बाबरी मशिदीत राममूर्ती कशी आली : एकाने सांगितलेली कथा

बाबरी मशिदीत राममूर्ती कशी आली : एकाने सांगितलेली कथा

'अयोध्या- द डार्क नाईट' या कृष्णा झा व धीरेंद्र झा यांच्या पुस्तकातून त्यांच्या परवानगीने घेतलेला हा काही भाग – एका रात्रीत मशिदीचे मंदिर कसे झाले!

२३-२४ जुलैला जोशी- अडवाणींचा जबाब नोंदवणार
अयोध्या: सरकार व न्यायसंस्थेला जमले नाही ते भारतातील मुस्लिमांनी करून दाखवले
रामजन्मभूमीच्या निकालापर्यंत अयोध्येत १४४ कलम लागू

रात्र संपतच आली होती. अयोध्या अजून साखरझोपेत होती. एक घामाने डबडबलेला तरुण साधू हनुमानगढ़ी वरून त्या शांततेला छेदत धावत आला. हनुमानगढ़ी हे अयोध्येतील हिंदूंचे एक किल्लेवजा धार्मिक स्थळ आहे जिथे ५०० हून अधिक साधू राहतात. सत्येन्द्र दासाचे गुरू अभिराम दास हे शेवटची घटका मोजत असल्याने सत्येन्द्रला बोलावण्यासाठी हा तरुण साधू आला होता. ३ डिसेंबर १९८१च्या पहाटे आता विस्मरणात गेलेल्या काही ऐतिहासिक घटना घडत होत्या.

अभिराम दासांचा दुसरा अनुयायी धरम दास त्यांच्यासोबत हनुमानगढ़ीच्या त्यांच्या खोलीमध्ये, असनमध्ये राहत होता. त्यानेच सत्येंद्रला बोलावणे धाडले होते, जेणेकरून ते दोघेही त्यांच्या गुरूंच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत असू शकतील. सत्येन्द्रला हे अपेक्षितच होते कारण आपले गुरू जीवन प्रवास संपवण्याच्या  मार्गावर आहेत याची त्याला कल्पना होती. तो दिवसभर त्यांच्या पलंगापाशीच होता आणि परिस्थिती फारशी आशादायक नव्हती. नुकताच तो थोडी विश्रांती घेण्यासाठी तिथून बाहेर पडला होता, पण गुरूची अंतिम घटिका बहुधा जवळ आली आहे याची कल्पना त्याला आली होती. या त्याच्या गुरूंनीच तीन दशकांपूर्वी अशाच एका डिसेंबरच्या रात्री बाबरी मशिदीमध्ये गुपचूप रामाची मूर्ती ठेवणाऱ्या हिन्दूंच्या छोट्या गटाचे नेतृत्व केले होते.  गुरूंना सोडून जाण्याची सत्येन्द्र दासची इच्छा नव्हती पण तो खूप थकला होता. बाहेरही तो बेचैन होता व त्याला झोपही येत नव्हती. त्या अस्वस्थ क्षणी त्याला या गोष्टीची संपूर्ण कल्पना होती की कोणीतरी ती बातमी घेऊन येईल आणि कुठल्याही क्षणी आपला दरवाजा वाजेल. त्यामुळे जेव्हा खरेच ती बातमी आली तेव्हा घाईघाईने एक शाल गुंडाळून तो त्याला बोलवायला आलेल्या तरुण साधूसोबत निघाला.

बाहेर खूपच गारठा होता. स्वतःमध्ये सगळे सामावून घेणाऱ्या धुक्यात ती थंडीची रात्र मिसळून जात होत होती. काहीच स्पष्ट दिसत नव्हते. तरी मिट्ट काळोखात दोघे  रस्त्यावरून पळत होते. हातावरल्या रेषांप्रमाणे त्यांना अयोध्येचा कानाकोपरा पाठ होता. सत्येन्द्र दास तिथे पोचला तेव्हा त्याला दिसले की असनच्या मध्यभागी ठेवलेल्या चारपाईवर गुरु अभिराम दास निजलेले होते, भोवतीने हनुमानगढीतील काही साधू होते. कोणीच बोलत नव्हते; सारे काही शांत होते. धरम दास उठला आणि त्याने सत्येंद्रच्या जवळ येऊन  हलक्या आवाजात सांगितले की तो पोचण्याआधी काहीच क्षण गुरूंचा देहांत झालेला आहे. जसा दिवस उगवेल तसे  गुरुंचे भक्त अणि अनुयायी असनमध्ये जमायला लागले. लवकरच हनुमानगढ़ीच्या रहिवाशांच्या मदतीने गुरुंच्या अंत्यविधीची तयारी सुरु झाली.

हिंदू संन्याशांचे अंत्यविधी सामान्य माणसांसारखे, गृहस्थांसारखे नसतात, विशेषतः उत्तर भारतात! गृहस्थांसारखे त्यांच्या शवाचे दहन अगदी क्वचित होते. एकतर त्यांच्या अंगाला मीठ फासून ध्यानासनामध्ये त्यांना मातीत पुरले जाते किंवा पवित्र नदीमध्ये अंगाला दगड वा वाळूची पोती बांधून सोडून दिले जाते. सर्वसंगपरित्याग केलेल्या साधूंचे दहन न करणे म्हणजे ते संन्यासी आधीच बाकी भौतिक जगापासून विभक्त असल्याचे प्रतीक आहे. असे म्हणतात की या त्यांचे दहन करण्यात काही अर्थ नसतो कारण संन्यास घेऊन त्यांनी मुळातच त्यांना जखडणाऱ्या सर्व भौतिक गोष्टींचे जणूदहन केलेले असते आणि संन्याश्याचे जीवन स्वीकारलेले असते.

सामान्यतः अयोध्येमध्ये अशी प्रथा आहे की संन्याशाचा देह शरयू नदीमध्ये सोडून दिला जातो. या नदीला फक्त अयोध्येच्या किनाऱ्यावर शरयू म्हणून संबोधले जाते. अयोध्येच्या आधी आणि नंतर ही  नदी ‘घाघरा’ म्हणून ओळखली जाते. हा नावाचा गोंधळ हिंदूंच्या भाबड्या श्रद्धेतून झालेला आहे. पुराणानुसार अयोध्या हे रामाचे जन्मस्थान झाले अणि मग अयोध्येतून, रामराज्यातून वाहणारी नदी शरयू नदी झाली.

इकडे हनुमानगढीमध्ये, ३ डिसेंबर १९८१च्या दुपारपर्यंत अभिराम दास यांच्या अनुयायी अणि मित्रपरिवाराने अंत्यविधीची सर्व तयारी केली. असनच्या बाहेर बांबूपासून बनवलेल्या एका आसनावर अभिराम दास यांचे शव मांडी घालून बसवण्यात आले होते, त्यांची मुद्रा अत्यंत संयमी दिसत होती आणि अर्धवट मिटलेल्या डोळ्यांमुळे ते ध्यानस्थ बसलेले आहेत असा भास होत होता. रेशमी भगव्या रामनामी नावाच्या सुती किंवा रेशमी वस्त्रामध्ये अभिराम दासना गुंडाळण्यात आले. त्या वस्त्रभर रामनाम विणलेले होते. त्यांच्या आसनावरची कमान देखील त्याच वस्त्राने तीन बाजूंनी झाकण्यात आली. त्या आसनाला विमान अशा शुभनामाने संबोधले जाते, कारण ते पुराणात सांगितल्याप्रमाणे आत्म्याला स्वर्गात नेते. त्याची एक बाजू अंत्यदर्शनासाठी उघडी ठेवण्यात आली होती.

साधूंच्या एका गटाने ते विमान आपल्या खांद्यावर सावकाश उचलले अणि हनुमानगढीच्या मध्यभागी असलेल्या हनुमान मंदिराच्या पायऱ्या चढून वर नेले. मंदिरात अजून गर्दी वाढली अणि ते विमान हनुमानगढीच्या बाहेर आणताच जमलेल्या गर्दीने घोषणा दिली, ‘ रामजन्मभूमि उद्धारक अमर रहे’.

तीन दशकांपूर्वी, २३ डिसेंबर १९४९च्या आदल्या रात्री बाबरी मशिदीमध्ये रामाची मूर्ती चोरून बसवण्याबद्दल अयोध्या पोलिसांनी एक एफआयआर नोंदवला. त्यातील मुख्य आरोपी होता अभिराम दास. त्या रात्री त्याने आणि त्याच्या मित्रांनी मिळून केलेल्या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर खटला देखील चालवण्यात आला पण तो खटला अनिर्णित राहिला. कालांतराने अयोध्येतील अनेक हिंदू त्याला रामजन्मभूमि उद्धारक म्हणायला लागले.

विमान बाबरी मशिदीच्या प्रवेशद्वारापाशी पोचताच घोषणांचा आवाज वाढत गेला. मग तिथे ते विमान काळजीपूर्वक खाली ठेवण्यात आले. बाबरी मशिदीमध्ये रामाची मूर्ती चोरून बसवल्यापासून आत एक मंदिर सुरु झाले होते; त्याचे पुजारी, इतर हिंदू धर्मस्थळातील लोक अभिराम दासाच्या देहान्ताविषयी समजल्यामुळे तिथे येऊन त्यांच्या मृतदेहावर हार-पुष्प घालत होते, वंदन करत होते.

पण बाकी अयोध्या अभिराम दासच्या मृत्यूविषयी अनभिज्ञ होती. काही रहिवाशांनी हा अंत्ययात्रेचा प्रकार कुतुहलाने पाहिला पण बहुसंख्य लोकांच्या दृष्टीने तो फक्त आणखी एका वृद्ध साधूचा मृत्यू होता. तीस वर्षानंतर १९४९ मधील घडामोडीतील सत्य अस्पष्ट होत गेले. अखिल भारतीय हिन्दू महासभा अणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांनी असे पसरवले की रामाची ती मूर्ती कधी चोरून बाबरी मशिदीच्या आवारात बसवली गेली नसून प्रभू राम त्यांच्या जन्मस्थळी स्वतः प्रकट झाले. आणि हिंदू धर्मभोळ्या लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. त्या निर्णायक रात्री अभिराम दासने त्या अंधारात जे कृत्य केले त्याचा याच्याशी असलेला संबंध विसरला गेला. मधल्या काळात अयोध्येतील दुकाने हिंदू जमातवाद्यांनी लिहिलेल्या पुस्तके अणि पत्रकांनी दुथडी भरून वाहू लागली आणि त्यांनी या दिव्य साक्षात्काराची कथा पुनर्प्रस्थापित केली.  जे या कपटामध्ये सहभागी होते त्यांनासुद्धा कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याकरिता हे धादांत असत्य पसरू देणे आणि लोकमान्य कल्पनांचीच तळी उचलणे सोयीचे होते. कायदा मानवी षड्यंत्राना आपल्या कचाट्यात पकडू शकतो पण असे दिव्य साक्षात्कार त्याच्या मर्यादेपलीकडचे असतात. तरीही अयोध्येतील एका छोट्या हिंदू गटासाठी अभिराम दास हा मरेपर्यंत रामजन्मभूमी उद्धारक वा उद्धारक बाबा होता.

हे काहीही असो, पण विमान जसजसे अयोध्येच्या अरुंद रस्त्यांवरून शरयूच्या घाटावर जायला लागले तसे स्थानिक लोकांचा याविषयीचा निरुत्साह अंत्ययात्रेतील लोकांच्या नजरेतून सुटला नाही. दुपारी साधारण दोनच्या दरम्यान ती अंत्ययात्रा घाटावर आली आणि आपल्या खांद्यावरचे ओझे खाली ठेवण्यासाठी खांदेकरी खाली वाकले. मग त्या साधूचे शव विमानातून बाहेर काढण्यात आले, शवाला नदी प्रवाहात स्नान घालण्यात आले अणि मग तुपाने माखवून स्वच्छ पांढऱ्या कपड्यात गुंडाळण्यात आले. शवाच्या खांद्याला एक अणि कमरेला एक अशी दोन वाळूची पोती बांधण्यात आली आणि मग ते शव एका होडीमध्ये ठेवण्यात आले. सत्येन्द्र दास अणि हनुमानगढीच्या अजुन तीन साधूंना घेऊन होडी निघाली. थोड्याच वेळात होडी खोल नदीपात्रात आली.  अशी जलसमाधी देण्यासाठी ही परंपरागत ठरलेली जागा होती. होडीत बसलेल्या साधूंनी उर्वरित अंत्यविधी उरकले अणि शरयू नदीच्या संथ, शांत प्रवाहात अभिराम दासचे प्रेत सोडून दिले.

II

१९८१मध्ये स्थानिक रहिवाशांमध्ये अभिराम दासच्या मृत्यूविषयीचीही उदासीनता होती. तीन दशकांपूर्वीच्या म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच्या वर्षात स्थानिक रहिवाशांनी अनुभवलेल्या वातावरणाच्या अगदीच विसंगत होती. त्या काळी देशातील इतर अनेक भागांप्रमाणेच अयोध्येतील लोकही गोष्टींकडे वेगळ्या प्रकारे पाहत होते. फाळणीसोबत जन्माला आलेल्या धार्मिक उन्मादाने वातावरण क्रूर झाले होते. यामध्ये काही संस्थांचा सहभागदेखील तितकाच महत्त्वाचा होता. त्यांनी हे बरोबर हेरले होते की स्वतंत्र भारताने हाती घेतलेला निधर्मीवादाचा प्रकल्प उधळून लावण्यासाठी  फाळणी ही उत्तम संधी आहे. अशा संस्थांचे हस्तक आणि त्यांनी रचलेल्या षड्यंत्रांनी देशात अनेक भीषण दुर्घटना घडवल्या होत्या.

त्यापैकी एक षड्यंत्र म्हणजे ३० जानेवारी १९४८ला झालेला महात्मा गांधी यांचा निर्घृण खून. महात्मा गांधींवर बंदूक रोखणारे हात नथुराम गोडसेचे असले तरी, नंतर असे सिद्ध झाले की, ती हत्या हा वि. दा. सावरकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदू महासभेच्या ज्येष्ठ नेत्यांनी रचलेल्या षड्यंत्राचा भाग होती. काँग्रेसने धर्मनिरपेक्ष राष्ट्रासाठी घेतलेला पुढाकार अणि धर्मनिरपेक्षता रुजवण्यासाठी चालू असलेले प्रयत्न यांना सुरुंग लावणे आणि राजकीय पुढारपण काँग्रेसकडून खेचून घेणे हा त्यांचा त्यामागील मूळ हेतू होता. या कटकारस्थानाची व्याप्ती हत्येनंतर लगेच चाललेल्या खटल्यात जरी उघडी पडली नाही तरी हे गांधींच्या खुनाचे षड्यंत्र फार काळ लपूनही राहू  शकले नाही.

बाबरी मशिदीवर कब्ज़ा करण्याचा कट देखिल साधारण त्याच माणसांनी सुमारे दोन वर्षांनी २२ डिसेंबर  १९४९ला केला. अनेक अर्थांनी ज्या वातावरणाने गांधींचा खून पडताना पाहिला त्याच क्रूर वातावरणाचा तो परिणाम होता. ना ते षड्यंत्र करणारी माणसं वेगळी होती ना त्यांचे छुपे इरादे निराळे होते. दोन्ही घटनेतील प्रमुख कर्ते हे हिंदू महासभेचे नेते होते – राममूर्ति चोरून बाबरी मशिदीत ठेवण्यात जे मुख्य हस्तक होते त्यातील काही नंतर गांधी खून खटल्यातील मुख्य आरोपी देखील होते – आणि याही वेळी त्यांचा उद्देश राजकारणातील काँग्रेसचे  केंद्रस्थान  रामनामाच्या नावाखाली भडकवलेल्या हिंदू जमावाच्या दबावतंत्राने उद्ध्वस्त करणे हा होता.

मात्र हिंदू सांप्रदायिकांनी अवलंबलेली कार्यप्रणाली अणि कांग्रेस सरकारने त्यांना दिलेल्या प्रतिक्रिया यांच्या दृष्टीने पाहिले तर या दोन्ही घटनांमध्ये फरक आहे. महात्मा गांधींची हत्या दिवसाउजेडी आणि जमावासमोर झाली तर बाबरी मशिदीला मंदिरात बदलण्याचा उद्योग गुपचुप रात्री करण्यात आला. परंतु गांधींच्या हत्येनंतर सरकारने त्वरेने अणि मोठ्या प्रमाणात केलेले पुनरुत्थान यामुळे हिन्दू महासभेच्या नेत्यांना चांगलाच धडा मिळाला. पहिला म्हणजे सरकारशी टक्कर टाळायची जेणेकरून त्याना त्यातून जास्तीत जास्त राजकीय फायदा करून घेता येईल. आणि दुसरा म्हणजे ज्यांना यांच्या कार्याविषयी सहानुभूति होतीअशा काँग्रेसमधील काही जणांनाच कटात सामील करून घ्यायचे. म्हणून २ वर्षांनी अयोध्या कट रचताना त्यांनी खूपच दक्षता घेतली. मशीद प्रत्यक्ष ताब्यात येईपर्यंत अत्यंत काळजीपूर्वक ते पडद्यामागून सूत्रं हलवत राहिले. आणि त्यानंतर अजिबात वेळ न दवडता त्यानंतर लगेच हिंदूंना मोठ्या प्रमाणात एकत्र करण्यासाठी खूप प्रयत्न केले. अयोध्येतील या भावनिक जातीय दंगलीचा त्यांना अपेक्षित राजकीय फायदा जरी झाला नाही तरी त्या रात्रीची ती  घटना अणि त्यामागच्या  षड्यंत्राचे सत्य दाबून टाकण्यात त्याना बऱ्यापैकी यश आलेले आहे. कारण या गोष्टी कधीच पूर्ण उजेडात आलेल्या नाहीत.

दोन वर्षांनी का असेना भारत सरकारने महात्म्याच्या हत्येची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमला. आयोगाने कसून चोकशी देखील केली. पण बाबरी मशिदीचं जबरदस्तीने मंदिरात रूपांतरण करणाऱ्या कटाची वा कट करणाऱ्यांची अशी कुठलीही चौकशी आजतागायत झालेली नाही.  याचा परिणाम असा झाला की, भारतीय राजकारणाची दिशा बदलणारी ही एवढी मोठी घटना, निव्वळ अयोध्येच्या स्थानिक लोकानी केलेला एक उत्स्फूर्त गुन्हा बनून राहिली.  ज्याचा सूत्रधार होता एक स्थानिक साधू, अभिराम दास. मात्र खरे सांगायचे तर गांधी हत्येनंतर हिंदू महासभेने गमावलेली प्रतिमा परत आणण्यासाठी अत्यंत सुसूत्रपणे केलेले हे षड्यंत्र होते ज्यामध्ये हिंदू महासभेचे राष्ट्रीय, प्रांतिक व स्थानिक कार्यकर्ते सहभागी होते.

कालांतराने हिंदू महासभेचे अयोध्येतील ते डावपेच पुसट होत गेले आणि केवळ जेवढे समोर दिसते तेवढयावरच जाहीर वादविवाद होत राहिले. त्या घटनेतून पुढे जो न्यायालयीन खटला सुरू झाला त्यामुळे त्या विध्वंसक रात्र पूर्णच विस्मरणात गेली आणि तो खटला हाच आता धार्मिक कट्टरतावादाच्या राजकारणाचा आधार बनला आहे. दुसरीकडे, त्या षड्यंत्राचा खरा महत्त्वाचा म्हणजेच दडवलेला भाग संशोधनात सर्वात दुर्लक्षित राहिलेला आहे. उदाहरणार्थ, बाबरी मशीद-रामजन्मभूमी विवादाच्या भारत सरकारच्या श्वेतपत्रिकेत या घटनेला फक्त एका परिच्छेदाइतकी जागा देण्यात आली आहे. खरे तर ती घटना कायद्याच्या दृष्टीने या सगळ्याच्या मुळाशी आहे. ०६ डिसेंबर१९९२च्या मशिदीच्या विध्वंसानंतर आलेल्या या कागदपत्रात त्या घटनेविषयी फार काही नमूद झालेले नाही.

“डिसेंबर १९४९ मध्ये वादग्रस्त असणाऱ्या जागेत मूर्ती बसवल्यापासून त्या विवादाचा नवीन अध्याय सुरु झाला. सदर आवार फौजदारी प्रक्रिया कायदा, कलम १४५ अंतर्गत संलग्न करण्यात आले. त्यानंतर लगेचच दिवाणी खटले सुरु झाले. त्या दिवाणी दाव्यातील अंतरिम निर्णयानुसार पक्षकारांवर मूर्ती हलवण्याबाबत वा त्यांच्या पूजाअर्चनेमध्ये दखल देण्याबाबत बंधने घालण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून डिसेंबर १९४९पासून ०६ डिसेंबर १९९२पर्यंत ती इमारत मशीद म्हणून वापरात नव्हती.”

बाबरी मशिदीच्या वादाचा संपूर्ण उगम हा एका अर्थाने त्या इमारतीमध्ये रामाच्या मूर्तीच्या प्रकटण्यातून झाला आणि तरीही त्या २२-२३ डिसेंबर १९४९च्या रात्रीविषयी आपल्याला खूपच कमी माहिती आहे. असे असले तरी हेही तितकेच खरे आहे की ही दरी भरून काढण्याच्या दिशेने मधल्या काळात समकालीन किंवा नवलेखकांकडून यावर फारच थोडे संशोधन झाले. १९८०च्या मध्यात विश्व हिंदू परिषदेने रामजन्मभूमीचा मुद्दा राजकीय मंचावर पुन्हा उचलून धरेपर्यंत हा गहाळ झालेला दुवा दुर्लक्षितच राहिला. आणि तोपर्यंत त्या रात्रीची ती गोष्ट मागे पडून त्याची जागा धार्मिक राजकारणाने आणि जमिनीच्या मालकीहक्काच्या वादंगाने घेतली.

प्रभू राम स्वतःच बाबरी मशीद आवारात प्रकट होण्यापूर्वी मशिदीच्या आवारातील राम चबुतऱ्यावर राम मंदिर बांधण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले होते. मात्र राम मूर्ती आत स्थापित केल्यानंतरच मुस्लिम धर्मस्थळाचे मंदिरात रूपांतर करण्यासाठीची मागणी कायद्याच्या परिघात मूळ धरु शकली. तरीही जेव्हा ती घटना घडली होती तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्या रात्रीच्या घटनेला फारसे महत्त्व दिले नाही. कोणतेही प्रस्थापित वर्तमानपत्र वा मासिक यांनी या घटनेला तितकेसे गांभीर्याने घेतले नाही व तिला योग्य ती प्रसिद्धीही दिली नाही. मात्र असे असले तरी काँग्रेसचे नेते जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, गोविन्द बल्लाळ पंत अणि अक्षय ब्रम्हचारी तसेच हिंदू महासभेचे अध्यक्ष ना. भा. खरे, उपाध्यक्ष वि. घ. देशपांडे, अखिल भारतीय सचिव आणि पक्षाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष महंत दिग्विजय नाथ या सर्वांना या घटनेचे महत्त्व पुरेपूर समजले होते.

‘विरक्ता’ या अयोध्येतील एकमेव स्थानिक साप्ताहिकाने ह्या बातमीला तपशीलवार प्रसिद्धी दिली. त्याचे संपादक, रामगोपाल पांडे ‘शरद’ हे महासभेचे समर्थक म्हणून ओळखले जायचे. विरक्तामध्ये प्रकाशित होणारे लिखाण हे सरळ सरळ हिंदू सांप्रदायिकतावादी असायचे त्यामुळे या घटनेबद्दलही त्यांच्याकडून तटस्थ वार्तांकनाची फार काही अपेक्षा  नव्हतीच.त्यांचे यातील योगदान काही असलेच तर ते म्हणजे त्यांनीचप्रभू रामाच्या मशिदीत प्रकट होण्याच्याया ‘चमत्कारा’चा हळूहळू प्रचार करायला सुरवात केली.

त्यानंतर रामगोपाल पांडे ‘शरद’ यांनी हिंदीतून एक पुस्तिका लिहिली- श्री रामजन्मभूमीचा रक्तरंजित इतिहास. याविषयावर अयोध्येत आत्तापर्यंत सर्वात लोकप्रिय व उपलब्ध असलेले साहित्य हेच आहे. विरक्ता प्रमाणेच ही पुस्तिकादेखील त्या रात्रीच्या घटना म्हणजे महासभेने स्थानिक धार्मिक लोकांना सोबत घेऊन आखलेला एक पूर्वनियोजित डावपेच असे न सांगता तिला‘दिव्य चमत्कार’असेच म्हणते. पुस्तिकेत असे म्हटले आहे की,

‘२३ डिसेंबर १९४९ हा भारतासाठी एक वैभवशाली दिवस होता. त्या दिवशी, जवळ जवळ ४०० वर्षांच्या कालखंडानंतर प्रभू रामाचे जन्मस्थळ मुक्त करण्यात आले. (आदल्या रात्री)ज्या घडामोडी घडल्या, त्यावरून असे म्हणता येऊ शकते की प्रभू रामाने स्वतःच आपले जन्मस्थळ मुक्त केले.’

सांप्रदायिकतावादी हा सिद्धांत त्या काळ्या रात्रीचे रहस्य उलगडण्यासाठी वापरत असताना सरकार, एखादी संस्था किंवा कोणी स्वतंत्र अभ्यासक यापैकी कोणीच तार्किक दृष्टया त्या रात्रीच्या घटनांचा परामर्श घेण्याचा साधा प्रयत्न सुद्धा केला नाही. या दिव्य घटनेतील फोलपणा उघडा करणे ही एक गोष्ट झाली (आणि हे मोठ्या प्रमाणात झाले आहे), पण जे सत्य लपवण्याचा प्रयत्न होत राहिला आहे त्याचा शोध घेऊन ते उलगडून दाखवणे ही वेगळी गोष्ट आहे.

गांधी हत्येप्रमाणे इथेही गोष्टी जेव्हा आणि जशा घडल्या तशा बाहेर आल्या नाहीत याचे एक महत्वाचे कारण आहे तेव्हाचेसत्ता राजकारण.१९४८च्या गांधी हत्येनंतर सरदार वल्लभभाई पटेलांच्या १९५०ला झालेल्या मृत्यूपर्यंत काँग्रेस पक्षाला आंतरिक सत्तासंघर्षाने घेरलेले होते. या आधी देखील असे गटागटांतील वाद झाले असले तरी महात्मा गांधींच्या प्रभावामुळे अणि स्वातंत्र्य चळवळीच्या आदर्श मूल्यांमुळे एक नियंत्रण होते. पण जशी ही नियंत्रणे बाजूला होत गेली तसा काँग्रेसमधील दोन शक्तींमधला वाद चव्हाट्यावर आला. एका बाजूला होते पटेलांच्या नेतृत्वाखाली हिंदू परंपरावादी अणि दुसरीकडे नेहरूंच्या नेतृत्वाखाली धर्मनिरपेक्षतावादी.

गांधी हत्येनंतर लगेचच काँग्रेसमध्ये दोन शक्तिशाली गट निर्माण झाले आणि त्याचं मुख्य कारण होतं संयुक्त प्रांत. गोविन्द बल्लभ पंत हे प्रांताचे मुख्यमंत्री, (संविधानाच्या स्वीकारापूर्वी त्यांना पंतप्रधान म्हटलं जायचं), हे पटेलांचे खंदे समर्थक होते. स्टेट काँग्रेसमधील त्यांना आव्हान देऊ शकणाऱ्या सर्वांना बाजूला करण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेने त्यांची आणि अयोध्येतील पुनरुत्थानवादी घटकांची युती घडवून आणली. त्याचा त्यांनाही फायदा मिळाला आणि महासभेच्या लोकांचेही धाडस वाढले. यातूनच अखेरीस बाबरी मशिदीत मूर्ती ठेवण्याच्या कार्याला बळ मिळाले.

नेहरूंचा प्रभाव कमी करण्याच्या नादात कांग्रेस मधील हिंदू कर्मठांनी उघडपणे पक्षाबाहेरच्या सांप्रदायिकतावादी घटकांकडून राजकीय ताकद उसनी घेण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनी ही राजकीय घसरण रोखण्याचा आणि आपले स्थान परत मिळवण्याचाही प्रयत्न केला, मात्र तेव्हा या सगळ्यामध्ये महासभेने केलेली दुष्कृत्ये उघड करण्यासाठीचा वेळ अणि निर्धार हे दोन्हीही त्यांच्याकडे उरले नव्हते. संयुक्त प्रांतामध्ये याचे प्रमाण अधिक होते कारण तिथे असे चित्र होते की सरकार हिंदू कट्टरवाद्यांना त्यांच्या कृत्यासाठी जाब विचारायचे सोडून त्यांना संरक्षणच देत होते.

१९५०च्या शेवटी जेव्हा ही लढाई नेहरूंनी जिंकली, तेव्हा २२ डिसेंबर १९४९च्या रात्री घडलेल्या घटना कायद्याच्या गदारोळात हरवून गेलेल्या होत्या, देशाची मन:स्थिति बदललेली होती, आणि हिंदू पुनरुत्थानवाद्यांनीही देशाच्या धर्मनिरपेक्ष बांधणीला उघडपणे आव्हान देणे थांबवले होते. २६ जानेवारी १९५०ला झालेल्या संविधानाच्या घोषणेने तर पूर्णच चित्र बदलले. हिंदू महासभेच्या अयोध्या कटात सामील असणारे बरेचसे लोक कालबाह्य ठरत गेले. जरी  त्यातल्या काहींनी कसेबसे आपले महत्त्वाचे स्थान टिकवून ठेवले तरी देशाच्या  धर्मनिरपेक्षतेचा समतोल बिघडवण्याची त्यांची कुवत खूपच मर्यादित होत गेली आणि त्यांचा त्या रात्रीशी असणारा संबंध हा आधुनिक भारताच्या इतिहासातला निखळलेला दुवा बनून राहिला.

(सूचना: प्रस्तुत उतारा प्रथम ०६ डिसेंबर २०१७ ला प्रकाशित करण्यात आला होता.)

लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.

अनुवाद: मृदगंधा दीक्षित

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: