जाहीर चर्चांची पुस्तकं

जाहीर चर्चांची पुस्तकं

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवारांमधील जाहीर चर्चा हे एक मोठ्ठं प्रकरण असतं. दोन उमेदवार कॅमेऱ्यासमोर असतात, एकादा पत्रकार किवा प्राध्यापक चर्च

ट्रम्प आणि ‘चौघीजणी’
इराण –अमेरिका तणावामुळे आखाती युद्ध घडेल का?
प्लीज – माझा श्वास कोंडतोय..

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवारांमधील जाहीर चर्चा हे एक मोठ्ठं प्रकरण असतं. दोन उमेदवार कॅमेऱ्यासमोर असतात, एकादा पत्रकार किवा प्राध्यापक चर्चा चालवत असतो. चर्चा चालवणारा दोन्ही उमेदवारांना प्रश्न विचारून त्यांच्या भूमिका स्पष्ट करायला सांगतो. तसंच उमेदवाराबद्दल असणारे आक्षेप उमेदवारासमोर ठेवतो आणि उत्तरं मागतो.

तीन चर्चा होतात. चर्चा लाईव्ह असतात. उमेदवार आणि त्याच्या टीमनं जोरदार पूर्वतयारी केलेली असते, तालमी केलेल्या असतात. उमेदवारानं कसं दिसलं पाहिजे याचीही मेकअपसह सगळी तयारी झालेली असते.

थोडक्यात म्हणजे एक स्पर्धाच असते, नोकरी मागायला जाणारा उमेदवार जसं समोरच्या प्रश्नांना तोंड देतो तसाच प्रकार असतो. करोडो लोकं ही चर्चा पहात असतात आणि त्यावरून काही प्रमाणात ते मत कोणाला द्यायचं ते ठरवतात.

१९६० मधे जेव्हां टीव्हीनं माध्यमांत प्रवेश केला तेव्हां निक्सन आणि केनेडी यांनी केलेल्या चर्चेपासून टीव्ही चर्चा युग सुरु झालं.

Presidential Debates, Risky Business on the Campaign Trail ( third edition) या पुस्तकात लेखक Alan Schroeder टीव्ही चर्चेचा इतिहास मांडतात. पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीपासून लेखकानं चर्चेचा अभ्यास करायला सुरवात केली. लेखक नॉर्थईस्टर्न युनिवर्सिटीत पत्रकारी या विषयाचे प्राध्यापक आहेत. पुस्तकाच्या २००० साली निघालेल्या आवृत्तीत उत्तरोत्तर नव्या मजकुराची भर लेखकानं घातली आहे.  २०१२ सालच्या प्रस्तुत आवृत्तीत  ओबामा आणि मॅक्केन, ओबामा आणि मिट रॉमनी यांच्यात झालेल्या चर्चेचा समावेश आहे.

चर्चेचे विषय आणि प्रश्न कसे ठरतात, चर्चेची पूर्वतयारी कशी होते, चर्चेच्या ठिकाणी सजावट आणि रचना कशी केली जाते, चर्चेच्या प्रसंगी घडलेलं नाट्य, चर्चेनंतर समाजात आणि माध्यमात झालेली चर्चा आणि चर्चेचा लोकमतावर झालेला परिणाम इत्यादी गोष्टी या पुस्तकात  मांडल्या आहेत.

ओबामा आणि मॅक्केन यांच्यात २००८ साली टीव्ही चर्चा झाल्यानंतर Jim Lehrer यांनी Tension City, Inside the Presidential Debates ..हे पुस्तक लिहिलं.

लेहरर यांनी कादंबऱ्याही लिहिल्या आहेत आणि त्यांनी अध्यक्षीय चर्चेत नियंत्रक म्हणून भाग घेतला आहे.

या पुस्तकातही अध्यक्षीय चर्चेत काय घडतं याचा इतिहास मांडलेला आहे. विशेषतः पडद्यामागं आणि पडद्यावर घडलेलं नाट्य या पुस्तकात वाचायला मिळतं.

श्रोडर यांचं पुस्तक रंजक कमी, पाठ्यपुस्तक अशा रुपाचं वाटतं. त्यात माहिती खच्चून आहे पण ती माहिती अभ्यासकाला उपयोगी पडावी अशा रीतीनं दिलेली आहे.

लेहरर यांच्या पुस्तकात माहिती आहे पण पुस्तकाची शैली रंजक आहे, पत्रकारीचा अभ्यासाचं झंगट पाठी नसलेल्या जनरल वाचकाला पुस्तक आवडावं असं त्याचं रुप आहे.

अशी पुस्तकं निघतात तेव्हां ती बेस्ट सेलर या यादीत जात नाहीत, त्यांचा बख्खळ खपही होत नाही. परंतू त्या पुस्तकातला मजकूर नंतर दीर्घकाळ टिकून रहातो कारण त्यात असलेली माहिती आणि ज्ञान वाचकाला समृद्ध करतं. राजकारण कसं चालतं, अध्यक्षीय उमेदवार हा पुढारी म्हणून कसा दिसतो आणि आतून कसा असतो याची काहीशी कल्पना अशा पुस्तकातून येते. देश चालवणारी माणसं कोण आणि कशी असतात याची कल्पना या पुस्तकातून येते.ही पुस्तकं विचार प्रवर्तक असतात, माहिती देतात, पत्रकारांना प्रत्येक निवडणूक चर्चेसाठी अभ्यास आणि संदर्भ म्हणून उपयोगी पडतात.

माध्यमातल्या चर्चेमधून लोकांना ज्ञान आणि उपयुक्त माहिती मिळावी अशी प्रेक्षक-वाचकांची अपेक्षा असते. परंतू या चर्चा बऱ्याच अंशी इव्हेंट होतात, तो एक शो होतो. वादामधे जिकावं, प्रतिस्पर्ध्यावर हल्ले करून त्याला नामोहरम करावं, प्रेक्षकांची मन जिंकावीत या बाजूनं चर्चेची तयारी केली जाते. ज्या देशाचं नेतृत्व आपण करणार आहोत त्या देशाबद्दल आपली कल्पना काय आहे, तो देश भविष्यात कसा असावा या बद्दचे विचार किंवा कार्यक्रम किंवा चिंतन या चर्चेत कमी होतं. कारण चर्चा नाट्यमय करण्याकडं कल असतो.

माध्यमातली माणसं म्हणतात की तास दीड तास प्रेक्षकांना खिळवायचं म्हटल्यावर नाट्यमयता अटळ असते. मुळात टीव्ही हे माध्यम माहितीसाठी कमी रंजनासाठी जास्त आहे असं माध्यमाचं म्हणणं पडतं. त्या दिशेनं माध्यम कार्यक्रम आखतात आणि चालवतात.

पुढाऱ्याची प्रश्नोत्तरं होत असताना स्टुडियोमधे प्रेक्षकांना टाळ्या वाजवा अशी सूचना एका पडद्यावर स्वतंत्रपणे दिलेली असते. थोडक्यात असं की चर्चा करणाऱ्यांनी काय बोलावं, कसं वागावं, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कशा असाव्यात इत्यादी सारं काही नाट्यमयतेच्या अंगानं चर्चेचे आयोजक, माध्यमं, ठरवत असतात.

पहिली चर्चा झाली ती काळ्या पांढऱ्या टीव्हीवर, केनेडी आणि निक्सन यांच्यात. निक्सन यांना घाम फुटला. तणाव निर्माण झाला की निक्सन यांच्या नाक आणि ओठ यांच्या मधल्या भागावर घाम येत असे. कॅमेऱ्यांनी क्लोज अप घेऊन नेमकं ते टिपलं. त्याच वेळी दुसऱ्या दृश्यात राजबिंडे आणि सुखात असलेले केनेडी दिसले. ही कॅमेरा आणि संकलनाची करामत.

केनेडी लोकप्रिय झाले, केनेडी जिंकले. निक्सनचं हसं झालं, निक्सन पराभूत झाले.

उमेदवारांनी काय काय तयारी केलीय हे निमंत्रकाला माहित असतं. त्या तयारीबाहेरचे प्रश्न विचारून उमेदवाराचा तोल घालवायचा उद्योग निमंत्रक करतात. त्यातून उमेदवार किती हजरजबाबी आहे, प्रश्न टोलवण्याचं कौशल्य त्याच्या जवळ किती आहे इत्यादी गोष्टी अशा प्रश्नातून उघड होतात.

फाशी या विषयावर अमेरिकेत चर्चा चालू होती. निमंत्रकानं उमेदवार दुकाकीस यांना प्रश्न विचारला “ समजा तुमच्या पत्नीवर एकाद्यानं बलात्कार केला, तर तुम्ही त्याला फाशी देण्याची शिफारस कराल काय?”

दुकाकीस फाशीच्या शिक्षेला विरोध करत असत.

असा प्रश्न विचारू नका असं त्या वेळी पॅनेलवर असलेल्या स्त्रियांनी नियंत्रकाला सांगितलं. नियंत्रकानं ऐकलं नाही.

दुकाकीस काहीसे गोंधळले. पण आपल्या भूमिकेशी इमान राखून म्हणाले “ शिक्षा देण्याच्या किती तरी अधिक चांगल्या पद्धती आहेत.”

दुकाकीस हरले.

ही झाली काहीशी जुनी पुस्तकं.

सावकाशीनं वाचन या वर्गवारीत मोडणारं एक पुस्तक कोलंबिया प्रेसनं प्रसिद्ध केलंय. पुस्तक आहे  A Community of Scholars

Seventy-Five Years of The University Seminars at Columbia. Edited by Thomas Vinciguerra.

कोलंबिया विश्वशाळेत १९४५ पासून दर वर्षी चर्चासत्रं भरवली जातात. सर्व ज्ञानशाखांतले विषय असतात. त्या त्या ज्ञानशाखेत संशोधन करणारे शिक्षक, संशोधक या चर्चासत्रात अभ्यास निबंध मांडतात आणि त्यावर चर्चा होते. प्रत्येक चर्चा सत्रातले निबंध आणि चर्चा यांचे कागद संपादित करून जपून ठेवले जातात आणि नंतर ते वेळोवेळी प्रसिद्ध केले जातात. २०२० हे या चर्चासत्रांचं अमृत महोत्सवी वर्षं. त्या निमित्तानं प्रस्तुत पुस्तकात चर्चा सत्रांचे अध्यक्ष आणि त्या सत्रांत विचार मांडणारे विचारवंत यांची भाषणं छापली आहेत. या चर्चासत्रांच्या काही संस्थापकांची संक्षिप्त चरित्रंही या पुस्तकात आहेत.

पुस्तकात आलेले काही विषय असे; कामगार चळवळीचा विकास, नागरी जीवन, ब्राझीलचं राजकारण आणि संस्कृती, प्रबोधन, जागतीक शांततेच्या शक्यता.

अशा पुस्तकांची गंमत म्हणजे त्यातून कायच्या काय निष्कर्ष काढता येतात. उदा. अमेरिकेत कोणकोणते विषय महत्वाचे ठरतात ते कळतं आणि अमेरिकेचा इतिहास कसा घडला, अमेरिकेचं मन कसं आहे  याचा अंदाज येतो.

सामान्य माणसाच्या हिशोबात जीडीपी, रोजगार, आरोग्य, शिक्षण इत्यादी ढोबळ गोष्टीच महत्वाच्या असतात. त्या महत्वाच्या असतातच पण समाज घडत असतो तो किती तरी बारीक सारीक विचारांमधून. माणसाच्या शरीरात कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे मोठे घटक असतात पण किती तरी सूक्ष्म द्रव्यं, मायक्रो एलेमेंट्स असतात. त्या द्रव्यांचं प्रमाण दहा लाख कणात एक कण इतकंच असतं. पण हे कण माणसाला प्रतिकारक शक्ती देतात, विचारशक्ती देत असतात, माणसाचं व्यक्तिमत्व घडवत असतात.

अमेरिकेत मानवी समाजाच्या शरीरातले सूक्ष्म घटक जपण्याचा प्रयत्न कसा होतो, याचं दर्शन अशा पुस्तकांतून घडतं.

निळू दामले, हे लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: