कोणाचा ‘फटका’ कोणाला?

कोणाचा ‘फटका’ कोणाला?

भाजप शिवसेनेच्या निवडणूक पूर्व युतीला बहुमत मिळूनही राज्यात अजुन सरकार बनण्याची प्रक्रिया सुरु झालेली नाही . हरियाणा मध्ये मात्र भाजप ला बहुमत मिळाले नसताना सुद्धा लागोलाग सरकार स्थापन झाले आहे. तोपर्यंत महाराष्ट्रातील या लांबलेल्या पावसाळ्यात जाणकारांच्या निवडणूक विश्लेषणाचा पुर मात्र जरूर आला आहे.

आझाद यांच्या राजीनाम्याचा भाजपला किती फायदा?
शिव्यांची नवी राजकीय संस्कृती
नियमनाच्या अभावामुळे खाजगी रुग्णालयांद्वारे रुग्णांचे शोषण

नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या कामगिरीचे विश्लेषण करताना कुणा ना कुणा  वर खापर फोडले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या पक्षाच्या  अनपेक्षित कामगिरी मागे सुमारे २० बंडखोरांचा  हात आहे असं म्हटलंय  तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनुक्रमे जितेंद्र आव्हाड आणि बाळासाहेब थोरात यांनी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या ‘मेहेरबानी’ मुळे  आघाडीला सुमारे २०-२५ जागांचा फटका बसला असे म्हणत ‘धर्मनिरपेक्ष’ मतांची विभागणी केल्याबद्दल प्रकाश आंबेडकरांवर तोंडसुख घेतले आहे. प्रकाश आंबेडकरांनी मात्र काँग्रेस राष्ट्रवादीने  स्वतःच्या पराभवासाठी आम्हाला दोष देऊ नये असे प्रत्युत्तर दिले आहे.

लोकसभेच्या अभूतपूर्व पदार्पणानंतर अचानक वेगळे झालेल्या ‘वंचित बहुजन आघाडी’ आणि ‘एमआयएम’ या दोन पक्षांना अनुक्रमे २४ लाख आणि ७ लाख एवढी मते विधानसभेला देखील मिळाली.  ‘वंचित’ ला एवढी मते मिळवूनही शून्य जागा तर तर ‘एमआयएम’ला २ जागा मिळाल्या.

वंचित चे १० जागांवर उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर इतर अनेकांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.

१०१ जागा जिंकणारी महाआघाडी  खरोखरचवंचितमुळे  सत्तेपासून  वंचित राहिली का?

लोकसभेपासूनच ‘वंचित’ ला भाजपाची  ‘बी टीम’ म्हणत हिणवणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांसकट काही जाणकार पत्रकारांनी सुद्धा विधानसभेनंतर हाच आरोप केलाय. त्यामुळे खरोखरच वंचित मुळे भाजपा ला फायदा झाला का हे तपासून पाहणे गरजेचे आहे.

नव्याने स्थापना झालेल्या या आघाडीला लोकसभेला सुमारे ४१ लाख मते मिळाली. लोक सभा निवडणुकी नंतर ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ अचानक पणे वेगळे झाले. पण तुटलेल्या या युतीतून विजयी रेषा ओलांडण्यासाठी दोन्ही पक्षांना याचा फटका बसला. दोन क्रमांकावर राहिलेल्या ‘वंचित’च्या बहुतेक जागा थोड्या फरकाने हरल्या गेल्या. वंचित नसल्याने विधानसभेला दोन जागांवर विजयी झालेल्या ‘एमआयएम’ चे सुद्धा नुकसान झाले. मुंबई, औरंगाबाद सोलापूर अश्या ठिकाणी पक्षाला जागा जिकता आल्या नाही.

राहता राहिला ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ मुळे झालेल्या महाआघाडीच्या झालेल्या  कथित नुकसानीचा  प्रश्न. माझ्यामते महाआघाडीच्या पराभवाला ‘वंचित’ फॅक्टर सोडून इतर तीन  प्रमुख

बाबी कारणीभूत आहेत.

. महाआघाडीच्या महागळती

लोकसभेच्या निवडणुकी आधी काँग्रेस राष्ट्रवादी कडून सुरु झालेली गळती काही काही केल्या थांबली नाही. उदयनराजे, हर्षवर्धन पाटील, वैभव पिचड आणि दिलीप सोपल ह्या सारख्या काही पक्षांतर केलेल्या नेत्यांचा जरी पराभव झाला असला तरी  राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, शिवेंद्र भोसले, सचिन आहिर, जयकुमार गोरे, कालिदास कोळंबकर, नमिता मुंदडा, राणा जगजितसिंग,काशीराम पावरा  सारखे  दोन डझन प्रमुख  चेहरे सोडून गेल्याने पार्टीचे भारी नुकसान झाले. वरळी, शिर्डी, सिल्लोड, नवी मुंबई, शिरपूर अश्या हमखास येणाऱ्या महाआघाडी च्या कित्येक जागा पक्षांतर मुळे  गेल्या. या मतदार संघात पक्षापेक्षा नेत्यांना मते दिली गेली.

विशेषतः नवी मुंबई ठाणे परिसरात महाआघाडीला नाईक, अहिर, कोळंबकर, नार्वेकर यांच्या जाण्याने फटका बसला.

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची फौज होय. शरद पवारांच्या झंझावातामुळे राष्ट्रवादी ने आपली साख राखली असली तरीही, पक्षांतराचा फटका बसला नसता तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या आकड्यात दोन डझन पेक्षा  जास्त वाढ निश्चित झाली असती.

  1. नोटा आणि मनसे फॅक्टर

वंचित मुळे  २३ जागा कमी झाल्या अशी वल्गना करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विट मधील २३ मतदार संघातील काही जागांचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की प्रथम दर्शनी विश्वास ठेऊ वाटणाऱ्या या माहितीत तथ्य कमी आणि कांगावा जास्त आहे.

  • यापैकी पंकज भुजबळ यांचा ‘नांदगाव’ येथे १३, ८८९ मतांनी पराभव झाला, परंतु वंचित’ ला यापेक्षा कमी म्हणजे १३,६३७ मते मिळाली. याचा अर्थ संपूर्ण वंचित ची मते मिळून सुद्धा पंकज यांचा पराभव अटळ होता. म्हणजे आव्हाडांचे हे उदाहरणच सपशेल चुकीचे आहे.
  • ‘नाशिक पश्चिम’ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव कम्युनिस्ट पार्टी मुळे झाला असे म्हणता येऊ शकते. या पक्षाच्या धोंडीराम कराड यांना मिळालेली मते ही महायुतीच्या विजयी उमेदवाराच्या फरकापेक्षा जास्त आहेत.
  • ’चांदिवली’ या मुबंईतील मतदार संघात काँग्रेस ला केवळ ४०९ मताने पराभव पत्करावा लागला. याचे खापर काँग्रेस-राष्ट्रवादी वंचित वर फोडत आहे. वास्तविक पाहता येथे ‘नोटा’ ला ३,५०० तर ‘मनसे’  ला ८,८७० मते मिळाली आहेत. मग  ‘मनसे’ आणि ‘नोटा’ मुले चांदिवली ची काँग्रेस ची जागा गेली असे का म्हणू नये?
  • पुण्यातील ‘शिवाजीनगर’ मतदार संघात भाजप चे सिद्धार्थ शिरोळे केवळ ५,१२४ मतांनी विजयी झाले. येथे ‘मनसे’ ला मिळालेली मते त्याहून जास्त म्हणजे ५,२७२ आहेत. तर ‘नोटा’ ची मते २,३८२ आहेत. वंचित ला १०,००० पेक्षा जास्त मते असली तरीही मनसे ने उमेदवार उभे केल्याने काँग्रेस पराभूत झाली असा अर्थ कोणीही काढू शकतो.
  • बाकी ‘अकोला पश्चिम’, ‘चाळीसगाव’, ‘खामगाव’ ‘धामणगाव रेल्वे’, ‘चिमूर’ मध्ये  मध्ये वंचितला अनुक्रमे  सुमारे २०,०००, ३८,०००, २५,००० २०,००० आणि २५००० मते मिळाली आहेत. म्हणजेच ‘वोट कापू’ पेक्षा हा पक्ष विजयाच्या उद्देशाने लढला असे म्हटले पाहिजे.  ‘उस्मानाबाद’ मध्ये तर अपक्ष उमेदवाराने वंचित पेक्षा जास्त मते घेतली आहेत.
  • ‘नांदेड उत्तर’ मध्ये ‘एमआयएम’ ने काँग्रेस च्या खालोखाल तब्बल ४१,००० मते घेतली आहेत यामुळे याठिकाणी ते ‘वोट कटुवा’ आहेत असे म्हणता येणार नाही.

खालील तक्ता पहिला असता असे दिसून येईल कि मनसे आणि नोटा या मुळे सुद्धा महाआघाडी ला ‘खडकवासला’, ‘उल्हास नगर’, ‘दौंड’  ‘पुणे कॅन्टोन्मेंट’येथे  फटका बसला आहे.

संदर्भ : निवडणूक आयोग (http://results.eci.gov.in/)

याचाच अर्थ या आव्हाडांनी दिलेल्या २३ पैकी बहुतांशी मतदारसंघात ‘वंचित’ सोबतच   अनेक फॅक्टर महा आघाडीच्या पराभवास जबाबदार आहेत.

वंचित आघाडी ने सर्व वंचित समाज घटकांना उमेदवारी दिल्याने ते केवळ पारंपरिक महाआघाडीच्या नव्हे तर बऱ्याच ठिकाणी महायुतीची मते सुद्धा आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झाली आहेत. केवळ बौद्ध आणि दलित मतावर वंचित ने २४ लाखांवर मते घेणे

अशक्य आहे. हे याआधी न एकत्रित रिपब्लिकन पक्षाला जमले ना बसपाला. धनगर, भटके, कोळी, छोटे ओबीसी असे असंख्य मतदार ही वंचित सोबत होते हि गोष्ट मान्य करावी लागेल.

काही पत्रकारांनी सुद्धा अभ्यास न करता वंचित मुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस २३ ठिकाणी पराभूत अशी री ओढली आहे. ती वास्तविकतेला धरून नाही. याचे कारण म्हणजे  ‘वंचित’ काँग्रेस राष्ट्रवादी च्या मागे भक्कम पणे उभ्या असल्येल्या मराठा समाजाला नव्हे तर सेने भाजप कडे सरकलेल्या असंख्य बहुजन समाजाला आकर्षित करण्यात यशस्वी झाला आहे. यामुळेच त्याचा फटका महायुतीला देखील बसला आहे .

महाआधाडीच्या हरलेल्या जागा दाखविण्यापेक्षा महायुतीच्या हरलेल्या जागा बघितल्यास  असे लक्षात येईल कि सेने भाजप चे मताधिक्य कमी करण्यास आणि काही ठिकाणी त्यांना पाडण्यात वंचित आघाडी यशस्वी झाली आहे.

उदाहरणार्थ २०१४ ला ‘वंचित’ नसताना हरलेल्या वडगाव शेरी, सिन्नर, हडपसर या मतदार संघात ‘वंचित’ असताना यंदा महाआघाडीला निसटता विजय मिळाला. परंतु तो विजय ‘वंचित’ चा उमेदवार नसता तर  ‘वंचित’  च्या सामाजिक समीकरणामुळे उलट देखील फिरू शकला असता. या सर्व ठिकाणी विजयी फरकापेक्षा वंचित ला अधिक मते मिळाली आहेत. यातील काही बहुजन समाजाची मते शिवसेना भाजप कडून ‘वंचित’ कड़े गेली असल्याची शक्यता आहे.

अशा कित्येक मतदारसंघाचे विश्लेषण करता येऊ शकते.

आता ‘मनसे’कड़े वळू. ’मनसे’ फॅक्टरकडे बदललेल्या परिस्थितीत ‘शिवसेनेची परंपरागत  मते फोडणारा पक्ष’ म्हणणे चुकीचे ठरेल. २०१४ नंतर राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खूप जवळ आले आहेत. लोकसभेला त्यांनी काँग्रेस ला मतदान करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन

ही केले होते. मनमोहन सिंग आणि शरद पवारांना मानणारा आणि मोदी विरुद्ध बोलणारा ‘मनसे’ आता राम मंदिर चा जयघोष करणाऱ्या शिवसेना नव्हे तर काँग्रेस राष्ट्रवादी च्या मतांशी स्पर्धा करतोय. मनसेला मिळालेली अनेक मते हि मरगळ आलेल्या काँग्रेसची हि असू शकतात.  म्हणूनच मनसेच्या १२ लाख मतांचे विश्लेषण होणे गरजेचे आहे.  मुंबई ठाणे पुणे शहर आणि पालघर पट्ट्यात महायुतीने प्राबल्य राखल्यानेच त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला. अन्यथा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि काही अंशी खान्देशात महाआघाडीने चांगली लढत दिली आहे.

मग मनसे  ने शेवटच्या क्षणी एकट्याने निवडणूक लढविण्याचा   ‘वंचित’ ची ताकद कमी असणाऱ्या मुंबई ठाणे पुणे शहर आणि पालघर भागात आघाडीवर नक्कीच प्रतिकूल परिणाम झाला असण्याची शक्यता आहे.

  1. काँग्रेस ची मरगळ

शरद पवारांनी जेवढी जिद्द दाखविली तेवढी काँग्रेस ने दाखविली असल्यास मतदानाची टक्केवारी वाढली असती  आणि ‘नोटा’ पर्याय  इतक्या प्रमाणात मते घेऊ शकला नसता. मोदी आणि फडणवीस यांच्याबद्दल बद्दल भ्रम निराश झालेल्या कित्येकांनी ‘नोटा’ बटन दाबणे का ठरविले असेल? आघाडीतून युतीकडे होणारी गळती आणि कित्येक मतदार संघात काँग्रेस कडून प्रचाराचा अभाव हे शहरी भागात पक्षाच्या परभवास नक्कीच कारणीभूत ठरले.

काँग्रेस मध्ये सक्रिय झालेल्या पक्षाच्या सचिव प्रियांका गांधींच्या सभा विदर्भ मराठवाडा मुंबई येथे का घेण्यात आल्या नाहीत हे एक मोठे कोडे आहे. बहुदा ही निवडणूक आपण हरलेली असल्याने कोणत्याही गांधी ला प्रचारास उतरवणे म्हणजे हरल्यावर गांधी कुटुंबाच्या प्रभावावर  प्रश्न चिन्ह  येऊ नये म्हणून कदाचित प्रियांकाला महाराष्ट्रात शिरकु दिले नसावे. पण याचा तोटा पक्षाला महाराष्ट्र आणि हरियाणा  राज्यात झाला. शरद पवारांनी निवडणुकी नंतर सांगितल्या प्रमाणे काँग्रेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः उत्स्फूर्तपणे  काम करून जागा जिंकून आणल्या. पण या जागेत आणखी भर टाकता आली असती.

दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी देखील आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. २४ लाख मते घेतल्यावर किमान १० आमदार निवडून आणता आले असते.  ते का करता आले नाही? असे ना झाल्याने ‘वंचित’ समाज घटकात निराशा होणे स्वाभाविक आहे.  या निराशेवर मात करून  जमलेली सामाजिक एकजूट अबाधित ठेवणे त्यांच्या समोरचे आव्हान असेल.

एवढे मात्र नक्की की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्या काही जागांवरील अपयशासाठी पूर्णतः  आंबेडकरांना जबाबदार धरण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत तो निराधार आहे.

काँग्रेस तर्फे आक्रमक प्रचाराचा अभाव, महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांची गळती आणि मनसे सोबत काही मतदारसंघात समझोत्याचा  अभाव यामुळे महाआघाडीच्या गाडीला ब्रेक लागलेला दिसतोय.

रविकिरण शिंदे, हे सामाजिक आणि राजकीय विषयावर स्तंभलेखन करतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0