१४ एप्रिल २०२० च्या घटनांनी मागच्या वर्षांमधल्या सगळ्या चांगल्या आठवणींची जागा घेतली होती. आणि त्यानंतरचा प्रत्येक १४ एप्रिल आमच्यावर लादलेल्या त्या असीम वेदनांचीच आठवण देत आला आहे, ज्या आजही आमच्या आयुष्यातल्या प्रत्येक मिनिटाला आम्ही भोगतो आहोत.
१९ नोव्हेंबर १९८३ ला आनंद आणि माझे लग्न झालं. आमचे लग्न अगदी टिपिकल ठरवून केलेलं लग्न होतं – एका सामायिक हितचिंतक मित्राच्या माध्यमातून ठरलं होतं. ३७ वर्षे मी गृहिणीची भूमिका निभावली, माझ्या दोन्ही मुलींना वाढवलं, त्यांना काय हवं-नको ते पाहिलं आणि घर चालवलं. आनंदना मदत करण्याचा माझा तो मार्ग होता, कारण त्यामुळे आनंदना मुक्तपणे आणि पूर्णपणे त्यांच्या व्यावसायिक जीवनावर आणि त्यांनी ज्यासाठी त्यांचं जीवन समर्पित केलं होतं अशा त्यांच्या सामाजिक कामांवर लक्ष केंद्रित करता आलं.
त्यांचं व्यावसायिक करियर आणि एक कार्यकर्ता म्हणून असणारी भूमिका हे दोन्ही सांभाळण्याची कसरत करत असूनही ते माझ्या मुलींचे तितकेच उत्तम वडीलही होते. त्यांना कधीही आवश्यकता भासली तर ते त्यांच्यासाठी वेळ काढत. मला काही वर्षांपूर्वीच्या गोष्टी आठवतात. त्यावेळी मी साध्यासुध्या काळज्यांमध्ये व्यग्र होते. टेनिस खेळणाऱ्या माझ्या लहान मुलीबरोबर तिचा विजय साजरा करत आणि पराभवांनंतर तिची समजूत काढत माझा प्रवास चालू असे. माझी मोठी मुलगी तिच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी रात्री जागत असे त्यावेळी मीही तिच्याबरोबर बसून राही. मी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत होते, त्या मोठ्या होताना त्यांच्या आयुष्यातले निर्णय घेऊ लागल्या तेव्हा त्यांना मार्गदर्शन करत होते, त्यांच्या पाठीशी उभी राहत होते. पण आता त्या आठवणी जणू वेगळ्याच जीवनातल्या वाटतात. आज, वयाच्या ६६ व्या वर्षी, जेव्हा बहुतांश स्त्रिया निवृत्ती उपभोगत असतात किंवा त्यांच्या निवृत्त जोडीदारांबरोबर शांत जीवन जगत असतात, तेव्हा माझ्या आयुष्याने एक वेगळेच वळण घेतले आहे. त्याने मला माझाच एक वेगळा पैलू दाखवला आहे, जो अस्तित्वात असल्याचे मला माहीतही नव्हते. नियतीने हे वळण तेव्हा घेतले जेव्हा पोलिसांनी आमच्या अनुपस्थितीमध्ये गोव्यातील आमच्या घरावर छापा मारला.
मला माझ्या कुटुंबाला आधार द्यायचा होता, त्यामुळे मी बाहेरून शांत राहण्याचा प्रयत्न करत होते, पण आतून मी प्रचंड अस्वस्थ होते. माझे पती आणि आमचे घर यांच्या छायाचित्रांसहित टीव्हीच्या स्क्रीनवर ती बातमी आली तेव्हा लगेचच मी मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी फ्लाईट बुक केली. माझे पती आणि मुली मुंबईतच राहिल्या. काही अपरिचित लोक आम्हाला न सांगता आमच्या खाजगी जागेत घुसले होते, त्यामुळे आता तिथे काय उरलं आहे ते मला पहायचं होतं. त्यानंतर आमच्या वकिलांबरोबर मी तक्रार नोंदवण्यासाठी जवळच्या पोलिस स्टेशनला गेले. मी माझ्या कारमधून जात असताना अगदी शांत होते, मलाच समजावत होते, की माझे पती आणि मी घाबरण्यासारखं काहीच नाही. आम्ही कायद्याने वागणारे नागरिक आहोत, अगदी प्रामाणिकपणे आमचं आयुष्य जगलो आहोत आणि त्यामुळे आपल्या समाजातल्या शोषित लोकांच्या भल्यासाठी अथक काम करणाऱ्या माझ्या पतीच्या बाबतीत काही वाईट घडेल असं मानण्याचं मला काहीच कारण नव्हतं.
पण त्यावेळी मला हे माहीत नव्हतं की पोलिस स्टेशनकडे तो पहिला प्रवास म्हणजे अजूनही चालू असलेल्या आणि ज्याचा शेवट अजूनही दृष्टिक्षेपात नाही अशा एका दीर्घ, थकवणाऱ्या कायदेशीर लढ्याची ती केवळ सुरुवात होती. त्या घटनेनंतर आमची आयुष्ये आम्ही कल्पनाही केली नव्हती इतकी बदलली. पण आनंदना त्यांच्या आयुष्यातला एक क्षणही रिकामा घालवलेला आवडत नाही, आणि त्यांच्या कुटुंबाकडूनही त्यांची हीच अपेक्षा असते. त्यांनी त्यांची व्याख्याने देणे, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या गरजांची काळजी घेणे चालू ठेवले. काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेनंतरही आणि तो केवळ त्यांना घाबरवण्यासाठी रचलेला बनाव होता हे स्पष्ट दिसत असूनही ते किती शांत होते याचे मला कौतुक वाटत होते.
आनंद अगदी शरण जाण्यापूर्वीच्या आदल्या रात्रीपर्यंत काम करत होते, त्यांचे विद्यार्थी आणि सहकाऱ्यांवर त्यांच्या अनुपस्थितीमुळे, जी किती काळासाठी असेल काहीच सांगता येत नव्हते, फार ताण येणार नाही याची खात्री करत होते. आम्ही आमचे आयुष्य पूर्वीसारखेच जगण्याचा प्रयत्न करत असलो तरी अर्थातच आमच्या कॅलेंडरवर आम्हाला काही नव्या गोष्टींशी जुळवून घ्यायचे होते. आम्हाला आता न्यायालयाच्या तारखा लक्षात ठेवायच्या होत्या. आनंदने त्यांच्या विरोधात लावलेले भयंकर आणि खोटे आरोप फेटाळून लावण्यासाठी एक केस दाखल केली होती. आजवरचा सर्वात क्रूर आणि लोकशाहीविरोधी कायदा असलेल्या यूएपीए खाली आनंदवर गुन्हा दाखल करण्यात आला होता हे पचवणे फार कठीण आणि त्रासदायक होते.
आनंद – एक ७० वर्षे वयाचा, घरदार, पत्नी, मुले असणारा, कॉर्पोरेट व्यावसायिक, प्राध्यापक, कार्यकर्ता, लेखक असणारा मनुष्य, त्याच्यावर या हिंसक दहशतवाद्यांसाठी असणाऱ्या कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. १४ एप्रिल २०२० या दिवसाबद्दल मला काय वाटते ते वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एक तर त्या दिवशी आम्ही अजूनही धक्क्यामध्येच होतो, पण तरीही त्यानंतर असा कोणताही दिवस उगवला नाही जेव्हा आम्हाला त्या दिवसाची आठवण झाली नाही. माझ्याकरिता, २०२० पूर्वी प्रत्येक १४ एप्रिल म्हणजे एक आनंदाचा दिवस होता. ती माझ्या आजोबांची, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. जितकी वर्षे मी मुंबईत राहते आहे, त्या प्रत्येक वर्षी मी चैत्यभूमीला भेट देण्याची आणि एक मेणबत्ती पेटवून त्या महान माणसाच्या पुतळ्याला नमन करण्याची संधी चुकवली नव्हती, ज्याचे जीवन आणि यश हे भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या कोट्यवधी माणसांच्या जीवनाला स्पर्श करणारे होते. त्या रात्री १२चे ठोके पडले तेव्हा आनंद त्यांचा पांढरा कुर्ता पायजमा घालून तयार झाले होते आणि राजगृहातल्या स्मारकामध्ये जाण्यासाठी माझी वाट पाहत होते. त्यांनी मेणबत्ती पेटवून डॉ. आंबेडकरांची रक्षा असलेल्या कलशाला नमन केले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचे नेहमीचेच स्मितहास्य होते. मीही त्यांच्या मागोमाग तो विधी पार पाडला, पण माझे मन पुढच्या काही तासांमध्ये काय होईल याकडेच लागलेले होते.
१४ एप्रिल २०२० च्या घटनांनी मागच्या वर्षांमधल्या सगळ्या चांगल्या आठवणींची जागा घेतली होती. आणि त्यानंतरचा प्रत्येक १४ एप्रिल आमच्यावर लादलेल्या त्या असीम वेदनांचीच आठवण देत आला आहे, ज्या आजही आमच्या आयुष्यातल्या प्रत्येक मिनिटाला आम्ही भोगतो आहोत. त्या दिवशी मी त्यांच्याबरोबर ‘एनआयए’च्या कार्यालयात गेले आणि तिथे ते न्यायालयाच्या आदेशानुसार शरण आले. अगदी आत जातानाही ते शांत होते. त्यांना स्वतःची काळजी नव्हती, पण त्यांच्या आईची चिंता वाटत होती. आणि त्यांना फोन वापरता येण्याच्या शेवटच्या क्षणालाही ते त्यांच्या मुलींशी बोलत होते. धैर्य राखा, सर्व काही ठीक होईल असे ते त्यांना सांगत होते. ते त्यांना त्यांचं आयुष्य छान आणि प्रामाणिकपणे जगायला सांगत होते. त्या रडत होत्या, तेव्हा ते त्यांना समजावत होते. त्या दिवशी जे काही झाले ते अजूनही चालू असलेला माझ्या पतींवरचा क्रूर अन्याय आणि मी आणि माझ्या मुलींचे दुःख यांची सुरुवात होती. आणि जाणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत हे दुःख आणखी असह्य होत आहे. ‘कोविड १९’ महामारी म्हणजे संपूर्ण जगभरात अभूतपूर्व असे मानवतेवरील संकट होते. माझ्यासाठी तो अनेक आघाड्यांवरचा संघर्ष होता. त्या काळात मी एकटी होते, माझे पती तुरुंगात होते, प्रवासावरील बंधनांमुळे दूर राहणाऱ्या माझ्या मुली माझ्याकडे येऊ शकत नव्हत्या. आनंद शरण आल्यापासून मी एकटीच राहत आहे, अनेकदा मनात येणाऱ्या नकोशा भयंकर विचारांना दूर सारण्याचा प्रयत्न करत, त्यांच्यावरचा अन्याय लवकरात लवकर दूर व्हावा यासाठी झगडत आहे. सामाजिक अंतर, लॉकडाऊन या उपायांनंतरही विषाणूच्या वेगवेगळ्या नवीन रूपांनी विशेषतः भारतात धुमाकूळ घातला, त्याच्या बातम्या टीव्हीवर पाहणे हे असह्य होत होते. हे सगळे चालू असताना आनंद तुरुंगात होते, क्षमतेपेक्षा तिप्पट लोकांची गर्दी असलेली जागा. जगभरातले लोक एकटेपणाबद्दल, एकटेपणात मानसिक आरोग्य कसे टिकवायचे त्याबद्दल बोलत असताना मला मात्र आनंदच्या आरोग्याची चिंता खात होती! आमचे हे काय होऊन बसले आहे असे वाटत होते. त्यांना दम्यामुळे श्वास घ्यायला कठीण जाते आणि त्यांना ‘कोविड १९’ची बाधा झाली तर काय या विचाराने माझा थरकाप होत होता. अर्थातच, तुरुंगात असलेल्या, प्रियजनांपासून दूर राहणाऱ्यांच्या मानसिक स्थितीचे ‘कोविड १९’ महामारीच्या काळात काय होईल याबद्दल कुणी चर्चा करत नाही. ‘मुलाकात’मध्ये आमच्या प्रिय व्यक्तीला भेटू देण्याची जी एक छोटीशी दया दाखवली जाते, तिच्यापासूनही लॉकडाऊनमध्ये आम्ही कुटुंबीय वंचित राहिलो. त्याऐवजी दर आठवड्याला १० मिनिटांच्या एका व्हिडओ कॉलला परवानगी दिली गेली. माझ्या फोनच्या रिंगरचा आवाज नेहमीच पूर्ण मोठा केलेला आहे का आणि वायफाय मॉडेमची कनेक्टिव्हिटी चांगली आहे ना याची मी सारखी खात्री करून घेई. आनंदबरोबर बोलण्याची संधी मला चुकवायची नसे. खरे सांगायचे तर माझे दिवस या अनियोजित साप्ताहिक कॉलभोवतीच फिरत असत. त्या कॉलनंतर मुलींना कॉल करणं हे नित्याचं होऊन बसलं कारण आनंदना त्यांच्या फोनवर कॉल करता येत नव्हता. एका साध्या व्हिडिओ कॉलची ही चैन, जर ही चैन म्हणता येत असेल तर, केवळ माझ्यापुरतीच होती, बाकी कुटुंबियांना पत्रे लिहूनच त्यांच्याशी संपर्क करावा लागत होता. पत्रांना बहुतेक वेळा अनेक दिवसांचा विलंब लागत असे कारण ती आनंदपर्यंत पोहोचवण्याआधी अधिकाऱ्यांना ती वाचायची असत. परिस्थिती अशी होती की आमच्यावर दाखवण्यात येणाऱ्या या दयेतच आम्ही समाधान मानून घेत होतो.
आनंदच्या कामामुळे त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीमध्ये त्यांनी भरपूर प्रवास केला आहे – पण ते कुठेही गेले तरी आम्हाला कॉल करायला कधीच विसरत नसत. दिवसातून किमान एकदा तरी ते आमची खुशाली विचारत. विशेषतः त्यांच्या मुलींच्या परीक्षांच्या काळात ते त्यांना शुभेच्छा द्यायला कधीच विसरत नसत. असे होते आनंद आणि आता जवळजवळ दोन वर्षांमध्ये ते त्यांच्या मुलींशी बोलू शकलेले नाहीत. ते अंडरट्रायल कैदी आहेत, क्रूर यूएपीए कायद्याखाली खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना अडकवण्यात आलं आहे. ७२ वर्षे वय असताना, जेव्हा माणसांना त्यांच्या मुलाबाळांनी काळजी घेण्याची, त्यांचे कुटुंबीय आजूबाजूला असण्याची गरज असते, तेव्हा आनंद आणि माझा वेगळाच संघर्ष चालू आहे. आणि हे केवळ ‘एनआयए’ने न्यायालयाला सादर केलेल्या एका कहाणीच्या आधारे, ज्यातील तथ्यांची अजून पडताळणीही झालेली नाही.
महामारीची परिस्थिती किंचित सुधारल्यानंतर, साप्ताहिक ‘मुलाकात’ सुरू झाली. ती आठवड्यातून एकदा, १० मिनिटांसाठी होते. मी माझ्या घरापासून १ तास प्रवास करून तिथे जाते, नाव नोंदवण्यासाठी रांगेत उभी राहते आणि त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी माझी बारी येण्याची वाट पाहत बसते. कधीकधी मला २-४ तासही वाट पहावी लागते. मी हे सर्व काही सहन करते ते केवळ त्या धूळभरल्या पायरेक्स स्क्रीनमधून का होईना, पण आनंदना पाहता यावे, इंटरकॉमवर त्यांचा आवाज ऐकता यावा यासाठी. इतर कैदी त्यांच्या प्रियजनांशी मोठमोठ्या आवाजात बोलत असतात, तुरुंगातले कर्मचारी बोलत असतात, त्या सगळ्या आवाजांवर मात करून, आमच्या या वयातल्या थकलेल्या आवाजात आम्ही एकमेकांशी जास्तीत जास्त संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. तेसुद्धा माझ्या या साप्ताहिक भेटीची आतुरतेने वाट पाहत असतात. मागच्या २ वर्षांपासून त्यांना ज्या जगापासून सक्तीने दूर ठेवले गेले आहे, त्या बाहेरच्या जगाची खबरबात त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा एक ओळखीचा चेहरा.
बहुतांश लोकांप्रमाणे ‘मुलाकात’ची माझी कल्पनाही चित्रपटांमधूनच बनलेली होती. पण मी नक्की सांगू शकते की भेटणाऱ्या दोन्ही व्यक्तींना सहन करावे लागणारे अपमान आणि त्रास चित्रपटांमध्ये सोयिस्कररित्या गाळून टाकलेले असतात. मार्च २०२० पर्यंत आनंद आणि माझे आयुष्य प्रतिष्ठेचे, सुखदायी होते. आणि आम्ही नियमितपणे हे अशा रितीने एकमेकांना भेटू असे आम्ही कधीच स्वप्नातही कल्पले नव्हते. त्या ‘मुलाकात’मध्ये आम्ही एकमेकांचे हात हातात घेऊ शकत नाही, मिठी मारून एकमेकांचे सांत्वन करू शकत नाही. पण आम्ही एकमेकांसमोर आपल्या वेदना लपवण्यात मात्र तरबेज झालो आहोत, किमान त्या १० मिनिटांमध्ये तरी. माझ्या मुली त्यांना दर आठवड्याला पत्र लिहितात आणि ते न कंटाळता त्यांना उत्तरं लिहिलात. ते १४ एप्रिल २०२० ला त्यांच्याबरोबर शेवटचे फोनवर बोलले तेव्हा त्यांनी त्यांना जी ताकद दिली, जशी समजूत काढली तसेच त्यांच्या सगळ्या पत्रांमधून ते करण्याचा प्रयत्न करतात.
असे वाटते, की माझे आणि आनंदचे आयुष्य स्थगित झाले आहे. अनेक प्रसंगी मला असे वाटते मी या दुःस्वप्नामधून जागी होईन आणि रोजचा सकाळचा बाल्कनीतला चहा, त्याबरोबर वर्तमानपत्राचं वाचन आणि एकमेकांना कोपरखळ्या मारत चालणारं आमचं प्रसन्न संभाषण यासाठी मी आनंदची वाट पाहत असेन. प्रत्येक जाणाऱ्या दिवसानंतर आणि न्यायालयातल्या प्रत्येक सुनावणीनंतर, जिची निष्पत्ती केवळ पुढची सुनावणीची तारीख एवढीच असते, असं वाटतं की आमच्या आत्ताच्या परिस्थितीला कारणीभूत असलेला गोंधळ आणि अन्याय हे कुणीच समजू शकत नाही. कदाचित त्यांना हेसुद्धा समजत नाही, की हे त्यांच्यापैकी कुणाच्याही बाबतीत घडू शकते.
COMMENTS