कोरोनाची लाट ओसरताच राज्ये गाफील राहिली

कोरोनाची लाट ओसरताच राज्ये गाफील राहिली

नवी दिल्लीः संपूर्ण देश कोरोना विषाणू महासाथीच्या दुसर्या लाटेचा मुकाबला करत आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर, बेड्स यांची अभूतपूर्व टंचाई जाणवत आहे. अनेक रुग्णांना या पैकी कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

कोविडची ही दुसरी लाट अपेक्षित होती पण हा धोका देशातील अनेक राज्यांनी लक्षात घेतला नाही, परिणामी या राज्यांनी अनेक कोविड सेंटर बंद करण्याचा आततायी निर्णय घेतला. ही कोविड सेंटर बंद केल्याने कोरोना लाटेचा मुकाबला या राज्यांना समर्थपणे करता आलेला नाही.

दिल्ली

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या वर्षी दिल्लीत चार आपतकालिन कोविड रुग्णालये उभे करण्यात आली होती. पण फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रतिदिवशी २०० हून कमी आढळत असल्याचे लक्षात आल्याने राज्य सरकारने ही चारही रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेतला. या चारपैकी एक रुग्णालय आयटीबीपीचे छतरपूर येथे सुरू होते. या रुग्णालयात १० हजार रुग्णांची क्षमता होती त्यापैकी १ हजार बेड हे ऑक्सिजन पुरवणारे होते. सध्या दिल्लीत प्रतीदिन २५ हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर छतरपूर येथे रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश

कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपण राज्यात ५०३ कोविड रुग्णालय सुरू केल्याचा दावा उ. प्रदेश सरकारचा होता. या रुग्णालयांत एकूण बेड दीड लाख होते. पण फेब्रुवारीत कोरोना रुग्णालयांची संख्या ८३ इतकी कमी करण्यात आली. यामध्ये केवळ १७ हजार बेड आहेत. त्या मुळे राज्याची आरोग्य व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. सरकारने बंद केलेल्या रुग्णालयांमधील २५ रुग्णालयांत व्हेंटिलेटर, आयसीयू, डायलेसिसच्या व्यवस्था होत्या. ७५ रुग्णालयांत ऑक्सिजन सुविधा व व्हेंटिलेटरची सुविधा होत्या. ४०० रुग्णालयांत ४८ तास पुरेल इतकी ऑक्सिजनची सुविधा आहे.

आता राज्याने ४५ रुग्णालये सुरू केली आहेत. राज्यात महाराष्ट्रानंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत असून रविवारी राज्यात ३८ हजाराहून अधिक रुग्ण होते.

कर्नाटक

कोरोनाच्या पहिल्या व दुसर्या लाटेच्या दरम्यान बंगळुरूमध्ये सरकारी रुग्णालयांत ११७ आयसीयू व्हेंटिलेटर बेड होते. त्या पैकी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयांत ४७ व १३ सरकारी रुग्णालयांत ७० बेड आहेत. आता केंद्राच्या मदतीने बेडची संख्या ३०० करण्याचे प्रयत्न आहेत पण ते पूर्णत्वास आलेले नाहीत.

महाराष्ट्र

पुण्यात ८०० बेडचे रुग्णालय बंद करण्यात आले होते. ते आता मार्चमध्ये पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

झारखंड

रांची येथे राज्यातील सर्वात मोठे राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये एकही हाय रेझोल्युशन सीटी स्कॅन मशीन नाही. काही दिवसांपूर्वी झारखंड उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर राज्य सरकारने हे मशीन खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक कोरोना सेंटरची घोषणा केली होती. तसेच रांची, धनबाद, बोकारो, जमशेदपूर येथे १२ खासगी रुग्णालयांत कोविड-१९सोयी युक्त रुग्णालये आहेत.

बिहार

बिहारमधील परिस्थिती गंभीर आहे. राज्यांत ३८ पैकी केवळ १० जिल्ह्यांत व्हेंटिलेटर आहेत. राज्यात डॉक्टर, रुग्णालये, आरोग्य सेवक, मेडिकल सोयी यांची प्रचंड कमतरता आहे. बिहारमध्ये ५ हजाराहून अधिक वैद्यकीय पदे रिक्त आहेत.

मूळ बातमी

COMMENTS