मुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये

मुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये

कोलकाताः सुमारे ३ वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेलेले मुकुल रॉय यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला. प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसलेल्या मोठ्या झटक्यानंतर मुकुल रॉय यांचा तृणमूल प्रवेश भाजपच्या केंद्रीय नेत्यांना धक्का समजला जातो. बंगालमध्ये भाजपच्या दारुण पराभवानंतर आपला तृणमूल प्रवेश व्हावा म्हणून मुकुल रॉय प्रयत्नशील होते. त्यांच्या तृणमूलमधील अनेक नेत्यांशी पडद्याआड चर्चा सुरू होत्या. त्यांनी स्वतःला भाजपपासून दूरही ठेवले होते.

अखेर शुक्रवारी दुपारी ३ वाजता मुकुल रॉय यांनी शहरातील तृणमूल भवनात प्रवेश केला. त्यांच्यानंतर पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी हेही पोहचले. या अगोदर तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी भवनात आल्या होत्या. त्यांची व मुकुल रॉय यांची प्रदीर्घ बैठक झाली. त्यानंतर मुकुल रॉय यांनी आपण भाजप सोडून तृणमूलमध्ये आलो आहोत. आता बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत भाजप येथे राहणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.

ममता बॅनर्जी यांनीही मुकुल रॉय यांचे पक्षात स्वागत करत त्यांना पक्षात महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात येईल, अशी घोषणा केली. भाजपने रॉय यांना अनेक धमक्या दिल्या, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असेही त्या म्हणाल्या. रॉय यांनी भाजपच्या प्रचारात सहभाग घेतला होता पण त्यांनी तृणमूलच्या विरोधात बोलणे टाळले. त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव वाढत होता, त्यामुळे ते भाजपमध्ये गेले, असाही आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

ममता व रॉय या दोघांनी आपल्यामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचा दावा केला.

मुकुल रॉय यांनी तृणमूल भवनातील आपल्या जुन्या कार्यालयालाही भेट दिली. तेथील कर्मचार्यांशी, कार्यकर्त्यांशी संवादही साधला.

मुकुल रॉय यांच्याबरोबर त्यांचे सुपुत्र शुभ्रांशु हेही तृणमूलमध्ये सामील झाले आहेत.

मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमधील दुसर्या क्रमांकांचे नेते होते. पण नारद आर्थिक घोटाळ्यात अडकल्याने त्यांना पक्षाकडून राष्ट्रीय महासचिव पदावरून हटवण्यात आले होते. त्या नंतर नोव्हेंबर २०१७मध्ये त्यांनी तृणमूलमधून भाजपमध्ये उडी घेतली होती.

रॉय यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बंगालमध्ये यश मिळवले होते.

मूळ बातमी

COMMENTS