नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून झुंडबळीच्या विरोधात पत्र पाठवणाऱ्या देशातील ४९ मान्यवरांवर दाखल केलेले देशद्रोहाचे गुन्हे अखेर बिहार प
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून झुंडबळीच्या विरोधात पत्र पाठवणाऱ्या देशातील ४९ मान्यवरांवर दाखल केलेले देशद्रोहाचे गुन्हे अखेर बिहार पोलिसांनी मागे घेतले. मुझफ्फरपूरचे पोलिस अधिक्षक मनोज कुमार यांनी बुधवारी हे आदेश दिले. मुझफ्फरपूर येथील वकील सुधीर ओझा यांनी ४९ मान्यवरांच्या विरोधात दाखल केलेली फिर्याद हे खोडसाळपणाचे कृत्य होते व त्यामागे पुराव्यांचा कोणताही आधार नसल्याने हे गुन्हे मागे घेत असल्याचे मनोज कुमार यांनी स्पष्ट केले.
सुधीर ओझा हे अनेक प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल करण्यात तत्पर असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. ओझा हे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीशी संबंधित असल्याची माहिती पुढे येत आहे.
ओझा यांनी ऑगस्ट महिन्यात मुझफ्फरपूर मधील न्यायालयात ४९ मान्यवरांविरोधात देशद्रोहाची तक्रार केली होती. त्याने देशभर तीव्र संतापाची लाट उमटली होती. गेल्या आठवड्यात या स्थानिक न्यायालयाने ४९ मान्यवरांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी दिली होती त्यानंतर पुन्हा तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ४९ मान्यवरांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी देशातील सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील आणखी १८५ कलावंत मैदानात उतरले होते. या कलावंतांनी देशात वाढते झुंडबळी रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घालणाऱ्या ४९ मान्यवरांच्या पत्राचे समर्थन करत लोकांचा आवाज दाबण्याचा व न्यायालयाच्या माध्यमातून त्यांचा छळ करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना आमचा कडाडून विरोध असेल असे स्पष्ट केले होते.
झुंडबळी रोखण्यासाठी ज्या कलावंतांनी मोदींना पत्र पाठवले ते समाजातील प्रतिष्ठित नागरिक असून त्यांनी त्यांच्या कर्तव्याचे पालन केले आहे. या कलावंतांनी झुंडबळीच्या विरोधात जर भीती, चिंता प्रकट केली असेल तर त्याला देशद्रोह म्हणायचे का? या मान्यवरांचा आक्रोश बंद करण्यासाठी न्यायालयांच्या मार्फत त्यांना त्रास देणे हा छळ नाही का असा सवाल १८५ मान्यवरांनी केला होता. जर सरकार लोकांचा आवाज दाबण्याचा, त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर आम्हीही सातत्याने आवाज उठवत जाऊ असाही इशारा या मंडळींनी दिला होता.
या १८५ मान्यवरांच्या यादीत प्रामुख्याने अभिनेता नसीरुद्धीन शाह, लेखिका नयनतारा सहगल, नृत्यांगना मल्लिका साराभाई, इतिहास संशोधक रोमिला थापर, विचारवंत आनंद तेलतुंबडे, शास्त्रीय गायक टी. एम. कृष्णा, कलाकार विवान सुंदरम आदी सामील होते.
मूळ बातमी
COMMENTS