पाटणा महाविद्यालयात जेपी नड्डा यांना घेराव, विरोधात घोषणाबाजी

पाटणा महाविद्यालयात जेपी नड्डा यांना घेराव, विरोधात घोषणाबाजी

पाटणा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा घेराव केला आणि गो बॅकच्या घोषणा दिल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० मागे घेण्याची आणि पाटणा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.

पाटणा : भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा शनिवारी बिहारच्या राजधानीत पाटणा महाविद्यालयात आले होते. तिथे त्यांना विद्यार्थ्यांच्या निदर्शनांना सामोरे जावे लागले. विद्यार्थ्यांनी ‘जेपी नड्डा गो बॅक’च्या घोषणा दिल्या. घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मागे घेण्याची आणि पाटणा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्याची मागणी केली.

मध्यमांमधून आलेल्या वृत्तानुसार, नड्डा यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ‘आयसा’ (AISA) आणि ‘एनएसयुआय’ (NSUI) शी संबंधित तरुणांचा समावेश होता. नड्डा यांनी पाटणा महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, शनिवारी आंदोलनादरम्यान डावी संघटना आयसाच्या विद्यार्थ्यांनी नड्डा यांना घेराव घातला, तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना हुसकावून लावण्यासाठी जमावाला ढकलले. याच महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदवी घेतलेले नड्डा यांचे वडील पाटणा विद्यापीठात कार्यरत होते.

हा घेराव आणि निषेधही महत्त्वाचा आहे, कारण भाजप जेडीयूच्या नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारमध्ये भागीदार आहे. पाटणा विद्यापीठाला केंद्रीय दर्जाची मागणी करणारी आयसा  एकटी नाही. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यापूर्वीही ही मागणी लावून धरली आहे.

नड्डा यांच्यासोबत पाटणा कॉलेजमध्ये गेलेले भाजप नेते या घटनेने संतापले. ते म्हणाले की, पोलिसांनी आंदोलकांना नड्डाजवळ येऊ दिले. एका स्थानिक भाजप नेत्याने सांगितले, की, तसेच जेव्हा विद्यार्थिनी त्याच्या वाहनासमोर जमिनीवर पडल्या होत्या तेव्हा एकही महिला पोलिस उपस्थित नव्हत्या.

भाजपच्या आघाडीच्या संघटनांच्या दोन दिवसीय परिषदेसाठी नड्डा आदल्याच दिवशी राज्याच्या राजधानीत पोहोचले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने रोड शोही केला.

आंदोलनानंतर आयसाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे, की राज्य युनिटचे सहसचिव कुमार दिव्यम यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थी कार्यकर्त्यांचे नेतृत्व केले. संस्थेचे असे मत आहे, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० हे असमानतेला प्रोत्साहन देणारे असून, खाजगी संस्थांच्या संख्येत होणारी वाढ ही आरक्षणे आणि इतर धोरणांद्वारे लागू करण्यात आलेल्या सामाजिक न्यायाच्या कल्पनेच्या विरोधात आहे.

मूळ वृत्त

COMMENTS