कपिल सिब्बल यांच्यावर काँग्रेस नेत्यांचा निशाणा

कपिल सिब्बल यांच्यावर काँग्रेस नेत्यांचा निशाणा

नवी दिल्लीः बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीवर काँग्रेसचे नेतृत्व चर्चा करण्याच्या तयारीत नाही, आता जनता काँग्रेसला पर्याय म्हणूनही

माझी अखेरची निवडणूकः नितीश कुमार
बिहारः एनडीएचा पूर्ण बहुमत मिळाल्याचा दावा
‘बिहार मे भाजपा बा…’

नवी दिल्लीः बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीवर काँग्रेसचे नेतृत्व चर्चा करण्याच्या तयारीत नाही, आता जनता काँग्रेसला पर्याय म्हणूनही पाहात नाहीत, अशी विधाने केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्यावर काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी निशाणा साधला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पक्षांतर्गत मुद्दे मीडियात चर्चेला नेण्याची गरज नव्हती, अशा विधानांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होते अशी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसने १९६९,१९७७, १९८९, १९९६मध्ये संकटे झेलली होती. अशा पडत्या काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचारधारा, कार्यक्रम व धोरणांवर विश्वास ठेवला होता. २००४ मध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली यूपीएचे सरकार सत्तेवर आले होते, यावेळीही आपण या संकटातून बाहेर पडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेहलोत यांच्या प्रतिक्रियाला तारिक अन्वर यांनीही सहमती दर्शवली. कपिल सिबल जेष्ठ नेते आहेत, त्यांना पक्षातली काही कमतरता वाटत असेल तर त्यांनी काँग्रेस अध्यक्षांशी बोलले पाहिजे. त्यांनी मीडियामध्ये विधाने केल्यास त्याचा फटका पक्षाला बसतो, असे ते म्हणाले.

माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनीही सिबल यांच्यावर निशाणा धरला. पक्षातील बाबी सार्वजनिक पातळीवर बोलणे योग्य नाही. आपण बाहेरच्यांचे खेळणे होता कामा नये. अनेक महत्त्वाची कामे समोर आहेत, ती पक्षाला करावयाची आहेत, असे खुर्शीद म्हणाले.

काँग्रेसचे दिल्ली अध्यक्ष अनिल कुमार चौधरी यांनीही सिबल यांच्यावर टीका केली. आपणा सर्वांना मोदी व केजरीवाल यांच्याविरोधात संघर्ष करावयाचा आहे, असे ते म्हणाले.

कपिल सिब्बल काय म्हणाले होते?

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीवर काँग्रेसचे नेतृत्व चर्चा करण्याच्या तयारीत नाही, आता जनता काँग्रेसला पर्याय म्हणूनही पाहात नाहीत, अशी टीका काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत केली होती.

काँग्रेसपुढे अनेक समस्या आहेत, त्या समस्यांची उत्तरेही पक्षापुढे आहेत पण ती उत्तरे प्रत्यक्षात आणण्याच्या मनःस्थितीत काँग्रेस नाही, असेही ते म्हणाले होते.

आत्मपरिक्षण करण्याची वेळही आता गेली आहे, असे म्हणत सिब्बल यांनी एका जेष्ठ नेत्याने काँग्रेसमध्ये आत्ममंथन व्हावी असा मुद्दा मांडला होता, त्याची आठवण करून दिली होती. पण आता ६ वर्षाहून अधिक काळ झाला आहे, आत्ममंथनाचीही वेळ गेली आहे. काँग्रेसकडे त्यांच्या समस्यांची उत्तर आहेत, पण ती प्रत्यक्षात आणत नसल्याने काँग्रेसचा आलेख वेगाने खाली येत राहील, गुजरातमध्ये पोटनिवडणुकात काँग्रेसने सर्व ७ जागा गमावल्या, त्यातील तिघांची अनामत रक्कम जप्त झाली. उ. प्रदेशात ७ जागांवर २ टक्क्यांपेक्षा कमी मते काँग्रेस उमेदवारांना मिळाली. म. प्रदेशात २८ जागांवरही काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब झाली, हे सर्व पराभव साधी घटना आहे का? काँग्रेसचे नेतृत्व त्यावर काय म्हणतेय? असा सवाल सिब्बल यांनी केला होता.

काँग्रेसमध्ये निवडणुका संदर्भात सिब्बल म्हणाले होते की, संपर्क क्रांतीमुळे देशातील निवडणुका या अध्यक्षीय निवडणुका सारख्या लढल्या जात आहेत. आपण आपल्यातील कमतरता समजून घेतल्या नाहीत तर निवडणूकांत त्याचे चित्र स्पष्ट दिसणार नाही. केवळ उमेदवार जाहीर करून निवडणुका लढवून बदल होणार नाहीत तर काँग्रेसची विचारधारा, तिची विश्वसनीयता, पक्षात असलेली संवादाची जागा बदलल्यास जनता आपल्याला स्वीकारू लागेल, असे सिब्बल म्हणाले होते.

सिब्बल यांच्या या मताचे अनुमोदन तामिळनाडूतील खासदार कार्ती चिदंबरम यांनी केले होते. त्यांनी एक ट्विट करून काँग्रेसने आत्मविश्लेषण, चिंतन, विचार विनिमय केला पाहिजे असे म्हटले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0