बर्ट्रंड रसेलचा लेखनसंसार

बर्ट्रंड रसेलचा लेखनसंसार

बर्ट्रंड रसेल दर्शन: भाग ४. - रसेलच्या कागदपत्रांची संख्या अंदाजे अडीच लाख होती. अनेक व्हॅन्स भरतील इतकी ती कागदपत्रे होती. त्यावेळी त्यांचे वर्णन ‘ब्रिटनमधील अशा प्रकारचा सर्वात महत्त्वाचा एकमेव संग्रह’ असे केले गेले. १९६० च्या दशकात रसेलला त्याच्या अणुयुद्धविरोधातील कार्यक्रमांसाठी मोठ्या रकमांची गरज होती. त्याने एजंटाकरवी आपल्या कागदपत्रांचा लिलाव केला. त्या लिलावासाठी रसेलच्या नॉर्थ वेल्स येथील निवासस्थानापासून लंडन येथे ही कागदपत्रे नेण्यात आली. ती नेताना कागदपत्रे भरलेल्या व्हॅन्सच्या मागे व पुढे मोठा सशस्त्र बंदोबस्त ठेवला होता, ज्याला आज आपण सशस्त्र ‘बाउन्सर’ म्हणू शकतो.

तत्त्वचिंतनाचे शत्रू
“तो सदैव बोलतच राहिला! ” : रसेलची तत्त्वज्ञानाकडे वाटचाल
तत्त्वज्ञानाचे तत्त्वज्ञान

‘रसेलचा लेखनसंसार’ असा शब्दप्रयोग मी शीर्षकात केलेला आहे. लेखमालेचे शीर्षक ‘ बर्ट्रंड रसेल दर्शन’ असे आहे. पहिल्या ‘बर्ट्रंड रसेल दर्शन:पूर्वपीठिका’ या लेखात मी भारतीय चिंतन परंपरेतील ‘दर्शन’ संज्ञेची व्याप्ती रसेलच्या तत्त्वज्ञानास कोणत्या अर्थाने आणि कोणत्या रीतीने उपयोजित करता येईल, ते दर्शविले होते. आता, ‘संसार’ या दुसरी संस्कृत संज्ञा कशी उपयोजित होऊ शकेल, त्याबद्दल थोडक्यात लिहितो.

संसार

‘संसार’ हा मूळ संस्कृत शब्द “सं + सृ गतौ + घञ्” किंवा “सम्‌+सृ+घञ्‌” असा लिहिला जातो. सरल संस्कृतमध्ये “संसरति इति संसार:” म्हणजे “जे निरंतर गतिशील, वाहते, प्रवाही, परिवर्तनशील आहे”. ‘सं – सार’ अर्थात “सम् + सार” असा विग्रह केल्यास, तसे लिहिल्यास “ज्यात साऱ्याचे सार, निष्कर्ष, सत्व किंवा तत्त्व आहे असे काहीएक ‘तत्त्व’. सतत गतिमान, वाहते असते ते जीवन. सारे ब्रह्माण्ड, सर्व जीव-अजीव सृष्टी. विश्वात मानव हाच आत्मजाणिव असणारा, म्हणजे सुख-दुःखाची जाणिव असणारा प्राणी असल्याने त्याच्या जन्म ते  मरण या क्रमाला ‘संसार’ म्हंटले जाते. अब्जावधी वर्षांच्या कालखंडात पृथ्वीवर सातत्याने टिकून राहिलेली प्रजाती केवळ मानवाचीच असल्याने त्यांच्या ‘जगण्याला’ उद्देशून ‘संसार’ म्हंटले जाते. मानवाच्या संसारात दृश्य विश्व व सर्व सजीव यांचा समावेश असल्याने ते सारे ‘संसार’ आहे.

‘संसार’ ला ‘सर्ग’ असाही पर्यायी शब्द वापरला जातो. सर्ग म्हणजे सतत अखंडितपणे निर्माण होत असणे. ‘निसर्ग’ म्हणजे ‘जे सतत न थांबता निर्माण होत असते. निर्मिती हा बदल असतो, तो अतिशय सूक्ष्म असतो, सहजासहजी लक्षात येत नाही, पण बदलता असतो. अशी सतत परिवर्तनशील वस्तू ती ‘निसर्ग’. सांख्य दर्शन या वैदिक हिंदू दर्शनात ‘सर्ग सिद्धांत’ मांडला आहे. ‘प्रकृति’ म्हणजे निसर्ग’ सतत उत्क्रांत होणारी घटना आहे, असा तो सिद्धांत आहे. बौद्ध दर्शनात आणि काही उपनिषदातही ‘अनित्यतावाद‘ मांडला आहे. ‘जे नित्य, स्थिर नाही, सतत बदलते ते जग’ असे बौद्ध दर्शन स्पष्ट करते. असाच सिद्धांत प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानात हेराक्लीटस (Heraclitus of Ephesus इ. स. पू. ५३५ ते इ.स. पू. ४७५)या तत्त्ववेत्त्याने मांडला. त्याच्या मते ‘तुम्ही एकाच नदीत दुसऱ्यांदा पाऊल टाकू शकत नाही.’ याचा अर्थ पहिले पाऊल टाकून झाल्यानंतर दुसरे पाऊल टाकताना आधीचे पाणी वाहून गेलेले असते! नदी सतत वाहात असते!! आधीची नदी वाहून जाते, असे सतत घडते. म्हणून त्याच नदीत दुसऱ्यांदा पाऊल टाकणे कधीही शक्य नसते.

लेखनसंसार

‘संसार’ चा हा ‘ जीवन’ आणि ‘परिवर्तनशील गतिमानता’ हा विस्तृत अर्थ लक्षात घेता रसेलच्या लेखनाला तो लावता येईल. रसेलने इतके अफाट लेखन केले की अद्यापि नीटसे मोजले गेलेले नाही. ‘की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने’ च्या व्रतानुसार रसेलने १२- १३ व्या वर्षांपासून लेखनाचे व्रत घेतले ते अखंड चालते ठेवले. जणू प्रत्येक तासाला तो काही ना काही लिहित होता. त्याने स्पष्ट केल्यानुसार आधी तो मनात, डोक्यात लिहित असे आणि मग तो प्रत्यक्ष कागदावर लिहित असे. ही त्याच्या लेखनाची गति हा एक पैलू आहे.

रसेलच्या लेखनाच्या दुसरा पैलू असा की त्यांच्या लेखनाचा पैस अतिशय विस्तृत आणि सखोल होता, जगण्याच्या प्रत्येक बाजूवर त्याने चिंतन लेखन केले. भारतीय परिभाषेत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या चारही पुरुषार्थावर त्याने गंभीर लेखन केले. त्याच्या सामाजिक व राजकीय लेखनाने वादळे उठली, अनेक प्रकारची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिवर्तने झाली. निखळ तत्त्वचिंतनाच्या क्षेत्रात, तत्त्वज्ञानात त्याने जणू कोपरनिकन क्रांती केली, त्याचे विज्ञान विषयक लेखन वैज्ञानिक जगातला मूलभूत दिशादर्शक ठरले. त्याचा लेखनसंसार सतत प्रवाही, परिवर्तनशील आणि प्रगतीसाधक ठरला. मृत्यूपर्यंत रसेल लिहिता राहिला. जीवनातील प्रत्यक्षातील चार लग्ने, अनेक प्रेमप्रकरणे असलेला त्याचा संसार आणि त्याचा चिंतन-मनन-निधीध्यासनवान संसार विलक्षण म्हंटला पाहिजे.

‘लिहिणे’ हे रसेल घराण्याचे जणूकाही व्यसन असावे. रसेल घराण्यातील प्रत्येकजण काही ना काही नेहमीच लिहीत असे. बर्ट्रंड रसेलचे वडील व्हायकाउंट अ‍ॅम्बर्ले यांनी एक मोठ्ठा ग्रंथ लिहिला होता. रसेलचा भाऊ फ्रँक रसेल गणितज्ज्ञ, लेखक होता. आजोबा लॉर्ड रसेल तर दोन वेळेस पंतप्रधान होते; त्यांनी स्वतःविषयी भरपूर लिहिले, पण राजकारण, समाजकारण, अर्थकारण इत्यादी अनंत गोष्टींवर लेखन केले. केवळ रसेल घराणेच नव्हे तर बर्ट्रंड रसेलचे मातुल आजोळही वाचन-मनन-लेखन करण्यात अग्रेसर होते. त्याची आई केट अ‍ॅम्बर्ले, तिची आई लेडी स्टॅन्ले, आणि आजी, मावशी या अनेक सामाजिक चळवळीत होत्या, त्याही सतत लिहीत असत. रसेल कुटुंबाने इतके लेखन केले की त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचेच एक स्वतंत्र ग्रंथालय तयार झाले होते…

रसेलच्या लेखनाचे मुख्य प्रकार

रसेलच्या लेखनाचे दोन मुख्य प्रकार करता येतील. पहिला: रसेलने केलेले लेखन आणि दुसरा: रसेलबद्दल आणि त्याच्या लेखनाबद्दल केले गेलेले लेखन. रसेलच्या लेखनशैलीची माहिती आधीच्या दोन भागात आपण घेतली आहेच.

या लेखात केवळ ‘रसेलने केलेले लेखन’ या बद्दलच लिहिता येईल, कारण तेच इतके प्रचंड आहे की अशा छोट्या लेखात तो विषय मांडणे, हे खरे तर रसेलवर अन्याय करणारे ठरेल. आणि ‘रसेलचे लेखन समजून घेणार्‍या वाचकांसाठी’ ही ते अन्यायकारक ठरेल. (पण नाईलाजाने तो अन्याय मी करतो!)

रसेलच्या लेखनाचे वर्गीकरण

रसेलप्रेमी, रसेलचे चहेते, विद्यापीठीय अभ्यासक व संशोधक, विचारवंत आणि काही तत्त्ववेत्ते इत्यादींनी रसेलच्या लेखनाचे त्या त्या विषयानुसार सामाजिक, राजकीय, आर्थिक, तत्त्वज्ञानात्मक, वैज्ञानिक असे वर्गीकरण केले आहे. त्याचप्रमाणे त्याने लिहिलेल्या छोट्या-मोठ्या पुस्तिका, पुस्तके, ग्रंथ, लेखमाला, संशोधन लेख-निबंध, आणि इतर लेखकांच्या पुस्तकांचा परिचय-आशीर्वाद-प्रस्तावना, पुरस्कार स्वीकारताना केलेली भाषणे-मनोगते, लोकांनी वापरलेली मुखपृष्ठ सुभाषित, त्यांना दिलेला मलपृष्ठ परिचय, तसेच हजारो ठिकाणी दिलेली व्याख्याने, भाषणे, वृत्तपत्रे-नियतकालिके-मासिके इत्यादींना दिलेल्या मुलाखती, लिखित मुलाखती, प्रश्नोत्तरे, त्याच्याविषयी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रस्तावना अशा शेकडो ‘लेखनाकार’ (forms of writings) नुसारही वर्गीकरण केले आहे. मी रसेलच्या लेखनाचे वेगळ्या रीतीने वर्गीकरण करु इच्छितो. ते वर्गीकरण तीन प्रकारात करतो.

 • रसेलचे तत्त्वज्ञानात्मक लेखन
 • रसेलचे आर्थिक निकडीतून झालेले लेखन
 • रसेलचे ‘स्वान्तसुखाय’ साहित्यिक लेखन.

रसेलच्या लेखनाचे हे वर्गीकरण अजून कोणी केलेले नाही, त्यामुळे ते ‘आधुनिक वर्गीकरण’ म्हणता येईल. रसेलच्या पुस्तकांचे ‘स्वरूप, विषय व एकूण लेखनाचेच स्वरूप’ या निकषानुसार हे वर्गीकरण केले आहे. रसेलचे हे तिन्ही प्रकारचे लेखन तुल्यबल आहे. आणि ते सारेच त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये आणि वाचकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे.

तत्त्वज्ञानात्मक लेखन

तत्त्वज्ञानात्मक लेखनात गणित, विद्यामूलक तत्त्वज्ञान (Academic Philosophy) आणि विज्ञानविषयक स्वतंत्र लेखनाचा आणि त्यांच्यातील परस्परसंबंध दर्शक लेखनाचा समावेश होतो. या विद्यामूलक तत्त्वज्ञानाचे तीन भाग करता येतील.

 • पहिला: तात्त्विक तर्कशास्त्र (Philosophical Logic)
 • दुसरा: भूमिती, गणित आणि तत्त्वज्ञानविषयक लेखन. आणि या तिन्हींचा परस्परसंबंध दर्शवणारे लेखन; जसे की गणिताचे तत्त्वज्ञानात्मक अधिष्ठान (Philosophical foundations of mathematics)
 • तिसरा: ज्ञानशास्त्र (Epistemology), सत्ताशास्त्र (Metaphysics) आणि नीतिशास्त्र (Ethics).

आर्थिक निकडीतून झालेले लेखन

आर्थिक निकडीतून झालेल्या लेखनात मुख्यतः विज्ञान-तत्त्वज्ञानाचा सुलभ परिचय आणि काही लोकप्रिय विषयांवरील लेखनाचा तसेच पुस्तक परिचय, समीक्षा, वृत्तपत्रीय लेख, स्तंभलेखन, व्याख्याने, भाषणे, नियतकालिके-मासिके-नभोवाणी-दूरचित्रवाणी यांना दिलेल्या मुलाखती व या सार्‍यांना रसेलने दिलेल्या लिखितस्वरूप लेखनाचा समावेश होतो. त्याचप्रमाणे त्याने इतरांना दिलेल्या देणग्या, मदत इत्यादीसाठी आणि त्याच्या स्वतःच्या संस्थासाठी देणग्या, मदत मिळण्यासाठी केलेला प्रचंड पत्रव्यवहार, यांचा समावेश होतो.

स्वान्तसुखाय लेखन

‘स्वान्तसुखाय’ लेखन साधारण चार प्रकारचे आहे:

 • हा प्रारंभ रसेलच्या पौगंडावस्थेतील दैनंदिनीपासून होतो.
 • जाणिवपूर्वक केलेल्या सामाजिक, आर्थिक व राजकीय विषयांवरील लेखन.
 • कथा, दीर्घकथा, कादंबरी, कवितावजा स्फुट रचना, सुभाषिते, वचने इत्यादी ललित साहित्य.
 • रसेलचा खासगी प्रचंड पत्रव्यवहार आणि त्याच्या चारही पत्नींना, तात्पुरत्या व दीर्घकालीन प्रेमपात्रांना लिहिलेली पत्रे.

अर्थात हे सारे मुख्य वर्गीकरण, त्यातील उपवर्गीकरण आणि त्यांचे वर्णन फार अचूक आहे असे नाही, ते नवीन आहे. त्याकडे रसेल समजून घेतानाच्या प्रक्रियेची मूलभूत पायाभरणी म्हणून पाहाणे इष्ट ठरेल. या वर्गीकरणाने रसेलच्या लेखनप्रपंचाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळू शकतो.

या साऱ्या लेखन प्रकारांची एकमेकात मिसळण करता येणे शक्य आहे. किंवा काही लेखन एकातच होऊ शकेल तर काहींचे वर्गीकरण दोनात होऊ शकेल. विशेषतः सामाजिक व राजकीय लेखन पहिल्या दोन प्रकारात होणे शक्य आहे. अर्थात कोणाही विचारवंताचे लेखन मूलतः त्याच्या स्वतःच्या वैचारिक गरजेतून आणि सामाजिक लेखकीय कर्तव्य भावनेतून होत असते, रसेल त्याला अपवाद नाहीच नाही. ते सारेच वस्तुतः ‘स्वान्तसुखाय’ लेखनच असते. रसेलमध्ये समाजभान व कर्तव्यभान तीव्र होते, म्हणून त्याच्या पहिल्या प्रकारातील लेखनाचा समावेश व्यापक तात्त्विक अर्थाने ‘स्वान्तसुखाय’ मध्ये होईलच. पण ललित लेखन मात्र रसेलने केवळ ‘स्वान्तसुखाय’ भूमिकेतून केले आहे, असे म्हणण्याइतके पुरावे उपलब्ध आहेत.

या तिन्ही वर्गीकरणात स्पष्ट केलेल्या लेखनाचा परिचय करून घेणे म्हणजे रसेल समजून घेण्याच्या दिशेने पाउल उचलणे आहे. अर्थात, त्याच्या आजच्या समकालीन प्रश्नांशी निगडित असलेल्या काही निवडक मुख्य मुद्द्यांचा, घटकांचा परिचय या लेखमालेत आपण करून घेऊ.

अर्थात तेवढ्याने ‘समग्र रसेल समजेल-उमजेल’ असे अर्थातच घडणार नाही. म्हणूनच मी पहिल्या लेखाला ‘पूर्वपीठिका’ असे म्हटले आहे. किंबहुना ही सारी  लेखमालाचं ‘रसेलच्या तत्त्वज्ञानाची पूर्वपीठिका’ आहे, असेही म्हणणे योग्य राहील. कारण रसेलचे लेखन येथून, किंवा अन्यत्र कोठून तरी वाचण्यापेक्षा-समजावून घेण्यापेक्षा रसेलने लिहिलेल्या ग्रंथांक्डेच वाचकाने-जिज्ञासूने थेट भिडणे, हे जास्त फलदायी आणि यथार्थ राहील. ; लेखक समजून घेण्यासाठी त्याची थेट साक्षात लेखनाला भिडूनच त्याद्वारे लेखकाची भेट घ्यावी, असे खुद्द रसेलही सुचवतो… आणि त्यानेही ते आणि तसेच केले आहे.

दैनंदिनी

रसेलने त्याच्या पौगंडावस्थेपासून लेखन केले, हे त्याचे पहिले ‘स्वान्तसुखाय’ लेखन होते. त्याने अनेक डायर्‍या लिहिल्या असाव्यात. पण तो त्या अतिशय गुप्त ठेवत असे. बर्‍याचशा डायर्‍या त्यानेच तो जसा मोठा होत गेला, तशा नष्ट केल्या असाव्यात. त्याच्या एका डायरीचा उल्लेख त्यानेच त्याच्या My Philosophical Development (1959) या पुस्तकात केला आहे आणि काही नोंदीही उध्दृत केल्या आहेत. रसेल या डायर्‍या अतिशय गुप्त ठेवत असल्यामुळे त्यांना तो ‘locked diary’ म्हणतो. या डायऱ्या तो ग्रीक भाषेत लिहित असे.

नैतिक संघर्ष

मी रसेलच्या लेखनातील एका द्वंद्वाकडे लक्ष वेधू इच्छितो. रसेलने केलेल्या सर्व तर्‍हांच्या लेखनात एक विशिष्ट तर्‍हेचे द्वंद्व आढळते, हा पहिला दृष्टिकोन आहे. आणि त्या द्वंद्वविकासातून दुसरा दृष्टिकोन लाभतो. तो नैतिक संघर्षाचा आहे.

रसेलचे प्रारंभीचे निखळ तांत्रिक पारिभाषिक स्वरूपातील गणिती लेखन व तत्त्वज्ञानात्मक लेखन होते. ते वगळता इतर समग्र लेखनात पारंपरिक नीतीचा व आधुनिक नैतिक भूमिकेचा संघर्ष आढळतो. लोकप्रिय सामान्य भाषेत मांडलेल्या विज्ञान व तत्त्वज्ञानविषयक क्षेत्रातील लेखनात हा संघर्ष तीव्रपणे जाणवतो. या आधुनिक नीतिचा पाया ‘सामाजिक डार्विनवादा‘ चा जनक आणि ब्रिटीश तत्त्ववेत्ता व जीवशास्त्रज्ञ हर्बर्ट स्पेन्सर (Herbert Spencer जन्म: २७ एप्रिल १८२०,मृत्यू:०८ डिसेंबर १९०३), ‘अभिजात स्वातंत्र्य सिद्धांता’ चा पुरस्कर्ता ब्रिटीश तत्त्ववेत्ता, राजकीय अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल (John Stuart Mill, जन्म: २० मे १८०६, मृत्यू:०७ मे १८७३),  ब्रिटीश उपयोगितावादी अर्थशास्त्रज्ञ हेन्री सिज्विक (Henry Sidgwick जन्म: ३१ मे १८३८, मृत्यू: २८ ऑगस्ट १९००) इत्यादींनी घातला होता, त्याला अत्याधुनिक उदारमतवादी व उत्तराधुनिक सामाजिक समष्टीशी सुसंगत व्यक्तिवादी चेहरा रसेलने दिला होता.

थोडक्यात, रसेलच्या समग्र लेखनाला नेहमीच एक तात्त्विक भूमिकेचे अधिष्ठान आहे. ज्ञान व प्रेम, करुणा, निखळ मानवहित यांनी बनलेली नीती हे त्या तात्त्विक भूमिकेचे साधारण स्वरूप आहे. कोणत्याही लेखकावर, चिंतकावर आपल्या समकालिन सामाजिक, राजकीय, आर्थिक व वैज्ञानिक बदलांची नोंद घेण्याची, समकालातील समाजजीवनाच्या स्वरुपाचे विश्लेषण करण्याची आणि त्यातील योग्य व आवश्यक परिवर्तनाची जबाबदारी असतेच. रसेल समकालिन होताच, पण भविष्यकालीन तत्त्ववेत्ता होता.

रसेलचे पहिले लेखन जर्मन भाषेतील एक पुस्तक परीक्षण रूपाने १८९५ मध्ये आले आणि शेवटचा लेख त्याने मृत्यूपूर्वी चार दिवस आधी ३० जानेवारी १९७० रोजी लिहिला. पहिला ग्रंथ German Social Democracy १८९६ प्रसिद्ध झाला, तर शेवटचा ग्रंथ Dear Bertrand Russell… १९६९ मध्ये प्रसिद्ध झाला. त्याने ७४ ग्रंथ लिहिले. Principia Mathematica  (सहलेखक आल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड) या महाग्रंथाचे तीन खंड, The Amberley Papers चे दोन खंड आणि त्याच्या आत्मचरित्राचे तीन खंड मोजता रसेलची एकूण ग्रंथ संख्या ८२ भरते. ही सारी यादी येथे देण्याचा मोह मी टाळत आहे. बरीचशी ताजी यादी इंग्लिश विकिपीडियाच्या BertrandsRussell पानावर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ती BERTRAND RUSSELL Online Books and Articles  येथेही उपलब्ध आहे.

तथापि रसेलच्या मी केलेल्या वर्गीकरणातील प्रसिद्ध पुस्तकांखेरीज त्याचे इतर साहित्य प्रचंड होते, म्हणजे आहे. त्या सार्‍यांची व्यवस्थित जुळणी आणि मांडणी करण्याचे ऐतिहासिक कार्य कॅनडातील मॅकमास्टर युनिव्हर्सिटी (McMaster University) ने केले आहे. त्यातून रसेलच्या लेखनसंसाराचे क्षणदर्शन (glimpse) होऊ शकेल.

मॅकमास्टर युनिव्हर्सिटीचे योगदान : रसेल अर्काव्ह

रसेलला १९६० च्या दशकात त्याच्या अणुयुद्धविरोधातील कार्यक्रमांसाठी मोठ्या रकमांची गरज होती. त्यामुळे त्याने एजंटाकरवी आपल्या कागदपत्रांचा लिलाव केला होता. त्या कागदपत्रांची संख्या अंदाजे अडीच लाख होती, असे पॉल जॉन्सन हा लेखक म्हणतो. अनेक ट्रकच्या ट्रक भरतील इतकी ती कागदपत्रे होती. त्यावेळी त्यांचे वर्णन ‘ब्रिटनमधील अशा प्रकारचा सर्वात महत्त्वाचा एकमेव संग्रह’ असे केले गेले.

लिलावासाठी रसेलच्या नॉर्थ वेल्स येथील निवासस्थानापासून लंडन येथे ही कागदपत्रे नेण्यात आली. ती नेताना रसेलचा तत्कालीन तरुण सेक्रेटरी राल्फ शोएमन याने ती कागदपत्रे भरलेल्या व्हॅन्स मागे व पुढे मोठा सशस्त्र बंदोबस्त ठेवला होता (ज्याला आज आपण सशस्त्र ‘बाउन्सर’ म्हणू शकतो).

रसेल हयात असतानाच मॅकमास्टर युनिव्हर्सिटीने ‘रसेल अर्काव्ह’ (the Bertrand Russell Archives) हा प्रकल्प हाती घेतला. त्या विद्यापीठाने रसेलची कागदपत्रे विकत घेण्याचा प्रस्ताव दिला आणि ही कागदपत्रे विकत घेतली. युनिव्हर्सिटीच्या प्राथमिक नोंदीनुसार ती अडीच लाख कागदपत्रे होती. त्या पत्रांमध्ये पन्नास हजार पत्रे, ऐंशी पुस्तके, अडीच हजार लघुनिबंध, निबंध व लेख अप्रकाशित पुस्तकांची शेकडो हस्तलिखिते आणि काही नियतकालिके होती.

रसेलच्या कागदपत्रांचा जसजसा थांगपत्ता लागत गेला, तसतशी युनिव्हर्सिटीने ती खरेदी केली. १९६५, १९७३, १९७७ अशा एकूण तीनवेळा ही मुख्य खरेदी झाली. आणि पुन्हा ३१ जानेवारी २००४ रोजी काही पत्रांचा शोध लागला आणि युनिव्हर्सिटीने तीही खरेदी केली. युनिव्हर्सिटीने मुख्यतः पाच प्रकल्प राबवविले.

 • The Collected Papers of Bertrand Russell
 • The Bertrand Russell Archives Catalogue Entry and Research System (BR ACERS)
 • A Bibliography of Bertrand Russell
 • The Collected Letters of Bertrand Russell
 • Bertrand Russell’s Library

मॅकमास्टरची रसेलभक्ति   

मॅकमास्टर युनिव्हर्सिटीने रसेलसाठी जणू स्वतःला वाहून घेतले आहे. त्याच्या संकेतस्थळावर russell archive असा शोध दिला तर किती प्रकारे आणि कोणकोणत्या दृष्टीकोनातून रसेलचा अभ्यास, चिंतन आणि संशोधन चालू आहे, त्याची सविस्तर यादी येते. ती जवळपास शंभर संकेतस्थळे खुली करते, तेव्हा डोळे विस्फारले जातात.

दोन सूची

‘रसेल अर्काव्ह’ हा प्रकल्प १९६८ साली सुरु झाला. तथापि कागदपत्रे ताब्यात मिळाल्यानंतर A Detailed Catalogue of the Archives of Bertrand Russell या शीर्षकाने एक सूची १९७६ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. ती सूचीच ३४३ पानांची आहे. ती इतकी विस्तृत होऊनही या सूचीत Bertrand Russell Peace Foundation चा पत्रव्यवहार आणि बराच मोठा खासगी पत्रव्यवहार त्यात समाविष्ट नव्हता. अर्थात ज्यांची नोंद करण्यात आली आहे, त्या पत्रव्यवहाराची संख्या पंचवीस हजार आहे!

रसेलच्या मृत्युनंतर १९७३ मध्ये रसेल कुटुंबियांकडून आणि रसेल शांती प्रतिष्ठानकडून आणखी कागदपत्रे विकत घेतली गेली आणि A Detailed Catalogue of the Second Archives of Bertrand Russell हे दुसरी सूची १९९२ साली प्रसिद्ध करण्यात आली. तिच्यात नव्या चाळीस हजार पत्रांचा समावेश करण्यात आला!

1) The Collected Papers of Bertrand Russell

रसेलने लिहिलेल्या विविध विषयांवरील निबंध, लेख इत्यादीचा संग्रह The Collected Papers of Bertrand Russell या नावाने ओळखला जातो. तो ३५ खंडांचा मोठा व व्यापक प्रकल्प असून त्याचे अनुक्रमे ०१ ते १५ तसेच २१, २८ आणि २९ वा, असे १८  खंड प्रकाशित झाले आहेत. त्यात त्याच्या शेकडो अप्रकाशित लेखनाचा समावेश आहे.

2) The Bertrand Russell Archives Catalogue Entry and Research System (BRACERS)

अर्काव्हने The Bertrand Russell Archives Catalogue Entry and Research System, BRACERS हे अभ्यास केंद्र २०१४ ला सुरु केले आणि रसेलच्या हजारो पत्रांमधील एक लाख बत्तीस हजार सुभाषिते, वचने  उपलब्ध करून दिली आहेत. त्यातील अनेक पत्रांचे दुवेही दिले आहेत. त्याचप्रमाणे रसेलने ज्यांच्याशी पत्रव्यवहार केला, अशा बेचाळीस हजार सातशे लोकांचा तपशीलही BRACERS Correspondents या उपप्रकल्पात दिला आहे.

 3) A Bibliography of Bertrand Russell

अर्काव्हने A Bibliography of Bertrand Russell (1. Separate Publications 2. Serial Publications 3. Indexes) ही रसेलच्या प्रकाशनांची सूची वेगळी दोन भागात प्रसिद्ध केली. तीन दोन भागातील तीन खंडांची सूचीग्रंथमाला आहे. ती एकूण १५२२ पानांची आहे. १९९४ ला तिची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. पहिल्या दोन खंडात ग्रंथ, ध्वनिमुद्रणे, चित्रपट, रेकॉर्डस इत्यादीच्या ४३०० नोंदींची सूची आहे, तर तिसर्‍यात बारा हजार नोंदीची ३०४ पानांची अनुक्रमणिका आहे. पहिल्या खंडात पुस्तके, पुस्तिका, किरकोळ हस्तपत्रिका मिळून रसेलने एकूण १८१ पुस्तके लिहिल्याचे असे म्हंटले आहे!

4) The Collected Letters of Bertrand Russell 

मॅकमास्टर युनिव्हर्सिटीचा हा चौथा महत्वाचा प्रकल्प आहे. लेखात वर उल्लेखलेली रसेलची सर्व पत्रे आणि पुढे भावी काळात जिथून मिळतील तिथून ती प्राप्त करणे आणि प्रसिद्ध करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

The Selected Letters of Bertrand Russell या शीर्षकाने पहिला संग्रह १९९२ मध्ये प्रकाशित करण्यात आला, त्याची दुसरी आवृत्ती २००१ मध्ये प्रसिद्ध झाली.

A Detailed Catalogue of the Archives of Bertrand Russell सूचीच्या संशोधनानुसार रसेलने लेखन सुरु केल्यापासून प्रत्येक ३० व्या तासाला किमान एक पत्र लिहिले आहे! या सूचीला रसेलने छोटी प्रस्तावना लिहिली आहे. प्रस्तावनेत रसेलने ही खास बाब नमूद केली आहे. रसेल ९८  वर्षे जगला, पहिली दहा वर्षे वगळली, तरी रसेल सलग ८८ वर्षे लिहित होता, असे म्हंटले पाहिजे.

रसेलच्या लेखनसंसारात त्याच्या प्रेमपत्रांचाही समावेश करावा लागेल. ती खरोखरीच सांसारिक पत्रे म्हणता येतील! रसेलच्या प्राथमिक काळातील अशाच एका डायरीतील नोंदीनुसार त्याने पहिल्या पत्नीला, अ‍ॅलिस पीअरसाल स्मिथ हिला सहाशे पत्रे लिहिली होती. शिवाय जवळपास प्रत्येक प्रेयसीला तो भरभरून पत्रे लिहित असे.

लेडी ऑटोलिन मोरेल (Lady Ottoline Violet Anne Morrell, जन्म: १६ जून १८७३, मृत्यू: २१ एप्रिल १९३८) या एकेकाळच्या प्रेयसीला १९०० पत्रे लिहिली,

चित्र सौजन्य : विकिपीडिया

लेडी ऑटोलिन मोरेल (चित्र सौजन्य : विकिपीडिया)

तर दुसर्‍या एका प्रकरणातील (?) ८०२ पत्रांचा शोध नुकताच लागला आहे. अशीच हजारो पत्रे असावीत, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. रसेलला कोणताही विषय वर्ज्य नव्हताच. प्रेमभावनेने आणि कारुण्याने ओतप्रोत भरलेली पत्रे लिहितानाही तो त्यात कोणता न कोणता तात्त्विक अथवा वैज्ञानिक विचार मांडत असे. त्याची अशी हजारो पत्रे अजूनही अप्रकाशित आहेत.

या खेरीज त्याने वेगवेगळ्या तुरुंगातून रसेलने लिहिलेल्या पत्रांचाही समावेश यात केला जाणार आहे. १९१८ मध्ये ब्रिक्स्टन तुरुंगात असताना त्याने १०४ पत्रे लिहिली. गुप्तता कायद्यानुसार ही पत्रे त्या त्या पत्रांच्या तारखेनुसार १०० वर्षांनी प्रसिद्ध केली गेली. पहिले पत्र ०२ मे २०१८ मध्ये आणि शेवटचे पत्र १३  मे २०१८ रोजी प्रसिद्ध झाले. १९६१ मध्ये त्याने केवळ एकच पत्र लिहिले, ते प्रसिद्ध व्हावे यासाठी जगाला आणखी ४० वर्षे वाट पाहावी लागणार आहे !

रसेल आणि भारत

आपल्याशी म्हणजे भारतीयांशी संबंधित पत्रव्यवहारही खूप मोठा आहे, तो अजून प्रकाशात आलेला नाही, पण त्याचे उल्लेख रसेलच्या A Detailed Catalogue of the Archives of Bertrand Russell मध्ये आहेत. अर्थात ते रसेलच्या त्या अवाढव्य कागदपत्रांमधून सापडलेले आहेत.  महात्मा गांधीजी, पंडीत नेहरू, रवींद्रनाथ टागोर, राधाकृष्णन यांच्याशी पत्रव्यवहार होताच, पण अनेक तत्त्ववेत्ते, विचारवंत यांच्याशीही रसेलचा मोठा पत्रव्यवहार होता. तोही एका मोठ्या पुस्तकाचा विषय आहे.

रसेल आणि राजेंद्रकुमार

एक खरोखरचा मनोरंजक पत्रव्यवहार म्हणजे एकेकाळचा चॉकलेट हिरो राजेंद्र कुमार याचा रसेलशी झालेला पत्रव्यवहार. राजेंद्र कुमारने १९६७ मध्ये दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘अमन’ हा युद्धविरोधी चित्रपट बनवला. हा चित्रपट त्याने पं. जवाहरलाल नेहरु यांना समर्पित केला आहे. एके दिवशी राजेंद्र कुमारच्या मनात आले की या चित्रपटात शांतिदूत बर्ट्रंड रसेल का असू नये? त्याने रसेलशी संपर्क साधला. वृद्धापकाळामुळे आणि व्यस्ततेमुळे रसेल येऊ शकत नव्हता. त्यामुळे रसेलच्या पत्रानुसार राजेंद्र कुमार आणि दिग्दर्शक व चमू नॉर्थ वेल्स येथे गेले. रसेलने त्यांचे अतिशय मनःपूर्वक स्वागत केले आणि चित्रपटाचा भाग म्हणून नायक राजेंद कुमारला मुलाखत वजा आशीर्वाद दिले!

राजेंद्र कुमार आणि बर्ट्रंड रसेल: 'अमन' (१९६७) मधील दृश्य : चित्र सौजन्य Emkay Pictures.

राजेंद्र कुमार आणि बर्ट्रंड रसेल: ‘अमन’ (१९६७) मधील दृश्य : चित्र सौजन्य Emkay Pictures.

चित्रपट सुरु झाल्यानंतर १६.२८  मिनिटापासून रसेल चित्रपटात दिसतो. हा शॉट साधारणपणे चार मिनिटांचा आहे. ‘पाहुणा कलाकार’ म्हणून का होईना पण रसेलने ज्यात काम केले आहे असा हा जगातील एकमवे चित्रपट आहे! आणि तो ही भारतीय (हिंदू नव्हे) चित्रपट आहे!!

श्रेय नामावली: 'अमन' (१९६७) मधील दृश्य : चित्र सौजन्य Emkay Pictures

श्रेय नामावली: ‘अमन’ (१९६७) मधील दृश्य : चित्र सौजन्य Emkay Pictures

5) Bertrand Russell’s Library रसेलचे ग्रंथालय

रसेल अखिल जगाचा लेखक आहे, त्याचे वाचक नाहीत असा देश नाही. त्याचे निर्गमन होऊन २०२१  मध्ये दीडशतक ओलांडले आहे तरी ज्यांची गणना अजूनही, आजही चालू आहे, इतके प्रचंड साहित्य निर्माण करणार्‍या त्या रसेलचे स्वतःचे वाचन काय असेल? स्वतः रसेलने वाचन केलेल्या पुस्तकांची, लेखांची इत्यादींची संख्या किती असेल? तत्त्ववेत्ता फक्त इतरांना आपली पुस्तके वाचायला लावतो, असे नाही तर तोही सामान्य वाचकासारखा इतरांचीही  पुस्तके वाचतो हे गृहीत धरून हा मुद्दा उपस्थित करता येतो.

रसेलचे ग्रंथालय

मॅकमास्टर युनिव्हर्सिटीने रसेलचे समग्र ग्रंथालय १९६५ मध्ये रसेलकडूनच विकत घेतले. कार्ल स्पडॉनी आणि डेव्हिड हार्लेरसेलप्रेमी (Carl Spadoni and David Harley) लेखकांनी या संबंधात Bertrand Russell’s Library हा लेख लिहिला. त्याचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात ग्रंथालयाची खरेदी, तेथील हरवलेल्या वस्तू, रेलच्या वाचनाच्या सवयी, पुस्तकांच्या जागा, त्याच्या आईवडिलांची व भाऊ-काका-आत्या इत्यादींची पुस्तके, रसेलचे प्रिंटर्स व बाईंडर यांच्याशी असलेले संबंध, रसेलने विटगेन्स्टाईन या त्याच्या जर्मन तत्त्ववेत्याचे व तात्त्विक अनुयायाचे ग्रंथालय कसे विकत घेतले, आपल्या ग्रंथालयाबद्दल स्वतः रसेलचे मूल्यमापन काय होते इत्यादींची माहिती आहे. दुसर्‍या भागात रसेलच्या पुस्तकांची संख्या व पुस्तकांची इतिहास, राजकारण, गणित, तत्त्वज्ञान, साहित्य, धर्म, विटगेन्स्टाईनची पुस्तके असे आठ भागातील वर्गीकरण केलेले आहे. शिवाय त्याने वाचलेल्या हजारो पुस्तकांच्या नोंदवह्या होत्या, त्यातून त्याच्या वाचनाचा आवाका उमगतो. रसेलकडे त्याची स्वतःची साडे तीन हजार पुस्तके होती.

‘रसेलचे ग्रंथालय’ हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे, हे नमूद करणे हीच एक महत्वाची गोष्ट आहे.

खरेदीचे रहस्य

मॅकमास्टर युनिव्हर्सिटीने रसेलची एकूण एक कागदपत्रे, पत्रव्यवहार खरेदी करण्याचा सपाटाच लावला होता आणि आजही ते काम चालू आहे. ह्याचे कारण काय? हे एक रहस्य आहे. या प्रकल्पावर काम करणारे बरेचजण आता निवृत्त झाले असून, त्यांनी त्या त्या काळात या संबंधात लेखन केले आहे आणि करत आहेत. यावर एक वेगळा स्वतंत्र विस्तारपूर्वक लेख लिहिणे आवश्यक आहे.

बहुभाषाकोविद

रसेलचा जन्म उमराव घराण्यात झाला होता. त्याचे पालक आजी-आजोबा जर्मन, फ्रेंच, इटालियन आणि इंग्लिश अतिशय सफाईदारपणे बोलू-लिहू शकत होते. इंग्लिश त्यांची मातृभाषा होतीच, पण जर्मन, फ्रेंच, इटालियन याही जणू त्यांच्या मातृभाषाच असाव्यात! रसेलचे सारे प्राथमिक शिक्षण खासगी शिक्षकांकडून झालेले होते, त्यात फ्रेंच आणि जर्मन भाषांचाही समावेश होता. अगदी लहानपणापासून तो अभिजात ग्रीक शिकला होता, त्याची अतिशय गुप्त रोजनिशी कोणीही वाचू नये म्हणून तो ती ग्रीकमध्ये लिहित होता. परिणामी, आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक समाजाला जाणारा रेने देकार्तसारखा फ्रेंच तत्त्ववेत्ता, समग्र ग्रीक-युरोपीय व पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा ‘चेकपोस्ट’ समजला जाणारा तत्त्वज्ञानप्रदीप इमान्युएल कान्ट व नंतर हेगेल, मार्क्स, शोपेनहॉवरसारखे जर्मन तत्त्ववेत्ते आणि गॅलिलिओसारखे इटालियन वैज्ञानिकांचे लेखन त्यांच्या मूळ भाषेतून समजून घेणे रसेलला सहज शक्य झाले. रसेलचे इंग्लिश तर अतिशय उच्च दर्जाचे आणि विनोद, उपहास, गांभीर्य आणि तात्त्विकता यांनी भरलेले आणि भारलेले होते. चार्ल्स सँगर हा रसेलचा मित्र काहीशा विनोदाने म्हणतो की ‘रसेलचे इंग्लिश अतिशय सफाईदार आणि पारदर्शक होते. त्याचे कारण त्याचे प्राथमिक शिक्षण कोणत्याही सार्वजनिक सरकारी शाळेत झाले नव्हते!’ कारण

केवळ तज्ज्ञांसाठीचे गंभीर व अनाकलनीय ग्रंथ, निबंध, नियतकालिके-मासिके आणि वृत्तपत्रीय लेखन तसेच भाषणे, व्याख्याने, परिसंवादातील विशेष व्याख्याने, आठवणी, कबुलीजबाब, नभोवाणी व दूरदर्शनला दिलेल्या शेकडो मुलाखती, तसेच लोकप्रिय साहित्य, कथा-दीर्घकथा, इत्यादी ललित लेखन अशी अनेक प्रकारची माध्यमे रसेलने यशस्वीपणे हाताळली. त्याचे आत्मचरित्र हाही एक वेगळा साहित्य प्रकार मानता येईल.

रसेलचे भाषासंवादाचे गारुड

विज्ञान-तत्त्वज्ञानातील An Essay on the Foundations of Geometry, Principia Mathematica, Introduction to Mathematical Philosophy सारख्या अतिशय किचकट व तांत्रिक विषयांपासून The Manners of Tourists, Choosing Cigars, The Uses of Lipstick  Wife Beating सारख्या सरळसोप्या अनंत विषयावर रसेल इतके अक्षरशः अफाट लेखन कसे काय करु शकला? सार्‍या लेखनातून जगाला प्रचंड उपदेश करण्याची क्षमता तो कशी विकसित करु शकला? ‘विश्वाचे व मानवाचे सारे प्रश्न केवळ मानवी प्रज्ञेच्या आधारेच सोडविता येतील?’ असा विश्वास त्याने कसा काय बाळगला होता? त्या विश्वासाचे तात्त्विक अधिष्ठान कोणते होते? आणि मुख्य म्हणजे ‘जगातील लोक, नेते, विद्वान मंडळी त्याचे बोलणे ऐकत का होती?’, ‘त्याने कोणती जादू केली होती?’, ‘जादू केली होती?’ हा प्रश्न तर त्याच्या बाबतीत यथार्थतेने व वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचारता येईल काय? हे आणि असे सारे प्रश्न आज उपस्थित करणे अनिवार्य आहे,असे मला वाटते.

रसेलची  प्रकांड पंडिती बुद्धिमत्ता, त्याची एकवाची-एकपाठी अतितल्लख प्रतिभा, त्याची ऋतंभरा प्रज्ञा, त्याला लाभलेला उच्च घराण्याचा वारसा, त्याला लाभलेले जागतिक दर्जाचे हजारो बुद्धिमान लोक, त्याला लेखनासाठी लाभलेली संधी व निमित्त या सार्‍या बाजू होत्याच. पण त्याने लेखनासाठी अंगी बाणवलेली शिस्त ही अतिशय महत्वाची बाब अधोरेखित करणे आवश्यक आहे.

मराठी सारस्वतापुढील आव्हान

मराठी सारस्वताला, मराठी साहित्यविश्वाला किंवा एकूणच भारतीय साहित्यविश्वाला या प्रकल्पाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, ते हे साहित्यविश्व एका उंचीवर जाण्यासाठी!

रसेलसारखे लेखक-तत्त्ववेत्ते भारतात का निर्माण होत नाहीत? किंवा झालेच असतील, ते जनसामान्यांनाच काय पण विशेषज्ञांना देखील माहित का नाहीत? किंवा त्यांना माहीत आहेत, पण हे विशेषज्ञ ते (पवित्र वैदिक गुप्तज्ञान) जाहीर करीत नाहीत, असे काही आहे का? मग का करत नाहीत? की भारतीय भाषांमधील त्या त्या साहित्यविश्वाचे प्रश्नच पाश्चिमात्य-युरोपीय जगापेक्षा भिन्न आहेत? मग आपले व पाश्चिमात्य-युरोपीय साहित्यविश्वाचे साहित्यिक व तत्त्वज्ञानात्मक नाते काय आहे? असे बरेच प्रश्न आहेत.

येथे वेदग्रंथ, जैन व बौद्ध साहित्य, पुराणे, महाकाव्ये, कथा-बृहत्कथा इत्यादींचा तसेच संत साहित्य, यांचा उल्लेख करणे, त्यांची उदाहरणे देणे अनावश्यक व संदर्भहीन आहे. कारण अशा प्राचीन साहित्याचा वारसा जगातील बहुतेक साऱ्या संस्कृतींना असतोच असतो किंवा आहे. तो वारसा अनेकांनी अनेक शतके निर्माण करीत आणला आहे. कोण्या एका व्यक्तीने लिहिलेला नाही.

भारतात, व मराठी पुरते बोलायचे झाल्यास बाळशास्त्री जांभेकरांपासून, म. फुले, लो.टिळक, आगरकर, म. शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, म. गांधीजी इत्यादींनी उदंड लेखन केले आहेच. पण रसेलच्या लेखनाप्रमाणे वैविध्य असलेले, जागतिक दर्जाची नवी विचारसरणी निर्माण करणारे आहे, असे नाही. ती नसेल तर का नाही? कशी बनविता येईल, त्यासाठी कोणत्या सचोटीवान प्रवृत्तीची व प्रामाणिक वृत्तीची गरज आहे? इत्यादी शेकडो प्रश्न उकलण्याच्या दिशेने जाण्यासाठी या रसेल प्रकल्पाची जाण असणे नितांत गरजेचे आहे, असे मला प्रामाणिकपणे (आणि अप्रामाणिकपणे ही!) वाटते. एवढे सूतोवाच येथे पुरे!!

१८ मे १८७२

 जन्मानंतर तिसर्याच दिवशी त्याने डोके अगदी वर उचलले आणि प्रचंड उर्जेने भरलेल्या नजरेने सभोवताली पाहायला सुरुवात केली

….बाळाची आई केट ॅम्बर्ले तिची आई लेडी स्टॅन्ले हिला बाळाच्या जन्मानंतर  लिहिते,

बाळाचे वजन अंदाजे पावणे नऊ पाउंड असून ते एकवीस इंच उंच आहे. बाळ खूपच लठ्ठ आणि कुरुप आहे. त्याचा मोठा भाऊ फ्रँकसारखेच याचेही डोळे निळे आहेतच, पण दोन्ही डोळे पसरट आहेत, हनुवटी तर नसल्यासारखीच 

मी दुधाने खूप भरले आहे. आणि त्याला ते मिळाले नाही किंवा द्यायलाच उशीर झाला किंवा चोखता चोखता दूध त्याच्या तोंडाबाहेर पडू लागले, तर दूध मिळेपर्यंत तो प्रचंड गोंधळ घालतो, कानठळ्या बसाव्यात इतका किंचाळतो, जोरजोरात लाथा झाडतो, दोन्ही हातांनी देखील आवरेनासा होतोफारच दणकट आहे हा आणि डॉक्टर ऑडलँड म्हणतात की त्यांच्या तीस वर्षांच्या वैद्यकीय कारकिर्दीत याच्याइतके मजबूत दांडगट बाळ त्यांनी अजून पाहिलेलेच नाही!

बाळाचे नाव काय ठेवावे, यावरून दोन्ही बाजूंच्या आज्जींबाईंनी वाद घातला. बाळाच्या वडलांची आई लेडी रसेल यांना Galahad, (ब्रिटिश उच्चारगॅलड्हाइड्’) हे नाव अतिशय पसंत होते. पण  बाळाच्या आईचीकेट ॅम्बर्लेची आई, लेडी स्टॅन्ले  यांनी मात्र आपल्या लेकीलाच (लेकी बोले विहीण लागे फेम) जोरदार खडसावलेबजावले, हे बघ, कृपा कर, हे असले काहीतरी चमत्कारिक नाव बाळावर थोपवून त्या नावाने तो ओळखला जाईल, अशी आजन्म शिक्षा विनाकारण पोराला करु नको! मग मातुल आजीबाईंनी Bertrand (ब्रिटिश उच्चार बर्ट्रंड) हे नाव सुचवले, आणि हे बाळ बर्ट्रंड रसेल या नावाने जगतविख्यात झाले

‘Galahad’ नावाला धार्मिक संदर्भ आहे. त्याचा अर्थशुद्ध अंतःकरणाचा, उमदा आणि निस्वार्थी माणूस’. ‘Bertrand’ हे ब्रिटिश जर्मन नाव आणि आडनाव दोन्ही आहे. जर्मनमधील लशीहीं (बेअर्ट) पासून ‘Bertrand’ हे नाव बनते, ‘behrt’ चा अर्थप्रकाशमान’. Bertrand हे मुलग्याचे नाव असेल, तर त्याचा जर्मन फ्रेंच अर्थ magnificent crow असा होतो. मराठीतभव्योदात्त कावळाकिंवादिमाखदार एकाक्षअसे म्हणता येईल. आणि Russell चा अर्थलाल केसांचाकिंवातांबड्या कातडीचाअसा होतो. Russell ते ब्रिटिश आडनाव आहे, तो Russel किंवा Rossell असाही लिहिला जातो.

जन्मानंतर जगाकडे मान उंचावून पाहिलेली रसेलची प्रचंड उर्जेने भारलेली नजर त्याच्या अखेरपर्यंत चढती उंच कमानीची राहिली. त्याच्या लेखनचिंतन आणि त्यानुसारच्या चळवळींनी रसेल मानवी इतिहासातील एक मौलिकदार्शनिकआणिअस्सल साहित्यिकम्हणून प्रसिद्धीस आला. विसावे शतक जणू काहीरसेल शतकम्हणून अधोरेखित झाले

 श्रीनिवास हेमाडे, हे तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.

(मुक्तसंवाद, १५ जुलै २०२१ च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा पुनर्लिखित विस्तृत आणि संपादित लेख. )

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0