भाजप ‘असमर्थ’, शिवसेनेला निमंत्रण

भाजप ‘असमर्थ’, शिवसेनेला निमंत्रण

मुंबई – महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यास आपण असमर्थ असल्याचे आज संध्याकाळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यपालांना सांगण्यात आल्यानंतर राज्यपाल

दहशतवादविरोधी प्रशिक्षणाकडे केंद्रसरकारचे दुर्लक्ष
एसपी-डीआयजी पदांना केंद्रात प्रतिनियुक्ती सक्तीची
लोकांचा मूड ओळखण्यात उदारमतवादींचे अपयश

मुंबई – महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यास आपण असमर्थ असल्याचे आज संध्याकाळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यपालांना सांगण्यात आल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले आहे.

काल ९ नोव्हेंबरला सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी पाचारण केले होते. आज संध्याकाळी भाजपने सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे राज्यपालांना सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेला निमंत्रण देण्यात आले. शिवसेनेला उद्या संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी वेळ देण्यात आल्याचे समजते.

२८८ जागा असणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी १४४ आमदारांच्या पाठींब्याची गरज आहे.

शिवसेनेच्या ५६ जागा निवडून आल्या आहेत, तर ८ अपक्ष आणि इतर आमदारांचा मिळून ६४ जागा असल्याचा शिवसेनेचा दावा आहे. शिवसेनेला अजून ८० आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४ आणि काँग्रेसकडे ४४ जागा आहेत.

निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर १८ दिवसांनी आज संध्याकाळी भाजपच्या नेत्यांनी आपण सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. राजभवनाच्या परिसरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी सरकार स्थापन करणार नसल्याचे राज्यपालांना सांगितल्याचे पत्रकारांना सांगितले.

पाटील म्हणाले, की आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो होतो. एकत्र लढूनही शिवसेना आमच्यासोबत सत्तेमध्ये येण्यास उत्सुक नाही. शिवसेनेला आमच्यासोबत यायचे नाही. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही. शिवसेना जनादेशाचा अनादर करत आहे.

शिवसेनेला आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळून सरकार स्थापन करायचे त्यासाठी आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत, असेही पाटील म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज दुपारी झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि गिरीश महाजन राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात गेले आणि आपण असमर्थ असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले. मात्र यावेळी मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये भाजपचे केंद्रातील निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादवही उपस्थित होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात येते. यावेळी शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना म्हंटले, “कालपर्यंत भाजपाचे लोक सांगत होते, की मुख्यमंत्री भाजपाचाच होणार. पण, भाजपा सत्ता स्थापन करणार नसेल, तर मुख्यमंत्री कसा होणार. आता कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल.”

शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करायची की नाही, याचा राष्ट्रवादीने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. शिवसेनेने आधी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतून बाहेर पडावे. त्यानंतरच सरकार स्थापन करण्याचा आम्हाला प्रस्ताव द्यावा, मग निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला १०५, तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत. बहुजन विकास आघाडीला ३, समाजवादी पार्टीला, एमआयएमला आणि प्रहार जनशक्ती पार्टीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पार्टी, शेकाप, मनसे, रासपला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. एकूण १३ अपक्ष निवडून आले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0