लोकशाहीचे मारेकरी

लोकशाहीचे मारेकरी

या देशाला एका हुकुमशहाची गरज आहे...असे म्हणणाऱ्या वर्गाची इच्छा वायूवेगाने पूर्ण होताना दिसते आहे. तपास यंत्रणा, नोकरशाही, समाजातला सुस्थापित धर्मप्रेरित देशभक्त वर्ग लोकशाहीच्या एकेक खाणाखुणा पुसून टाकण्यासाठी आपले योगदान नोंदवतोय...

चांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार
कोरोनाचा आकड्यांचा खेळ
‘आरे’तील ६०० एकर जागा वनांसाठी राखीव

या लेखाच्या प्रारंभालाच एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. ती म्हणजे, कितीही मोनोटोनस असला, कितीही दीडशहाणा वाटला आणि कितीही विघ्नसंतोषी-नकारात्मक भासला, तरीही या घडीला टेलिव्हिजन न्यूज क्षेत्रातला देशातल्या मोजक्याच विवेकी, धाडसी नि एकनिष्ठ पत्रकारांपैकी रवीशकुमार हा एक पत्रकार-लेखक आहे.

रवीशकुमारला मॅगेसेसे अवॉर्ड मिळाले आहे, म्हणून तो मोठा पत्रकार नाहीये, तर रोज त्याला खुनाच्या, त्याच्या बायको-बहिणीला बलात्कार-अत्याचाराच्या धमक्या मिळत असताना अथकपणे लोकशाहीची हत्या करणाऱ्यांविरोधात तो सातत्याने आवाज उठवतो आहे. असुरक्षिततेची भावना देणारे सर्व घटक त्याच्यावर दबा धरून असूनही त्याने त्याच्यातला माणूस मरू दिलेला नाही. अभिव्यक्तीचे सर्वात धारदार अस्त्र ठरलेल्या उपरोधाची धार बोथट होऊ दिलेली नाही. म्हणून तो थोर आहे. असो.

काही योग खूप विचित्र असतात. ते टाळायचे म्हणून टाळता येत नाहीत. असेच काहीसे त्या दिवशी घडले होते. तो दिवस ७ मे २०१७ हा होता. रवीशकुमारच्या गाजियाबाद इथल्या घरी गेलो होतो. बऱ्याच वर्षानंतरची भेट असली, तरीही वर्तमान राजकारण आणि टेलिव्हिजन जर्नालिझम या पलीकडे बोलण्याचे विषय जात नव्हते. नेमका तो दिवस ‘रिपब्लिक’ नामक चॅनेलच्या लाँचिंगचाही दिवस होता. आदल्या दिवशीच्या एका सेमिनारमध्ये उपस्थित पत्रकारांमध्ये हाच मुख्यतः गप्पांचा विषय ठरला होता. त्या वेळी सहज बोलता बोलता, रवीशकुमारने टीव्ही ऑन केला. चॅनेल सर्फिंग करता करता नुकत्याच सुरू झालेल्या ‘रिपब्लिक’ चॅनलवर थोडा थांबला. काहीतरी सुपर एक्स्लुसिव्ह ‘चेस सिक्वेन्स’ सुरू होता. चॅनलचा रिपोर्टर काँग्रेस खासदार आणि सुनंदा पुष्कर हत्येचा आरोप झालेले शशी थरूर यांच्या तिरुवनंतपूरम इथल्या घराची भिंत ओलांडून ‘सत्य’ टिपण्यासाठी पुढे सरसावत होता. एखाद्या शार्प शूटरप्रमाणे. एकीकडे अँकरचे शशी थरुरना खुनी, कारस्थानी, पळपुटा अशी दूषणे देणे सुरू होते. न राहवून रवीशकुमारने टीव्ही बंद केला. म्हणाला- यह कोई जर्नालिजम है…यह तो गुंडा जर्नालिजम है…पुरे देश को खा जाएगा यह…

त्या क्षणी रवीशकुमारचे ते म्हणणे थोडे अतिरंजित वाटले होते, परंतु आज तंतोतंत खरे ठरले आहे. गिधाडांमधल्या गुंडांप्रमाणे टेलिव्हिजन न्यूज चॅनेलच्या पत्रकारांनी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातली आरोपी आणि आता मारुआना खरेदी-सेवनप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेली रिया चक्रवर्ती हिला ओरबाडायचेच तेवढे शिल्लक ठेवले होते. मुंबईतल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयाबाहेर न्यूज चॅनेल्सच्या प्रतिनिधींनी तिला घातलेला हिंसक वेढा ‘गुंडा जर्नालिजम’चे जिवंत उदाहरण ठरला होता.

लक्षात घ्या, निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी मिळून दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने, सभ्यतेने वागा, जर्नालिजमच्या मर्यादांचे पालन करा, असे मीडियाला, त्यातही टीव्ही न्यूज मीडियाला निर्देश दिल्यानंतरही हे घडले होते. रिया चक्रवर्ती ही कितीही मोठी गुन्हेगार असेल, पण न्यायालयाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून गुन्हा सिद्ध होण्याआधीच तिला टोचून टोचून मारण्यात आले आहे. कोणाचीही पर्वा न करता तिच्या चारित्र्याचे लचके तोडले गेले आहेत.

सत्तेचा वरदहस्त असलेले काही चॅनेल्स गिधाडगिरी करत असतील तर समाजातला एक वर्ग रिया चक्रवर्तीला मिळत असलेल्या या शिक्षेमुळे ( लक्षात ठेवा- ‘प्रोसेस इटसेल्फ इज पनिशमेंट’.) कमालीचा चेकाळल्यागत वागतो आहे. रियाबाबत जे घडतेय, ते योग्यच घडतेय, तिला तिच्या कर्माची फळे मिळताहेत, अशी या वर्गाची पक्की खात्री आहे. यात चांगले शिकले-सरवलेले, ‘फॉरेन रिटर्न’ म्हणून तोरा मिळवणारे, स्वतःला सभ्य नि सुसंस्कृत मानणारेच अधिक आहेत.

हा तोच वर्ग आहे जो, सीएए-एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्यांना अद्दल ही घडायलाच हवी, असे म्हणणारा आहे. हा तोच वर्ग आहे, जो जेएनयू-जामियामधल्या विद्यार्थ्यांना धडा शिकवला हे, उत्तमच झाले, असे मानणारा आहे. आणि हा तोच वर्ग आहे, जो दिल्लीतल्या जातीय दंगलीत सर्वाधिक मनुष्यहानी आणि मालमत्तेचे नुकसान सोसलेला मुस्लिम समाजच सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, असे ठासून सांगणारा आहे. म्हणजे एका बाजूला द्वेषाने, सुडाने पेटलेला समाजातला एक वर्ग आहे आणि दुसरीकडे या वर्गाच्या मनोकामना पूर्ण करणारी ‘रिपब्लिक’ टीव्हीसारखी कितीतरी हिंदी-इंग्लिश न्यूज चॅनेल्स आहेत.

कोरोनाचा कहर वाढतोय, भारत-चीन सीमेवरचा तणाव शिगेला पोहोचलेलाय, लडाखमधला तणाव निवळण्यासाठी भारताचे परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण मंत्री तिकडे रशियात डेरेदाखल आहेत, उद्योगधंद्यांना मोठी खीळ बसलेली आहे, बेरोजगारामुळे सामाजिक वीण उसवण्याचा धोका समोर दिसतोय आणि हे सगळे ज्वलंत प्रश्न बिनमहत्त्वाचे ठरवून एका नटाच्या आत्महत्येचा, एका उद्दाम नि आक्रस्ताळ्या नटीच्या बेताल बडबडीचा सर्वोच्च राष्ट्रीय प्रश्न बनवून दरदिनी न्यूज चॅनेल धिंगाणा घालताहेत. आपण कितीही उत्पात घडवला तरीही ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’च्या रक्षणासाठी विद्यमान सत्ताधारी कायम आपल्या मदतीला तत्पर असणार आहेत, याची या चॅनेलवाल्यांना पूर्ण ग्यॅरंटी आहे.

प्रत्यक्षात घडतेही तसेच आहे. विरोधी विचार करणाऱ्यांचा खरा-खोटा गुन्हा कसाही करून कायद्याच्या चौकटीत बसवा आणि समर्थक व्यक्ती-संघटनांचे मोठ्यातले मोठे गुन्हे कायद्याच्या कचाट्यातून सोडवा, या संदेशबरहुकूम जणू दिल्लीपासून राज्यापर्यंतच्या सगळ्या यंत्रणा हलताहेत. म्हणजेच, विरोधात असलेल्या लेखक-कार्यकर्ते-विद्यार्थ्यांना थेट देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगांमध्ये डांबले जात आहे. आणि विरोधकांना धमकावणाऱ्या मर्जीतल्या नेत्यांना, जनभावना भडकावणाऱ्या न्यूज चॅनेल्सना पूर्ण मोकळीक आहे.

लोकशाहीच्या हत्येत आपण सामील असल्याची या चॅनेल्सने तशी कधीही फिकीर केलेली नाही. परंतु, भस्म्या रोग झाल्यागत या चॅनेल्सवर जे दाखवले जाईल, ते खरेदी करणारा वर्गही या हत्येत दोषी आहे, आणि हीच सगळ्यात धोकादायक बाबही आहे.

नेहरू अय्याश होते…काँग्रेसने देशाची वाट लावली…हे सांगताना हा वर्ग पिसाळून उठल्यागत वागतो आहे. तसेच विद्यमान पंतप्रधान हेच या देशाचे खरेखुरे भाग्यविधाते आहेत, मसिहा आहेत, हे सांगताना त्याचा आवाज फाटतोय. चिरकतोय. धर्मप्रेरित देशभक्त ही या सगळ्यांची एकसामायिक ओळख आहे.

काळ कोणताही असू द्या, धर्मप्रेरित देशभक्त हे सगळ्यात हिंसक आणि म्हणून विद्धंसक समीकरण आहे. आधी ही हिंसा मुखावाटे बाहेर पडते, मग ती प्रत्यक्षात रस्त्यांवर दहशत माजवताना दिसते. गेल्या काही वर्षांत कितीदा तरीही याचा प्रत्यय आलेला आहे. सोशल मीडियावर मध्यंतरी कोणीतरी ‘हिंदुस्थानी भाऊ’ अशी खास देशी ओळख असलेला धर्मप्रेरित देशभक्त सुसंस्कृत, सभ्य समाजाला लाज वाटावी, अशाप्रकारे अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन एका स्टँडअप कॉमेडियनला ‘जशास तसे’ उत्तर देत होता. ते देताना तो आई-बहिणीवरून घाण घाण शिव्या घालत, धर्माच्या, पर्यायाने सत्तेच्या विरोधात असलेल्या इतर सगळ्यांनाही धमकावत होता. त्याच्या या धमक्यांना लाखो लाइक्सही मिळत होते.

घरातल्या पोरीबाळींच्या कानावर पडू नये, असे काय काय हा हिंदुस्थानी भाऊ बरळतोय, आणि विश्वगुरू होण्याची क्षमता असलेल्या सर्वश्रेष्ठ धर्माचा ध्वज हाती घेतलेल्या विद्यमान सत्तेची पितृसंस्था असलेल्या सांस्कृतिक संघाचे याबाबत काहीच म्हणणे नाहीये. ‘जैसी करनी, वैसी भरनी’ हाच बहुदा त्यांचा तक्रारदारांना परस्पर सांगावा आहे. निःसंग साधूबाबांच्या रुपात शिरू पाहणाऱ्या विद्यमान पंतप्रधानांचे दीर्घकालीन मौन ही तर त्यांची मोठीच खासियत ठरली आहे. तेही अशा प्रसंगी आपला दरवाजा उघडणार नाहीत, हे एव्हाना स्पष्ट आहे.

हिंसा मग ती शाब्दिक असो वा कृतीमधली, त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्याची मोठीच सिद्धी विद्यमान सत्ताधाऱ्यांनी कमावली आहे. यातली त्यांनी पूर्वसुरींना खूप मागे टाकले आहे. सध्या जे काही चालले आहे, तो सारा नियतीचा विहित खेळ आहे आणि नियतीचे दान हे आमच्या बाजूने राहणार आहे, याची खात्री असल्यासारखे सत्ताधाऱ्यांचे सध्या वागणे-बोलणे आहे.

काँग्रेस नालायक होती, समाजवादी दुबळे होते आणि कम्युनिस्ट देशविरोधी होते, असे म्हणता म्हणता, विद्यमान सत्ताधारी सुडाचे राजकारण करत, सगळ्यांना मागे टाकून शंभर योजने पुढे निघून गेले आहेत. सुडाची ही भावना इतकी संसर्गजन्य आहे की, ती आता, सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांमध्येसुद्धा ती खोलवर झिरपली आहे. रिया चक्रवर्तीच्या संदर्भाने, मुलगी उच्चकुलीन, उच्चशिक्षित असो वा तळाच्या दलित-महादलित शोषित-पीडित वर्गातली, सगळ्या जणींच्या वाट्याला येणारे भोग, मिळणारी शिक्षा एकसमान असणार आहे, हा या सत्योत्तर काळात आपली छाप सोडू पाहणाऱ्या नव्या राष्ट्रातल्या व्यवस्थेने दिलेला संदेश आहे. आता राजकीय फायद्या-तोट्याची गणिते पाहून इथे बड्या-बड्यांचेही बळी दिले जाणार आहेत आणि छोट्यातले छोटेदेखील सर्वंकष सत्तेच्या लालसेत भरडले जाणार आहेत.

परंतु, याचे भान सुटलेले तमाम सुसभ्य लोक सत्ताधाऱ्यांनी आरंभलेल्या खेळात आनंदाने सामील आहेत. ‘जस्टिस फॉर एसएसआर’, ‘डेथ ऑफ डेमोक्रसी’ असे हॅशटॅग चालवून आपण, या देशाची, या देशाच्या लोकशाही संस्कृतीची खूप मोठी सेवा करत असल्याचा भ्रम त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. हा भ्रम टिकून राहावा, यासाठी रवीशकुमार म्हणतो, तसे दिवसाचे २४ तास गुंडा जर्नालिजम करणारे लोक रोज नवा शत्रू लोकांपुढ्यात उभा करताहेत.

हे सारे अर्थातच विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या मनासारखे घडते आहे. ही उघडपणे लोकशाहीची हत्या आहे, हे खरेच. पण, ‘या देशाला एका हुकुमशहाची गरज होतीच’, असे जाहीर इच्छा बोलून दाखवणारे लोक या हत्याप्रकरणात अग्रभागी उभे राहून लोकशाहीच्या दिशेने आगीचे गोळे फेकताहेत.

घरातल्या हुकुमशाहीने कुटुंबव्यवस्था टिकत असेलही. पण घराबाहेरच्या हुकुमशाहीने देश विस्कटतात. समाज उद्ध्वस्त होतात. लोकशाही मरते. लोकशाही मेली की माणसातला माणूस मरतो. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा सरकार आणि सरकारच्या हाताखालच्या तपास यंत्रणा आणि या सगळ्यांभोवती फेर धरून असलेले सत्तासमर्थक नागरिक यांनी मिळून जो खेळखंडोबा चालवला आहे, ते पाहता लोकशाहीतला माणूस मरण्याची प्रक्रिया एक टप्पा पुढे सरकली आहे.

न्यायाधीश विरुद्ध न्यायाधीश, राजकारणी विरुद्ध राजकारणी, नोकरशाही विरुद्ध नोकरशाही, चॅनेल्स विरुद्ध चॅनेल्स, पोलीस विरुद्ध पोलीस, कलावंत विरुद्ध कलावंत अशी ही सुडाची आग आता घरादारांत, नातेसंबंधातही पसरत चालली आहे. पूर्वीच्या राजवटींमध्ये या आगीचा फैलाव विशिष्ट वर्गापुरता मर्यादित होता, पण आता ही आग सर्वव्यापी झालेली आहे. यात दुरान्वये संबंध नसलेल्यांनाही मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.

ताजा कलमः राजकीय वर्चस्वाच्या साठमारीत सीन क्रिएट करण्याचे तंत्र दक्षिणेतल्या राजकारण्यांनी विशेषतः करुणानिधी-जयललिता संघर्षाच्या काळात विकसित केले. आता केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांनी आणि इतरही विरोधी पक्षांनी या तंत्रावर हुकुमत मिळवली आहे. राज्यात गेल्या चार-आठ दिवसांत रिया चक्रवर्ती आणि कंगना राणावत प्रकरणात याचा प्रत्यय चांगलाच प्रत्यय येत गेला. आधी एनसीबीच्या चौकशीच्या निमित्ताने सलग तीन-चार दिवस सीन क्रिएट केले गेले, मग महारानीच्या थाटात थेट मुख्यमंत्र्यांना ‘अरे-तुरे’च्या भाषेत ललकारणाऱ्या कंगना राणावतला धडा शिकवण्यासाठी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी सीन क्रिएट केला. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, तुमची पद-प्रतिष्ठा काय आहे, तुमची पोहोच किती आहे, यावर सीन क्रिएट करायचा, की नाही हे ठरणार आहे. आता हे आपल्याकडचे ‘न्यू नॉर्मल’ आहे.

शेखर देशमुख, हे लेखक पत्रकार, लेखक आणि ग्रंथसंपादक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0