गैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी

गैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी

रावसाहेब कसबे यांच्या बहुतांश ग्रंथ निर्मितीची प्रेरणा पुरोगामी सामाजिक चळवळी ज्या आंतर्विरोधी लयींनी पोखरल्या गेल्या त्या आहेत, त्यांना सांधू शकण्याच्या ज्या शक्यता आहेत त्या समाजासमोर ठेवणे या असल्याचे ठळकपणे जाणवत राहाते.

महावितरणची सुरक्षा ठेव ६ मासिक हप्त्यांत भरता येणार
कर्नाटक : मुस्लिम मांस विक्रेत्यावर हिंदुत्ववादी संघटनांकडून हल्ला
धार्मिक सलोखा म्हणून मंदिरात नमाजः २ मुस्लिमांवर गुन्हा

गेल्या तिसेक वर्षांत मंडल-कमंडलच्या निमित्ताने भारतीय समाजात धृवीकरणाच्या प्रक्रियेने मोठा वेग घेतला आहे. भारतीय सामाजिक जीवनाला धार्मिक कट्टरतेच्या लेपणाने साऱ्या समाजाचे जगणे एकरंगी करण्याचे मोठ्या निकराचे जे प्रयत्न गेले शतकभर चाललेले होते,  त्याला अलिकडे एक मुजोर निर्ढावलेपण प्राप्त झाले आहे. आपल्या संविधानाने पुरस्कारलेली व भारतीय जनमानसाने शिरोधार्य मानलेली भारतीय धर्मनिरपेक्ष व्यवस्था उखडून टाकू इच्छिणाऱ्या शक्तींना शिरजोर करण्याचा अत्यंत नियोजनबद्ध प्रयत्न लोकशाही व्यवस्थेतील बहुमत नावाच्या झुंडशाहीच्या आधारावर सुरू आहे. ही बाब साऱ्या भारतीयांसाठी मोठी वेदनादायी आहे.

आपल्या अनेक महापुरुषांनी येथील सामाजिक जीवनाला लागलेला बुरशीगत बिभत्सपणा काढून टाकण्याचे निकराचे प्रयत्न केलेत. स्वातंत्र्य,समता, बंधुता, न्याय या सर्वांग सुंदर  तत्त्वावर या देशाचा स्वातंत्र्योत्तर पाया मजबूत करण्यासाठी ही सारी मंडळी धडपडली.  समाजाला विवेकी आणि विज्ञानोन्मुख करण्यासाठी केल्या गेलेल्या यांच्या कार्याने विसाव्या शतकाचा सारा पूर्वार्ध व्यापला आहे. अशा या महापुरूषांचे कर्तृत्व नाकारण्याचा, त्यांना या देशाचे खलपुरूष ठरविण्याचा उद्योग पद्धतशीरपणे फार झपाट्याने आपल्याकडे गेल्या काही दिवसांपासून चाललेला आहे. गांधी, नेहरू, आंबेडकर आणि या देशातील कार्यरत डावी विचारसरणी येथील सनातनी विचारधारेच्या ब्लॅकलिस्टमध्ये शतकभरापासूनच आहे. भारतीय सामाजिक व्यवस्थेला निरोगी व सुदृढ करू इच्छिणाऱ्या महापुरूषांबद्दलचा विद्वेष समाजात सतत पसरवत राहाणे आणि आपल्या सनातनी, रूढीग्रस्त विचारसरणीचा प्रसार करणे ह्या मानसिकतेचे संस्कार अंगी बाळगलेली मंडळी आज देशात सर्वोच्च सत्तास्थानावर विराजमान आहेत. त्यामुळे स्वाभाविकच धर्मांधतेविरूद्ध धर्मनिरपेक्षता हा सामना कधी नव्हे इतका आता ऐरणीवर आला आहे.

महाराष्ट्राला आपल्या देशातील पुरोगामी विचार आणि चळवळींचा प्रबळ आधार समजला जातो. फुले-शाहू-आंबेडकरांच्या वैचारिक सिंचनाने डवरलेला हा प्रांत. त्यामुळे इथले तात्त्विक  आवेश मोठे आणि तेवढेच आक्रमकही. इथे सामाजिक चळवळीतील हेव्यादाव्यांना इतिहासाची व्यापक पार्श्वभूमी जुळली आहे. त्यामुळे आपल्याकडील प्रागतिक चळवळींनी एकीपेक्षा बेकीचेच गडदस्वरूप घारण केलेले आहे. तात्पर्य येथील सामाजिक आंदोलने वर्तमान स्थितीत दिशाहीन अवस्थेत गटांगळ्या खाताना दिसून येत आहेत.

आज देशात धर्मांधतेचा उन्माद सर्वत्र पसरलेला आहे. अशा वेळी देशाची संविधानात्मक चौकट टिकून राहावी असे ज्या मंडळींना मनापासून वाटते, त्या मंडळींनी आपला वर्तमान आणि भविष्यकाळ सुरक्षित करण्यासाठी व सामाजिक एकोपा दृढ करण्याच्या दृष्टीने या देशात चाललेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रयत्नांना सकारात्मक हुंकार देणे अत्यावश्यक झाले आहे. स्वत:ला पुरोगामी समजणाऱ्या भारतातील सर्व समूह, चळवळींसाठी एकमेकांचे हात हातात घट्ट पकडणे आत्यंतिक गरजेचे झाले आहे. या दृष्टिकोनातूनच रावसाहेब कसबे यांच्या ‘गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’, या बृहदग्रंथाकडे पाहावे लागते. हा ग्रंथ वाचतांना, आपले वर्तमान सामाजिक पर्यावरण विद्वेषाच्या ज्या ढिगाऱ्यावर उभे आहे त्याला ठिसूळ करण्यासाठी प्रगतिशील चळवळीतील हेव्यादाव्यांना पातळ करू शकेल असा ऑथेंटिक दस्तऐवज उपलब्ध करून देणे हीच लेखकाची ग्रंथनिर्मिती मागील प्रेरणा आणि तळमळ असल्याचे जागोजागी जाणवते. आठशेपेक्षा अधिक पृष्ठसंख्येच्या या ग्रंथराजाने मोहनदास करमचंद गांधी

रावसाहेब कसबे

रावसाहेब कसबे

ते महात्मा गांधी पर्यंतचा प्रवास एकूणतीन विभाग आणि नऊ प्रकरणांत विभाजित केला आहे. यात त्यांनी लिहिलेली एक्केचाळीस पानांची प्रदीर्घ प्रस्तावना ग्रंथांच्या अंतरंगात प्रवेश करण्यापूर्वी दीशादर्शकाचे मोठे काम करते. ते प्रस्तावनेत सुरुवातीलाच लिहितात, ‘मोहनदास करमचंद गांधी हा महात्मा आध्यात्मिक होता. म्हणून स्वत:ला जडवादी, विवेकनिष्ठ, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष समजणारे गांधींकडे तुच्छतेने पाहतात. त्यांपैकी काहींचा गांधी हा टवाळीचा विषय असतो.’ गांधींच्या व्यक्तिमत्त्वाला व्यापून असणाऱ्या अध्यात्मिक अंगाचे मानसशास्त्रीय दृष्टीने परिशिलन न करता, त्यांच्यातील केवळ राजकीय अंगाचाच विचार केल्याने, त्यांच्या एकूण कार्य आणि त्यासाठी त्यांनी अवलंबलेले मार्ग यांचे आकलन करतांना, बहुतेकांचा तोल ढळत जातो हे सत्य आहे. हे संतुलन प्राप्त करण्याच्या दृष्टीने रावसाहेब कसबे यांचा हा ग्रंथमहत्वपूर्ण ठरणारा आहे.

या ग्रंथाचा पहिला भाग ‘सत्यशोधक राजकारणी’ हा  दोनशेहून अधिक पृष्ठांचा विभाग तीन प्रकरणांत विभाजित केला आहे. ‘गांधीपूर्व भारत: ऐतिहासिक पार्श्वभूमी‘ या पहिल्या प्रकरणामध्ये भारताचा प्राचीन ते मध्ययुगीन कालखंड आणि तत्कालीन समाजातील भेदाभेदांवर उभ्या असलेल्या सामाजिक व्यवस्थेचे सूक्ष्म ताणेबाणे उलगडून दाखविण्यात आले आहेत. राष्ट्रसभेच्या उदयानंतर(स. १८८५) अल्पावधीतच या संघटनेस ‘उच्चवर्णीयांचे हितसंबंध जोपासणारी संधटना‘(क्लब) असे स्वरूप प्राप्त झाले होते. खरे तर त्याअगोदर १८७०-८० च्या दशकात ‘भारतात सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय स्वराज्य अर्थहीन असल्या’चे प्रतिपादन न्या.रानडेकरीत होते. ज्याकडे बहुतांश दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती दिसून येते. एकीकडे भारतात ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळींनी जोर पकडलेला असतांना येथील राजकारण उच्चवर्णीय वर्चस्वाने लिबलिबीत झाले होते. अशा या वेळी तिकडे दक्षिण आफ्रिकेत सामान्य भारतीयांच्या मनात स्वत्वाची जाणीव जागृत करून देऊन, त्यांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास सिद्ध करणारे मोहनदास करमचंद गांधी जानेवारी १९१५ मध्ये भारतात दाखल झाले.

‘सफाई कामगार ते संत‘ या पहिल्या विभातील दुसऱ्या प्रकरणात रावसाहेबांनी म. गांधीचा संतत्वाचा प्रवास अधोरेखित केला आहे. वयाच्या चाळीसाव्या वर्षांपर्यंत फारसे दखल घेण्यासारखे काही न घडलेल्या एम. के. गांधी यांच्या आयुष्याला पुढील काळात जी विलक्षण कलाटणी प्राप्त झाली त्याचे तपशीलवार वर्णन यात आले आहे.  म. गांधी यांनी त्यांच्या आयुष्यात तीनच स्वतंत्र पुस्तके लिहिली आहेत. हिंद स्वराज्य (१९०९), माझे सत्याचे प्रयोग: आत्मकथा(१९१५), सत्याग्रह इन साऊथ आफ्रिका (१९२८) या केवळ तीन पुस्तकांच्या आधारे गांधी समजून घेणे अशक्यप्राय आहे. ‘हिंद स्वराज्य‘ या पुस्तिकेत म. गांधी यांनी ‘आधुनिक संस्कृतीला पूर्णपणे नाकारून ती कशी आणि का वर्ज्य आहे, हे तपशीलवार सांगण्याचा प्रयत्न केला‘,  असा सारांश रावसाहेब कसबे म. गांधींच्या ‘हिंदस्वराज्य‘चा काढतात.

पूर्वी राष्ट्रप्रेम व्यक्त करणे ही केवळ उच्च जाती आणि वर्गाची मक्तेदारी होती. या मक्तेदारीला मोडून काढण्याचे कार्य म. गांधी यांनी केले. त्यांच्यावर लिओ टॉलस्टॉय, जॅान रस्कीन, येशू, बुद्ध, भगवतगीता यांचा प्रभाव होता याचे विश्लेषण लेखकाने मोठे चिकित्सकपणे केले आहे. ‘गीतेचा मुख्य विषयच खाजगी मालमत्तेसाठी युद्ध करायचे की नाही‘ हा असल्याचे अधोरेखित करून लेखकाने ‘भगवतगीते‘ची मार्क्सवादी दृष्टिकोनातून केलेली मांडणी फारच मूलगामी आहे. रावसाहेबांनी आपल्या एकूणच मांडणीमध्ये अत्यंत विवेकशील,तर्ककठोर चिकित्सा पद्धतीचा अवलंब केल्याने, प्रसंगोपात आलेल्या विविध विषयांच्या चर्चेला सखोलता प्राप्त होत गेली आहे.

पहिल्या विभागाच्या तिसऱ्या म्हणजेच ‘शेतकरी -कामगार नेते ते महात्मा‘ या प्रकरणात म. गांधीं द. आफ्रिकेतून भारतात परत आल्यानंतर न्या. गो. कृ. गोखल्यांनी ‘डोळे उघडे ठेवून तोंड बंद ठेवण्याची‘ अट घालून भारतभर प्रवास करण्याची सूचना गांधींना केली. या भटकंतीत भारताचे वैविध्य आणि वैचित्र्यही गांधींच्या लक्षात आले. नॅशनल काँग्रेसची(राष्ट्र सभा)स्थापना होऊन तीस वर्षांचा काळ लोटला होता. एकापेक्षा एक दिग्गज नेते या काळात राष्ट्रीय स्तरावर कार्यरत होते. दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली कार्य करून स्वत:ला फरफटत नेणे  म. गांधींच्या स्वभावातच नव्हते. आतापर्यंत, ‘या देशातील उच्चवर्णीय मध्यमवर्गीयांच्या हितसंरक्षणार्थ लढणारी संघटना’, अशीच राष्ट्रभेची प्रतिमा तयार झाली होती. अशा या पार्श्वभूमीवर देशात प्रचंड संख्या असलेल्या शेतकऱ्यांच्या दु:खाला कोणी वाली नाही, हे गांधींच्या लक्षात यायला फार वेळ लागला नाही. या आधारे नेतृत्वावर पकड मिळविण्याची शक्यता राजकारणी गांधीनी हेरली. यातूनच चंपारण्य, खेडचा सत्याग्रहाचे आंदोलन हातात घेऊन शेतकरी प्रश्नाकडे आणि आपल्या सामर्थ्याकडेही सरकार आणि लोकांचे लक्ष वेधून घेण्यात म.गांधी यशस्वी झाले.

त्याचवेळी अहमदाबादमध्ये कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी सत्याग्रह केला. हा सत्याग्रह करतांना भांडवलदार वर्गही दुखावला जाणार नाही, याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली. खरे तर त्या अगोदर म.ज्योतिराव फुल्यांचे सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्ते नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांना संघटित करून कामगार आंदोलने केली होती. त्यांची कामगार चळवळ केवळ पगारवाढ एवढ्या पुरतीच मर्यादित नव्हती तर, कामगार चळवळीच्या माध्यमातून जातीअंत आणि वर्गअंताचा लढाही ते लढत होते. म.गांधी सुद्धा आपल्या कोणत्याही आंदोलनाला सत्याग्रह, अहिंसा, अस्पृश्योद्धार असा आध्यात्मिक आणि सामाजिक आयाम देण्याचा सतत प्रयत्न करीत होते. त्यामुळे राष्ट्रीय सभेच्या तोपर्यंतच्या कार्यपद्धती आणि विषयपत्रिकेलाच  म. गांघी यांनी एकप्रकारे आव्हान उभे केले. पुढील काळात म. गांधींचे लोकांच्या मनावर जे गारूड निर्माण झाले त्यामुळे पुढील काळात राष्ट्रीय सभेतील नेत्यांना पटो न पटो म. गांधी यांच्या मागे फरफटत जाण्याशिवाय प्रत्यवायच राहिला नाही.

या बृहदग्रंथाबद्ल संपूर्ण महाराष्ट्राला आणि एकूण समग्र परिवर्तनवादी चळवळींला जे विलक्षण कुतुहल आहे ते ‘गांधी- आंबेडकर‘ या विषयावर रावसाहेब कसबे काय आकलन मांडतात याचे. ही मांडणी रावसाहेब कसबे यांनी जवळपास तीनशे पानांत ‘गांधी आणि आंबेडकर‘ या विभागात केली आहे. अंतर्विरोधाच्या भोवताऱ्यात ‘महात्मा‘, डॉ. आंबेडकरांची राजकीय भूमिका आणि आंबेडकरांशी केलेल्या संघर्षातून गांधींमध्ये आरपार बदल,  अशा तीन प्रकरणांत हा दुसरा विभाग विभाजित झाला आहे. टिळकांच्या निधनानंतर भारताच्या राजकीय पटलावर गांधी नावाचा तारा लखलखायला लागला होता. सन १९२३ मध्ये डॅा. बाबासाहेब आंबेडकर अमेरिका, ब्रिटनमधून आपला शिक्षणासाठीचा संघर्ष आटोपून भारतात परतले होते. अल्पावधीतच त्यांनी येथील दलित, शोषित आणि वंचित वर्गाला आपल्यावरील हजारो वर्षांचे गुलामगिरीचे जोखड झुगारून देण्यासाठी प्रत्यक्ष सामाजिक रणसंग्रामात उभे केले. डॉ. आंबेडकर गांधींपेक्षा एकेवीस वर्षांनी लहान होते. पण त्यांचा व्यासंग आणि कोणत्याही समस्येकडे पाहताना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, ऐतिहासिक परिप्रेक्षात विचार करण्याची त्यांची पद्धत, यामुळे भारतीय समाजकारण आणि हळूहळू राजकारणातही बाबासाहेबांचा दबदबा निर्माण व्हायला लागला. तर तिकडे हिंदू- मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यता निवारण आणि खादीचा प्रसार झाल्याशिवाय भारताला स्वातंत्र्य मिळणे अशक्य आहे, या मतापर्यंत म. गांधी येवून ठेपले होते. खादी वगळता डॅा. आंबेडकरांनाही म. गांधींचे हे मत स्वीकार्ह्य होते. संपूर्ण देशभर आता अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या आक्रमक नेतृत्त्वामुळे ऐरणीवर आलेला असतांनाच म. गांधी यांनीही आपल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नास स्वीकारले. एकीकडे स्वत:ला सनातनी हिंदू असल्याचा कंठरव करणारे गांधी, दुसरीकडे अस्पृष्यता निवारणाच्या कार्याला जे प्राधान्य देतात, याचा अर्थ हे व्यक्तिमत्व हिंदूमधील आपली स्वीकारार्ह्यता मजबूत ठेवून घर्म सुधारणांच्या कार्याला पुढे नेऊ इच्छित होते, हे सिद्ध आहे. म. गांधींच्या अनेक कृतींमागे असे छुपे व्यूह दडलेले असायचे.

रावसाहेब कसबे यांनी ‘पुणे कराराचे‘ प्रकरण विस्तृतपणे मांडले आहे. गोलमेज परिषदांत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करणे, म. गांधीनी त्याला विरोध करणे, रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केल्यानंतर म. गांधींनी प्राणांतिक उपोषणास बसणे, या उपोषणाच्या परिणामस्वरूपात देशभरात दलितांसाठी मंदिर मोकळे करण्याची मोहीम चालणे, सहभोजनाच्या आयोजनांचा देशाच्या विविध भागांत धूमघडाका सुरु होणे व पुढे राखीव मतदारसंघावर एकमत होऊन म. गांधी आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात  पुणे करार घडून येणे, हा सारा घटनाक्रम म्हणजे म. गांधी यांच्या पूर्वनियोजित व्यापकव्यू हनीतीचा भाग होता, हा इतिहासाचा अंधारा कोपरा रावसाहेब कसबे अनेक ठोस पुरावे देऊन प्रकाशमान करण्याचा प्रयत्न करतात. आंबेडकरी समुदायात ‘पुणे करार‘ या विषयावर म. गांधी यांच्या विषयी अजुनही जी तीव्र नाराजी आहे, त्या करारासमयीच्या एकूण एक घडामोडी पाठीमागील बारकावे पाहिल्यास संशयाचे अभ्र निवळणयास बरीच मदत होऊ शकते. यावर या अंगाने आपल्या संशोधनाचा काटा वळविता येवून अधिक व्यापक मांडणी केली जाऊ शकते.  त्याचप्रमाणे डॅा.बाबासाहेब आंबेडकरांना घटना परिषदेत निवडून आणण्यासाठी पडद्यामागे ज्या घडामोडी घडून आल्या आणि त्यापाठीमागील मुख्य सूत्रधार म्हणून म. गांधी यांनी पार पाडलेली भूमिका मुळातूनच समजून घेणे अत्यावश्यक आहे. डॉ. आंबेडकरांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे, यासंदर्भात म. गांधी यांनी कांग्रेसला  दिलेला सल्ला हा त्यांनी कांग्रेसला दिलेला शेवटचा राजकीय सल्ला असल्याची नोंद लेखक करतात. गांधी- आंबेडकर संबंधांबाबत आंबेडकरी समुदायात जे अनेक समज पसरलेले (खरे तर जाणीवपूर्वक पसरवलेले) आहेत त्यावरील धूळ झटकून या संबंधांकडे निरभ्र मनाने पाहण्यास रावसाहेबांचे हे संशोधन सहाय्यकारी ठरते.

गांधी-आंबेडकर संबंधाचा विचार करतांना हे दोघेही जसे तळमळीचे समकालीन सुधारक होते तसेच विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील अर्धा काळ ते भारतीय राजकारणाच्या पटलावरील एकमेकांच्या विरोधात कट्टर स्पर्धक म्हणून उभे राहिलेली इतिहासाची अपरिहार्य पात्र होती हेही ध्यानात घ्यावे लागते. हाच प्रकार तत्कालीन भारतातील डाव्या आंदोलनाबाबतही झाला आहे. गांधी, आंबेडकर या दोघांच्या वैचारिक भूमिकांत बरेच मतभेद होते हे खरे असले तरी ते दोघेही एकमेकांचे शत्रू असण्यापेक्षा एकमेकांबद्दल आदर बाळगून असणारे महापुरुष होते, हे समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या काळात गांधी असो वा डावे यासंदर्भात डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मांडणी राजकारणातील अपरिहार्य डावपेच आणि तात्विक मतभेद म्हणून त्याकडे पाहिल्यास बरेचसे मळभ दूर झाल्याशिवाय राहणार नाही. ते होणे ही आजची अवघ्या पुरोगामी चळवळींची गरज आहे. म्हणूनच अनेक गैरसमजांच्या भोवऱ्यात भिरभिरणाऱ्या प्रगतिशील चळवळीतल्या समग्र कार्यकर्त्यांनी आपल्या उशाशी जपावा असा हा ग्रंथ आहे.

या ग्रंथाचा तिसरा आणि शेवटच्या जवळपास दोनशे पस्तीस पानांच्या विभागाचे काव्यात्म शीर्षक आहे, ‘रक्तज्वाळात अंतहीनप्रवास‘.  हा विभाग, ‘स्त्रियांच्या सहवासात, अखंड वेदनादायी स्वातंत्र्य आणि वन मॅन आर्मी‘,  या तीन प्रकरणांत विभागलेला आहे. रावसाहेब कसबे यांनी, म. गांधींबद्दलचे महत्त्वाचे चिंतन यात मांडले आहे. म. गांधी यांनी स. १९०६ साली ब्रम्हचर्याचा निश्चय केला. गांधींचे पुढील सारे आयुष्य आंतर्बाह्य संघर्षात व्यतीत झाले. आतून ते कामवासनेशी सतत संघर्ष करीत होते, तर बाहेरून अस्पृश्यतेच्या रूढीविरूद्ध संघर्ष करीत राहिले. गांधींमधील हा ‘आतला‘ आणि ‘बाहेर‘चा संघर्ष नीट समजून घेतल्याशिवाय गांधींना सम्यक दृष्टीने समजून धेणे अवघड आहे. महात्माजींच्या एकूण संपूर्ण व्यक्तिमत्वाला हा ‘आतला’ ‘बाहेरचा’ संघर्ष कायम लपेटून होता. रावसाहेबांनी या दोनही प्रकारच्या संघर्षाला महत्त्वाचे मानून गांधींच्या एकूणच वर्तनातील अन्योन्य संबंधांची चिकित्सा करण्याचा प्रयास केला आहे. अशा पद्धतीची मांडणी केले गेलेले आपल्याकडचे हे अपवादात्मक लेखन असावे. म.गांधींकडे केवळ एक ‘महात्मा‘ म्हणून न पाहता, तेही हाडामांसाचे पुरूष होते, ही बाब ध्यानात घेतली की, गांधींना समजून घेतांना त्यातून येणाऱ्या निष्कर्षांमुळे आपल्याला फार धक्का बसण्याचे कारणच उरत नाही. म. गांधी सुरूवातीला स्त्रियांसंदर्भात फार पारंपरिक विचार बाळगून असले तरी पुढील काळातया विचारांत बरेच बदल होते गेले. स्त्रियांच्या संदर्भात त्यांच्या विचारांना मानवियतेचा स्पर्श झालेला आहे. या  भागात रावसाहेबांनी महात्मा गांधींची स्त्री वर्गाकडे पारंपारिक पद्धतीने पाहण्याची अनेक उदाहरणे यात दिली आहेत. पुढे त्यांच्यात होत गेलेल्या बदलांचेही दाखले दिले आहेत. २३ फेब्रुवारी १९१६ ला ‘विमेन्स युनिव्हर्सिटी’मध्ये दिलेल्या भाषणात म. गांधी यांनी ‘मनुस्मृती आणि तुलसीदासांचा स्त्रियांचा अपमान करणारा दोहा नाकारला आणि असा भाग धर्मग्रंथातून काढून टाकण्याचा मागणी केली‘.

महात्माजींच्या जीवनात आलेल्या, त्यांच्यावर लुब्ध झालेल्या स्त्रियांची चर्चाही या प्रकरणात लेखकाने केली आहे. म. गांधी ज्या स्त्रीवर पहिल्यांदा मोहित झाले ती स्त्री म्हणजे रवींद्रनाथ टागोरांची भाची सरलादेवी चौधरी या होत. या सरलादेवी कोणी सामान्य स्त्री नव्हत्या तर त्या असामान्य व्यक्तिमत्वाच्या धनी होत्या. म.गांधी यांनी सरलादेवींकडे ‘आध्यात्मिक विवाहा‘चा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी ‘गांधींचे मन हे हिंदू मन नसून ख्रिस्ती किंवा बौद्ध मन आहे‘, असे सांगून त्या मोकळ्या झाल्या. सरलादेवींबद्दल महात्माजींच्या मनात शेवटपर्यंत (सरलादेवी मृत्यू स. १९४५)एक हळवा कोपरा सतत राहिला आहे. या व्यतिरिक्त म. गांधींचा देशविदेशातील अनेक स्त्रियांवरही प्रभाव पडला. काही त्यांच्या प्रेमातही पडल्या. त्यापैकी काहींनी त्यांचे शिष्यत्व पत्करून म.गांधींच्या कार्यास स्वतः:ला वाहून घेतले.

याच प्रकरणात लेखकाने म.गांधीच्या ब्रम्हचर्याच्या प्रयोगाची अत्यंत व्यासंगी चिकित्सा मांडली आहे. या चिकित्सेला त्यांनी ओशोंचा आधार घेतला असून, ओशोंनी गांधींजींच्या ब्रम्हचर्य प्रयोगाचे महत्त्व नेमकेपणाने अधोरेखित केले आहे. ते आपल्या प्रयोगातपूर्ण यशस्वी झाल्याने त्यांच्यातील अहिंसा अधिक शक्तिशाली झाली आणि पुढील काळात हा उर्जावान महापुरुष भारत-पाक फाळणीनंतर उसळलेल्या हिंदू-मुस्लीम दंग्यात मध्यभागी उभे राहण्याचे धाडस करू शकला. सिग्मंड फ्राइड यांच्या कामविचारावरील मांडणी, स्त्री-पुरूष संबंधांविषयी मार्क्सचे विवेचन, ओशो, जे. कृष्णमुर्ती यांच्या संदर्भांमुळे म. गांधी यांच्या ब्रम्हचर्य प्रयोगाची ज्या कुत्सितपणे अवहेलनेचा विषय म्हणून पाहिल्या जाते त्याकडे लेखक गंभीरपणे आपले लक्ष वेधतात.

भारताचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीयांच्या मनावर एक न बुजणारी फाळणीची भळभळणारी जखम देऊन गेली. भारताची फाळणी कोणी केली? गांधींच्या कांग्रेसने? महंमद अली जिना यांनी? नेहरू-पटेलांनी? की आणखी कोणी? लेखक याचे उत्तर देतात ‘भारताच्या इतिहासाने!’ मुस्लिम लीगच्या स्थापनेने भारतीय राजकारणात प्रत्यक्ष धर्माचा प्रवेश झाला. या पुढील काळात धार्मिक आधाराव रभारतीय समाजाचे धृवीकरण करणाऱ्या इतरही अनेक शक्ती देशात उदयास आल्या. धर्मांधता वाढविणाऱ्या या शक्तींचा धुमाकूळ पुढील चाळीस वर्षे भारतात सुरू राहिला. ब्रिटिश सरकारच्या ‘फोडा झोडा‘ नीतीला नी आपल्या मूर्खपणाच्या सिंचनाला आलेली ही रसरशीत विषारी फळे होती. भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे ‘अखंड वेदनादायी स्वातंत्र्य’ कसे ठरले? याचा विस्तृत आढावा लेखकाने घेतला आहे. शेवटच्या कालखंडात गांधींना ना कोणी ऐकत होते ना प्रत्येक घडामोडित त्यांचा कोणी सल्ला घेत होते. कांग्रेस त्यांचे तेवढेच ऐकत होती, जे कांग्रेसींच्या हिताचे होते. या दृष्टीने कांग्रेस- मुस्लिम लीग आणि म. गांधी यांच्या एकूण वर्तनाचे आकलन करून घ्यावे लागते. स्वातंत्र्याच्या वाटाघाटीत ३१ मार्च १९४७ ला म. गांधी व लॅार्ड माऊंटबॅटन यांच्यात घडून आलेल्या भेटीत म. गांधीं लॅार्ड माऊंटबॅटन यांना, ‘भारतातील अराजकसदृष्य परिस्थितीला नियंत्रणात ठेवण्यासाठी, ‘जीनांना त्यांना आवडेल असे सरकार स्थापन करण्यासाठी बोलवावे‘ हा आणि या संदर्भात दिलेले काही सल्ले मोठे आकर्षक वाटले तरी  र्लॅार्ड माऊंटबॅटन यांच्या कार्यालयीन अधिकाऱ्यांनी त्यांना,  ‘Mountbatten should not allow himself to be drawn into negotiation with the Mahatma, but should listen advice.’ असा सल्ला दिला होता. पुढे म. गांधीनी ११ एप्रिल १९४७ रोजी लॅार्ड माऊंटबॅटन यांना लिहिलेल्या पत्रात ते स्पष्टपणे सांगतात, “…. I felt sorry that I could not convince them (Nehru and Patel).” पुढे ते लिहितात, “…..Thus I have to ask you to omit me from your consideration.” म. गांधींना आपल्या शेवटच्या काळात आपले कोणी ऐकत नाही याची वेदनादायी जाणीव होणे म्हणजेच, ‘गांधीनी आपला राजकीय पराभव मोकळेपणाने स्वीकारणे होते.’

महात्मा म्हणून ते यशस्वी ठरले असले तरी एक राजकारणी म्हणून त्यांना पदरी पराभूततेचा शिक्का पदरात स्वीकारावा लागला. ज्यांनी समाजकारण आणि राजकारण या दोन्हींवर पकड मिळविण्यासाठी आयुष्यभर धडपड केली, त्यांच्या वाट्याला हे आलेले अपयश म. गांधींचे आकलन करतांना समजून घ्यावे लागते. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांच्या काळात घडून आलेल्या आणि आज आपल्याला चूकीच्या वाटणाऱ्या तत्कालीन घडामोडींचे सारे खापर गांधींच्या डोक्यावर फोडतांना तत्कालीन इतिहासाचे हे वास्तव दुर्लक्षित करताच येत नाही. एकूणच या साऱ्या घडामोडी मांडतांना रावसाहेब कसबे यांनी कोणताही अभिनिवेश न बाळगता ठिकठिकाणी मूळ दस्तऐवजांतील संदर्भांची रेलचेल पेरली असल्याने या  ग्रंथाचे संदर्भ मूल्य वाढले आहे.

‘वन मॅन आर्मी‘ हे या ग्रंथातील शेवटचे प्रकरण. म. गांधींच्या हत्येला त्यांच्यातील तळमळीचा ‘हिंदू धर्म सुधारक‘ कारणीभूत ठरल्याची मांडणी अलिकडच्या काळात मोठ्या हिरीरीने अनेक अभ्यासक करीत आहेत. स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवून घेणाऱ्या म. गांधींचे १९३०च्या दशकातील वर्तन हिंहू धर्मविरोधी बंडखोरीचेच राहिले आहे. त्यांची अस्पृश्यता विरोधी चळवळ असो वा आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याची भूमिका, ही चातुर्वर्ण्य आधारित जातपितृसत्ताक व्यवस्थेविरोधात उभारलेली एक मोठी बंडखोरीच होती. इ.स.१९३४ पासून पुढील काळात म. गांधींना मारण्याचे सात वेळा प्रयत्न झाले. बव्हंशी पंचावन्न कोटी मुळे गांधींचा खून झाल्याची बकवास केली जाते. तो विषय शेवटच्या यशस्वी प्रयत्नापूर्वी सहा वेळा जे अयशस्वी प्रयत्न झाले त्याची संगती कशी लावता येईल? या संदर्भातील विस्तृत चर्चा शेवटच्या प्रकरणात करून रावसाहेबांनी या विषयावर अधिक व्यापक संशोधनाची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. परंतु ‘आज तरी भारतातील कोणी संशोधक ती जोखिम पत्करील अशी परिस्थिती नाही’, हे रावसाहेब कसबे यांची केलेले भाष्य, विद्यमान परिस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी गळचेपी सुरू आहे, त्यावरचे हे विषण्ण करणारे वास्तव आहे.

या ग्रंथाच्या मुखपृष्ठासाठी गुलाम महम्मद शेख यांच्या ‘गांधी आणि गामा’ या त्रिचित्र माळेतील एक भाग वापरण्यात आला आहे. हा समग्र ग्रंथच मोहनदास करमचंद गांधी या एका सामान्य माणसाचा असामान्यत्वापर्यंतचा प्रवास अधोरेखित करतो. त्यांच्यातील सामान्यत्व त्यांच्या देहबोलीतून सतत झिरपत असे. म्हणूनच या देशांतील बहुसंख्यांकांना हा आपला माणूस वाटला. चित्रकार गुलाममहम्मद शेख यांनी आपल्या चित्रात गांधीची भारतीयत्वाचा पुरेपुर नमुना ठरू शकेल अशी तरूणपणातील देहबोली चित्रात पकडली आहे. द.आफ्रिकेतून नुकतेच भारतात आलेल्या काळातील हे गांधी आहेत. मुखपृ्ष्ठातून ग्रंथाशयाची लय नेमकी पकडली गेल्याने मुखपृष्ठ फार आशयसंपन्न झाले आहे.

रावसाहेब कसबे यांनी हा ग्रंथ म.गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्याही उतार आयुष्यातील रोगग्रस्त, उदास आणि एकाकी आयुष्याला ज्यांनी मन:पूर्वक जपले अशा त्या म. गांधींची नात मनूबेन आणि डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या त्यागपूर्ण आयुष्याला अर्पण केला आहे. एकंदरीत दोनही महापुरूषांच्या झंजावती व्यक्तित्वापुढे झाकोळून गेलेल्या, दुर्लक्षित अशा या मनूबेन आणि माईसाहेब यांचे त्यांच्या जीवनातील महत्त्व त्यामुळे वाचकांच्या मन:चक्षूंपुढे चमकून जाते.

रावसाहेब कसबे यांच्या बहुतांश ग्रंथ निर्मितीची प्रेरणा पुरोगामी सामाजिक चळवळी ज्या आंतर्विरोधी लयींनी पोखरल्या गेल्या त्या आहेत, त्यांना सांधू शकण्याच्या ज्या शक्यता आहेत त्या समाजासमोर ठेवणे या असल्याचे ठळकपणे जाणवत राहाते. जे विचार, जी व्यक्तित्वं आपली असू शकतात आणि आपल्या पुरोगामित्वाला बळकट करू शकतात त्यांचा नव्याने विचार करून इतिहासाची जळमटे दूर करून खरे वास्तव लोकांपर्यंत पोहचविणे हीच त्यांची तगमग असते. ऐतिहासिक तत्थ्यांशी पूर्ण प्रामाणिक राहून केल्या जाणारी त्यांची मांडणी म्हणून बरेचदा वाचकांच्या रूढ समजुतींना धक्का देण्याचे कार्य करते. ‘गांधी: पराभूत राजकारणी विजयी महात्मा’, हा ग्रंथ म. गाधींसंदर्भात असलेल्या आपल्या अनेक रूढ समजुतींना ठिकठिकाणी धक्के देतो आणि आपल्याला गांधी नव्या आयामाने समजून धेण्याची पुन्हा आवश्यकता असल्याचे वाचकांच्या मनावर बिंबवण्यात यशस्वी होतो.

गांधी: पराभूत राजकारणी विजयी महात्मा
रावसाहेब कसबे
लोकवाड़्मय गृह
किंमत-१०००

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0