माझा जगण्याचा मार्ग बदलवणारा बिहार

माझा जगण्याचा मार्ग बदलवणारा बिहार

माझ्या जागी अभय बंग किंवा प्रकाश आमटे असे कोणी असते; तर त्यांनी तिथं राहून परिस्थितीचा सामना केला असता. पण माझ्यात ते बळ नव्हतं. त्या वेळी तसं कुठलंही काम बघितलेलं नव्हतं. एकच मॉडेल मनात रेंगाळत होतं, ते खासगी प्रॅक्टिसचं. ते स्वप्न अप्रस्तुत वाटू लागलं. माझी प्रॅक्टिस कितीही चालली, तरी या गावातल्या घराघरांतलं आजारी अंथरुण पुसलं जाणार नव्हतं; की त्या मुलीच्या डोळ्यांतलं अकाली प्रौढत्व जाऊन बाल्य येणार नव्हतं. प्रॅक्टिस न करून तरी मी काय करणार होतो? या जगड्‌व्याळ प्रश्नांपुढे माझी अशी काय ताकद? पण ठरवलं, आता आपण गरिबांचे. जी ताकद असेल, ती गरिबांसाठी. तिथून जो रस्ता बदलला, तो बदललाच. ''साधना'च्या दिवाळी अंकामध्ये २०१५ मध्ये आलेला लेख. 

बिहारचे माझ्यावर खूप उपकार आहेत. सन १९६६च्या दुष्काळात बिहारमध्ये काम करायला गेलो नसतो, तर कदाचित माझी वाट मला सापडली नसती. काय झालं असतं माझं? कुठे तरी छोट्या जागेत दवाखाना टाकून बसलो असतो. डॉक्टर झाल्यावर पुढं शिकायची हिंमत नव्हतीच. तोवर लक्षात आलं होतं- डॉक्टरी क्षेत्र हे आपल्या आवडीचं क्षेत्र नाहीच. मग अशा माणसाचा दवाखाना जेमतेमच चालणार. माझ्या खुर्ची-टेबलापलीकडे पार्टिशन घालून कंपाऊंडरची खोली केली असती. आत तो बसलेला, बाहेर मी पेशंटची वाट पाहत.

पण मधेच हा बिहार आला आणि सगळं बदललंच. आयुष्य गजबजलंच. माझ्यासारखा कसलाही ‘डॅश’ नसलेला मुलगा बिहारला गेलाच कसा? इतक्या लांब? अनोळखी प्रांतात? पण झालं खरं. तोवर आम्हा काही विद्यार्थ्यांचं अभ्यास मंडळ सुरू झालं होतं. पुण्याजवळच्या दोन गावी रविवारचे जुजबी दवाखाने आम्ही काही मित्र चालवू लागलो होतो. पण एकदा एमबीबीएसची परीक्षा पास झालो असतो की, सगळे वेगवेगळ्या दिशांनी भुर्रकन उडून जाणार होतो. मग कधी भेटल्यावर पुण्याजवळच्या दवाखान्यांच्या आठवणी निघाल्या असत्या, एवढंच. त्या दिवशी मिळून सिनेमाला गेलो. सिनेमाआधी इंडियन न्यूजमध्ये बिहारच्या दुष्काळावरची छोटी फिल्म दाखवली आणि चित्र बदललंच. ती मुलं… काळी… काटकुळी… जसे सांगाडेच चालताहेत! भेगा पडलेल्या उजाड जमिनी… आणि मधून-मधून पडलेले मृत जनावरांचे सांगाडे… अन्न मागणारी उघडी-कृश माणसे… वृद्धांच्या चेहऱ्यांवरचे सुरकुत्यांचे साम्राज्य… आम्ही सगळेच हलून गेलो. नंतरचा सिनेमा हवेत विरून गेला आणि त्या पाच-दहा मिनिटांच्या लघुपटाने हलवलेच जसे. (नंतर कळलं, तो लघुपट सुखदेव यांनी केलेला. ते प्रसिद्ध दिग्दर्शक होते.)

मग आम्ही बिहारच्या दुष्काळात जाऊन काम करायचा निर्णय घेतला. आमच्यातल्या कुमार (सप्तर्षी)ला अशा कल्पना सुचत आणि आम्हा इतरांच्या अंगांत त्याचा संचार होत असे. बिहारला जाणं पुढंच राहिलं; पण आम्हाला पैसे देणार कोण? त्या सुमारास महापौरांनी बिहारसाठी मदत फेरी काढली होती. त्यांना त्यात जेमतेम सतराशे रुपये मिळाले होते. आम्ही तर अनोळखी, कॉलेजची पोरं. आम्हाला कोण देणार पैसे? पण काय, ते एक वय असतं! एरवीच्या व्यावहारिक विचारांना तिथं जसा प्रवेश बंदच. मग आम्ही डेक्कनवरच्या पूनम हॉटेलात वेटरचं काम केलं. बाहेर बोर्ड लावले होते- ‘आम्ही बिहारमध्ये जाऊन काम करणार आहोत. एका माणसाला महिनाभर जगवायला अकरा रुपये खर्च येतो. आम्हाला टिप देऊन एक जीव वाचवा…’

नंतर ‘पूनम’समोर बूट पॉलिश करणारी पाचसहा मुलं बसायची. त्यांना त्यांची दिवसभराची कमाई देऊन, त्यांचं सामान वापरून आम्ही बूट पॉलिशचं काम रस्त्यावर बसून केलं. तेव्हा खालून वरचं जग बघणं, हा वेगळाच अनुभव होता. वेटरचं काम करताना काही लोक मुद्दाम बोलावून, ‘ए पोऱ्या, इथं पुसून घे. चल, फडकं मार- बघतोस काय?’ असं म्हणायचे; तर काही जण आस्थापूर्वक चौकशी करून पाच-पाच माणसे जगतील एवढी टीप द्यायचे. सगळीकडे संमिश्र प्रतिक्रिया. सुटीच्या दिवशी लोणावळा-खंडाळा इथल्या बंगल्या-बंगल्यात जाऊन पैसे मागितले. काहींनी बसवून चहा-पाणी वगैरे दिले, तर काहींनी आम्ही गेटमध्ये दिसताच आमच्या अंगावर कुत्री सोडली. विश्वास-अविश्वास, कधी दुस्वासही. सगळे अनुभव पहिल्यांदाच घेत होतो. असं करता-करता तेवीस हजार रुपये जमा झाले, ते सहासष्ट सालात!

पहिली बॅच जायचे ठरले. त्यात मी, रवींद्र गुर्जर, अनिल दांडेकर, फडके असे चौघे जण. डॉक्टर मीच. तिकडे अन्नछत्र तर चालवायचे होतेच, पण दवाखानाही. डॉक्टर मंडळींकडे जाऊन औषधे जमा केली. ‘साधना’चे संपादक यदुनाथ यांच्याकडून जयप्रकाश नारायणांच्या (जे. पी.) सदाकत आश्रमाची माहिती मिळाली. बिहारच्या मदत कार्याचे नियोजन जे. पी. च करीत होते. त्यामुळे पहिल्यांदा तिथं जायचं, एवढीच माहिती होती; त्यानिशी बाहेर पडलो.

0

त्या काळात माझे फिरण्याचे विश्व खूप लहान होते. ओतूर, पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई एवढंच. यापेक्षा दूर गेल्याचं आठवत नाही. कोकण, मराठवाडा, विदर्भ… हे सगळं नकाशात पाहिलेलं. (बिहारनंतर आमची संघटना झाली. जागोजागी शिबिरं होऊ लागली. नंतर लिहिण्यानिमित्ताने, विषयांप्रमाणे महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात एस.टी.ने फिरलो. पण तेव्हा त्या वयात यातलं काही पाहिलं नव्हतं.) एका बुजऱ्या तरुण पोरावर बिहारच्या दुष्काळात काम करायची जबाबदारी येऊन पडलेली. रेल्वेतनं बाहेरची स्टेशनं दिसत होती, त्यांची नावं किती अनोळखी! ‘मुगल सराई’ हे नावही ऐकलेलं नाही. आणि ते केवढं भलं मोठं स्टेशन! ती माणसं- डोक्याला फडकं गुंडाळलेली… त्या घुंगट पुढं ओढलेल्या जीर्ण वस्त्रांतल्या स्त्रिया… विधवांचं वस्त्र मळकट, जीर्ण, पांढरं. चहा मातीच्या कपात (कुल्हड) मिळायचा. त्याची चवही वेगळीच. इतका चांगला कप लगेच फेकून द्यायचा? असे फेकायला नको वाटे. पण जवळ कप ठेवणार तरी किती? असे फुटलेल्या मातीच्या तुकड्यांचे ढीग जागोजाग.

सकाळी जाग आली. खिडकीतून पाहिलं, तर उजाडलं होतं. पण कुठंही पिवळे सूर्यकिरण नाहीत. नंतर कळलं की, जमिनीलगत धुळीचा थर असतो, म्हणून. सर्व बिहार  प्रवासात कोवळी उन्हंच नव्हती. त्यामुळे उदास वाटायचं. त्या प्रकाशात बाहेरची शेतजमीन दिसत होती. पांढुरकी माती आणि त्यावर बांधांच्या आडव्या रेघा. थेट क्षितिजापर्यंत. आपल्याकडे काळ्याभोर जमिनी पाहायची सवय. पांढरी जमीन? वास्तविक, ही गाळाची सुपीक जमीन. गंगा-यमुना दरवर्षी गाळ आणून पसरतात, ती ही जमीन. पण हे नंतर कळलं. त्या वेळी ते सुन्न करणारं, उदासी पसरवणारं दृश्य. पाटण्यात आम्हाला सदाकत आश्रमाने गया जिल्ह्यातलं रजौली नावाचं गाव दिलं. आम्ही आणलेले पैसे तिथं जमा केले आणि गयेकडे निघालो. गयेतली दुपार आठवतेय. त्या हॉलवजा घरात दुष्काळात काम करायला निघालेले काही ग्रुप्स उतरलेले. गया हे भारतातले सर्वाधिक उष्ण तापमानाचे गाव. तिथं भिंतीला टेकून विश्रांती घ्यावी, म्हणून टेकलो; तर भिंतही केवढी तापलेली! खालच्या फरशीवर पसरावे, तर तीही तापलेली. टेकायची सोय नाही की पसरायची; मग जायचं कुठं? उन्हं उतरली तरी तसंच. हा बिहारचा पहिला अनुभव.

चौकाचौकांत सायकलरिक्षांचे थवे. ओढणारे दोन-दोन माणसांना, कधी सामानासह हे कृश रिक्षावाले ओढत होते. वास्तविक वेटलिफ्टर्स शरीराने किती मजबूत असतात; त्याउलट हे. वजन ओढणारी माणसं किती हडकुळी! एवढ्या जाळणाऱ्या उन्हात उघडी. डोक्याला फक्त पटका. खाली अपरं धोतर किंवा लुंगी. सायकलच्या वर आलेल्या पॅडलवर पूर्ण शरीराचा भार देत, की रिक्षा थोडी पुढं जायची- की, परत दुसऱ्या बाजूच्या पॅडलवर. अंगातून घामाच्या धारा. गया-बोधगया अंतर बहुधा आठ-दहा किलोमीटरचे. तिथं रिक्षाने जाणारे शेठ लोक बारा आणे ठरले तर अंगावर आठ आणे फेकत. सगळंच अजब. पाटण्यात काय आणि गयेमध्ये काय, दुष्काळाचे चिन्ह नव्हते. भीषण दुष्काळच्या वार्ता तिकडे ऐकलेल्या; पण इथे सिनेमे, त्यावरची मोठमोठी पोस्टर्स, हॉटेले, त्यावरच्या आकर्षित करणाऱ्या पाट्या, आत पदार्थ चापणारी माणसं… ‘कडा अकाल’ हा शब्द तिथं हास्यास्पद वाटत होता. ते शहर म्हणजे महाकाय, बथ्थड परजीवी प्राणीच असावा. परत आल्यावर इथंही जाणवलं, आपलंही आवडतं शहर तस्संच आहे. तस्साच परजीवी बथ्थड प्राणी.

0

रजौलीला त्यामानाने उन्हाळ्याचा त्रास झाला नाही. तिथं उष्णता वर फेकणारे डांबरी रस्ते नव्हते, की सिमेंटची घरं. शिवाय, अधूनमधून झाडंही होती. मला बाकीचं गाव फारसं आठवत नाही, पण दोन वास्तू आठवताहेत. एक म्हणजे महंतांचा मठ- जिथं उतरायला आम्हाला एक खोली दिली होती. आणि एक लांबलचक व्हरांडा- जिथं दुपारी मुलं, स्त्रिया व वृद्ध माणसं वाडगे घेऊन बसत. आपण अन्नछत्र म्हणतो, त्याला ते रसोडा म्हणतात. ती रसोड्याची जागा, तो रसोडा बंद पडलेला असावा; आमच्यामुळे चालू झाला. बाजरीची खीर बनवायची जागा, मठातली मोठमोठी भांडी, खीर करणारी माणसं… हा सेटअप तयारच होता. बाहेर मोठं आवार. त्यात विहीर होती. त्यातनं आम्ही रहाट फिरवून पाणी काढून घ्यायचो. पलीकडे म्हातारे महंत राहायचे. पांढरीशुभ्र दाढी. चेहऱ्यावर स्मित. कधी त्यांच्याबरोबर गप्पा व्हायच्या. बाहेर, आवार संपले की मोठा लाकडी जाडजूड दरवाजा.

रसोड्यावर घरातल्या पुरुष माणसांना बाजूला ठेवले जायचे, ही आधीपासूनची पद्धत. खीर फक्त मुलांना, स्त्रियांना आणि वृद्धांना मिळणार. तरी खिरीने कटोरा भरला की, आमच्या नजरा चुकवून काही पोरं बाहेर पळायची. तिथं झाडाखाली त्यांच्या घरातली पुरुषमाणसं उभी असायची. आमच्यापैकी काही जण त्यांना अडवू पाहायचो. पण खिरीचा कटोरा एकदा तिकडे पोहोचला, की- सगळी माणसं, ती पोरं नाहीशी व्हायची. पोरगं परत येऊ शकायचं नाही, पण घरच्यांसाठी ते स्वत:ची भूक थोडी बाजूला ठेवायचं. हातात कटोरा घेऊन पळणाऱ्या त्या हाडांच्या सांगाड्यास ते पूर्ण मिळावं, असं वाटायचं. पण सगळे तसे करू लागले असते, तर व्यवस्थाच कोलमडली असती. ती पोरंही काही कमी नव्हती. आतून बादल्या भरून आम्ही खीर आणायचो. एकाचा कटोरा घेऊन त्या कटोऱ्याने चार-सहा मुलांना खीर वाढली की, त्याला कटोरा भरून परत द्यायचो. बादली पुढं सरकवायचो. एकदा एका पोराचा कटोरा घेतला. त्याबरोबर समोरच्या चार-सहा पोरांनी आपले कटोरे पाठीमागे केले. मी आश्चर्याने विचारलं,

‘‘क्या हो गया?’’

‘‘वो अछूत का कटोरा है!’’

बापरे! मला धक्काच बसला. महाराष्ट्रातले प्रबोधन माझ्यात उतरले असल्याने मीही म्हटलं,

‘‘इस कटोरेसेहि लेना पडेगा।’

त्याबरोबर ती पोरं कावळ्या-कबुतरांचा थवा उडावा, तशी पळून गेली. मी हतबुद्ध. दिवसातून एकदाच अन्न मिळणार. खायला दुसरे काही नाही. असं दोन-तीन दिवस खायला मिळालं नाही की, समोर मरणच. तरी ‘अछूतका  कटोरा’- इतक्या लहान वयात? इतक्या मरणप्राय भुकेल्या अवस्थेत? मी माझे प्रबोधन बाजूला ठेवले आणि जाऊन त्यांना परत आणले. ही सामाजिक सुधारणा करायची वेळ नव्हे, जागा नव्हे. आता आम्ही इथं आलोय ते काम वेगळे आहे…

असे अनेक विचार क्षणात मनात येऊन मी माझा हट्ट सोडला. सकाळी दहाच्या सुमारास दवाखाना चालवायचो. तिथंही खूप गर्दी, बरोबरच्या मित्रांना मी तात्पुरते आवश्यक ट्रेनिंग देऊन कामचलावू डॉक्टरच बनवले होते. दवाखान्यात जास्त करून बायका-मुलांचा कल्लोळ. रांगा लावणे माहीत नाही. एका वेळी एकाने बोलावे, हेही माहीत नसावे. एकदा एका बाईच्या कडेवरच्या पोराला तपासत होतो. डोळ्यांत इन्फेक्शनची परिसीमा. मी मलम घालायचा प्रयत्न करीत होतो. पण पोराने रडून गोंधळ घालून अशक्य करून टाकलं. जवळ उभ्या असलेल्या दुसऱ्या बाईला म्हणालो,

‘‘आप इस लडकेका सिर पकडो, मै मलम लगाऊँगा।’’

ती जागची हलली नाही.

मी विचारलं, ‘‘जरा पकडो ना?’’

ती म्हणाली, ‘‘हम नहीं छूएँगे… वो अछूत है।’’

हे जागो जाग.

एकदा मी रहाटाने विहिरीचं पाणी काढीत होतो. विहिरीच्या दगडी ओट्याखालच्या जागी एक काळा, कृश, खप्पड चेहऱ्याचा उघडा वृद्ध ओणवा बसला होता. मला हिंदीत म्हणाला, ‘‘एक पोहरा माझ्या अंगावर ओता ना-’’ मी तसे दोन-तीन पोहरे ओतले.

मी खाली आल्यावर अंग पुसत म्हातारा म्हणाला, ‘‘आप बम्मन है, इसलिए आपसे पानी लिया। नहीं तो नहीं लेता!’’ आणि हसला. काय तो कृश म्हातारा- पण जातीचा अभिमान भरलेला. दवाखान्यातली ती बाई काय, आम्हाला अन्न नको म्हणून पळत सुटलेली रसोड्यावरची पोरं काय, आणि आता हा म्हातारा! महाराष्ट्रात जात अजूनही मनात असते, ती उघडपणे कुणी व्यक्त करीत नाही. शिवाय खूप माणसं जात मानतही नाहीत. आंतरजातीय लग्ने होतात. काही ठिकाणी विरोध, पण काही ठिकाणी सुरळीतही पार पडतात. इथं अंधार दाटून आला, असं मला वाटलं. आपल्याकडे प्रबोधन करणाऱ्या सुधारकांची पिढीच होऊन गेली. त्यांनी पेरलं, ते काहीसं उगवलं. तिकडे दोनच नावं- राजेंद्रप्रसाद आणि जयप्रकाश नारायण. राजेंद्रप्रसाद, जगजीवन राम यांची कारकीर्द राजकीय स्वरूपाची. मला पहिल्यांदाच महाराष्ट्राविषयी एवढं अगत्य वाटलं. सुधारणांचं पीक फोफावलं नसलं, तरी पीक हातचं गेलं तरी नाही.

0

दुसरं घर लक्षात राहिलं ते जमीनदाराची हवेली ऊर्फ कोठी. गावातली सगळीच घरं एकमजली, कौलारू. कौलं अर्धगोल नळ्यांची. घरांना रंग असल्यास पांढरा. तशी ती हवेलीही. पण तिने मोठ्ठी जागा व्यापलेली. कडेने बाहेर पाठ करून उभ्या असलेल्या, तटबंदीचं काम करणाऱ्या खोल्या- खोल्यांची रांग. मधे आवार, मोकळी जागा. बाजूच्या खोल्यांमधे धान्याची कोठारं. पडवीत आरामखुर्ची टाकून बसलेले म्हातारे जमीनदार गौरकिशोर सहाय ऊर्फ गौरीबाबू. बाजूला वावरणारी त्यांची आडदांड, महाकाय तिशी- चाळिशीतली मुलं. वावरणारे, पाळलेले पीळदार मिशांचे लठैतही. एक चांगलाच जाडजूड, जोरदार मिशा, अवाढव्य शरीर, असलेला गौरीबाबूंचा मुलगा वावरत होता. काय म्हणू या त्याला? टग्या? बरोबर, टग्याच म्हणू या. आम्हाला पाण्यासाठी माठ ऊर्फ डेरा हवा होता, म्हणून बाजार शोधत निघालो. तेवढ्यात महाकाय टग्या भेटला. तोही बरोबर आला. आम्ही एक निवडताच त्याने आग्रह करून दुसरा घ्यायला लावला. मी पैसे विचारताच टग्या लगेच म्हणाला, ‘‘पैसे की कोई बात नहीं.’’ दुकानदार कुंभारही ओशाळेपणाने हसला.

ते घेऊन आता मठाकडे निघायचे, तर टग्याने तिथून चाललेल्या एका माणसाला थांबवले. त्याच्या डोक्यावर दोन माठ दिले. त्यालाही पैसे द्यायची सोडा, पण विचारायची बात नाही. विनंती, आभार हे शब्द तर तिथं हास्यास्पदच. त्या बाजारातल्या कुणाहीकडून, कसलेही काम टग्या करून घेऊ शकत होता. नाही म्हणायची कुणाची शहामत नव्हती. गौरीबाबू म्हातारे असले, तरी जरब तशीच. एक असाच फाटका माणूस त्यांच्यासमोर उकिडवा बसला होता. त्यानं गौरीबाबूंकडून दहा की पंधरा रुपये घेतले होते. दुष्काळामुळे ‘फसल’ आली नाही, म्हणून ते परत करू शकला नाही. तो अजीजीने पुढची मुदत मागत होता. गौरीबाबूंचा पारा चढला होता. ते सर्वोदयी. आम्ही सर्वोदयावरच गप्पा मारीत होतो. बघता-बघता त्यांनी तिथं पडलेली झाडाची वेडीवाकडी फांदी उचलली आणि त्या माणसाला बडवायला सुरुवात केली. सरळ काठी असती, तर मुका मारच बसला असता. इथं ती वेडीवाकडी तुटलेली फांदी त्या माणसाला रक्तबंबाळ करीत होती. नाइलाजाने मार चुकवण्यासाठी त्याने हाताने  फांदी धरली- हा गौरीबाबूंचा केवढा अपमान… मग आतून आणखी दोन-चार लठैत माणसं आली. पुढचं काही विचारू नका. मी अस्वस्थ होऊन उठून आलो.

हिंदी सिनेमात अशी दृश्ये बघायचो. ती अतिशयोक्ती वाटायची. आता मला भडक हिंदी सिनेमाही वास्तववादी वाटू लागला. परत माझ्याशी मात्र ही माणसं अगदी मान ठेवून वागत होती. डाक्टरसाब, डाक्टरबाबू म्हणायची आणि माझ्यासमोरच बरोबर उलट वागायची- तेही नि:संकोचपणे. आल्या-आल्या अंगणात चक्क एक हत्ती उभा. मी थक्कच. हा या जमीनदार कुटुंबाने प्रतिष्ठेसाठी पाळलेला. त्याचं नाव चंचल. रोज मण-मण धान्य खातो, अशी गावात वदंता. तर, टग्या त्याच्या पोटावर थोपटत म्हणाला, ‘‘अकालके दिन है, बेटा चंचल सूख गया है।’’ धान्याची कोठारं धान्याच्या पोत्यांनी गच्च भरलेली. पण ती गोदामं भुकेल्यांना खुली करायला कुणी दामाजीपंत तिथं नव्हता. उलट, जमीनदाराची तरुण पोरं शिकारीला रानात जात आणि हरणं मारून आणत. त्यांचं लुसलुशीत मांस त्या कुटुंबात सगळ्यांनाच प्रिय.

गावाबाहेर एका बंदिस्त-कम-मोकळ्या जागेत एक विमान ठेवलेलं. ‘डाकोटा’ जातीचं. मनात आलं तर मौजमजा करायला कोलकात्याला जाऊन येण्यासाठी. मी गेलो, तेव्हा वैमानिक विमानाच्या सावलीत मस्त पहुडला होता. तरी हे गौरीबाबू म्हणजे त्या भागातले जरा ‘छोटे जमींदार’. कारण त्यांच्याकडे फक्त पाच हजार एकर जमीन होती! (पुढे थोड्याच वर्षांनी मी उत्तर बिहारचा दौरा केला, तर तीस हजार एकरवालेही ‘जमींदार’ पाहिले.) माझ्या गावी जास्तीत जास्त 30-40 एकरांची जमीन पाहिलेली. त्यामुळे ही बिहारची दुनिया मनाला सतत धक्के देत होती.

कोरला गेलेला एक प्रसंग सांगतो. एका सकाळी उठून विहिरीतनं पाणी काढून तोंड धूत होतो. बाहेर जरा गलका ऐकू आला. म्हणून ते मोठ्ठं लाकडी दार उघडलं- तर समोर पंधरा-वीस लोकांचा घोळका. खाली पायाशी पाहिलं, तर एक बाई पायऱ्यांवर पडलेली. अंगावर सर्वांत गरीब घालतात तसं पांढरट-मळकट फाटकं पातळ. चेहऱ्यावरून पन्नाशीची वाटली.

कोणी म्हटलं, ‘‘मर गयी है बेचारी.’’

‘‘रातको आपका दरवाजा खटखटा रही थी.’’

तो आम्हाला इतक्या आत ऐकू येणं शक्यच नव्हतं. मधे मोठं आवार होतं. पण इथं अन्न मिळतं, हे समजलं म्हणून लांबून चालत इथवर ती आली असावी. मी दगड बनून गेलो. एक घास अन्न मिळालं असतं, तरी तो जीव वाचला असता. आपण किती अन्न टाकून देतो, किती वेळा गरज नसताना खातो- ते आठवलं. जमीनदाराच्या कोठीतल्या गोदामातल्या धान्याच्या थप्प्या आठवल्या आणि हरणाचं कोवळं मांसही. इथं आल्यापासून वर्तमानपत्र क्वचित पाहायला मिळे. त्यात बातम्या असत- अमक्या विभागात इतके भूकबळी. तो भूकबळी हा नुसता शब्द होता; आता ते वास्तव गहिरा अर्थ घेऊन उभं होतं. मला या वास्तवाच्या डोळ्याला डोळा देण्याची हिंमत नव्हती. तो प्रसंग पुढं माझा पाठलाग सतत करीत राहिला. तोवर हौस म्हणून, साहस म्हणून, आनंद मिळतो म्हणून हे काम करायला बिहारला आलो होतो; पण त्या प्रसंगाने माझ्या जगण्याखालचा पायाच गदागदा हलवला. माझं सगळं जीवन एका क्षणात वरकड, अप्रस्तुत, उपरं करून टाकलं. कदाचित इथं मी खऱ्या अर्थानं माझी वाट बदलली असावी.

0

वाट बदलायला आणखीही एक अनुभव कारणीभूत आहे. पण दारात मृत झालेल्या बाईसारखा तो टोकदार, घुसणारा नाही. तो काही दिवसांचा आहे. घणासारखा बोथट आहे, पण त्याची ताकद अफाट होती. आम्ही रजौलीत मेडिकल सेंटर चालवत होतो. तिथं खादीचा लांब नेहरू शर्ट, खाली धोतर घातलेले पस्तीस-चाळिशीतले शर्माजी यायचे. ते खादी, सर्वोदय यातले कार्यकर्ते असावेत. त्यांना आमच्या कामाचे खूप कौतुक वाटायचे. म्हणाले- गाववाल्यांध्ये तुमची खूप चर्चा आहे. काम किती नेटाने करताय, म्हणत होते. आमच्या बिहारी पोरांना हे कसं काहीच जमत नाही, वगैरे. गौरीबाबू आणि टग्याच्या अत्याचाराच्या घटना त्यांनी दबक्या आवाजात सांगितल्या होत्या. एकदा म्हणाले, ‘‘इथं तर ठीक आहे. पण तिकडं पहाडरी गावं आहेत. लोकांचे फार हाल चाललेत. त्या गावांमध्ये दवाखाना कसा नेता येईल?’’ नंतर मी रसोडा सहकाऱ्यांवर सोपवला आणि शर्माजींबरोबर आसपासच्या खेड्यांत जाऊन दवाखाना चालवू लागलो.

औषधांच्या दोन पिशव्या (सॅक्स) पाठीवर घेऊन आम्ही जात असू. एकेक गाव एकेका तासात उरकायचो. बहुतेक सगळे आजार माल-न्यूट्रिशन, म्हणजे कुपोषणातून आलेले. पोरांना मुडदूस. वर छातीचा पिंजरा. खाली त्यातनं आलेले मोठ्ठं, गोल गरगरीत पोट. असं पोट  म्हणजे खरं तर सुबत्तेचं लक्षण. पण इथं ते दारिद्र्याचं द्योतक. हा कॅल्शियम कमतरतेचा प्रताप. त्यांचे केस भुरे-भुरे. ते प्रोटिन कमतरतेचं लक्षण. केस धरून ओढले की पुंजका सहज बाहेर! अंगावर-चेहऱ्यावर व्हिटॅमिन कमतरतेचे पांढरट नकाशे. जणू कुणा चित्रकाराची अमूर्त शैलीतली चित्रंच. सगळीकडे इन्फेक्शनचा मारा. जंतूंना विरोधच नाही ना! दूरवर डोंगराळ भाग होता, तिथं पोहोचलो. त्या भागाचं नाव झुमरी तलैय्या. हे रेडिओवर गाण्याच्या फर्मायशीत नेहमी ऐकलेले. पण आम्ही त्या शहरात गेलोच नाही. डोंगरातल्या गावांमध्ये जात होतो. तिथं अभ्रकाच्या प्रसिद्ध खाणी. तिथं निघणारे अभ्रकाचे तक्ते खूप जाड आणि मोठे, म्हणून जगप्रसिद्ध. पण आता नैसर्गिक अभ्रकाला कृत्रिम पर्याय निघालेत, त्यामुळे यांची मागणी कमी. खाणीमध्ये, गावात, वस्तीत सगळीकडे अभ्रकाची धूळ. चमचमत सगळीकडे उडणारी. भरून राहिलेली. सगळ्यांच्या नाका-तोंडात जाणारी.

शर्माजी म्हणाले, ‘‘सात-आठ वर्षांचा पोरगा कामाला लागतो. पंधरा-सोळा वर्षांचा होईपर्यंत या अभ्रकाने छाती निम्मी-अधिक भरते. मग त्यावर कधी तरी टी. बी.चे जंतू बसतात. पुढं दहा-बारा वर्षं टी. बी.चा प्रवास- की माणूस तिसाव्या वर्षांच्या आसपास मरतोच. या भागात बघा- तिशीच्या पुढचा माणूस दिसणार नाही.’’ आणि, खरोखरच तसा दिसला नाही. घराघरांत गेलो. एखादा माणूस आजारी, झोपलेला. सगळ्यांची लक्षणं तीच, तशीच. एका झोपडीत फाटक्या कपड्यातली, अर्धीएक उघडीच अशी दहा-बारा वर्षांची एक मुलगी बसलेली. मी तिच्या वडलांना तपासत होतो. ते ती लक्षपूर्वक बघत होती. तिच्या चेहऱ्यावर कसल्याही भावना नव्हत्या. वयानुसार असते ते पोरपण तर कधीच करपून गेलेलं. काय विचार करीत असेल ती? तिच्या प्रिय वडलांचं भवितव्य तिला पुरतं समजलं असणार… आणि मागोमाग येऊ घातलेलं तिचं स्वत:चंही भविष्य कळलं असणारच. मृत्यू या वास्तवासहित जगणारी ती संत-महात्मा, स्थितप्रज्ञ नव्हती. पण तिला कळत होतं, आपली जमात वेगळी आहे. आपल्याला देवाचा वर आहे, आपल्याला कुणाला म्हातारपणच नाही. आणि शाप? सगळं जगणं, हाच शाप.

पाणी प्यायलो, तर ते इतकं विचित्र चवीचं, की चूळ फेकून द्यावी लागली. कसे राहत असतील, जगत असतील? मृत्यूचं तांडव आहे, तर मग पोट भरायला दुसरीकडं का जात नाहीत? की, हे दुसरीकडूनच आलेले आहेत? म्हणजे तिथं यापेक्षा वाईट स्थिती? आमच्याबरोबर टीबीची औषधे नव्हती. त्या वेळी स्ट्रेप्टोमायसिन हे इंजेक्शन वर्षभर थोड्या-थोड्या गॅप सोडून द्यावं लागायचं. समजा- ती औषधं असती, तरी वर्षभर पुरेल इतकी- तीही इतक्या माणसांना देणं कसं शक्य आहे ते? आणि परत टी.बी. हा कुपोषणाचा आजार. पोटात अन्न नसेल तर कुठलं औषध लागू पडणार? शर्माजींना म्हटलं, जाऊ या परत. काही करता येईल असं इथं दिसत नाही. त्यांनाही ते कळत होतंच. सगळ्या वैद्यकीय विज्ञानाने, व्यवसायाने, यंत्रणेने या परिस्थितीपुढं हतबल होऊन नांगी टाकली होती. सपशेल शरणागती!

मला डॉक्टरी व्यवसायाचा उत्साह नव्हताच. पण घरच्यांनी लहानपणापासून बिंबवलेली स्वप्ने मनात पिंगा घालत होतीच. हॉस्पिटल, गाडी, बंगला… वगैरे. आता ते सगळं अर्थहीन वाटू लागलं. माझ्या जागी अभय बंग किंवा प्रकाश आमटे असे कोणी असते; तर त्यांनी तिथं राहून परिस्थितीचा सामना केला असता. पण माझ्यात ते बळ नव्हतं. त्या वेळी तसं कुठलंही काम बघितलेलं नव्हतं. एकच मॉडेल मनात रेंगाळत होतं, ते खासगी प्रॅक्टिसचं. ते स्वप्न अप्रस्तुत वाटू लागलं. माझी प्रॅक्टिस कितीही चालली, तरी या गावातल्या घराघरांतलं आजारी अंथरुण पुसलं जाणार नव्हतं; की त्या मुलीच्या डोळ्यांतलं अकाली प्रौढत्व जाऊन बाल्य येणार नव्हतं. प्रॅक्टिस न करून तरी मी काय करणार होतो? या जगड्‌व्याळ प्रश्नांपुढे माझी अशी काय ताकद? पण ठरवलं, आता आपण गरिबांचे. जी ताकद असेल, ती गरिबांसाठी. तिथून जो रस्ता बदलला, तो बदललाच.

0

बिहारवरून परतताना जबलपूरला माझ्या लाडक्या शकूमावशीकडे उतरलो. भाकरी-पिठलं, भात असं जेवण महिन्यानंतर मिळत होतं. किती जेवलो, कुणास ठाऊक. पण नंतर शकूमावशी माझ्या आईला म्हणत होती- ‘‘काय जेवलंय पोर… दुष्काळातनं यावं तसं!’’

मूळ लेखः साधना दिवाळी अंक २०१५

COMMENTS