बिहारच्या राजकारणात दिवसेंदिवस नवनवे ट्विस्ट येत असून याचाच एक भाग आमचं ठरलंय, महागठबंधन पुन्हा जमलंय अशी स्लोगन आता राष्ट्रीय जनता दल तसेच संयुक्त जनता दलाच्या कार्यकर्त्यांत आणि नेत्यांत खासगीत बोलली जाऊ लागली आहे.
बळेबळे मिळालेले मुख्यमंत्रीपद आणि त्यातून होणारी घुसमट, मित्र पक्ष असलेल्या भाजपचा हस्तक्षेप आणि दादागिरी, तसेच मित्रानेच दगा देऊन अरुणाचल प्रदेश येथील फोडलेले आमदार या सर्व घटनेने प्रचंड व्यथित झालेल्या नितीशकुमार यांनी आता राष्ट्रीय जनता दलाबरोबर पुन्हा संसार मांडण्यासाठी तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण या चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न नितीश कुमार करत आहे. शुक्रवारी त्यांनी आपल्या सरकारला कोणताही राजकीय धोका नाही असे वक्तव्य केले.
नव्या वर्षाच्या दिनी कार्यकर्ते व अन्य नेत्यांच्या शुभेच्छा घेण्यापेक्षा नितीश कुमार हे सचिवालयात बसून विविध खात्याच्या कामाची चौकशी करत होते. गेले वर्षभर नितीश कुमार सचिवालयात अभावानेच येतात. ते आपल्या संवाद या कार्यालयातून कारभार हाकत असतात. पण आता या नव्या वर्षात आठवड्यातून एक दिवस तरी सचिवालयात येऊन काम करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
काही पत्रकारांनी नितीश कुमार यांना नव्या वर्षांत राजकीय आव्हाने काय असतील असे विचारले असता, त्यांनी आपले सरकार स्थिर असून कोणतेही राजकीय संकट आलेले नाही असे मोघम उत्तर दिले.
पण नितीश कुमार यांना भाजपपासून दूर करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. याबाबतचे संकेत आता राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनीच दिले आहेत. महागठबंधन स्थापन करण्याबाबत आम्ही सकारात्मक असून नितिश बाबू यांना त्यामध्ये सामावून करून घेण्यासाठी विचार सुरू असल्याचे राबडीदेवी यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे गठबंधन तयार होण्यासाठी दस्तुरखुद्द लालू प्रसाद यादव यांनीच पुढाकार घेतला आहे. कोणत्याही स्थितीत राज्यात सत्तापालट करण्यासाठी व्यूहरचना केली जात आहे, याचाच एक भाग म्हणजे जदयुचे १७ ते २० आमदार संपर्कात असल्याची माहिती गुरुवारी आरजेडीच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने दिली होती. त्याचाच पुढील अध्याय राबडीदेवी यांनी शुक्रवारी जाहीर केला.
दरम्यान हे महागठबंधन तयार होण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी मधील काही नेते पुढाकार घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यासाठी मोठी भूमिका बजावत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पवार यांनी याबाबत नितिश बाबू यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चाही केल्याचे खात्रीलायक समजते.
मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास आता कोणताही रस नसल्याचे वक्तव्य नितीशकुमार यांनी नुकतेच केले होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मुख्यमंत्री कोणाला करायचे हे ठरवावे असे विधानही त्यांनी केले होते. त्यामुळे आरजेडीने नितिश बाबू यांना पुन्हा एकत्र येण्यासाठी साद घालताना २०२४च्या पंतप्रधानपदासाठी साथ देताना राज्यात तेजस्वी तर केंद्रात नितिशबाबू असा प्रस्ताव ठेवला आहे.
या सर्व घडामोडी होत असताना जदयु आणि नितिशबाबू यांच्यावर कोणतीही टीका करू नका असा आदेश आरजेडीने आपल्या कार्यकर्त्यांना काढले आहेत. त्यामुळे २०२१ या नववर्षातील राजकीय क्षितिजावरील बिहार सत्तांतर ही पहिली घटना होऊ शकते.
अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.
COMMENTS