‘लता क्या चीज है’

‘लता क्या चीज है’

‘कुछ शरमाते हुए और कुछ सहम सहम, नए रास्तेपे रखा आज मैंने पहला कदम’ म्हणत सावळ्या वर्णाच्या, सडपातळ शरीरयष्टीच्या विपुल केशसंभार असलेल्या मराठी मुलीने- लताने मोठ्या दिमाखात व आत्मविश्वासाने पाचव्या दशकात, हिंदी चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत पदार्पण केले. लतादीदींच्या अद्वितीयपणाचं त्यांच्या गायकीतून उलगडून दाखवलेलं हे वैशिष्ट्य

मध्य प्रदेशात हिंसक गोरक्षकांना रोखणारा कायदा; ६ वर्षांच्या शिक्षेची तरतूद
हिंदीः राष्ट्रभाषा की संपर्कभाषा?
‘चळवळींचा आधार गेला’

त्या काळी आघाडीच्या लोकप्रिय नायिका होत्या- नलिनी जयवंत, नर्गिस, मधुबाला, निम्मी आणि गीताबाली. प्रत्येकीचे वेगळे व्यक्तिमत्व, ढब, शैली, शब्दोच्चार व भूमिका! लताने या सर्व नायिकांचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केलेला दिसतो. लताचे गाणे ऐकताना डोळे मिटून ती कुणासाठी गाते आहे ते संगीतश्रोता सांगू शकतो. लता आली, पडद्यावरील नायिका आणि लताच्या आवाजात विलक्षण साम्य दिसू लागले. लताचा आवाज साखरेसारखा, कुणाही नायिकेच्या गळ्यात सहज विरघळून गोडी निर्माण करणारा होता. मुकेशच्या मुखातून राज कपूरचा आत्मा गात आहे, असा भास होत असे. लताच्या मुखात तर भगवान श्रीकृष्णासारखे पूर्ण विश्व सामावले होते. हिंदुस्तानातील विविध प्रांतातील अनेक नायिकाचे आवाज त्यात दडलेले होते.

अभिनेत्री नलिनी जयवंतने लताविषयी अत्यंत बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली होती- ‘लताने गायलेल्या गाण्यांवर मला कधी अभिनय करण्याची गरज भासत नसे. तिचे गाणे नुसते गुणगुणले तरी त्या गाण्यातील भाव सहजगत्या व्यक्त होत.’ पन्नास ते सत्तरच्या दशकांत पार्श्वगायिकांनी आघाडीचे गायक वाटून घेतले होते. मात्र बहुतेक संगीतकारांची पहिली पसंती ही फक्त लता होती. मग ती नायिका अथवा सहनायिका कोणीही असो. लता नसेल तर इतर गायिकांना संधी! लताने गायिकेच्या दृष्टीने कितीही अवघड चाल, हरकती, मुरक्या, आड लय असली तरी कधी तडजोड केली नाही. त्या गाण्याचे चीजच केले आहे. प्रत्येक नव्या-जुन्या प्रतिभावंत संगीतकाराचे आव्हान तिने पेलले आहे. ज्याला ‘प्युअर क्लासिकल’ म्हणता येतील अशी गायकीच्या दृष्टीने अत्यंत अवघड अशा ताना असलेली वजनदार गाणी तेच माधुर्य राखून इतक्या तरलपणे भावनावेगाने ओथंबून गाणे, मला नाही वाटत लता सोडून कधी कुणाला जमले असते.

‘हाय कैसे दिन बीते कैसे बीती रतिया’ (चित्रपट – अनुराधा) हा उच्छ्वास टाकणारा हायचा उच्चार फक्त लतानेच करावा. आपल्या श्वासावर ही लताची हुकूमत जाणवते. गाताना लताला स्वर लावावा लागत नाही. हार्मोनियमची मदतही नाही. तिने गायला तोंड उघडताच ते स्वर आपोआप लागले जातात. शास्त्रीय संगीतातील गायक-गायिकांना मैफिलीत गाताना खालचा सा किंवा षडज लावायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात लता आपल्या गाण्यातून त्या रागाचे स्वरुप उलगडून दाखवते. एखाद्या सुंदर बागेतील कारंजे चालू केल्यावर लगेच ते जसे थुई थुई नाचू लागतात तसे लताने नुसते तोंड उघडले तरी तिच्या मुखातून सुरेल शब्दांचा शिडकावा होतो. गाण्यातील तिचे गद्य संवाद किंवा साधे संभाषणही इतके सुरेल असते की ते तास न तास ऐकत राहावे. उदा. ‘झनक झनक पायल बाजे’ चित्रपटातील ‘नैन सो नैन’ गाण्यातील, ‘अच्छा! रुक क्यूँ गए?’ किंवा ‘आराधना’तील ‘बागों में बहार है’ गाण्यातील गद्य संवाद.

चांगल्या वजनदार गाण्याचा आविष्कार करताना लता श्वास घेते की नाही याचा प्रश्न पडतो. गाण्याच्या दोन-तीन ओळी एका दमात तिला गाताना पाहून ऐकणाऱ्याचा श्वास बंद पडण्याची वेळ येते. उदा. ‘बेदर्द तेरे दर्द को सीने से लगाके, रो लेंगे तवस्सूर में तुझे पास बिठाके’ (चित्रपट – पद्मिनी, संगीत – मास्टर गुलाम हैदर) हे दमछाक करणारे वजनदार गाणे विशीतल्या मध्यमवर्गीय मराठमोळ्या मुलीने गायले आहे यावर विश्वास न बसावा असे आहे.

लताना घडवण्यात अनेक जुन्या-नव्या संगीतकारांचा वाटा आहे. संगीतकारांनी लतालाच का घडवले? इतर गायिकांना का नाही ते घडवू शकले? याचे कारण या सर्वांमध्ये लताचे स्वतःचे मोठे योगदान आहे. लताच्या मार्दवयुक्त आवाजात लवचिकपणा अधिक आहे. इतर शास्त्रीय गायकांपेक्षा मर्दानीपणा कमी आहे. रियाज, विद्वता, तंत्र, प्रतिभाशक्ती आणि गायनाचा अनुभव या बाबतीत तिला उभ्या विश्वात तोड नाही. आज नाक्यावरच्या पानाच्या ठेल्यावर, केशकर्तनालयातही शास्त्रीय संगीत कानावर पडते. ही किमया लताच्या गाण्यांनी केली आहे म्हटल्यास वावगे ठरू नये.

लताचे योगदान समजण्यासाठी ‘मधुमती’ चित्रपटातील ‘ओ बिछुआ’ हे समूह नृत्यगीत उदाहरण म्हणून घेऊ. या गाण्याच्या अपूर्व यशात संगीतकार, गायक, गायिका, दिग्दर्शक आणि नायिका या सर्वांचा महत्त्वाचा सहभाग आहे. परंतु जाणीवपूर्वक या गाण्याचे श्रवण केल्यास आपल्या लक्षात येते की गाण्यात खरी रंगत आणली आहे ती लताने व तिच्या गाण्यावर अभिनय करणाऱ्या वैजंयतीमालाने. गाण्यात विषारी विंचवाने कडाडून चावा घेतल्यानंतर नायिका कळवळून ओरडते- ‘ओय..ओय..ओ..’ म्हणत लताने ही जागा अशी काही उचलली आहे की प्रत्यक्ष ध्वनिमुद्रणप्रसंगी मन्ना डे, सलिलदा व विमलदाही क्षणभर स्तिमित झाले. इतक्या भावनावेगाने, विद्वतापूर्वक परंतु सहज भासणारे स्त्रीसुलभ उच्चार फक्त लताच करू जाणे. लता गाण्यातून हा प्रसंग डोळ्यांसमोर उभी करते हे तिचे स्वतःचे, एकटीचे योगदान आहे. अशीच एक सर्वांगसुंदर जागा लताने ‘यहुदी’मधील ‘मेरी जा मेरी जा’मध्ये घेतली आहे.

भारतीय लोकसंगीतावर आधारित विविध रचना ऐकताना प्रश्न पडतो की लताचा नक्की प्रांत कोणता? प्रादेशिक संगीत गाताना ती तिथली होऊन जाते. भारतातील विविध बोली भाषांतील शब्दोच्चार, शब्दांची फेक, वजन, त्याचा अर्थ समजावून घेण्याची क्षमता व त्यातील नैसर्गिक लय यावर तिचे प्रभुत्व जाणवते. सज्जादच्या ‘रुस्तम सोहराब’ चित्रपटामध्ये, ‘ऐ दिलरुबा, नजरे मिला’ ही अरेबियन सुरावटही तिने त्याच ढंगाने आळविली आहे.

एखादे कोळी गीत म्हणजे तीच चाल व तोच ठराविक ठेका, फक्त शब्दांची अदलाबदल! पं. हृदयनाथ व लता यांनी ‘मी डोलकर’ या गीताची निर्मिती करून कोळीगीताला अशा उंचीवर नेवून ठेवले आहे की, तिथपर्यंत पोचण्याचे भविष्यात कुणी धाडसही करू शकणार नाही. ‘या गो दरियाचा दरारा मोठा’ ही अप्रतिम जागा म्हणजे मंगेशकरांच्या प्रतिभेची छोटीशी झलक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संस्कृतप्रचुर काव्याला सुरेख चाल लावून ते गीत म्हणून जनसामान्यात लोकप्रिय करण्याचे धाडसही लताने दाखवले आहे. लताचे गाणे शांत, मंदिरात शोभून दिसणारे, पांढऱ्या मोगऱ्याच्या कळीसारखे सोज्वळ, सात्विक आहे. ओवी, अभंग, भजन, गवळण, मीराबाईची पदे, लतानेच गावीत. उदा. सपना बन साजन आये – शोखियाँ, ज्योति कलश छलके – भाभी की चूडियाँ, एरी मैं तो प्रेम दीवानी – नौ बहार.

सुरुवातीला लताच्या हिंदी उर्दू शब्दोच्चाराविषयी शंका घेणाऱ्या टीकाकारांची तोंडे तिने बंद करून टाकली. खानदानी मुस्लिम संस्कृतीप्रधान चित्रपटातील अस्सल उर्दू गीतकारांची गाणी तिने गायली आहेतच. याशिवाय ‘सुबह का तारा’मधील ‘यूँ ही हूए बदनाम’ गाण्यात आपल्या नाजूक आवाजात बेमालूमपणे बदल करून लखनवी तवायफचा ढंगही तिने प्रदर्शित केला आहे. या बाबतीत एका खास गाण्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे – ‘बसा लो अपनी निगाहों में प्यारा थोडासा’ नाजूक रेशमाची लडी इतकेच उलगडावी तशी यातील ‘थोडा सा’ ही हरकत आहे. पुढे ‘वो हंस के बोले हां अभी इंतजार थोडासा’ हां..धसनिधपमगरेसा या अप्रतिम जागेवर पंडितजी व लतानी शब्दातील भाव सूरातून काढन दाखवला आहे. लताची भावस्पर्शी लाडीक आर्जव वेड लावणारे आहे. ‘खुशी से भर दिया दामन रकीब का तुमने, हुजूर मेरे लिए, हुजूर मेरे लिए इकरार थोडासा’ हा भाग लाहौरचा अस्सल पंजाबी ढंग दाखवतो. लताने घेतलेली ‘तुमने’ ही जागा प्रख्यात कव्वाली गायक शंकर शंभू यांची तीव्रतेने आठवण करून देते. आवाजातील असा लवचिकपणा फिल्मी संगीतात क्वचित पाहायला मिळतो. खमाज रागातील ही अफलातून संगीतरचना पंडित श्यामसुंदर यांच्या ‘बाजार’ चित्रपटातील आहे. शास्त्रीय संगीतातील उस्ताद, पंडित, खाँसाहेबांनाही विस्मय वाटावा अशा जागा लताने फिल्मी गीतात घेऊन त्याला मानसन्मान, प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. त्यातील काहींचा उल्लेख केल्याशिवाय ‘लता क्या चीज है’ याची पुरेशी कल्पना रसिक श्रोत्यांना येणार नाही.

‘ये बहार ये समां कह रहा है प्यार कर’ यातील ‘प्यार’ शब्दावर लावलेला सुरेख कोमल निषाद. पुढे ‘ए जिन्दगी की शाम आ’ – पनी धनी सा, नीपनी म साम गप मनी सा हा कोमल निषाद आणि मध्यमाचा संवाद व आकारावर घेतलेली नाजूक लकेर – चित्रपट – अनारकली (ऐ जिन्दगी उसीकी है) ‘कही ऐसा न हो, दिल की लगी दिल ही को ले डुबे’ – ही लाजवाब जागा – चित्रपट – अलिफ लैला (बहार आयी खिली कालिया – राग हिंदोल), ‘नैन कहे रो रोके सजना’ यातील ‘सजना’वर घेतलेली हरकत – चित्रपट – बैजू बावरा (मोहे भूल गए सावरिया), ‘जिया ले गयोजी मोरा सावरिया’ – चित्रपट – अनपढ. यातील माधुर्य आणि लयकारी. ‘आ ओ बाज रही शहनाई, आ नैनो मे झूमकर साजना सपनों मे बाजी शहनाई’ – चित्रपट – दारा. यातील ‘सजना’वर घेतलेली हरकत व शहनाई वर घेतलेली गोड सम. ‘छेड गयो मोहे सपनों मे श्याम’ – चित्रपट – झांझर, छेड गयो – मोहे खमाजमधील, तीव्र निषाद षडजाला मिळणारी ही खट्याळ जागा. ‘बैरन नींद न आये’ – चित्रपट चाचा झिन्दाबाद, ‘बैरन, बै’वर लावलेला काफीमधील धैवत, जणू काही झोप ही वैरीणच आहे असा भास होतो. ‘कैसे सबे बिछोह हम’ यातील तारसप्तकातील षडज, चित्रपट – मालती माधव (बांध प्रीती फूलडोर), ‘ऐ दिल मचल मचल’ – चित्रपट – मै सुहागन हूँ. यातील ‘ऐ’वर लावलेला गंधार, पुढे ‘अपना चमन उजाड गया’ ही हरकत व ‘काँप उठी है जिन्दगी’ येथे सुराला दिलेले हेलकावे थरकाप प्रकट करतात आणि शेवटचे मास्टर गीत, ‘साजन की गलिया छोड चले’ – चित्रपट – बाजार, संगीत पंडित श्यामसुन्दर. यातील ‘गालिया’वर घेतलेली हरकत, रोया – आंसू धैवत व गंधारचा सुखद संवाद, पुढे अंतऱ्याच्या मध्ये ‘उनके लिए उनको (गंधार), छोड दिया (मध्यम) दिया’वर घेतलेली लाजवाब हरकत कळस गाठते. पहाडी रागावर इतके सुंदर गाणे परत कधी झाले नाही.

(मूळ लेख – तारांगण (सप्टेंबर २०१९, संपादक – मंदार जोशी ) या मासिकात प्रसिद्ध झाला आहे.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0