाजपच्या घड्याळातलीही संपूर्ण वाळू खाली पडणार आहेच. प्रश्न फक्त एवढाच आहे की तोवर स्वतःच्या घड्याळाची खालची बाजू वर करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये येईल का? की पुन्हा भाजपचेच घड्याळ खालची बाजू वर येऊन पुन्हा राजकीय कालगतीकडे जाणार आहे? देशात कितीही पक्ष असले आणि अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष ताकदवान असले तरीही व्यापक अर्थानं काँग्रेस आणि भाजप या दोनच राजकीय शक्ती, दोनच राजकीय विचार प्रामुख्यानं रुजलेले आहेत. काळाच्या पोकळीतून वाळूप्रमाणे एकेक दिवस जाताना पुढील काळात पुन्हा एकदा काँग्रेसी विचारांना तरतरी यावी म्हणून आपण काय करायला हवे? नियोजित काळाच्या आधीच भाजपच्या विचारांचा वरचा अर्धगोल वेगाने रिकामा व्हावा म्हणून आपल्याला काय करता येईल? एक पक्ष म्हणून स्वतःचे राजकीय अस्तित्व राखण्याची जेवढी निकड काँग्रेसला आहे त्याहून अधिक काँग्रेसी विचारांची निकड या देशाला आणि समाजाला आहे. ज्यांना आज हे कळत नाही त्यांना हे कळेल तोवर मोठी पडझड किंवा नुकसान झालेले नसेल एवढीच अपेक्षा आपण आज करू शकतो.

या विवेचनात काँग्रेसचा अर्थ नेहरु, गांधी किंवा सोनिया-राहुल असा नाही तर भाजपच्या राजकीय, सांस्कृतिक विचारांना छेद देणारा, त्याच्या विरोधातला विचार असा आहे. राहुल गांधी आपला राजीनामा मागे घेतात किंवा नाही, सोनिया गांधी यापुढे किती सक्रीय राहतात, गांधी घराण्याला पर्यायी नेतृत्व काँग्रेसमध्ये तयार होते अथवा नाही, एवढ्या सीमित आणि संकुचित अर्थाने याचा विचार होऊ नये. परंपरेने काँग्रेसने देशात, समाजात जी सहिष्णू वृत्ती जोपासली होती, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य झिरपू दिले होते, आपल्याला न पटणारा विचारही व्यक्त केला जाऊ देण्याचं वातावरण टिकवून ठेवलं होतं, त्याचं रक्षण, असा याचा अर्थ होतो. यावर लगेचच काँग्रेसच्याच इंदिरा गांधीनी देशावर लादलेल्या आणीबाणीचा विषय काढला जाईल. परंतु आणीबाणीनंतर इंदिरा गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात उभे राहिलेल्यांपैकी अनेक जण काँग्रेसच्या वैचारिक पठडीतूनच आले होते, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्यापैकी अनेकांचा संघ विचारांना विरोध असूनही त्यांनी तेव्हा स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ संघाच्या नेत्यांचीही साथ घेण्यास कमी केले नव्हते. कारण, कष्टानं मिळालेलं स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्याच्या सर्व अर्थांचं रक्षण करणं हाच मूळात काँग्रेसी विचार आहे.

देशात लोकशाही पद्धतीनं भाजपचं सरकार आलेलं असताना आणि बहुसंख्य जनतेनंच ते निवडून दिलेलं असताना, या पद्धतीचा विचार आपल्याला का करावा लागतो? कारण भाजपनं आपला राजकीय विचार पटवून देताना बुद्धीला आवाहन करण्याऐवजी भावनेला हात घालण्याचा उपाय करून लोकशाहीच्या डोळ्यांत धूळफेक केलेली आहे. देशांतर्गत राजकारणासाठी भारताविषयीचं शत्रुत्व सतत जागं ठेवून नागरिकांच्या मनात भारताविषयी राग धुमसता ठेवणं ही पाकिस्तानी राज्यकर्त्यांची गरज होती. कारण तिथं लोकशाही रुजू शकली नाही आणि कोणत्याही क्षेत्रात भारताशी तुलना करावी अशी प्रगती त्या देशाला साधता आली नाही. यावरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं तर देशभक्तीचा ओव्हरडोस देणं हाच पर्याय होता आणि त्यासाठी एका शत्रूची गरज पाकिस्तानला होती. शिवाय सतत लष्करी विचारांच्या हातीच सत्ता राहिल्याने युद्धखोरी, दहशतवाद याच दिशेने पाकिस्तानचे नेते विचार करत राहिले.

भारताची स्थिती तशी नाही. गेल्या साठ वर्षात भारताने अनेक क्षेत्रात उत्तुंग प्रगती केली आहे. आज सत्तेवर आलेल्यांनी एकेकाळी संगणकाला विरोध करून आज आपण पाहात असलेल्या प्रगतीचे वारु रोखण्याचा प्रयत्न केला होता, हे सोशल मीडियावर देशभक्तीचे प्याले रिचवणारांना माहिती नसेल. परंतु गेल्या साठ वर्षात काय केले, हे विचारताना, तुमच्या आजोबा-पणजोबांची जीवनशैली आणि तुमची जीवनशैली यांची तुलना करून पाहा म्हटले तरी तोंडे गप्प व्हावीत. तर थोडक्यात असे की, गेल्या साठ वर्षात देश सर्वच क्षेत्रात प्रगती करत असताना, राजकीय स्वार्थासाठी पाकिस्तान नामक बागुलबुवाची देशाला गरज नव्हती. पाकमधील भारतविरोधी विखाराला उत्तर देण्यापुरतीच भाषा आपण वापरली आणि वेळ, गरज पडली तेव्हा मैदानातही ताकद दाखवली. पाकिस्तान हे लष्करीदृष्ट्या किती क्षूल्लक, कमकुवत राष्ट्र आहे हेही सिद्ध केले. परंतु गेल्या पाच वर्षात आणि त्यातही विशेषतः सहा महिन्यात पाकिस्तानचा फुगा फुगवून, शत्रु राष्ट्राचा बागुलबुवा उभा करून इथल्या देशभक्तांच्या छात्यांमध्ये हवा भरली गेली. त्या हवेवरच निवडणूक लढवली गेली. बुद्धीऐवजी भावनेला हात घालणे ते हेच होय.

पाकिस्तानला धडा शिकवून आपल्या तरूणांना नोकऱ्या मिळणार नाहीत, पाकिस्तानला धडा शिकवून आपल्या शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार नाही, पाकिस्तानला धडा शिकवून दुष्काळावर उपाय सापडणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवून आपली अर्थव्यवस्था सुधारणार नाही. ‘पाकिस्तान आपला शत्रू’ याचा छुपा अर्थ मुसलमान हे आपले शत्रू असा होतो, त्याचाच विस्तारीत अर्थ हा देश फक्त हिंदूंचा असा होऊन इस्लामव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्मांना इथे स्थान नाही हे सांगणे, असा होतो…आणि या सगळ्याचा अर्थ जुनाट बुरसटलेल्या विचारांवर गेल्या साठ वर्षात धरलेली कोळिष्टके झटकणे असा होतो. भाजपचे लहान-सहान नेते, पाठीराखे, सोशल मीडियावर त्यांनी सोडलेले पुंड या सगळ्यांच्या विधानांमधून वारंवार हेच सिद्ध होते. ‘आपण पुरोगामी आहोत हे सिद्ध करण्यासाठी केवळ, काही लोक सलमान खानच्या सिनेमाला चांगले म्हणतात’ इतपत विषारी विधान करण्याएवढी वैचारिक कीड यांना लागलेली आहे. तेव्हा भाजपच्या वाळूच्या घड्याळातून वाळू वेगाने खाली यावी यासाठी  व्यापक काँग्रेसी विचारांनी लवकरच उभारी धरली पाहिजे.

अगस्ती चापेकर, घरंदाज राजकीय विश्लेषक असून, लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0