कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे महासंकट

कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे महासंकट

न्यूयॉर्क : जगभर कोरोना विषाणूची पसरलेली साथ हे दुसर्या महायुद्धानंतरचे जगापुढील सर्वात मोठे संकट असून या आपत्तीत केवळ लोकांचे मृत्यू होणार नाहीतर तर जगाची अर्थव्यवस्था वेगाने मंदीकडे जात असल्याची भीती संयुक्त राष्ट्रांचे महासरचिटणीस अँटोनियो गुंतारेस यांनी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक दशकात जगापुढे असे संकट आलेले नाही, असेही ते म्हणाले.

अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार जगभरात कोरोनाचे सुमारे ९ लाख रुग्ण असून ४५ हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर केवळ अमेरिकेत जगातील सर्वाधिक २ लाख नागरिकांना कोरोना विषाणू बाधा झाली असून ५ हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणुमुळे अमेरिकेत सुमारे दोन ते अडीच लाख मृत्यू होतील अशी भीती व्यक्त केली आहे. अमेरिकेतल्या सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर येणार्या संकटासाठी सज्ज राहावे असेही त्यांनी म्हटले आहे.

गुंतारेस यांनी कोरानाचे संकट हे सामूहिक प्रयत्नाने परतावून लावू शकतो असा विश्वास व्यक्त करताना सामूहिक जबाबदारी, वैश्विक ऐक्य, सामाजिक –आर्थिक पातळीवर याचा सामना शक्य असल्याचेही म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ७५ वर्षांच्या इतिहासात हे पहिलेच संकट आहे, हे संकट केवळ लोकांचे प्राण घेणारे नाही तर मानवी समाजाला वेदना देणारे व आयुष्य उध्वस्त करणारे असल्याचे म्हटले आहे.

आर्थिक निधीची गरज

कोरोनामुळे जगापुढे एक मोठे आर्थिक संकट उभे राहिल्याचेही गुंतारेस म्हणाले. या जगाला आर्थिक संकटातून बाहेर काढायचे झाल्यास एका फंडची गरज असून जेव्हा या संकटातून जग बाहेर येईल तेव्हा आपणा सर्वांना आपल्या पूर्वीच्या जगात पुन्हा जावे लागेल किंवा ज्या संकटामुळे आपण कमकुवत होऊन जातो त्यावर निर्णायकी असा उपाय शोधला पाहिजे, असे ते म्हणाले.

संयुक्त राष्ट्रांमधील एक सहयोगी आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोरोनाच्या महासाथीमुळे विविध क्षेत्रातल्या ५० लाखाहून अधिक नोकर्या नष्ट होतील व अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला ९६० अब्ज ते ३.४ खर्व डॉलर नुकसान सोसावे लागेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रांची आणखी एक सहयोगी संस्था अंक्टाडने कोरोना महासाथीमुळे परदेशी गुंतवणुकीचे ४० ते ५० टक्के नुकसान होईल तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटनात २० ते ३० टक्के कपात होईल अशी भीती व्यक्त केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS