अमित शहांच्या सभेत ‘गोली मारों..’च्या घोषणा

अमित शहांच्या सभेत ‘गोली मारों..’च्या घोषणा

नवी दिल्ली : दक्षिणपूर्व दिल्लीतील शाहीन बागमध्ये सीएएविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी रविवारी ‘हिंदू सेना’ या संघटनेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणार होते. पण शनिवारी रात्रीच पोलिसांनी हस्तक्षेप करून मोर्चा न काढण्यास संस्थेच्या कार्यकर्त्यांना मनवले. त्यामुळे रविवारी खबरदारीचे उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था शाहीन बाग परिसरात लावण्यात आली आहे. या ठिकाणी १४४ हे जमावबंदीचे कलमही पोलिसांनी पुकारल्यानंतर परिस्थिती तणावसदृश आहे.

रविवारी दिल्ली पोलिसांनी २ महिला तुकडींसह १२ पोलिस तुकड्या तैनात केल्या आहेत. स्थानिक पोलिसांसह चार जिल्ह्यातून १०० पोलिसांना तेथे पाचारण करण्यात आले आहे.

तर रविवारी रात्री टिळक नगर व रघुबीर नगर परिसरात हिंसाचार सुरू असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या सर्व अफवांचे खंडन करत दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. अफवा पसरवणारे समाजकंटक असून त्यांच्यासंदर्भात माहिती पोलिसांना तत्पर द्यावी असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.

अमित शहांच्या भाषणात उग्र घोषणा

वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांवर ‘गोली मारो… ’ अशा घोषणांमुळे दिल्लीमध्ये दंगल पेटली होती. तशाच घोषणा रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोलकाता येथील जाहीर सभेत देण्यात आल्या. अमित शहा यांनी सीएएच्या समर्थनात आपली भूमिका मांडताना प. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराला राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरले. या दरम्यान सभेत उपस्थित असणाऱ्या भगवे रंगाचे कपडे व भाजपचे झेंडे घेतलेल्या कार्यकर्त्यांकडून गोली मारो.. सालो को..च्या घोषणा देण्यात आल्या. काही समर्थक ‘उन सभी को गोली मार दो जो देश को धोखा दे रहे हैं’, असे म्हणताना दिसत होते.

अमित शहा यांनी आगामी प. बंगाल विधानसभा निवडणुकांत भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळेल असा दावा केला. राज्यात राजकुमारला वारसदार करण्याचे प्रयत्न भाजप धुडकावून लावेल व येथे या राज्याचा मुलगाच मुख्यमंत्री होईल, असा इशाराही ममता बॅनर्जी यांना उद्देशून दिला.

COMMENTS