देवेंद्र फडणवीसांना बसलेला मास्टर स्ट्रोक !

देवेंद्र फडणवीसांना बसलेला मास्टर स्ट्रोक !

स्क्रिप्टप्रमाणे फडणवीस वागत नसल्याचे दिसताच, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीरपणे पुढे येऊन फडणवीस उपमुख्यमंत्रीपद घेणार असल्याचे थेट माध्यमांसमोर जाहीर केले.

एखाद्या आवडणाऱ्या मुलीशी लग्न होण्याऐवजी तिच्या लग्नातील फोटो काढण्याचे काम मिळावे किंवा त्या लग्नाचे इव्हेंट व्यवस्थापन करावे लागणे, यासारखी दुसरी भयानक वा अपमानास्पद गोष्ट काही नसते.

महाराष्ट्राचे ३०वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्नं पुन्हा एकदा भंगल्याचे स्पष्ट झाले. पण आश्चर्य तर तेव्हा वाटले, जेव्हा त्यांनी चक्क उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत थेट सांगितले की, “देवेंद्र फडणवीस यांचा चेहराच सांगत होता, की ते आनंदी नाहीत. आदेश आला की आणि सत्तेचे कोणतेही पद मिळाले की घ्यायचे याचे उत्तम उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले.”

महाविकास आघाडीच्या सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर काम केले. समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने हे दोघे जवळ आले. पुढे या दोस्तीचे रूपांतर घनिष्ट संबंधात झाले. त्याचा योग्य वेळ येताच फडणवीस यांनी फायदा उठवला आणि शिवसेनेमध्ये बंड घडवून आणले.

या बंडामागे शिवसेना संपवणे हा जसा उद्देश होता, तसंच स्वतः मुख्यमंत्री बनणे हाही उघड हेतू होता.

फडणवीस यांना मुख्यमंत्री पद गेलेले खूप लागले होते. ते त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवत होते. इतकेच नव्हे तर पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी ते कसे उतावीळ झाले होते, हे अनेकवेळा महाराष्ट्राने पाहिले होते. त्यांनी संधी मिळताच पक्ष, भ्रष्टाचार, तत्त्वज्ञान असे सगळे बाजूला सारून ज्यांच्यावर आरोप केले त्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांबरोबर सत्ता स्थापन करून औट घटकेचे मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवले होते. त्यानंतर विधानसभेत बोलताना ‘मी पुन्हा येईन, पुन्हा येईन’ असे भाषण केले. एव्हढेच नव्हे तर त्यावर त्यांनी कविताही केली ती पुढे चित्रीतही झाली.

फडणवीस यांनी या सगळ्या काळामध्ये महाराष्ट्रातील पक्षावर एकहाती वर्चस्व मिळवले. फडणवीस म्हणजे भाजप, असे समीकरण तयार करण्यात आले. त्यांचे खास असलेले चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन हे भाजपपेक्षा फडणवीस यांच्यासाठी काम करताना दिसत होते.

सरकार पाडून मुख्यमंत्री बनण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न लपून राहिला नव्हता. चंद्रकांत पाटील, नारायण राणे यांसारखे नेते दरवेळी सरकार पडणार असल्याचे नवनवे मुहूर्त जाहीर करत होते.

ज्यावेळी मुख्यमंत्री होण्याची संधी आली, तेव्हा मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांची ही संधी हिरावून घेतली, एव्हढेच नव्हे तर त्यांची पदावनती करून उपमुख्यमंत्रीपद घ्यायला लावले आणि तेही जाहीरपणे सांगितल्याने फडणवीस यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला.

शिवसेना संपवायची आणि राज्यात असे सरकार आणायचे, अशी योजना कदाचित केंद्रीय नेतृत्वाने तयार केली असली तरी ती प्रत्यक्षात आणण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सागर बंगल्यावर बैठका घेतल्या. मुंबई-दिल्ली ये-जा केली. एकनाथ शिंदे यांच्या भेटींचे नियोजन केले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माध्यमांशी न बोलता काही दिवस गप्प बसण्याची कळ सोसली. हे सगळे करण्यामागे आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याची त्यांना खात्री होती, मात्र ती संधी काढून घेण्यात आली.

शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा होता. तर ५ वर्षांपूर्वी शिवसेना आणि भाजप युती मोडली, तेव्हाही केवळ अडीच वर्षांसाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार होता आणि नंतर ते पद फडणवीस यांनाच मिळणार होते. मात्र त्यावेळी फडणवीस यांनी ती संधी आपल्या हेकेखोर स्वभावाने घालवली.

गुरुवारी दुपारी शिंदे मुंबईत आले तेव्हा त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल आणि मुख्यमंत्रीपद फडणवीस यांनाच मिळेल असा सगळ्यांचा आणि फडणवीस समर्थकांचा विश्वास होता. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर फडणवीस समर्थक नेते थेटपणे सांगत होते की आता जे काही होईल, ते फडणवीस यांच्या सरकारमध्ये होईल.

मात्र भाजप केंद्रीय नेतृत्वाच्या स्क्रिप्टप्रमाणे शिंदे यांना मुख्यमंत्री पद आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. हे समजल्यावर आपण आणि भाजप सत्तेसाठी हपापलेले नाही आणि महाराष्ट्राच्या हितासाठी त्याग करत असल्याचा देखावा फडणवीस यांनी उभा केला आणि पत्रकार परिषदेत आपण सत्तेमध्ये सहभागी होत नसल्याचे जाहीर केले शिवाय नव्या सरकारची जबाबदारी मी व्यवस्थित सांभाळेन असेही ते बोलून गेले.

स्क्रिप्टप्रमाणे फडणवीस वागत नसल्याचे दिसताच, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीरपणे पुढे येऊन फडणवीस उपमुख्यमंत्रीपद घेणार असल्याचे थेट माध्यमांसमोर जाहीर केले. त्यानंतर लगेच गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले, “भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांच्या सांगण्यावरून, देवेंद्र फडणवीसजी यांनी मोठ्या मनाने आणि महाराष्ट्राच्या राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या महाराष्ट्राप्रती असलेल्या खऱ्या निष्ठेचे आणि सेवेचे द्योतक आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.” भाजपने हा निर्णय केला की शिंदे यांना भाजप समर्थन देईल आणि शिंदे मुख्यमंत्री होतील.”

त्यामुळे फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद घ्यावेच लागले. त्यावर भाजपच्या कोणत्याही नेत्याने काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. एका वृत्तवाहिनीला मुनगंटीवार म्हणाले, आम्ही नेते नाही कार्यकर्ते आहोत, वरचे आदेश आम्ही पाळत असतो. आम्ही नेते झालो तर कोण आदेश पाळणार! या घडामोडी पाहून सर्द झालेले शरद पवारही म्हणाले, फडणवीस यांनी आनंदाने हे पद स्वीकारलेले दिसत नाही.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना केंद्रात येण्याचे दरवाजे या निमित्ताने बंद केले. त्याशिवाय आपला एक प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था केली आणि पदावनती करून फडणवीसांचे मोठे होण्याचे पंख कापून योग्य तो इशारा दिला.

या सगळ्या असह्य परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत फडणवीस यांनी आपले जलयुक्त शिवार आणि आरे मेट्रोशेड असे प्रकल्प पुढे रेटून मंत्रीमंडळावर आपलाच प्रभाव राहणार असल्याचे दाखवायला सुरवात केल्याचे दिसते. तरीही हे लक्षात ठेवले पाहिजे की फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री हे पद नाही आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी थेट संबंध आता राहणार आहे.

त्यामुळे कितीही मास्टर स्ट्रोक मारल्याचे भाजप नेते सांगत असले, तरी हा दिल्लीतील मास्टरने फडणवीस यांना मारलेला स्ट्रोक आहे.

(छायाचित्र – देवेंद्र फडणवीस फेसबुक )

COMMENTS