तत्त्वचिंतनाचे शत्रू

तत्त्वचिंतनाचे शत्रू

बर्ट्रंड रसेल दर्शन भाग १५ - ग्रीकांनी बुद्धिमत्ता आणि प्रज्ञान (Intellect आणि wisdom) यात फरक केला आणि ‘प्रज्ञानाचे प्रेम म्हणजे तत्त्वज्ञान’ (Philosophy means Love Of Wisdom) अशी व्याख्या केली. आता, ‘प्रज्ञानाचे प्रेम’ असे म्हणता येत असेल तर 'अज्ञानाचे प्रेम', 'मूर्खपणाचे प्रेम', किंवा 'शहाणपणाचे तिरस्कर्ते' असे काही असते काय? Philosophy च्या विरुद्ध अर्थाची (The Converse of Philosophy) संज्ञा कोणती?

“तो सदैव बोलतच राहिला! ” : रसेलची तत्त्वज्ञानाकडे वाटचाल
तत्त्वचिंतनाचे शत्रू
बर्ट्रंड रसेलचा लेखनसंसार

लेखमालिकेच्या प्रारंभापासून बर्ट्रंड रसेलचे चिंतनविश्व समजून घेण्यासाठी आपण ‘तत्त्वज्ञान’ (‘Philosophy’) या विषयाचा थोडक्यात परिचय करून घेत आहोत. ग्रीकांनी बुद्धिमत्ता आणि प्रज्ञान (Intellect आणि wisdom) यात फरक केला आणि ‘प्रज्ञानाचे प्रेम म्हणजे तत्त्वज्ञान’ (Philosophy means Love Of Wisdom) अशी व्याख्या केली. आता, ‘प्रज्ञानाचे प्रेम’ असे म्हणता येत असेल तर  ‘अज्ञानाचे प्रेम’, ‘मूर्खपणाचे प्रेम’, किंवा ‘शहाणपणाचे तिरस्कर्ते’ असे काही असते काय? Philosophy च्या विरुद्ध अर्थाची (The Converse of Philosophy) संज्ञा कोणती? The Converse of Philosophy अशा स्वरुपाची संज्ञा किंवा संकल्पना असते का? की ती केवळ कल्पनाच आहे ? तसा विचार कोणी केला आहे काय ?  असा प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे.

हा प्रश्न अतिशय प्राचीन आहे. त्यात दोन मुख्य संकल्पना मांडण्यात आल्या आहेत. ‘पूर्वार्ध’ या प्रस्तुतच्या भागात त्यातील एका संकल्पनेचे स्वरूप आपण पाहू.

The Converse of Philosophy अशा स्वरुपाच्या संकल्पनेचा विचार प्राचीन काळापासून होत आला आहे. आणि आजही तो होत आहे. ते समजून घेण्यासाठी ज्यांनी ‘तत्त्वज्ञान’ निर्माण केले आहे, त्या ‘संस्कृतीं’ कोणत्या आहेत, त्यांना ‘संस्कृती’ का म्हणावे, हे अतिशय थोडक्यात यासाठी ‘सभ्यता’ (Civilizations) आणि ‘संस्कृती’ (Culture) यात फरक करणे आवश्यक आहे.  हा फरक अनेक बाजूंनी आणि अनेक इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, विज्ञान, धर्म इत्यादी सामाजिक विज्ञानांच्या परिप्रेक्ष्यातून करता येतो. मी येथे तत्त्वज्ञानात्मक परिप्रेक्ष्यातून अतिशय संक्षेपात फरक करतो.

सभ्यता आणि संस्कृती  

‘प्राचीन’ म्हणता येतील अशा बऱ्याच ‘सभ्यता’ (Civilizations) जगात आहेत, हे खरे असले तरी ज्यांना ‘संस्कृती’ (Culture) म्हणता येते, त्या केवळ तीनच संस्कृती जगात आहेत. ‘सभ्यता’ (Civilizations) ही रुळलेली-रुजलेली जीवनरीत असून ‘संस्कृती’ (Culture) हा सातत्याने नवा शोध असतो. सभ्यतेतूनच संस्कृतीचा उद्भव होतो. ‘संस्कृती’ हा ‘सभ्यते’चा सतत उद्भव होत जाणारा हिस्सा असतो. एका अर्थाने ‘सभ्यता’ हा भूतकाळ आणि ‘संस्कृती’ हा सातत्याने वास्तवात येणारा, वर्तमानात रूपांतरित होत असलेला भविष्यकाळ असतो. काळप्रवाह जसा अखंड आहे, तसेच हे ‘सभ्यतेचे संस्कृतीत होणारे रुपांतरण अखंड असते.

भारतीय, ग्रीक आणि चिनी या तीन प्राचीन सभ्यता आहेत, पण त्याच खऱ्या अर्थाने ‘संस्कृती’ ही आहेत. या तिन्हीं सभ्यतांनी साहित्य, संगीत, कला, विज्ञान-तंत्रज्ञान आणि धर्म या रुपात ‘मानवी संस्कृती’ची निर्मिती केली. या सभ्यतांनी ‘संस्कृती’ केवळ रुजविली, असे नव्हे तर संस्कृतीचे अमूर्त आणि नियंत्रक सारतत्त्व ‘तत्त्वज्ञान’ रुपात अचूकपणे शब्दबद्ध केले. म्हणूनच त्यांना ‘संस्कृती’ म्हणता येते. आणि वस्तुतः या तिन्हींचे तत्त्वज्ञानही आता ‘सभ्यते’चे ‘रचनात्मक अंग’ बनले असून नव्या ‘संस्कृति’ची गरज निर्माण झाली आहे. म्हणजेच विद्यमान काळात ‘नव्या धर्म व तत्त्वज्ञान’ यांची गरज आहे. असा प्रयत्न ग्रीक, पर्यायाने पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञानात गेल्या ७० वर्षांत गंभीरतेने चालू आहे. काही प्रमाणात चिनी व भारतीय चिंतनविश्वातही तो संथ गतीने आकार धारण करतो आहे, पण आवश्यक गांभीर्य अभावी त्या प्रयत्नांना वेग येत नाही. अर्थात हा स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे.

तत्त्वज्ञानाचा परिचय करवून घेताना किंवा देताना जागतिक पातळीवर ग्रीक-पाश्चात्य तत्त्वज्ञान, पौर्वात्य तत्त्वज्ञान (भारतीय दर्शने आणि चिनी, कोरियन, जपानी तत्त्वज्ञाने) आणि प्रमुख धर्मांचे ‘धार्मिक तत्त्वज्ञान’ म्हणून इस्लामी, ख्रिस्ती, ज्यू इत्यादी धर्मतत्त्वांनी प्रभावित झालेल्या परंपरा गृहीत धरल्या जातात. इस्लामी, ख्रिस्ती, ज्यू परंपरा मुख्यतः धार्मिक तत्त्वज्ञाने कथित करतात, निदान त्यांच्याविषयी तसा समज आहे. त्यांच्यातील ‘तत्त्वज्ञान’ मांडण्याचे प्रयत्न गेल्या काही दशकात होत आहेत.

तथापि भारतीय तत्त्वज्ञान, ग्रीक-पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि चिनी तत्त्वज्ञान तीन वैचारिक परंपरांनाच मुख्य ‘तात्त्विक परंपरा’ म्हणून मान्यता आहे. ज्यांना अस्सल व सत्यार्थाने ‘तत्त्वज्ञान’ हा दर्जा दिला जाऊ शकतो, अशी ही तीन तत्त्वज्ञाने मानवी इतिहासातील काटेकोर अर्थाने ‘तत्त्वज्ञाने’ आहेत.

या तिन्ही तत्त्वज्ञान परंपरांनी जसा ‘तत्त्वचिंतन’ संकल्पनेचा विचार केला, तसा त्यांनी ‘तत्त्वचिंतनाच्या शत्रू’ चाही विचार केला.

“Philosophy”च्या विरुद्ध अर्थाची संज्ञा कोणती ? या प्रश्नाची चर्चा प्राचीन काळापासून तिन्ही तत्त्वज्ञान परंपरांनी केली. या संदर्भात मते त्यांची अनुक्रमे पाहू:

(अ) ग्रीक-पाश्चात्य परंपरेत दोन संकल्पना मांडण्यात आल्या. पहिली ‘Misology’ आणि दुसरी ‘Misosophy’. ‘Misology’ म्हणजे ‘तर्काशी शत्रूत्व’ किंवा ‘तर्कशास्त्राशी शत्रूत्व’. ‘Misosophy’ म्हणजे ‘तत्त्वचिंतनाशी शत्रूत्व’.

(ब) भारतीय तत्त्वज्ञानात ‘तत्त्वज्ञान’ संज्ञेची मूळ संज्ञा आहे ‘दर्शन’.  तिच्या विरुद्ध म्हणजे ‘दर्शन’च्या विरुद्ध अर्थाची ‘अदर्शन’ ही संकल्पना मांडली गेली. त्याशिवाय थेट ‘तर्क करणे’ या कृतीला विरोध करणारा विचार मांडण्यात आला.

(क) चिनी तत्त्वज्ञानात ‘मूर्खपणा’ची लक्षणे स्पष्ट करण्यात आली आहेत.

 

(अ) ग्रीक-पाश्चात्य परंपरेतील दोन संकल्पना

Misology आणि Misosophy

Misology’ ही प्राचीन ग्रीक-पाश्चात्य तात्त्विक परंपरेतील Philosophy या संज्ञेच्या विरुद्ध अर्थाची मूलभूत संज्ञा आणि संकल्पना आहे. तिचा आधार घेऊन नंतरच्या काळात म्हणजे अठराव्या शतकात पाश्चात्य तत्त्वज्ञान परंपरेत ‘Misosophy’ ही नवी संकल्पना मांडण्यात आली.

आधुनिक काळात, गेल्या काही दशकांमध्ये ‘Phobosphy’, Phobosopher, Sophophobia, आणि Philomoria (love of foolishness) असे नवे शब्द आणि नव्या संकल्पनाही घडविण्यात आल्या. विद्यमान चर्चाविश्वात या संकल्पना अजून सुस्पष्टपणे आरेखित झाल्या नसल्या तरी त्या काही प्रमाणात रुळल्या आहेत. त्यांचेही स्वरूप आपण पाहू.

प्रथम आपण ‘Misology’ ही संकल्पनेचे स्वरूप पाहू.

(१) Misology

Misology म्हणजे तर्काचा तिरस्कार, द्वेष, तिटकारा. misologic किंवा misologia या मूळ ग्रीक शब्दापासून Misology ही संज्ञा बनते. misein किंवा miseô  चा अर्थ तिरस्कार, द्वेष असा होतो. त्याला logia हा उपसर्ग लागून Misology ही संज्ञा बनते. Misology म्हणजे कल्पनांचा किंवा तर्काचा अथवा तार्किक युक्तिवादाचा द्वेष किंवा तिरस्कार करणे. आणि Misologists म्हणजे तार्किक युक्तिवादाचा द्वेषी, तिरस्कर्ता, तार्किक युक्तिवादाचा शत्रू.

Misology म्हणजे तर्काशी शत्रूत्व करणे, याचे किमान अर्थ असे: 

  • तर्कशुद्ध, तार्किक/ तात्त्विक बोलण्याचा द्वेष करणे.
  • तात्त्विक युक्तिवाद तर्कावर आधारित असतात, म्हणून तात्त्विक युक्तिवादांचा द्वेष करणे, त्यांच्याशी शत्रुत्व करणे.
  • पर्यायाने तत्त्वज्ञानाचा/ तत्त्वचिंतनाचा द्वेष करणे.
  • पर्यायाने तार्किक-तात्त्विक युक्तिवाद करणाऱ्यांचाच द्वेष करणे.
  • स्वतः तर्कशुद्ध, तार्किक, बुद्धीला पटणारे असे काहीही न बोलणे.
  • आपल्या मनात येईल तसे, वाट्टेल तसे, भावनिक प्रभावाखाली बोलणे.

Misologue असाही एक शब्द प्रचलित आहे. Dialogue च्या विरुद्ध अर्थाने Misologue असा शब्द बनवला गेला असावा. Dialogue म्हणजे संवाद आणि Misologue म्हणजे विसंवाद.

Misology या शब्दापासून त्याने psilology म्हणजे ‘निरर्थक बडबडीवर प्रेम करणे’ असाही एक नवा शब्द बनवला आहे.

Misology शब्दाचा वापर   

Misology ही संज्ञा नेहमीच्या वापरत नसते. प्लेटोने (इ.स.पूर्व ४२७ ते इ.स.पूर्व ३४७)  Misology किंवा Misologists हा शब्द त्याच्या संवादात एका संकल्पनेच्या रुपात स्पष्ट केली. नंतर मात्र तो जवळपास २२०० वर्षे हा शब्द वापरात नव्हता. प्लेटोनंतर अठराव्या शतकात जर्मन तत्त्ववेत्ता इमान्युएल कान्ट (१७२४-१८०४) याने प्रथम ती संकल्पना उपयोगात आणली. त्यावेळी कान्टने Misologie हा जर्मन भाषेतील शब्द वापरला. त्याच्या Critique of Pure Reason and Foundations of Metaphysics of Morals, Chapters I, AA395) या ग्रंथात १७८० साली कान्टने “तर्काचा व प्रज्ञानाचा तिरस्कार” (“hating argument”) या अर्थाने Misology शब्दाचा वापर केला.

इंग्लिश भाषेत १८२० साली Misology या शब्दाचा समावेश झाला, पण पहिला इंग्लिश भाषेतील वापर १८३३ साली झाला, असे डेव्हिड व्हाईट (David A. White) या लेखकाचे मत आहे. विसाव्या शतकात गिल्लेस देल्यूज (Gilles Deleuze १९२५-१९९५) या फ्रेंच तत्त्ववेत्त्याने त्याच्या Difference and Repetition आणि What is Philosophy या ग्रंथात हा शब्द तात्त्विक आणि साहित्यिक संदर्भात व साहित्यिक अर्थाने वापरात आणला. आता तो सहजपणे तत्त्वज्ञानात्मक आणि साहित्यिक लेखनात वापरला जातो. अतार्किक बोलण्याला Misologue असेही म्हटले जाते.

(२) Misosophy

आता आपण दुसऱ्या Misosophy ह्या संकल्पनेचे स्वरूप पाहू. Misology आणि Philosophy यांच्या संधीतून Misosophy ही संज्ञा बनते. जसे ‘Misology’ संज्ञेमधील logy चे मूळ logia (म्हणजे तर्कशास्त्र) मध्ये आहे, तसे ‘Misosophy’ संज्ञेमध्ये sophy चे मूळ Sophia (ज्ञान/तत्त्वज्ञान/तत्त्वचिंतन) मध्ये आहे. म्हणून ‘Misosophy’ म्हणजे ज्ञान/तत्त्वज्ञान/तत्त्वचिंतन यांचा द्वेष/तिरस्कार.

‘Misology’ म्हणजे ‘तर्कशास्त्राशी शत्रूत्व’ किंवा ‘तर्काशी शत्रूत्व’ या अर्थाप्रमाणे असल्यामुळे ‘Misosophy’ म्हणजे ‘तत्त्वचिंतनाशी शत्रूत्व’ असे म्हणता येते. थोडक्यात, Misosophy चा अर्थ “प्रज्ञानाचा द्वेष”, शहाणपणाचा तिरस्कार आणि Misosophist म्हणजे ज्ञानाचा तिरस्कर्ता आणि Misosopher = Lover of  Foolishness..!!

पहिला उपयोग :

Misosophy ही संकल्पना अठराव्या शतकात तत्त्वज्ञानाच्या चर्चेत उपयोगात आणली गेली. Misosophy संज्ञेचा पहिला ज्ञात उपयोग बर्ट्रांड कॅपमार्टिन डी चॉपी (Bertrand Capmartin de Chaupy १७२० ते १७९८) या फ्रेंच लेखक आणि पुराणवस्तुसंशोधक-शास्त्रज्ञाने केला. (चॉपी इ. स. पूर्व पहिल्या शतकात होऊन गेलेल्या होरास (Horace) या कवीच्या घराचा शोध लावल्याबद्दल प्रसिद्ध आहे.) चॉपीने त्याच्या Philosophy of letters that could have saved everything Voltairian misosophy which could only lose everything या ग्रंथाच्या शीर्षकात आणि ग्रंथलेखनात त्याने हा शब्द वापरला.  हे पुस्तक १७९० साली प्रकाशित झाले.

नंतरचे उपयोग : 

सम्युएल कोलरीज (Samuel Taylor Coleridge१७७२-१८३४) या इंग्लिश कवीने त्याच्या एका पुस्तकात Notes of Hooker Misosophy ही संकल्पना उपयोगात आणली. हे पुस्तक १८३० साली प्रकाशित झाले. त्यानंतर हेन्री ब्रेथवेट ब्राऊन (Henry Braithwaite Brown जन्म: ०७ ऑक्टोबर १८४५, मृत्यू: १९१५) या कॅनेडियन वकिलाने त्याच्या Esse and Posse: A Comparison of Divine Eternal Laws and Powers या पुस्तकात एका खटल्याच्या संदर्भात १८७२ साली ही संकल्पना त्याच्या वकिलपत्रात वापरली. त्यानंतर १८८८ साली स्वाईनबर्ग या कवीने ( Algernon Charles Swinburne जन्म: ०५ एप्रिल १८३७, मृत्यू: १० एप्रिल १९०९ ) याने स्कॉटीश कवी, निबंधकार आणि तत्त्ववेत्ता थॉमस कार्लाईलवर (Thomas Carlyle  जन्म: ०४ डिसेंबर १७९५, मृत्यू: ०५ फेब्रुवारी १८८१) टीका करताना वापरली.

हेन्री हेमॅन (Henry Hayman जन्म: १८२३, मृत्यू : १९०४ या ब्रिटीश धर्मगुरू आणि शिक्षणतज्ज्ञाने जर्मन निराशावाद मांडणाऱ्या ऑर्थर शोपेनहॉवर (Schopenhauer) आणि निकोलाय हॉर्टमॅन (Hartmann) या तत्त्ववेत्त्यांवर जहाल टीका करण्यासाठी नोव्हेंबर १८८८ मध्ये हा शब्द वापरला. त्यानंतर १९१५ साली पीटर टेलर फोरसिथ (Peter Taylor Forsyth जन्म: १८४८, मृत्यू: १९२१)   या स्कॉटीश धर्मगुरूने वापरला.

विख्यात विश्लेषक तत्त्ववेत्ता गिल्बर्ट राईल (Gilbert Ryle जन्म: १९ ऑगस्ट १९००,मृत्यू: ०६ ऑक्टोबर १९७६) यानेही हा शब्द १९३७ साली त्याच्या Taking Sides in Philosophy या निबंधात धार्मिक अंगाने नव्हे तर तात्त्विक अर्थाने उपयोगात आणला आणि तेथून तो तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात रुजू लागला.

तत्त्वज्ञान, साहित्य व अनेक सामाजिक समस्यांवर लिहिणारा प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता-लेखक हर्मान टर्क (Hermann Türck जन्म: १८५६-१९३३) याने नीत्शे (Nietzsche), मॅक्स स्टीर्नर (Stirner) आणि नाटककार इब्सेन (Ibsen)  यांची समीक्षा करताना उपयोगात आणला, असे इस्लामी अध्ययन आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांच्यात सांधेजुळणी करणारा आधुनिक काळातील सुधारणावादी व शांततावादी इराणी तत्त्ववेत्ता सय्यद हुसेन नासर (Seyyed Hossein Nasr जन्म: ०७ एप्रिल १९३३, हयात …..) अधोरेखित करतो. १९५२ साली Misosophy ही संज्ञा गब्रिएल मार्सेल (Gabriel Marcel १८८९-१९७३) याने शोधली असा दावा अमेरिकन तत्त्ववेत्ता रिचर्ड झेनर (Richard M. Zaner जन्म: २० सप्टेंबर १९३३, हयात) The Way of Phenomenology (प्रकाशन १९७०) या पुस्तकात केला आहे.     

“प्रज्ञानाचा तिरस्कार/द्वेष” या अर्थाने  misosophy ही संज्ञा ब्रिटीश व्यावसायिक तत्त्ववेत्ता आणि लेखक डेव्हिड कॉनवे (David Conway जन्म: १९४७, हयात…) याने त्याच्या The Rediscovery of Wisdom: From Here to Antiquity in Quest of Sophia, २००० या ग्रंथात वापरली.

शब्दकोशात समावेश

या दरम्यानच्या शतकातील तत्त्वज्ञानाच्या काही शब्दकोशात Misosophy शब्द समाविष्ट करण्यात आला. उदाहरणार्थ ऑक्सफर्ड शब्दकोशात तो समाविष्ट झाला. एकोणिसाव्या शतकापर्यंत अनेकांनी तो वापरात आणला. पुन्हा त्याचा वापर काही काळ गुप्त झाला, तथापि विसाव्या शतकात तो पुन्हा वापरात आला.

पेंग्विन डिक्शनरी ऑफ फिलॉसॉफीने २००० साली Misology आणि त्यावर आधारित अन्य काही शब्द स्वीकारले.  ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोशाने Misosophyचा अर्थ “प्रज्ञानाचा द्वेष” असा मान्य केला आहे. नंतर २००८ साली  हचिनसन शब्द्कोशाने misosophy misosophist  misosophos हे  शब्द स्वीकारले.

Phobosophy

Misosophy ला समांतर ‘Phobosphy’ अशी आणखी एक संज्ञा प्रचारात आली. “ज्ञानाची भीती” या अर्थाने ‘Phobosphy’ ही संज्ञा जॉन डेस्मंड बेरनल (John Desmond Bernal, जन्म : १० मे १९०१, मृत्यू: १५ सप्टेंबर १९७१) या आयरिश जीवशास्त्रज्ञ आणि लेखकाने बनवली. त्याच्या The Freedom of Necessity (1949)  या पुस्तकात त्याने ही संज्ञा नव्याने बनवली. त्याने विज्ञान आणि समाज या विषयी बरेच प्रबोधनात्मक लेखन केले. तो साम्यवादी कार्यकर्ता आणि लेखक होता.

येथे ‘ज्ञानाची भिती’ याचा अर्थ ‘अमूर्त ज्ञानाची’ किंवा ‘तात्त्विक चिंतनाचे भय’ असा आहे. Phobosophy = phobo (fear) भिती +‎ sophy (wisdom, knowledge) ज्ञान. म्हणून Phobosophy म्हणजे ज्ञानाचे भय. असा भिणारा माणूस म्हणजे Phobosopher. अर्थात तो Phobosopher ही संज्ञा Philosopher च्या विरुद्ध आहे.

Phobosphy शी आणखी एक समांतर संज्ञा आहे. ती म्हणजे Sophophobia. ग्रीक sophíā म्हणजे ज्ञान (learning, wisdom) आणि phobia म्हणजे भय (fear). म्हणून Sophophobia म्हणजे ज्ञानाचे भय.

Philomoria

या खेरीज धार्मिक अर्थानेही काही शब्द निर्माण करण्यात आले. जोहान जोआकिम लँग (Johann Joachim Lange, १६७० – १७४४) या जर्मन प्रॉटेस्टंट ईश्वरवादी धर्मगुरु आणि धार्मिक तत्त्ववेत्त्याने philosophyच्या विरुद्ध philomoria (love of foolishness) हा शब्द बनवला. त्याच्या मते, तत्त्वज्ञान म्हणजे केवळ ईश्वरी ज्ञान आणि त्या ज्ञानाविषयीचे प्रेम. “मनापासून असे प्रेम नसणे, पण त्याचवेळी ‘असे प्रेम आपल्या मनात आहे, असे ढोंग करणे म्हणजे philomoria होय”, असा त्याचा युक्तिवाद आहे. philomoria या शब्दाचे वर्णन तो ” ‘मिथ्या-तत्त्वज्ञान” (pseudo-orthodox) अशा शब्दात करतो. त्याच्या मते, हे मिथ्या-तत्त्वज्ञान हा ‘तत्त्वज्ञानाचा भाऊ’ आहे. (अशीच काहीशी समांतर कल्पना “जादू ही विज्ञानाची फसवी बहिण आहे” असे फ्रेझरने मांडली होती.)

अर्थात लँगच्या ईश्वरवादी भूमिकेशी हे विवेचन जुळणारे आहे, पण त्याचवेळी ते प्लेटोच्या आयडियांच्या प्रेमाच्या कल्पनेशी आंतरिक नाळ जोडणारेही आहे, असे दिसते. ही कल्पना त्याने त्याचा Medicina mentis  या ग्रंथात मांडली. या ग्रंथाकडे बारूख स्पिनोझा (जन्म: २४ नोव्हेंबर १६३२, मृत्यू : २१ फेब्रुवारी १६७७) आणि जर्मन तत्त्ववेत्ता ख्रिश्चन वुल्फ (Christian Wolff जन्म: २४ जानेवारी १६७९, मृत्यू: ०९ एप्रिल १७५४) यांच्या दरम्यानचा गहाळ झालेला दुवा समजला जातो. मानसिक आरोग्याविषयी हे पुस्तक असले तरी ते आजच्या अर्थाने मानसिक आजारांवरचे नसून ‘मनाच्या विविध शक्ती आणि क्षमता यांचा विकास’ हा त्याचा विषय आहे. ख्रिश्चन वुल्फच्या मते Philosophy म्हणजे विज्ञान आणि निगमनावर आधारित वैज्ञानिक पद्धती, व निसर्ग जाणून घेणे. तर जोआचिमच्या मते, Philosophy म्हणजे मूलतः “अस्तित्वाचा शोध” किंवा “स्वतःचे ज्ञान” किंवा आत्मज्ञान. एका अर्थाने तो सॉक्रेटिस आणि देकार्तशी नाते सांगतो, असे म्हणता येईल. Philosophy हा प्रज्ञानाचे प्रेमाचा शोध आहे. आणि अंतिम प्रज्ञान हे ईश्वर स्वरूप आहे.  ईश्वराचा शोध घेणे हेच तत्त्वज्ञान’ अशी त्याची धारणा आहे.

श्रीनिवास हेमाडे, तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि  व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0