‘जय श्रीराम’ विरुद्ध ‘४२ एम’ व्हाया मिथुन!

‘जय श्रीराम’ विरुद्ध ‘४२ एम’ व्हाया मिथुन!

भाजपने काही दिवसापासून राज्यात ‘जय श्रीराम’ घोषणा रुजवत धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या ध्रुवीकरणला छेद देण्यासाठी ममता यांनी मुस्लिम समाजातील ४२ जणांना उमेदवारी देत भाजप समोर आव्हान उभे केले आहे.

बंगालची निवडणूक आणि भारताचे राजकीय भवितव्य
सीआरपीएफचा गोळीबार हे हत्याकांडः ममतांचा आरोप
प. बंगालमध्ये मतदार दुरावल्याची माकपची कबुली

दिवसेंदिवस पश्चिम बंगालची रणभूमी तापत असून या रणभूमीवर आता ‘४२ एम’ विरुद्ध ‘जय श्रीराम’ ही घोषणा अशी अत्यंत चुरशीची आणि धमाकेदार लढत होणार आहे. तर दुसरीकडे तारे तारकांच्या मांदियाळीत ही निवडणूक आणखी कलरफुल होईल. भाजपने मिथुनदाला स्टार प्रचारक म्हणून आखाड्यात उतरवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत असलेल्या एका शासकीय कार्यक्रमात भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने ममता बॅनर्जी यांनी तिथे तीव्र नाराजी व्यक्त करत भाषण करण्यास नकार दिला होता. पश्चिम बंगालच्या राजकीय धुमश्चक्रीत झालेल्या या पहिल्या अंकाचा दुसरा भाग आता जाहीर झाला आहे. ममता यांनी विधानसभा निवडणुकीच्या २९४ पैकी २९१ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. या यादीत तृणमूलच्या काही बाहुबली नेत्यांची नावे कापण्यात आली असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे तब्बल ४२ उमेदवार हे अल्पसंख्याक ( मुस्लिम) समाजाचे आहेत. आणि राज्याच्या निवडणुकीत नेहमीच महत्त्वाच्या आणि सत्ता स्थापनेसाठी महत्वपूर्ण ठरलेल्या नंदीग्राम मधून स्वतः ममता यांनी उमेदवारी घेऊन भाजपला आव्हान दिले आहे.

पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षे डाव्यांची सत्ता होती. पण नंदीग्रामच्या रुपाने तिथे डावे हद्दपार होऊन तृणमूल सत्तेत आली. भाजपने काही दिवसापासून राज्यात जय श्रीराम घोषणा रुजवत धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या ध्रुवीकरणला छेद देण्यासाठी ममता यांनी मुस्लिम समाजातील ४२ जणांना उमेदवारी देत भाजप समोर आव्हान उभे केले आहे. या सोबत सोशल इंजिनिअरिंगचा अफलातून प्रयोग दीदींनी केला आहे. २९१ जागांपैकी ४२ जागा या मुस्लिम समाजातील नेत्यांना तर ७९ अनुसूचित जाती, १७ अनुसूचित जमाती तर फक्त महिलांसाठी ५० जागा देण्यात आल्या आहेत. हे करताना ममता यांनी विद्यमान २७ आमदारांची तिकिटे कापली आहेत. यापैकी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अर्थ मंत्री अमित मित्रा हे निवडणूक लढविणार नव्हते. दुसरे ज्येष्ठ मंत्री पार्थो चटोपाध्याय यांचे तिकीट कापले आहे. तसेच ८० वर्षावरील एकाही नेत्याला उमेदवारी देण्यात आलेली नाही.

ही उमेदवारी यादी जाहीर करताना ममता यांनी खास आपल्या शैलीत ‘खेला होबे, देखा होबे, जिता होबे’ असे सांगितले. याचा अर्थ आम्ही खेळणार, लढणार आणि आम्हीच जिंकणार असा होतो. नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच घेतलेल्या सभेत यावर कोटी करताना, आता हे खेळ जनता बंद करेल असे सांगून प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपने संपूर्ण मंत्रिमंडळ प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या रणभूमीवर उतरवले आहे. तर दिवसेंदिवस आयराम – गयाराम आणि फोडाफोडीला ऊत आला आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किमान २५ सभा येथे होतील असे सांगण्यात आले.

दरम्यान क्रिकेटपटू सौरव गांगुली हा गळाला लागत नसल्याचे पाहून  भाजपने फेकलेल्या दुसऱ्या फाश्यात अभिनेता मिथुन चक्रवर्ती आपसूक अडकला. बंगाली छोरा म्हणून त्याला भाजपने आखाड्यात उतरविले आहे. मी साप नाही तर डंख मारणारा कोब्रा आहे असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर भर सभेत डॉयलॉग मारून मिथुनने इथून तिथून राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. मिथुन हा भाजप च स्टार प्रचारक म्हणून काम करेल.

जय श्रीरामच्या घोषणेला अभिनेता मिथुनचा ग्लॅमरस चेहरा जोडत जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करत भाजप सर्वशक्तीनीशी रणांगणात उतरली आहे. त्याला ममता यांचे एम ४२ आणि सोशल इंजिनिअरिंगचे अस्त्र भारी पडणार का हे निकालानंतर समजेल.

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0