नितीशकुमार दुपारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, तेजस्वी उपमुख्यमंत्री

नितीशकुमार दुपारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, तेजस्वी उपमुख्यमंत्री

बिहारमध्ये, नितीश कुमार यांनी मंगळवारी ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) मुख्यमंत्री’ म्हणून राज्यपालांकडे राजीनामा दिला. आता बुधवारी दुपारी नितीश कुमार महाआघाडीच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

चिराग पासवानना धक्का, लोजपमध्ये फूट
सुशांत सिंग प्रकरणात गुप्तेश्वर पांडे यांना रस का आहे!
बिहार: शिक्षणमंत्र्याचा ३ दिवसात राजीनामा

पाटणा: नितीश कुमार यांनी मंगळवारी बिहारच्या राज्यपालांना ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)’ च्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. आता बुधवारी दुपारी नितीश कुमार महाआघाडीच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची पुन्हा शपथ घेणार आहेत. नितीश कुमार यांच्या सरकारला काँग्रेस, राजद आणि डाव्या पक्षांचा पाठिंबा मिळणार आहे. यापूर्वी, नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली होती आणि त्यांनी राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा केला. राजभवनातून दुपारची शपथविधीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. दुपारी २ किंवा ४ वाजता शपथविधी होणार आहे.

राजद प्रमुख तेजस्वी यादव यांच्यासह राज्यपाल फागू चौहान यांच्या भेटीनंतर नितीश यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले, की महाआघाडीत अपक्ष आमदारांसह सात पक्षांचे १६४ आमदार आहेत.

जनता दल युनायटेडचे ​​नेते नितीश कुमार बुधवारी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याआधी त्यांनी सात वेळा या पदाची शपथ घेतली आहे. २००५ पासून नितीश हे बिहारचे काही दिवस वगळता सतत मुख्यमंत्री होते.

नितीश कुमार म्हणाले, की आज त्यांना राज्यातील सात मोठ्या पक्षांचा पाठिंबा आहे. जदयुने भाजपला सोडचिठ्ठी देऊन नवीन सरकार स्थापन करावे, अशी या सर्व पक्षांची इच्छा होती.

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पक्षाने पत्रकार परिषदेत म्हटले आहे, की “जे लोक हे करतात त्यांना जनता धडा शिकवेल”.

एनडीएशी फारकत घेतल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेते अश्विनी चौबे यांनी नितीश कुमार यांना ‘संधीसाधू’ म्हणून संबोधले आणि बिहारचा विश्वासघात करणार्‍यांना बिहारच्या विकासात अडथळा आणायचा आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी संध्याकाळी पाटणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, इतिहास सांगतो. भाजप ज्याच्यासोबत राहतो, त्याला प्रथम नष्ट करतो.

लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी (एनडीए) संबंध तोडल्यानंतर टीका केली आणि त्यांनी दुसऱ्यांदा जनादेशाचा अपमान केल्याचा आरोप केला. पासवान यांनी बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून नव्याने निवडणुका घेण्याची मागणी केली.

तृणमूल काँग्रेसने मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून वेगळे होण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. तृणमूल काँग्रेसने असा आरोप केला आहे, की भारतीय जनता पक्षबरोबर युतीत  राहून कोणताही पक्ष आपली ओळख वेगळी ठेऊ शकत नाही, कारण भाजपचे ‘सर्व काही हडपण्याचे’, राजकारण प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही.

ही चांगली सुरुवात असल्याचे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. या दिवशी ‘ब्रिटिशांना भारत छोडो’चा नारा देण्यात आला आणि आज बिहारमधून ‘भाजप भगाओ’चा नारा येत आहे. मला वाटते की लवकरच राजकीय पक्ष आणि विविध राज्यातील लोक भाजपच्या विरोधात उभे राहतील.

नितीश कुमार म्हणाले की, एनडीएशी फारकत घेण्याचा निर्णय हा त्यांचा एकट्याचा नाही. भाजप आणि एनडीएतून बाहेर पडून त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या विकासासाठी काम करावे, अशी त्यांच्या पक्षातील इतर लोकांनाही इच्छा होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0