प. बंगालमध्ये मतदार दुरावल्याची माकपची कबुली

प. बंगालमध्ये मतदार दुरावल्याची माकपची कबुली

भाजपच्या कडव्या हिंदुत्वाला रोखण्यासाठी देशातल्या सर्व सेक्युलर पक्षांमध्ये एकजूट दिसली नाही. हिंदुत्व व धर्मनिरपेक्षता हा संघर्ष जोरकसपणे लढण्यात सर्वच विरोधी पक्ष कमी पडले असे माकपचे म्हणणे आहे.

आपला मोठ्या प्रमाणावर हक्काचा मतदार दुरावल्याने २०१९च्या लोकसभा निवडणुकांत प. बंगालमध्ये पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याची कबुली सोमवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिली. पण हा मतदार भाजपकडे गेला का यावर माकपचे अधिकृत भाष्य नाही. उलट भाजपच्या कट्‌टर हिंदुत्वाला काँग्रेसने मवाळ हिंदुत्व म्हणून दिलेले उत्तर सर्व सेक्युलर पक्षांना महागात पडले असे माकपचे मत पडले.

माकपचा जनाधार घटला तर तृणमूल, भाजपचा वाढला

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प. बंगालमध्ये माकपचा एकही खासदार निवडून आला नाही. २०१४मध्ये माकपचे दोन खासदार या राज्यात निवडून आले होते व त्यावेळी २९.९५ टक्के मते माकपला होती. यंदा मात्र ही टक्केवारी केवळ ८ टक्क्यांवर घसरली आहे. पण २०१४च्या निवडणुकीत १७.०२ टक्के मते कमावलेल्या भाजपने २०१९मध्ये ४०.२५ टक्क्यांची मते मिळवत आपली टक्केवारी २३ टक्क्यांनी वाढवली व दोन वरून १७ खासदारांवर उडी मारली. त्याचबरोबर २०१४मध्ये तृणमूल काँग्रेसला ३९.७९ टक्के मिळाली होती व २०१९मध्ये ही आकडेवारी ४३.२८ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले. थोडक्यात तृणमूल भाजपची टक्केवारी वाढली याचे कारण डाव्यांचा मतदार मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळला अशी माहिती अनेक राजकीय विश्लेषकांच्या विश्लेषणातून बाहेर आली होती. पण भाजपने आपली मते पळवली यावर माकपमधील ज्येष्ठ नेते बोलताना दिसत नाही. पक्षाची नवी दिल्लीत नुकतीच बैठक झाली. पण या बैठकीत आपली मते भाजपने खेचून घेतली यावर नेत्यांनी सहमती दाखवली नाही. .

सेक्युलर पक्षांमध्ये एकजुटीचा अभाव

भाजपच्या कडव्या हिंदुत्वाला रोखण्यासाठी देशातल्या सर्व सेक्युलर पक्षांमध्ये एकजूट दिसली नाही. हिंदुत्व व धर्मनिरपेक्षता हा संघर्ष जोरकसपणे लढण्यात सर्वच विरोधी पक्ष कमी पडले असे पक्षाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मतदारसंघांची फेररचना व निवडणूक सुधारणा आवश्यक असल्याचेही पक्षाने म्हटले आहे.

. बंगाल त्रिपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. हा हिंसाचार रोखण्यात निवडणूक आयोगाला अपयश आले. या निवडणूका शांततेत खुल्या वातावरणात होईल असे आश्वासन नागरिकांना आयोग देऊ शकले नाहीत, असाही आरोप पक्षाने केला.

केरळमधील विजय दिलासादायक

प. बंगालच्या तुलनेत केरळमध्ये भाजपच्या कडव्या हिंदुत्वाला रोखण्यात सेक्युलर पक्षांच्या एकजुटीमुळे यश मिळाल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. या राज्यात धर्मनिरपेक्ष मूल्याचे समर्थन करणारे नागरिक अल्पसंख्याक भाजपच्या विरोधात उभे राहिले, असेही निरीक्षण मांडण्यात आले. शबरीमला प्रवेश प्रकरणात केरळमधील डाव्या लोकशाही आघाडी सरकारने योग्य पावले उचलली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन राज्य सरकारने केले असे मत माकपने व्यक्त केले.

पराभवाची मीमांसा करू

प. बंगाल व त्रिपुरातील दारुण पराभवाची चिकित्सा करू व आपला हक्काचा मतदार का सोडून गेला याची खोलवर जाऊन कारणे शोधली जातील, असेही पक्षाने म्हटले आहे.

मूळ बातमी

COMMENTS