कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासून विराटने गोंदवून घेतलेले टॅटू म्हणजे, त्याचा जीवनपटच आहे. ज्यात त्याचा संघर्ष, मेहनत, त्याचे आप्त, त्याचं यश या सगळ्याशी निगडित अस्सल कहाण्या दडलेल्या आहेत. ‘अक्षर’ प्रकाशनाच्या, विनायक राणे लिखित ‘विराट’ या पुस्तकातील एक प्रकरण..
टॅटू गोंदवून घेणं सोपं नसतं. ते शरीरासाठी वेदनादायी असतं. त्यासाठी मानसिक तयारी लागते. कारण हे टॅटू पुढे जन्मभर तुमची साथ करणार असतात. अर्थात, आजकाल टॅटू काढून टाकण्याचंही तंत्रज्ञान आलंय; पण विराटनं निर्धारानं टॅटू गोंदवण्याचा आणि ते न काढण्याचा निर्णय घेतला. आधी फॅशन म्हणून, तर नंतर ध्येयपूर्तीची आठवण म्हणून. का कोण जाणे, पण टॅटू गोंदवताना होणार्या वेदना त्याला हव्याहव्याशा वाटतात. त्याच्या दृष्टीनं हे टॅटू त्याच्या यशाचं प्रतीक आहेतच; परंतु, खेळाडू म्हणून कारकिर्दीत यशासाठी तसंच माणूस म्हणून घडताना त्यानं घेतलेल्या मेहनतीचं आणि केलेल्या आवश्यक समझोत्याची निशाणी म्हणजे, हे टॅटू आहेत.
विराटचं हे टॅटू-प्रकरण म्हणजे फक्त फॅशनचा ट्रेंड किंवा आपण किती मॉडर्न आहोत हे दाखवून देण्यासाठी केलेलं कृत्य तर अजिबातच नाही. या टॅटूंमध्ये त्याच्या जन्मदात्यांची नावं आहेत, जी त्याला कायम कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव करून देतात. आपल्या टॅटूंबद्दल विराट म्हणतो, ‘मी शरीरावर टॅटू काढायला सुरुवात केली ती ‘कूल’ दिसण्यासाठी. त्या अल्लड वयाला साजेसं त्यावेळी मी ते केलं; पण जसा काळ सरत गेला, माझी समज विस्तारली, तेव्हा खर्या अर्थानं भान आलं की, हे टॅटू खरं तर मला माझी खरी ओळख देऊ शकतात. आत्मशोध घेण्यास मदत करू शकतात.’
कधी काळी ‘ट्रायबल’चा टॅटू त्यानं सहज म्हणून हातावर गोंदवून घेतला होता; पण आता त्यातही गांभीर्य आलं आहे. तो म्हणतो, ‘आता माझ्या टॅटू गोंदवून घेण्याला विशिष्ट कारण आहे. हे टॅटू माझ्या आयुष्याचं प्रतिबिंब आहेत. माझं आयुष्य कसं होतं, ते आता कसं आहे आणि ते भविष्यात कसं असेल, हे या टॅटूंमधून झळकत राहतंय अन् कायम झळकत राहील. मी पूर्वी आयुष्याकडे कसा बघायचो आणि आता कसा बघतो हेदेखील यातून दिसतं.
सरोज आणि प्रेम
विराटच्या आईचं नाव, सरोज आणि वडिलांचं नाव प्रेम. दोघांचीही नावं विराटनं आपल्या दंडावर गोंदवली आहेत. ही नावं विराटला त्यांनी केलेल्या संस्कारांची आठवण करून देत राहतात. तो म्हणतो, ‘माझे आई-वडील माझ्यासाठी काय आहेत, हे मी शब्दात सांगू शकत नाही. त्यासाठी खरं तर शब्दच अपुरे पडतील. त्यांचं नाव माझ्या हातावर गोंदवून घ्यायचं प्रयोजन एवढंच की, ते माझ्यासोबत माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत कायम राहतील…’
शंकर
कोट्यवधी भारतीयांचं श्रद्धास्थान असलेले कैलासपती भगवान शंकर. जो निर्माण करणाराही आहे आणि नाश करणाराही आहे. एखाद्याचा नाश करताना, नव्याची निर्मिती करणं, ही शिवाची धारणा असते. विराट नेमकं तेच करतो आहे. तो आपल्या आक्रमकतेने जुने विक्रम मोडून काढत नव्याची प्रस्थापना करतो आहे. मग ते विक्रम कर्णधार म्हणून असो किंवा खेळाडू म्हणून. विराटचं इतिहास घडवणं सुरूच आहे. मुख्य म्हणजे, आपल्यातली उपजत आक्रमकता तो खेळात उपयोगी आणतो आहे, एकूणच शंकराप्रमाणेच आपल्यातल्या असीम ऊर्जेचा योग्य वापर करणं विराटलाही उमगलं आहे. या बद्दलचीच कृतज्ञता शरीरावरच्या शंकराच्या टॅटूमध्ये झळकते आहे.
269
269हा विराटचा कसोटी कॅप क्रमांक आहे. कसोटी क्रिकेट विराटचं कायम फेव्हरिट राहिलं आहे. आपल्या जडणघडणीच्या काळात, भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न, त्यानं जेव्हा जेव्हा पाहिलं, तेव्हा तो ‘कसोटी संघाचं’ मला प्रतिनिधित्व करायचंय, असं खास अधोरेखित करत असे. वस्तुतः तो ज्या पिढीत जन्माला आला, वाढला ती पिढी मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर जीव ओवाळून टाकणारी आहे. टी-20 लीगमधून मिळणारी प्रसिद्धी आणि मिळकतीवर भाळणारी, म्हटलं तर अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारीसुद्धा आहे. विराट मात्र या सगळ्याला अपवाद आहे. क्रिकेटचा आत्मा, मूळ गाभा ज्या कसोटी क्रिकेटमध्ये आहे, त्याचा विराट पायिक आहे. त्यामुळे 269 हा कसोटी कॅप क्रमांक त्याला इतका भावतो, की त्याने त्याचा खास टॅटूच करून घेतला आहे.
175
175 हा आहे, त्याचा वनडे कॅप क्रमांक. हे आपल्या आयुष्यातले माइलस्टोन आहेत, अशी त्याची धारणा आहे. त्याच धारणेतून त्यानं आपल्या दंडावर हाही क्रमांक गोंदवून घेतला आहे. अर्थात, हा क्रमांक आपल्याला जबाबदारीची, बांधिलकीची जाणीव करून देत राहील हाही त्याचा विचार आहेच.
ट्रायबल
हा टॅटू म्हणजे, योद्ध्याचं ठसठशीत प्रतीक आहे. ते आक्रमकतेचंही द्योतक आहे. प्रतिस्पर्ध्याला त्याच्याच मैदानावर जाऊन भिडायचं असेल तर स्वतःमध्ये आक्रमकतेसह बंडखोरवृत्तीदेखील हवी. हा टॅटू विराटच्या व्यक्तिमत्त्वाचा हाच भाग अधोरेखित करणारा आहे. विराट जात्याच बंडखोर आहे; विराटला ट्रायबलसारखं शूरवीर, पराक्रमी योद्धा व्हायचं आहे.
स्कोर्पिओ
विराटने दंडावर ‘स्कॉर्पिओ’ असं इंग्लिशमध्ये गोंदवलं आहे. स्कॉर्पिओचा मराठीतला अर्थ विंचू. विंचू हे जगण्यात जे जे अमंगल, जे जे दुष्ट त्याचं प्रतीक. विंचू हेच अधोगतीचं रुपक घेऊन ‘काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला’, असं भारूड रचणार्या संत एकनाथांचंही म्हणणं हेच. विराटनं हे गोंदवण्यामागचा अर्थ तोच. दुष्ट प्रवृत्तींपासून दूर राहणं. मोह टाळणं. द्वेष, मत्सर यापासून दूर राहणं. जगण्यातलं मालिन्य दूर होणं. ‘इतरांशी तुलना न करणं, ‘फक्त आपल्या आणि आपल्या संघाच्या सुधारणेबाबत विचार करणं.’ समजा, या ध्येयपूर्तीदरम्यान अडथळे आलेच, तर हा स्कॉर्पिओ टॅटू आहेच, सोबत.
वॉरियर सामुराई
सामुराई हा जपानी योद्धा. याचं रूपही विराटनं गोंदवून घेतलं आहे. या जपानी योद्ध्याच्या भात्यात भाले आणि तोफा ही अस्त्र असतात; पण त्याचं मुख्य अस्त्र आणि बोधचिन्ह असतं, ती त्याची धारदार तलवार. विराटही बॅटरूपी तलवार हातात घेत, आपल्या संघाला तारतो. प्रतिस्पर्धी गोलंदाजांची पिसं काढतो. विक्रम नोंदवतो. इतिहास घडवतो. हा जपानी योद्धा आप्तांना न्याय (जस्टिस) मिळवून देतो. जो धीट, धैर्यवान आणि शूर आहे. जो निष्ठावान, विश्वासूदेखील आहे. या जपानी योद्ध्याचा आणखी गुण म्हणजे, Benevolence, म्हणजे दानशूरता. जो मदतीसाठी कायम सज्ज असतो. हा योद्धा विनयशील, प्रामाणिक, आदरणीय आहे. जो आदर, सन्मान करणं जाणतो. या गुणांमुळेच या योद्ध्याचा जगात सर्वाधिक आदर राखला जातो. हे सगळे पैलू, गुण आपल्यात असावेत, त्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहावं, यासाठी विराटनं जपानच्या या योद्ध्याचा टॅटू गोंदवून घेतला आहे. हे चिन्ह विराटला त्याच्या गुणांची, आत्मविश्वासाची आठवण करून देत राहतं. जणू त्याला सांगत असतं, ‘तू पुढे वाटचाल करत राहा, तुझ्यातली अंगभूत कौशल्यं तुझ्या यशाला हातभार लावत राहतील…’
मॉनेस्ट्री
मॉनेस्ट्रीचा अर्थ, संत किंवा भिक्षूंचा मठ. असा मठ, जिथे संत मंडळी स्वतःशी, ईश्वराशी, निसर्गाशी संवाद साधतात, प्रसंगी तादाम्य पावतात. अशा समयी संतांना आजूबाजूच्या जगाचा संवाद साधतात, प्रसंगी विसर पडतो. त्यांचं लक्ष जराशानेही विचलित होत नाही. विराटही क्रिकेटशी असाच एकरूप होतो. ऐन लढतीत आपल्या खेळाशी एकरूप होताना विराट आपल्या मनातील मठात असाच ध्यानस्थ झालेला असतो. त्याच साध्य झालेल्या अवस्थेचं प्रतीक म्हणून विराटने गोंदवलेला हा मॉनेस्ट्रीचा हा टॅटू आहे.
देवाचा डोळा
म्हटला, तर हा केवळ एक डोळा आहे, ज्याला विराटनं ‘देवाचा डोळा’ असं नाव दिलं आहे. आपल्यावर देवाची नजर आहे, अशी त्याची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेचं हे प्रतीक आहे. ‘मी चुकीचं कृत्य केलं तर तो मला दंड करणार आणि माझ्या मेहनतीचं मला उचित फळ देणार,’ अशी विराटची भावना आहे.
ओमकार
विराटने टॅटू म्हणून ओमकार गोंदविला आहे. ‘ओमकार’ हा या विश्वातला सातत्यपूर्ण स्वर आहे, असं विराटला वाटतं. ज्यामध्ये प्रचंड ताकद आहे. आपण सगळेच समसमान आहोत, कुणीच वरचढ नाही. आपल्या सगळ्यांनाच कधीतरी या मातीशी एकरूप व्हायचं आहेच; पण काही जणांना या मूलभूत विचारांचा विसर पडतो. ज्यामुळे काहींचा अहंकार मोठा होतो, अशा व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा मोठ्या समजू लागतात. ही प्रवृत्ती कधीच डोकं वरू काढू नये, यासाठी शिवाचंच एक प्रतीक असलेला, हा ओमकार विराटनं गोंदवून घेतला आहे. हा ओमकार त्याला परिस्थितीचं भान देतो, त्याचे पाय जमिनीवर ठेवत त्याला गर्व नि अहंकारापासून दूर ठेवतो.
एकूणच, कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासून विराटने गोंदवून घेतलेले हे टॅटू म्हणजे, त्याचा जीवनपटच आहे. ज्यात त्याचा संघर्ष, मेहनत, त्याचे आप्त, त्याचं यश या सगळ्याशी निगडित अस्सल कहाण्या दडलेल्या आहेत. त्यातून उच्छृंखल, उद्दाम नव्हे, तर जगण्याचं तत्त्व गवसलेला विचारी मनाचा विराट दृश्यमान होत आला आहे…
विराट
विनायक राणे
अक्षर प्रकाशन
किंमतः १७५ रुपये.
COMMENTS