नवी दिल्ली: ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडणाऱ्या करसेवकांमध्ये आपण होतो, असा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते देव
नवी दिल्ली: ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडणाऱ्या करसेवकांमध्ये आपण होतो, असा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत एका भाषणात केला आहे. शिवसेनेच्या तुलनेत आपला अधिकार सिद्ध करण्याच्या प्रयत्नात फडणवीस यांनी हे विधान केले.
मुंबईतील महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपने घेतलेल्या एका सभेला संबोधून फडणवीस बोलत होते. शिवसेनेतील कोणीही अयोध्येत उपस्थित नव्हते, असा आरोप फडणवीस यांनी केला.
“बाबरी मशीद पाडली त्या दिवशी अयोध्येत उपस्थित सक्रिय करसेवकांमध्ये मी होतो हे मी अभिमानाने सांगतो. भव्य राममंदिराच्या बांधकामासाठी मी करसेवेत भाग घेतला, लाठीचा मार खाल्ला, तुरुंगात गेलो,” असे फडणवीस म्हणाले.
एप्रिलच्या अखेरीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, “मला हिंदुत्व शिकवणाऱ्यांनी स्वत: हिंदुत्वासाठी काय योगदान दिले आहे हे स्वत:लाच विचारावे. बाबरी (मशीद) पाडली गेली, तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात.” राममंदिराचे बांधकाम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहे, हा काही भाजपा सरकारचा निर्णय नाही, असेही ठाकरे म्हणाले होते.
त्याला उत्तर म्हणून फडणवीस म्हणाले, “आम्ही कुठे लपलो होतो, असे ते विचारत आहेत… मशिदीवरील ध्वनिक्षेपके काढण्याची वेळ आली, तेव्हा ते (शिवसैनिक) घाबरले आणि बाबरी मशीद पाडल्याचे दावे करत आहेत. मी अभिमानाने सांगतो, हो, मी मशीद पाडण्यासाठी तेथे गेलो होतो. या देवेंद्र फडणवीसाने १८ दिवस बदाऊन तुरुंगात काढले.”
त्यानंतर त्यांनी शिवसेनेला अनेक प्रश्न विचारले: “मशीद पाडली तेव्हा महाराष्ट्रातील कोणता नेता तेथे गेला होता, मला सांगा? कोणी नेता गेला होता?”
शिवसेनेने हिंदुत्वासाठी काहीच केलेले नाही असे दाखवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. शिवसेने युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यापासून दोन्ही पक्षांमध्ये कडवा संघर्ष निर्माण झाला आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार, ऋतंभरा, कल्याणसिंग यांनी बाबरी मशीद पाडण्यात सहभाग घेतला आणि त्याबद्दल कायद्याची लढाईही ते लढले, असे फडणवीस म्हणाले.
‘मुद्दे बदलले आहेत’
शिवसेनेचे नेते संजय राऊत फडणवीस यांच्या वक्तव्यावर म्हणाले, “बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा शिवसैनिक कुठे होते असे कोणी विचारत असेल, तर त्यांनी त्यांचे नेते दिवंगत सुंदरसिंग भंडारी यांना विचारायला हवे होते. त्यावेळचा सीबीआय अहवाल तपासा. आयबीचा अहवाल तपासा. अर्थात आता परिस्थिती बदलली आहे आणि त्यामुळे मुद्देही बदलले आहेत. लोक आता असल्या मुद्दयांकडे लक्षही देणार नाहीत.”
भाजपा आणि त्यांची तळी उचलणारे पक्ष हनुमान चालीसा म्हणणे आणि अयोध्या यांसारखे मुद्दे उगाच लावून धरण्याचा प्रयत्न करत आहेत. बेरोजगारी, महागाई व चीनची घुसखोरी यांसारख्या मुद्दयांकडून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे, असेही राऊत म्हणाले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका याच महिन्यात होणार असल्याने राज्यातील विरोधी पक्षांनी शिवसेना सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
COMMENTS