‘एच-वन बी’ व्हिसावर वर्षभर स्थगिती

‘एच-वन बी’ व्हिसावर वर्षभर स्थगिती

वॉशिंगटन/नवी दिल्लीः अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न बाळगणार्या भारतासहीत जगभरातील आयटी प्रोफेशन्सला एक मोठा झटका ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी दिला असून

अफ़गाणिस्तानचा तिढा
अमेरिकेतील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट मागे का घेतले
ट्रम्प यांची २० पावले, घडला इतिहास

वॉशिंगटन/नवी दिल्लीः अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न बाळगणार्या भारतासहीत जगभरातील आयटी प्रोफेशन्सला एक मोठा झटका ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी दिला असून एच-१बी व्हिसा, एच-४ व्हिसासोबत अन्य व्हिसाच्या मंजुरीला वर्षभर स्थगिती दिली आहे. अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका जवळ आल्या असून स्थानिक बेरोजगारांच्या प्रश्नावर उत्तर म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २४ जूनपासून सुरू होणार आहे. या निर्णयाने अमेरिकेतील लाखो बेरोजगारांना रोजगार मिळेल व कोविड-१९च्या काळात अमेरिकेच्या आर्थिक व्यवस्थेला जी झळ बसली आहे, ती भरून काढण्यासाठी ही पावले उचलणे गरजेचे होते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

एच-१बी व्हिसावर स्थगिती आणण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर बहुराष्ट्रीय कंपन्या, मानवाधिकार संघटनांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अमेरिका दरवर्षी ८५ हजार एच-१बी व्हिसा मंजूर करत असून या वर्षी या व्हिसासाठी २ लाख २५ हजार अर्ज आले आहे. एनडीटीवी ने दिलेल्या माहितीनुसार या व्हिसांच्या मंजुरीला स्थगिती दिल्याने अमेरिकेत सुमारे ५ लाख २५ हजारांहून अधिक पद रिक्त होतील व त्या नोकर्या अमेरिकी नागरिकांना मिळतील, असे ट्रम्प यांचे प्रयत्न आहेत.

एच-१बी व्हिसांवर स्थगिती आणल्याने त्याचा मोठा परिणाम अमेरिकेबरोबर भारतातील आयटी कंपन्यांवर होणार आहे. कारण १ ऑक्टोबर २०२१ पासून नव्या वित्तीय वर्षांसाठी एच-१बी व्हिसा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, व्हिसाही मंजूर झाले होते. व्हिसांचे नूतनीकरणही सुरू होते. आता ही प्रक्रिया पूर्वपदावर येण्यासाठी भारतीय आयटी कंपन्यांना किमान पुढील आर्थिक वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.

एच-१बी व्हिसामुळे अमेरिकेतील आयटी कंपन्यांना भारतातील आयटी तंत्रज्ञानांना रोजगार देणे सोयीचे होते. भारतातील कुशल तंत्रज्ञ या व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकेत काम करू शकत होता. अमेरिकेतील कंपन्यांना भारतीय तंत्रज्ञ स्वस्तात मिळत होते पण भारतीय तंत्रज्ञांचे  अमेरिकेतील बड्या आयटी कंपन्यांमध्ये काम करण्याचे स्वप्न साकार होत होते. केवळ भारतीय नव्हे तर पाकिस्तान, चीन अशा देशातील अनेक आयटी तंत्रज्ञांना अमेरिकेत काम करण्यासाठी या व्हिसाचा फायदा होत होता.

ट्रम्प यांनी स्थलांतरितांचा देशावर सतत येणार्या बोजाबद्दलही नाराजी प्रकट केली. ते म्हणाले, अमेरिकेतील स्थानिक रोजगारावर स्थलांतरितांमुळे गदा येत असून सध्या अमेरिकेतल्या बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. त्या स्थानिक रोजगारनिर्मितीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. अमेरिकेचे सध्याचे धोरण ‘फर्स्ट रिकव्हरी’ असून अमेरिकेतील श्रमिकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी व कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी सरकार त्यांच्या मागे उभे आहे, असे ट्रम्प म्हणाले.

निर्णयावर गूगलचे सीईओ सुंदर पिचाई व नॅस्कॉम नाराज

अमेरिकेत नोकरी करणार्यांच्या व्हिसांवर स्थगिती आणल्याने गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. गूगल स्थलांतरितांच्या पाठिशी उभे असून त्यांच्यासाठी संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ट्विट पिचाई यांनी केले आहे.

अमेरिकेला आर्थिक पातळीवर समृद्ध करण्यामागे स्थलांतरितांचा मोठा वाटा आहे, त्यांच्यामुळेच अमेरिका तंत्रज्ञानात जगातील सर्वश्रेष्ठ मानली जाते. गूगल स्थलांतरितांमुळेच अग्रेसर आहे. सरकारने जी घोषणा केली आहे त्यावर आम्ही नाराज असून स्थलांतरितांच्या मागे आम्ही उभे आहोत, त्यांना संधी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे पिचाई म्हणाले.

आणखी एक संस्था लीडरशीप कॉन्फरन्स ऑन सिव्हिल अँड ह्युमन राइट्सच्या अध्यक्ष वनिता गुप्ता यांनी ट्रम्प यांचा हा निर्णय वंशभेद व परदेशी नागरिकांविरोधातील भावनेचा आणखी एक प्रयत्न असल्याची टीका केली आहे.

तर सॉफ्टवेअर उद्योगांची संघटना नॅस्कॉमने ट्रम्प यांचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत या निर्णयाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. अमेरिकेतल्या स्थानिक मनुष्यबळाकडे कौशल्य नाही, त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसेल असे नॅस्कॉमचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: