सापेक्षता सांगणाऱ्या माणसासोबतचा सहप्रवास…

सापेक्षता सांगणाऱ्या माणसासोबतचा सहप्रवास…

‘प्रत्यय’ निर्मित ‘आइन्स्टाइन- सापेक्षता सांगणारा माणूस’ या नाटकाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग २ जुलै रोजी कोल्हापूरच्या केशवराव भोसले सभागृहात होत आहे. त्यावेळी प्रकाशित होणार्‍या स्मरणिकेतील लेख.

समलिंगी विवाह : धर्माचा न्याय, न्यायाचा धर्म
आर्थिक विकासदर १२ टक्क्याने वाढेलःआयएमएफ
जूनअखेर दहावीचा निकाल; अकरावीसाठी प्रवेश परीक्षा

कोलाहल, अराजक, अनागोंदी या शब्दांनी देखील वर्णता येणार नाही अशा विपरीत काळात आपण जगतो आहोत. ‘आपला काळ’ असं ज्याला म्हणावं असं काही निर्माणच होऊ नये अशी रचितं आपल्याला घेरून आहेत. भ्रमांच्या आणि भासांच्या भुलावणार्‍या-चेतवणाऱ्या जत्रेत हरवून गेल्यासारखी आपली अवस्था झालेली आहे. आपली संवेदना, विचारप्रक्रिया, ओळख, भावजीवन तारण ठेवून आपण हे भ्रम आणि भास भोगायला घरी आणलेले आहेत. हे सारं विखंडित असण्याचा एक काळ होता. संवेदनांचे विखंडन…विचारप्रक्रिया-भावजीवनाचं विखंडन. परंतु हा काळ केवळ विखंडनाचा नाही. विखंडन सुसह्य वाटावं अशा सार्वत्रिक संज्ञाहीनतेचा हा काळ आहे. आपली पाचही ज्ञानेंद्रिये प्रचंड सामग्री गोळा करत आहेत, पण संज्ञाहीनतेच्या जहाल आम्लात ही सामग्री विरून जाती आहे. आपण आपल्या भोवतीचे जग केवळ अधाशासारखे भोगतो आहोत. या भोगण्यात रस, रंग, गंध, स्पर्श, ध्वनी सगळं अनुपस्थित आहे. म्हणून आता काळ नाही केवळ वेळ आहे, अवधी आहेत. अवकाश नाही केवळ स्थळं आहेत, जागा आहेत.

हे सारं विपरीत खरं… दारुण खरं… जीवनेच्छेला; तप्त डांबरी रस्त्यावर पडलेल्या पाण्यासारखं वाफ करून टाकणारं खरं.. पण दिलाशाचे आवाजही उमटत असतातच की आपल्या भोवतालात.

पाश म्हणतो तसं…

मै घास हूं, मै अपना काम करुंगा
मै आपके हर किये धरे पर उग आऊंगा

असाच आवाज ज्ञानोबा-तुकोबांचा, बुद्धाचा, फैजचा, चैपलीनच, गालिबचा आणि आइनस्टाइनचा. जे विज्ञान सतत भौतिक समृद्धीसाठी झटत असते, भौतिक समृद्धी हेच ज्याचे जन्मकारण असते, अशा विज्ञानात काम करत तत्वज्ञ होण्याचा स्तर गाठणे दुरापास्त गोष्ट असते. असे काम करताना जीवनश्रद्धेची जागा महत्त्वाकांक्षेने घेणे सहज शक्य असते. मागे आपण ज्या संज्ञाहीनतेचा विचार केला, त्या संज्ञाहीनतेसाठी भौतिक विज्ञानानं माणसाला प्राप्त करून दिलेलं प्रबळ सत्तास्थानही कारणीभूत आहेच. म्हणून भौतिक विज्ञानामध्ये काम करताना तत्त्वज्ञ होणे, जिज्ञासेची लवलव टिकवून ठेवणे, जीवनातली रसवंती शाबूत ठेवणे, राक्षसी महत्त्वाकांक्षांनी स्वतःला लीप्त न होऊ देणे आणि भौतिक समृद्धीच्या तथाकथित रेट्यात विश्वशोधाचा आत्मस्वर लावत राहणेही दुरापास्त असते. आइन्स्टाइन यांनी हे सारे आपल्या जीवनात घट्ट धरून ठेवले. विज्ञानाच्या कोणत्याही भव्योदात्त अविष्कारामागं जीवनाविषयीची प्रगाढ ओढ असते’ हा आइन्स्टाइनी आपल्याला घालून दिलेला धडा आहे. विज्ञानामधली त्यांची कामगिरी अजोड आहेच पण जीवनाला त्यांचं देणंही अजोड आहे.

मराठी भाषकांना वैज्ञानिक आइन्स्टाइन खूप तपशीलवार माहिती आहेत. मराठी वैज्ञानिकांनी आणि लेखकांनी त्यांच्यावर लेखन केलेलं आहे. डॉ. निवास पाटील यांचे आइन्स्टाइन यांच्या सिद्धांतांवर संशोधनही आहे. परंतु आइन्स्टाइन यांच्या व्यक्तित्वाचा समग्र वेध घेणार लेखन मराठीत फारसं नाही. नाटक तर त्याहून नाही. ही कमतरता प्रा. शरद नावरे यांनी अनुवादित केलेल्या गेब्रियल इमॅन्युअल यांच्या आइन्स्टाइन वरील नाटकाने भरून निघाली आहे. या नाटकाचं शीर्षक आहे ‘आइन्स्टाइन- सापेक्षता सांगणारा माणूस’. शीर्षकातील शेवटचे पद अत्यंत महत्त्वाचे आहे आणि हाच या नाटकाचा गाभा आहे. शास्त्रज्ञ म्हणून सारं काही थोर असेल पण माणसात काही उजळ काही करड्या जागा असतात. आणि या साऱ्याचा शास्त्रज्ञ असण्याशी अभिन्न संबंध असतो. हे नाटक म्हणजे सापेक्षता सांगणाऱ्या माणसासोबतचा मनोज्ञ सहप्रवास आहे. प्रा. शरद नावरे यांच्या अर्थवाही अनुवादाला, डॉ. शरद भुताडिया यांच्या भूमिकेनं कमालीचं प्रत्ययकारी केले आहे. त्यांनी साकारलेला आइन्स्टाइन एखाद्या प्रिय सुहृदासारखा, मित्रासारखा प्रेक्षकांचा पोटात शिरतो. प्रयोग संपेपर्यंत त्यानं प्रेक्षकांचे मन-बुद्धी व्यापून टाकलेले असतात. अनलंकृतता हा या नाटकाचा प्राण आहे. तो प्राण डॉ. भुताडिया यांच्या अभिनयाने सतेज बनतो. केवळ सतेज बनतो असे नव्हे, तर आपल्याला आइन्स्टाइन विषयी नीतळ आप्तपण वाटायला लागते. सिद्धांतांमधून परिचित असणारा आइन्स्टाइन सिद्धांतामागच्या जीवन ऊर्जेसह कडकडून भेटणे हे या नाटकाचे सर्वात मोठे यश आहे. आइन्स्टाइन यांचे कुतूहल, वैफल्य, निराशा, चमक, प्रतिभा या सार्‍यांचा मिळून जो प्रवाही नाट्यानुभव साकारतो तो चुकवण्यासारखा नाही.

आकृतिबंधाच्या विचार करता हे एक एकलनाट्य आहे. एकल नाट्यपुढे दोन महत्त्वाची आव्हाने असतात पहिले लेखनाच्या स्तरावरचे असते दुसरे अभिनय आणि दिग्दर्शनच्या स्तरावरचे. या प्रकारच्या नाटकात एकच एक व्यक्तिरेखा पूर्ण प्रयोगकाळ व्यापणार असते त्यामुळे अशा नाटकांमध्ये आवाजांचे वैविध्य असणा नसते. म्हणजे श्राव्यवैविध्यही असणार नसते आणि बहूआवाजीपणातून येणारे व्यक्तीतत्वांचे‍-दृष्टिकोनांच्या ताण्याबाण्यांचे ही वैविध्य येणार नसते. एकल नाट्याच्या लेखकाला एकाच व्यक्तिरेखेत असलेले अनेक पदर आणि स्तरांना उजागर करावे लागणार असते. या पदरा-स्तरातून उद्भवणारे श्राव्याचे वैविध्य एकल नाट्याचा श्राव्य अनुभव (आणि अर्थातच व्यक्तिरेखांच्या व्यामिश्रतेचा) अनुभव आस्वाद्य आणि सकस बनवणार असते. वरवर पाहता प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तित्व भाषिक स्तरावर एकसंध वाटले तरी त्या व्यक्तीत सामावलेल्या अनेक जीवनानुरूप भूमिकांचे एक-एक भाषिक व्यक्तित्व असते. हीच एकल नाट्याच्या श्राव्याची भूमी आहे. तसेच व्यक्तित्व वैविध्याचीही भूमी आहे. लेखक म्हणून गॅब्रिएल इम्य़नुएल हे साधले आहे असे मानले तरी अनुवादात ते उतरणे जिकिरीचे ठरणार असते. प्रा. नावरे यांनी त्यांच्या अनुवादात ही श्राव्याची आणि व्यक्तित्व वैविध्याची गुणवत्ता अत्यंत सहज उतरवली आहे. या नाटकात आइन्स्टाइन प्रेक्षकांशी संवादतात, प्रेक्षकांना दृश्य असणाऱ्या अवकाशाबाहेरच्या माणसांशी संवादतात आणि स्वतःशी संवादतात. प्रत्येक वेळी त्यांचे भाषिक व्यक्तित्व निराळे असते. प्रा. नावरेंनी लिहिलेले संवाद या निराळेपणाला अधोरेखित करतात. तसे झाले नसते तर ही भूमिका सपाट आणि एकसुरी-एक आवाजी झाली असती. हे निराळेपण पुढे डॉ. भुताडियांच्या अभिनयातून सजीव होते. हा प्रयोग एकाच वेळी निकटमंचाची आणि रंगचौकटीच्या मंचाची शक्तीस्थळे वापरतो त्यामुळे एकाच आसनावर बसून प्रेक्षकाला दोन मंचनशैलींचा प्रत्यय येतो. हा शैलीपालट अत्यंत स्वाभाविकपणे घडत राहतो. हवा तेवढा सहभाग आणि हवी तेवढी तटस्थता (नाट्यशैलीच्या भाषेत बोलायचे तर समरसता आणि परात्मता) प्रेक्षकांना साधता येते. हे दिग्दर्शकाने साधलेले नाट्यभान असते. प्रत्येक नाट्यप्रयोगाकडे ’नाटक म्हणून’ सांगण्यासारखे- अनुभवाला देण्यासारखे काहीतरी हवे अन्यथा ते नाटक म्हणून कुचकामी ठरणार असते. अन्यत्र उमजू शकणारी, समजू शकणारी सत्ये-वास्तवे नाटक केवळ अधोरेखित करणार असेल तर नाटक का पाहावे? आइन्स्टाइनच्या प्रयोगात ‘नाटक म्हणून’ सांगणे इतके सर्वांगयुक्त झालेले आहे की हा प्रयोग नसता तर असे आइन्स्टाइन आपल्याला उमगले नसते. नाटकाच्या प्रयोगाने इतके अपर्यायी असायलाच हवे.

अखेरीस, आणखी दोनच मुद्द्यांचा उहापोह करून हे लेखन आवरते घेतो. हे दोन मुद्दे आइन्स्टाइन यांच्या कार्याशी अभिन्नपणे जोडलेले आहेत आणि ते मुद्दे नाटकाची मूलद्रव्येही आहेत. आइन्स्टाइननी मांडलेल्या सिद्धांतनानंतर जगाची काळ आणि अवकाशाकडे बघण्याची दृष्टी पालटून गेली एकरेषीय काळाच्या पोटात किती काळ दडलेले असतात यांच्या दर्शनाने जग स्तिमित झाले. काळजाणीव बदलली की अवकाश जाणीवही बदलते अमुलाग्र बदलते. भौगोलिक-भौमितिक अवकाशाच्या परी पालटतात. आइन्स्टाइनवरील नाटकाने हे काळ-अवकाशाचे अवस्थावैपुल्य कवेत घेतले नसते तर ते निव्व्ळ चरित्र नाट्याच्या ढोबळ कोटी पलीकडे गेले नसते. प्रयोगात होणाऱ्या काळजाणिवेच्या हाताळणी विषयी आणि त्याच्या प्रेक्षकांना होणाऱ्या उमजेविषयी दीर्घ विवेचन करता येईल. तसेच अवकाशविचाराबाबतीतही करता येईल परंतु, या लेखनाचे ते औचित्य नाही. कोणताही नाट्यप्रयोग आपला वाहता घड्याळी काळ थांबवून त्यात हस्तक्षेप करत असतो. अनेकदा हा हस्तक्षेप घड्याळ थांबवून त्यात कथानककाळ स्थापण्या पलीकडे जात नाही. परंतु आइन्स्टाइनच्या प्रयोगात नानाविध काळगती-काळस्थिती प्रत्ययाला येतात तसेच अवकाशाचेही होते. प्रयोगात अवकाश विस्तारत-संकोचंत राहते, बंदिस्त-खुले, सापेक्ष-निरपेक्ष होत राहते. नेपथ्याने निर्माण केलेला स्थापत्याचा आणि मंचवस्तूंनी निर्माण केलेला सामाजिक-सांस्कृतिक तपशिलांचा अनुभव अनेकदा प्रयोगात सहभागी होतो, प्रयोगावर स्वार होतो आणि नाट्यअनुभवाला आवश्यक असेल तेव्हा तो अंतरिक्षात विरघळून गेल्यासारखा नाहीसा होतो. अवकाशाच्या अवस्थांतरणामुळे हे नाटक ’आइन्स्टाइनवरील’ नाटक न होता ’आइन्स्टाइनचे’ नाटक होते. आणि म्हणूनच ते अपर्यायी देखील होते.
तूर्तास इतकेच लिहून विराम घेतो. वेगवेगळ्या प्रकृतीच्या प्रेक्षकसमुहांसोबत सहप्रवास करीत करीत हे नाटक आता पन्नासाव्या प्रयोगापर्यंत पोहोचलेले आहे. या टीपणाच्या आरंभाला जो नकाराचा तीव्र सूर लागला होता त्या सुरावर मात करण्याचं बळ असे नाट्यानुभव आपल्याला प्रदान करत असतात विसंवाद त्यागून सामीलकीची वाट दिसणे हे अशा नाट्यप्रयोगांचे श्रेयस असते.

मूळ लेखक – गब्रीएल इमॅन्युएल 
मराठी अनुवाद – डॉ. शरद नावरे 
दिग्दर्शन आणि भूमिका – डॉ. शरद भुथाडिया 
शनिवार, २ जुलै , संध्या. ४.३० वाजता 
केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0