भाजप मंत्री अश्विनी वैष्णव, प्रल्हाद पटेलही यादीमध्ये

भाजप मंत्री अश्विनी वैष्णव, प्रल्हाद पटेलही यादीमध्ये

संभाव्य पीगॅसस लक्ष्यांच्या यादीमध्ये विहिंपचे नेते प्रवीण तोगडिया, स्मृती इराणींचे माजी ओएसडी आणि वसुंधरा राजे सिंधिया यांचे माजी वैयक्तिक सचिव आहेत.

‘कॅग’चा राफेलवरील अहवाल – मोदी सरकारची कुठे सरशी नि कुठे हार?
दिशा नसलेले अस्ताव्यस्त अंदाजपत्रक
‘राफेल’ बाबत ‘पीएमओ’ कडून हस्तक्षेप

इस्रायलच्या ‘एनएसओ’ कंपनीच्या पीगॅसस स्पायवेयरद्वारे भारतातील ज्या ३०० लोकांवर नजर ठेवण्यात आली होती. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच त्यांच्या मंत्रीमंडळात नव्याने सामील केलेले माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, जलशक्ती किंवा जल राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्याही फोन नंबरचा समावेश होता.

राजस्थानमधील भाजपाच्या मुख्यमंत्री असताना वसुंधरा राजे सिंधिया यांचे खाजगी सचिव, स्मृती इराणी पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात आल्या, तेंव्हा २०१४-१५ मध्ये त्यांचे विशेष कर्तव्य (ओएसडी) अधिकारी म्हणून काम करणारे संजय काचरू यांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे.

भारतीय जनता पक्षाशी निगडीत अन्य कनिष्ठ राजकारणी तसेच विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि नरेंद्र मोदी यांचे विरोधक प्रवीण तोगडिया यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.

मध्य प्रदेशच्या दमोहचे खासदार असलेले प्रल्हाद सिंग पटेल यांना नुकतेच कॅबिनेट मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या नेतृत्वात जलशक्ती मंत्रालयात पर्यटन व संस्कृती मंत्रालयातून हलविण्यात आले. तेथे त्यांचा स्वतंत्र कार्यभार होता.

प्रशासकीय सेवेचे माजी अधिकारी आणि राज्यसभेचे खासदार वैष्णव यांना मंत्रिमंडळातील नव्या फेरबदलात तीन महत्वपूर्ण कॅबिनेट विभाग देण्यात आले. त्यांच्यावर २०१७ मध्ये संभाव्य पाळत ठेवण्याचे लक्ष्य म्हणून समावेश करण्यात आले होते. तेंव्हा त्यांनी भाजपाच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला नव्हता. त्यांच्या पत्नीच्या नावे असणाऱ्या फोन क्रमांकाचाही या नजर ठेवण्यासाठीच्या यादीत समावेश आहे.

फ्रान्सच्या ‘फॉरबीडन स्टोरीज’ या ना नफा तत्वावर चालणाऱ्या एका माध्यम संस्थेकडे आणि अॅमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेकडे एनएसओद्वारा पाळत ठेवल्या गेलेल्या फोन क्रमांकांचे रेकॉर्ड होते. ते रेकॉर्ड त्यांनी ‘पिगॅसस प्रोजेक्ट’ नावाच्या एका प्रकल्पासाठी ‘द वायर’सह जगभरातील अन्य १६ माध्यम संस्थांकडे सुपूर्द केले.

या यादीतून काढलेल्या फोनच्या क्रमांकांवर फॉरेन्सिक चाचण्या घेतल्या गेल्या. माध्यम संस्थांनी एकत्र काम करून त्यांच्या यादीतील लोकांची ओळख पटविली. ही प्रक्रिया पार पाडणार्‍या अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या सुरक्षा प्रयोगशाळेने पीगॅसस स्पायवेअर भारतातील उपकरणांमध्ये अस्तित्त्वात असल्याची पुष्टी केली.

गेल्या आठवड्यात, वैष्णव यांच्या मंत्रालयाने ‘पीगॅसस प्रोजेक्ट मीडिया कन्सोर्शियमला’ ​​औपचारिक प्रतिसाद दिला की कोणत्याही व्यक्तीची हेरगिरी केली गेलेली नाही.

रविवारी उघड झालेल्या यादीमध्ये वैष्णव यांचेही नाव असल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती, मात्र त्यावर अद्याप त्यांची कोणतीही प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद मिळालेला नाही.

यादीमध्ये नाव असले तरी जोपर्यंत संबंधित फोनवर फॉरेन्सिक चाचणी करता येत नाही, तोपर्यंत हे सांगणे अवघड आहे, की पटेल आणि वैष्णव यांच्या फोनमध्ये पीगॅसस स्पायवेअर टाकण्यात आला होता की नाही.

तथापि, आकडेवारीवरून असे दिसून आले आहे, की पटेल यांच्यावर लक्ष ठेवण्यामध्ये विशेष रुचि होती. यादीमध्ये केवळ ते आणि त्यांच्या पत्नीचा फोन नंबर तर आहेच, पण त्यांच्या जवळच्या १५ सहकार्यांचा समावेश आहे. यामध्ये त्यांचे खाजगी सचिव, दमोहमधील राजकीय व कार्यालयीन सहकारी यांच्यासह त्यांचा स्वयंपाकी आणि माळी यांचाही समावेश आहे.

सावधगिरी म्हणून ‘द वायर’ने या दोन मंत्र्यांकडे त्यांच्या फोनची फॉरेन्सिक तपासणी करण्याची विनंती केली नव्हती, कारण ते दोघेही केंद्रीय मंत्री आहेत. मात्र त्यांच्याशी संबंधीत १८ फोन क्रमांक लक्ष्य करण्यात आले होते.

२०१७ च्या उत्तरार्धात वैष्णव आणि त्यांच्या पत्नीच्या फोन क्रमांकांवर लक्ष ठेवण्यासाठी नोंद झाली आहे.

प्रल्हाद पटेल खास का?

पटेल यांचे भाजपमध्ये मोठे करिअर आहे. ओबीसी नेता म्हणून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात राजकीय जीवनाची सुरूवात केली आणि हळूहळू पुढे जात मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांच्या अधिपत्याखाली काम केले. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये कोळसा राज्य मंत्री म्हणूनही काम केले. २००४ मध्ये उमा भारती यांनी भाजपविरूद्ध बंडखोरी केली, तेव्हा पटेल यांनी देखील  त्यांना साथ दिली आणि पुन्हा ते २००९ मध्ये भाजपमध्ये परतले.

मध्य प्रदेशात, ते भाजपामध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर सर्वात मोठा अडथळा म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी स्वत:हून नेते म्हणून आपली कारकीर्द जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच, जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा स्वतंत्र पदभार काढून घेण्यात आला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या.

त्याच्या साथीदारांपैकी ज्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी संभाव्य लक्ष्य म्हणून निवडण्यात आले होते, त्यात त्यांचे खाजगी सचिव आलोक मोहन नायक, राजकुमार सिंग आणि आदित्य जाचक, त्यांचे माध्यम सल्लागार नितीन त्रिपाठी, दमोह प्रदेशातील त्यांचे निकटवर्तीय, त्यांचा कुक, माळी आणि दमोहच्या बम्हौरी गावचे सरपंच देवीदीन यांचा समावेश आहे.

‘द वायर’ने एक सविस्तर ईमेल पाठवून त्यांची प्रतिक्रिया मागितली आहे.

२०१९ च्या मध्यावर पटेल यांचा मुलगा प्रबल पटेल आणि त्याचा पुतण्या व नरसिंगपूरचे भाजपचे आमदार जालमसिंह पटेल यांचा मुलगा मोनू पटेल यांना एका खुनाच्या आरोपात अटक करण्यात आली होती. त्यानंतर पटेल यांचा फोन नंबर आणि त्याच्या साथीदारांवर पाळत ठेवण्यासाठी निवडण्यात आले होते.

आयआयटीची पदवी असलेले वैष्णव व्हार्टन पदवीधर आहे

१९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी अश्विनी वैष्णव हे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळातील फेरबदलाचे मुख्य वैशिष्ट्य होते. आयआयटी आणि व्हार्टन बिझिनेस स्कूलचे पदवीधर, कॉर्पोरेट क्षेत्राच्या अनुभवासह, तीन महत्त्वाच्या मंत्रालयाचे मंत्री म्हणून वैष्णव यांची निवड झाली. यापूर्वी त्यांनी वाजपेयींच्या अध्यक्षतेखाली पीएमओमध्ये उपसचिव म्हणून काम पाहिले होते.

जून २०१९ मध्ये राज्यसभेवर त्यांची निवड झाली. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या शेवटच्या मिनिटाला झालेल्या फोन कॉलमुळे बिजू जनता दलाने आपली आपला तिसरा उमेदवार मागे घेतल्याने वैष्णव यांची बिनविरोध निवड झाली. मोदी आणि शहा हे दोघेही वाजपेयींच्या कार्यालयात असतानाच त्यांना ओळखत असत आणि एका मोठ्या भूमिकेसाठी त्यांना निवडले गेले.

म्हणूनच, या पार्श्वभूमीवर आश्चर्य वाटू शकते की त्याचे क्रमांक आणि त्याची पत्नीचा फोन नंबरदेखील लीक झालेल्या रेकॉर्डमध्ये आढळतो. लीक झालेल्या आकडेवारीनुसार, त्याचे दोन फोन नंबर आणि एक जो पत्नी वापरत आहे, तो २०१७ च्या मध्यात संभाव्य लक्ष्य म्हणून निवडण्यात आला होता.

जेव्हा वैष्णव यांनी स्वतःच स्थापन केलेल्या कंपन्या ते चालवत होते. २०१० मध्ये आयएएसचा राजीनामा दिल्यानंतर त्यात्यांनी बिझिनेस स्कूलमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण केले आणि २०१२ पर्यंत जीई आणि सीमेंन्समध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले. त्यानंतर दिनेश कुमार मित्तल यांच्यासह त्यांनी थ्री टी ऑटो लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि वी जी ऑटो ऑटो कंपोनंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या स्थापन केल्या. त्याचे ते प्रमुख होते. थ्री टी मोदींच्या गुजरातमधून चालत होती तर दुसरी हरियाणाच्या फरीदाबादमध्ये होती.

२०१७ मध्ये त्यांनी थ्री टी ऑटो लॉजिस्टिक्सचे संचालक पद सोडले पण अजून ते भागधारक आहेत त्यामध्ये त्यांची पत्नी संचालक म्हणून काम करत आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार व्हायब्रंट गुजरात समिटच्या २०१७ च्या परिषदेत त्यांच्या कंपनीने हल्लोल आणि पंचमहाल जिल्ह्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता.

त्याच वर्षी त्यांची ओडिशा येथील तमिळ वंशाचे उद्योगपती बी. प्रभाकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या थ्रीवेणी पॅलेट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मंडळावर संचालक म्हणून वर्णी लागली. २०१४ च्या एम.बी. शाह कमिशनमध्ये ओडिशामधील मोठ्या प्रमाणावर खाण घोटाळ्यातील लाभार्थी म्हणून प्रभाकरन यांचे नाव घेतल्याने त्यांची निवड वादग्रस्त ठरली. कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाच्या नोंदीनुसार वैष्णव यांना नऊ कंपन्यांमध्ये संचालक म्हणून नेमण्यात आले आहे.

‘द वायर’ने वैष्णव यांना ईमेल पाठवला असून त्यांची प्रतिक्रिया मागितली आहे.

इराणीची वादग्रस्त नियुक्ती लक्षात आली?

या दोन केंद्रीय मंत्र्यांव्यतिरिक्त संजय कचरू, त्यांचे वडील आणि त्याचा मुलगा यांचा फोन नंबरदेखील या यादीमध्ये दिसून आला आहे. २०१४ मध्ये तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांची विशेष अधिकारी (ओएसडी) म्हणून निवड केली होती. परंतु त्यांची औपचारिक नियुक्ती कधीच झालेली नाही. त्यांचे फोन नंबर २०१८ मध्ये बऱ्याच काळासाठी रेकॉर्डमध्ये दिसून येत आहेत.

इराणीच्या मंत्रालयात ओएसडी म्हणून काचरू यांच्या अंतरिम नेमणुकीची तपासणी पंतप्रधानांनी केली होती. नियुक्त्यांमधील त्यांची विवादास्पद भूमिका सोशल मीडियावर चव्हाट्यावर आली. अन्य मंत्र्यांच्या ओएसडीप्रमाणे त्यांची नियुक्ती मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) मान्य केली नव्हती. याचा परिणाम असा झाला की, त्यांना कधीही मंत्रालयात जागा मिळू शकली नाही. इकॉनॉमिक टाइम्सने अशी माहिती दिली होती की जेव्हा “इंटेलिजेंस ब्युरोने त्यांच्यासंदर्भात अहवाल सादर केला” तेव्हा काचरू यांच्या नियुक्तीबाबत वादळ निर्माण झाले. त्यानंतर भाजपा सूत्रांनी माध्यमांना सांगितले होते, की इराणी यांना २०१६ मध्ये हलक्या अशा वस्त्रोद्योग मंत्रालयात हलविले जाण्याचे एक कारण म्हणजे सल्लामसलत न करता एकतर्फी निर्णय घेणे ही त्यांकहा स्वभाव होता.

काचरू यांच्या नियुक्तीने संघ नाराज असल्याचेही बोलले जात होते. तरीही, काचरू हे इराणी यांच्या जवळच्या वर्तुळातील अविभाज्य भाग मानले जातात.

संघाचा भंग?

संघ परिवाराशी संबंधित असलेल्या लोकांचे अनेक फोन नंबर रेकॉर्डमध्ये आढळतात. यामध्ये विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांचा समावेश आहे. पंतप्रधानांचे विरोधक असणारे तोगडिया यांचा फोन नंबर २०१८ मध्ये पाळत ठेवण्याचे संभाव्य लक्ष्य होते.

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांचे खाजगी सचिव प्रदीप अवस्थी यांच्या दूरध्वनी क्रमांक डिसेंबर २०१८ मध्ये होणारया विधानसभा निवडणूकीच्या पूर्वी, लक्ष्य करण्यात आले होते.  सिंधिया आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व यांच्यातील मतभेद उघड आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत, केंद्रीय नेतृत्त्वासही त्यांचा झालेला कलह पुढे आला होता.

भाजपामध्ये राज्यात फुट होती. सिंधिया सरकारविरूद्ध असंतोष होता. त्यांच्या प्रचारात भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांची मदत क्वचितच झाली आणि त्यांची सत्ता गेली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: