लता मंगेशकर यांचे निधन

लता मंगेशकर यांचे निधन

भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांचे वय ९२ होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. केंद्र सरकारने २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, राज्य सरकारने शासकीय इतमामात दादर येथील शिवाजी पार्क येथे संध्याकाळी अंत्यसंस्कार करणार असल्याचे जाहीर केले आहे.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याचबरोबर त्यांना न्यूमोनियाही झाला होता. कोरोनाची सौम्य लक्षण जाणवत असल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. २८ जानेवारीला त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले होते. ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये केली. ही कारकीर्द पुढची ६० वर्षे सुरू होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली. २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांनी हा वारसा पुढे नेला. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांना लता असे नाव ठेवण्यात आले. लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे त्यांची अनेक गाणी अजरामर झाली आहेत. त्यांनी आनंदघन या नावाने संगीतही दिले होते.

“स्वरसम्राज्ञी लतादिदी आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील,” अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

COMMENTS