बासूदांचा रत्नदीप

बासूदांचा रत्नदीप

माणसाचा आतला आवाज समजायला काहीच मार्ग नाही. आतला आवाज आतच राहिला तर अस्वस्थता वाढते. वाढीला लागलेल्या अस्वस्थतेच्या झाडाला वेदनांचे अंकुर फुटतात. फुटलेल्या अंकुरातून निर्माण होतो गुंता.

मजरूह सुल्तानपुरी: दिलदार काळजाचा विद्रोही कवी
पत्रकारांचे ट्विट काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या देशांमध्ये भारत आघाडीवर
लॉकडाऊननंतर ३७८ श्रमिकांचा मृत्यू

माणसाचा आतला आवाज समजायला काहीच मार्ग नाही. आतला आवाज आतच राहिला तर अस्वस्थता वाढते. वाढीला लागलेल्या अस्वस्थतेच्या झाडाला वेदनांचे अंकुर फुटतात. फुटलेल्या अंकुरातून निर्माण होतो गुंता. गुंता सुटण्याऐवजी वाढत जातो. मग जाळ्यात सापडलेल्या किटकासारखी त्याची अवस्था होते. स्थिती होते. पैशाचा, मालमत्तेचा मोह वाढला की सगळे  जीवन जळून जाते. बेचिराख होते. आगीतून फुफाट्यात पडण्याची  घाई होणे म्हणजे चंचल मनाशी दोस्ती करणे. चालत्या गाडीला खीळ बसणे हे ओघाने आलेच.

सत् आणि असत् प्रवृत्तीचा संघर्ष आणि त्यात होरपळून निघालेल्या जीवांची कहाणी म्हणजे बासूदांचा ‘रत्नदीप’ चित्रपट. तसा कलात्मक. काहीसा गूढ कथेच्या अंगाने जाणारा. चित्रपटात गाणी मोजकीच पण सार्‍या व्यक्तिमत्त्वाला उठाव देणारी. आशा भोसले आणि किशोरच्या आवाजातील शब्दाशब्दाला अर्थ देऊन अख्ख्या जीवनाचा सार सांगणारी! गिरीश कर्नाड, हेमामालिनी, ए. के. हनगल हे त्यातील चेहरे. बाकीचे नट असून-नसून सारखे. संपूर्ण कथावस्तू गिरीश कर्नाड आणि हेमामालिनी या दोघांच्या भोवती गरगरत राहणारी असल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची खुबी मोठ्या कुशलतेने बासुदांनी वापरलेली आहे. स्वार्थी, प्रेमळ, प्रामाणिक, अप्रमाणिक, निष्ठावान, संस्कृतिप्रिय माणसाची रूपे एकात एक आणि आतल्या आत कशी आदळत जातात याची सुरेख गुंफण म्हणजे ‘रत्नदीप’.

‘रत्नदीप’ असे शीर्षक दिसले, की एखादी रहस्यकथा किंवा गूढकथा असावी असे वाटते. स्वाभाविक आहे, पण तसे नाही. ‘रत्नदीप’चे सगळे कथानक साधे आहे. गिरीश कर्नाड (मदन) जंगलातून जाणार्‍या रेल्वेमार्गावरील एका स्थानकावर स्टेशनमास्तर असतो. खेड्यातील वातावरणाचा कंटाळा येतो म्हणून महिना दीड महिना रजा मिळवितो. बदली माणूस येत नाही म्हणून जाणे लांबते. ही आहे ‘रत्नदीप’ची सुरुवात. (गिरीश कर्नाड या स्टेशनमास्तरचे सुटीवर जाणे लांबले नसते तर सिनेमाची सुरुवात आणि शेवटही तिथे झाला असता ना !) हे आखडणे आणि लांबवणे कसे आणि किती सफाईदारपणे दिग्दर्शक करतो, त्यावरच चित्रपटाच्या यशापयशाचा खेळ अवलंबून असतो. त्याचे जाणे कशासाठी लांबवले जाते याची उकल व्हायला फार काळ लागत नाही. गिरीश कर्नाड ज्या गावी स्टेशनमास्तर असतो, त्या गावी आगीनगाडी धूर ओकीत येते आणि आचके देत थांबते. स्टेशनमास्तर गिरीश कर्नाड आपल्या बदली कोण आले, असे विचारण्यासाठी गार्डजवळ जाण्याच्या आधी गार्ड त्याला सांगतो, गाडीत एक (पॅसेंजर) प्रवासी मरून पडला आहे. त्याला उतरून घ्या. पोलीस ठाणे नाही. मग हे सारे कुणाला सांगून करायचे ? स्टेशनमास्तर या नात्याने तो शेजारच्या मोठ्या गावी फोन करून पोलिस खात्याला वर्दी देतो. रेल्वेच्या गतीला विरोध नको म्हणून प्रवाशाचे प्रेत उचलून घेतले जाते. प्रवाशाजवळ कमंडलू, खडावा असल्यामुळे तो साधू आहे एवढे कळते. पुढे पोलिस येतात. (प्रेताचे नेमके काय करतात हे मात्र कळत नाही.) नेहमी बेवारस प्रेताचे होते तेच झाले असणार ! पुढे मग या साधूमहाराजाचा चेहरा अगदी गिरीश कर्नाडसारखा हुबेहुब असतो. (कदाचित असे काहीतरी होणार असावे म्हणूनच गिरीश कर्नाडने दाढी ठेवलेली असावी.) पोलिस येतात. प्रेत ताब्यात घेतात. (आता कथानक तर पुढे सरकले पाहिजे नाही का ?) स्टेशनमास्तर मदनसारखा हुबेहुब असणार्‍या साधूचे सामान पोलिस ताब्यात घेतात आणि नेमके त्याचवेळी रोजनिशी स्टेशनमास्तरच्या खोलीत विसरून जातात. (आहे की नाही गंमत !) असे काही नाही केले तर पोलिस खाते कसले हेच कदाचित दिग्दर्शकाला दाखवायचे असले पाहिजे. (हे मत मात्र आमचे बरं का !) कारण, चित्रपट बासूदा यांचा आहे ना, म्हणून! ते असो. विसरून राहिलेल्या साधूमहाराजांच्या रोजीनिशीवरून स्टेशनमास्तर मदनला कळते ते हे, की साधू दुसरा-तिसरा कुणी नसून धनवान ठाकुरांचा एकुलता एक बेटा आहे. (धनवान म्हटले की एकच मुलगा असला पाहिजे. बासूदांच्या जागी दुसरा कुणी असता तर कुटुंबनियोजनाचे एखादे पारितोषिक त्या श्रीमंत ठाकुराला दिलेच असते.) स्टेशनमास्तर मदन म्हणजे गिरीश कर्नाड मालमत्ता आणि धनाच्या लोभाने सारखेपणाचा फायदा घेण्याचे ठरवून गावी येतो. गावात, घरात छोटे ठाकूर परत आले म्हणून आनंद होतो. कालचा स्टेशनमास्तर छोटा ठाकूर बनून येतो खरा. पण ठाकुरांच्या महालातील विश्वच वेगळे असते. सात वर्षापूर्वी साधू बनण्यासाठी गेलेला आपला मुलगा परत आला म्हणून आईला (सुलोचना), पत्नीला (हेमामालिनी) आनंद होतो. छोट्या ठाकुराच्या बहिणीचे लग्न झालेले असते. जावई, घरजावई म्हणून आलेला असतो. अर्थात ही सारी मानवाच्या विविध प्रवृत्ती-अपप्रवृत्ती दाखविण्यासाठी वापरलेली व्यक्तिमत्त्वे आहेत. साधू बनून मरण पावलेल्या ठाकूरच्या पत्नीला एक मुलगाही असतो. ठाकूर म्हटले की गावचा देव. उपयोगी पडणारा माणूस वगैरे वगैरे सारे आपोआपच येते, येऊ बापडे !

‘आपण तोतये ठाकूर आहोत’ हा आतला आवाज स्टेशनमास्तरला सुखाने झोपू देत नाही. रोजनिशीत लिहून ठेवलेल्या अनेक नोंदीमुळे त्याचे खोटेपण, हे खरेपण भासविण्यासाठी उपयोगी पडते. पण सात वर्षांच्या विरहानंतर ठाकुरणीला हवा असणारा पतिस्पर्श देताना मात्र त्याची बेचैनी वाढते. पत्नीच्या स्पर्शाच्याही काही खुणा असतील. सवयी असतील. रतिसुखापूर्वी आणि आधी वागण्या-बोलण्यातील ढबी असतील, त्याची नोंद रोजनिशीत कशी असणार? आई, दिवाणजी, गावातील माणसांवर तर मात केली. पण ठाकूर पत्नीचे काय? ठाकूर पत्नीच्या नागवेलीच्या पानाचा विडा देतानाच्या पद्धतीतून तो सहीसलामत सुटतो. (गाडीच्या अपघातून वाचविण्यासाठी माणसांना बाहेर पडता येण्यासाठी काही खास खिडक्या ठेवलेल्या असतात. तशाच प्रकारातून हे घडते.)

ठाकुराची पत्नी आपली मानण्यासाठी स्टेशनमास्तरचे मन तयार होत नाही. (इतकी नखशिखांत देखणी बाई पाहिल्यानंतर नायकाच्या तोंडाला पाणी सुटत नाही, मग हा हिंदी चित्रपट कसला?) शरीर स्पर्श लांबवण्यासाठी तो व्रताचा उल्लेख करतो. ठाकुरबाईला आतला आवाज सांगत असतो, की हा माणूस पूर्वी गेला तसा पुन्हा जाईल. तो जाऊ नये यासाठी जे काही करता येईल ते ती करते. एक पोलिस अधिकारी स्वत:च्या कामासाठी ठाकुराच्या घरी येतो. त्यावेळी स्टेशनमास्तरला घाम फुटतो. त्याला वाटत असते, आपले भांडे फुटले. आता काही खरे नाही. असे काही सांगण्यासाठी दाखवलेले छोटे छोटे प्रसंग चित्रपटाला उपकारकच ठरले आहेत. छोट्या ठाकुराची पत्नी (हेमामालिनी) आपल्या सासूला म्हणते की ‘ते’ निघून जातील असे माझे मन वारंवार सांगत आहे. तेव्हा धर्माशी नाते जोडून जप-जाप्य आणि पूजा अर्चा करणारी सासू एक रत्नदीप काढून देते आणि सांगते, ‘या रत्नदीपानं पतिदेवांची पूजा कर ! तो तुला सोडून जाणार नाही.’ एका रात्री पूजा करण्याचा बेत ठरतो. ती स्टेशनमास्तरला कुंकू लावते. त्या वेळी दोघांच्याही मनातला संघर्ष अतिशय गतिमान होतो. तिच्या मनातील पतीविषयी असलेला सद्भाव आणि याच्या मनातील ‘परस्त्री’ विषयी असलेला आदर, अभिव्यक्त होत जातो. दोघे जेव्हा समोरासमोर उभे ठाकतात. तेव्हा प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते. स्टेशनमास्तर खरेपणा लपवून ठेवून तिला आपल्या बाहुपाशात घेईल, असे प्रेक्षकांना वाटत असतानाच या आशयाचे शब्द कानावर पडतात. “मी केलेल्या या पापाची सत्य कहाणी खरी आहे. खरी असूनही तुला ती पटली तर मी तुला पत्नी म्हणून जवळ घेईन. मी ठाकूर नसून तुझ्या पतीसारखा दिसणारा मदन नावाचा स्टेशनमास्तर आहे. तुझा नवरा मरण पावला. तो मेला याचा फायदा घेऊन मी येथे आलो आहे.” त्या क्षणी रत्नदीप पेट घेतो आणि त्याचबरोबर तिच्या नवर्‍याचाही फोटो…

छोटा ठाकूर म्हणून आलेला हा माणूस मदन नावाचा स्टेशनमास्तर आहे, हे जेव्हा दिवाणजीला (ए. के. हनगल) कळते, तेव्हा ते मातोश्रीला सांगतात. सूनबाईला कलंकित करणार्‍या या तोतयाला जगातून नष्ट केले पाहिजे. त्याला मारण्याची तयारी होते. ही गोष्ट छोट्या ठाकूराच्या पत्नीला कळते. ती दिवाणजीला आणि सासूबाईला म्हणते, ‘त्याला’  माफ करा. कारण त्याने मला स्पर्श केलेला नाही. मग त्याला घराबाहेर जावे लागते. तो निघतो, तो जात असताना छोट्या ठाकुराचे पोर ‘पिताजी’ म्हणून ओरडते. गच्चीत उभी असलेली ती पतिव्रता कोसळते आणि तिथेच मरते. चित्रपट इथेच संपला. तरी तिच्या प्रेताला अग्नी दिल्यावर तो दर्शन घ्यायला जातो तेव्हा दहनभूमीतून आवाज येतो, ‘मला शिवू नको, स्पर्श करू नको.’ हे मात्र फारच झाले बुवा. ते बासूदांच्या चित्रपटाला मात्र शोभत नाही.

महावीर जोंधळे, हे लेखक आणि ज्येष्ठ संपादक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0