बॉइज लॉकर रूम : पुरुषसत्ताक समाजाचा आरसा

बॉइज लॉकर रूम : पुरुषसत्ताक समाजाचा आरसा

असे असंख्य लॉकर रूम्स असंख्य पुरूषांचे आहेत, होते आणि यापुढेही असणार आहेत. कुठल्याही वयाच्या, कुठल्याही ठिकाणी राहणार्‍या आणि कुठलेही काम करणार्‍या पुरूषांचे असले ग्रुप्स असतात आणि ‘Boys talk’ च्या नावाखाली त्याला स्वीकृतीही मिळालेली असते.

पीएम बैठक ‘सुपर फ्लॉप’- ममतांचा आरोप
आंतरराष्ट्रीय सेमिनारसंदर्भातील वादग्रस्त निर्णय मागे
विद्युत वाहनांमुळे प्रदूषणात आणखी वाढ?

दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमावर #Boyslockerroom या हॅशटॅगने खळबळ माजवली. दक्षिण दिल्लीस्थित उच्चभ्रू वर्गातल्या शाळकरी मुलांच्या एका ग्रुपने आपल्याच मैत्रिणींचे अश्लील फोटो एकमेकांना पाठवून त्यावर अश्लील गप्पा मारल्या शिवाय आपल्या समवयीन वर्गमैत्रिणींवर बलात्कार करण्याची भाषा त्या ग्रुपवर दिसून आली. या चर्चा सुरू असताना या ग्रुप चॅटवर नव्याने जोडला गेलेल्या एक मुलाला हे सगळं पाहून, वाचून अस्वस्थ वाटले आणि त्याने या चर्चेचे स्क्रीनशॉट आपल्या मैत्रिणींना पाठवले. त्याच मैत्रिणींनी मग हे सगळे प्रकरण इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केले आणि सोशल मीडियावर या प्रकरणावरून तीव्र संताप व्यक्त होत गेला. अखेर पोलिसांनी सायबर कायद्यानुसार तक्रार नोंदवली व काही विद्यार्थ्यांची चौकशीही सुरू केली.

ही घटना जरी सगळ्यांना धक्कादायक वाटत असली तरी मला ती तशी अजिबात वाटली नाही. हा ग्रुप फक्त शाळकरी वयातल्या मुलांचा होता, इथल्या चर्चा बलात्काराचं नियोजन करण्यापर्यंत गेल्या आणि काही निमित्ताने हा प्रकार समाजापुढे आला हेच या घटनेतले वेगळेपण. असे असंख्य लॉकर रूम्स असंख्य पुरूषांचे आहेत, होते आणि यापुढेही असणार आहेत. कुठल्याही वयाच्या, कुठल्याही ठिकाणी राहणार्‍या आणि कुठलेही काम करणार्‍या पुरूषांचे असले ग्रुप्स असतात आणि ‘Boys talk’ च्या नावाखाली त्याला स्वीकृतीही मिळालेली असते. आता या घटनेबद्दल सोशल मीडियावर बोलणार्‍या आणि ‘Not All Men’ म्हणत स्वत:ला या चिखलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार्‍या सगळ्या पुरुषांनी हे मान्य करायला हवं की ते सगळे सुद्धा अशा एखाद्या तरी गटाचा भाग आहेत.

हे पुरुष तिथे कदाचित थेट बलात्काराचे नियोजन ते करत नसतील किंवा आपल्या ओळखीच्या मुलींचे फोटो शेअर करून बॉडी शेमिंगही करत नसतील पण इंटरनेटवर येणारे अनोळखी स्त्रियांचे हॉट आणि सेक्सी फोटो पाहून त्यांच्याही भावना चाळवत असतीलच. या गटांमध्ये बरेचसे पुरुष स्वत: काही पोस्ट करत नसतील आणि हे हत्यार वापरून ते आपल्या तिथे असण्याचं लंगडं समर्थन करतीलही कदाचित पण एखादा गुन्हा घडत असताना गप्प बसून तो पाहत राहणं ह्याचा अर्थ त्या गुन्ह्याला मूक संमती देणं असतं आणि अशी मूक संमती देणारा सुद्धा गुन्हेगारच ठरतो हे भान आपल्याला यायला हवंय.

पण इथे मुद्दा फक्त त्या ग्रुपमधील अल्पवयीन मुलांचा किंवा इतर पुरुषांच्या अशा ग्रुप्समध्ये असण्याचा किंवा नसण्याचा नाही तर यानिमित्ताने पुरुषत्व, लैंगिक अत्याचाराच्या संकल्पना, संमती, पितृसत्तेत पुरुषांकडे येणारी सत्ता आणि ती सत्ता प्रस्थापित करून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सुरू असलेली धडपड, यातूनच जन्माला येणारी बाईच्या शरीरावरची मालकी आणि या मालकीतूनच केलं जाणारं तिचं वस्तूकरण असे अनेक मुद्दे येतात.

आपल्या सामाजिककरणातूनच कुठलीही समज यायच्या आधी आपण स्त्री आहोत की पुरुष हे ठरवून त्यानुसार आपण काय केलं पाहिजे आणि काय करायला नको हेच मनावर बिंबवले जाते. मग आपण पुरुष आहोत हे सिद्ध करण्यासाठी स्त्रियांच्या शरीराचं वस्तूकरण करत त्यावर अश्लील कमेंट्स करणं, अवयवांची मोजमापं काढत आपल्याला काय आणि किती आकाराचं हवं हे किराणा दुकानात वस्तूचे डिटेल्स सांगावे इतक्या सहजतेने सांगणं, आपल्या अगदी जवळच्या नात्यात असलेल्या मुलींचे, बायकांचे पर्सनल फोटोज मित्रांसोबत शेअर करत ‘नवीन माल’ मिळवून देण्याचं श्रेय घेणं वगैरे यात ओघानं येतंच. ज्याच्याकडे सत्ता तो सत्ताधारी मालक आणि ज्याच्याकडे सत्ता नाही ती सत्ताहीन वस्तू हे समीकरण सगळीकडेच लागू होतं, तसं ते इथेही होतं. सत्ताधारी सत्ताहिनावर आपली सत्ता गाजवू शकतो, मालक वस्तूचे मालकी अधिकार स्वत:कडे घेऊन वस्तूला हवं तसं वागवू शकतो. मग या सत्तेच्या खेळात सत्ताधारी पुरुष सत्ताहीन स्त्रियांच्या शरीराचं वस्तूकरण करतात आणि आपण सारे ‘Men will be men’ म्हणत कौतुकाने पाहत त्यांच्या या कृतीला ‘मूक संमती’च देतो. ‘Men will be men’ स्ट्रॅटजी वापरुन एखादा परफ्यूम विकला जाईल कदाचित पण समाज म्हणून आपण सारे एका दरीत ढकलले जात असतो.

दिल्लीतील ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांची एक लाट सुरू झाली. तेव्हा या bois locker room मधल्या मुलांनी एक नवीन ग्रुप तयार केला आणि तिथे हे उजेडात आणलेल्या मुलीवर बलात्कार करून कसं तिला गप्प करता येईल याविषयीच्या गप्पा त्यांनी मारल्या. चारदोन मुलं जमा करून तिच्यावर बलात्कार करणं किती सोपं आहे अशा मेसेजेसचे स्क्रीनशॉटस पाहिले तेव्हा आपण बलात्काराचं सामान्यीकरण करण्यात दुर्दैवाने किती यशस्वी झालो आहोत हे दृश्य स्वरुपात ठळक दिसलं आणि धक्काच बसला. म्हणजे ‘जे विषय स्त्रियांनी बोलू नये’ असं म्हटलं जातं अशा विषयांवर स्त्रिया बोलल्या की त्यांना बलात्काराची धमकी द्यायची, पुरुषांनी काही विषयांवर बोलू नये हे स्त्रियांनी सांगितलं तरी त्यांना बलात्कार करू अशी धमकी देऊन गप्प करायचं, सोशल मीडियावर एखादी मुलगी राजकारणाविषयी ठामपणे आपली मतं मांडत असेल तर तिला बलात्कार करण्याच्या धमक्या देत ट्रोल करायचं किंवा आपल्यापेक्षा जास्त हुशारीने आणि कष्ट करून एखादी महिला सहकारी प्रमोशन मिळवत असेल तर बलात्काराची धमकी दिली की तिला सहज आपल्या वाटेतून वगळता येतं. म्हणजे स्त्रियांना वठणीवर आणायचं असेल तर बलात्काराशिवाय दुसरा उत्तम मार्गच नाही आणि बलात्कार करणं कुणालाही शक्य आहे अशा आशयाचं नॅरेटिव्ह आपण स्वीकारत चाललोय? पुढे नेत चाललोय? आणि आता बॉइज लॉकर रूम प्रकरण तर फक्त आपल्या सर्वांना दाखवलेला एक आरसा आहे.

मित्रांच्या ग्रुपमध्ये चालणारे सेक्सिस्ट विनोद, आपल्या मैत्रिणींना आणि क्रशेसला मित्रांमध्ये वाटून घेण्यावरून असलेली भांडणं, स्त्री सहकारी मैत्रिणीच्या कपड्यांवर केलेल्या कमेंट्स या सगळ्या बलात्काराच्या रस्त्यावरच्या सुरुवातीच्या पायर्‍या आहेत. हे सगळं करणारी पुरुष मंडळी ह्याला casual आणि cool म्हणत पडदा टाकत असली आणि ह्याला बलात्काराशी जोडणं म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठणं आहे असं म्हणत असली तरी हे खरं आहे. बलात्कार ही फक्त एक कृती नसते, तर तो अशा casual मानल्या जाणार्‍या गोष्टींना वेळीच विरोध करून न थांबवल्यामुळे झालेला उद्रेक असतो. अशा छोट्याछोट्या गोष्टींचं समर्थन करून आपण सगळे आपापल्या घरांमध्ये, रस्त्यांवर, चौकाचौकात, शाळांमध्ये बलात्कारी पोसत असतो. मग फक्त बलात्कारी म्हणून गुन्हा सिद्ध झालेल्यांना शिक्षा करून किंवा त्यांचं एन्काऊंटर करून आपण या मानसिकतेवर जरब बसवण्यात यशस्वी झालो असं म्हणता येणार नाही. अलीकडेच ‘मीटू’ चळवळीतून कितीतरी स्त्रियांनी आपल्यावर झालेल्या हिंसेचे, अत्याचाराचे अनुभव सोशल मीडियातून मांडले. पण या असल्या ग्रुप्सवर किती मुलींचे आणि बायकांचे फोटोज शेअर करून आंबट गप्पा झाल्या असतील याची काय मोजदाद?

पितृसत्तेने सत्ता हातात दिलेल्या पुरूषांना स्वत:ची मर्दानगी सिद्ध करण्याची अटच घातलेली असते. तसं केलं नाही तर तुम्ही मर्द म्हणून सिद्ध होत नाही. मग नामर्द, नपुंसक, बायल्या असली विशेषणं चिकटतात आणि ही अशी विशेषणं म्हणजे आपलं मर्द म्हणून अपयश दाखवणारी असतात हे सुद्धा आपणच डोक्यात पक्कं बसवलेलं असतं. मग बाहेरच्या बाजूने अतिशय चांगला, छान वाटणारा पण आतून मात्र खरवडून रक्त काढणारा असा पुरुषपणाचा काटेरी मुकुट या सगळ्या मर्द होऊ घातलेल्या माणसांना आयुष्यभर सोडवत नाही. आपल्या प्रत्येकाच्या आतल्या पितृसत्तेने लावलेली विषारी मर्दानगी सिद्ध करण्याची स्पर्धा जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत या पुरुषांमधला माणूस आपल्याला हेरता येणार नाही.

या घटनेतील आणखी एक विचार करायला लावणारा पैलू म्हणजे, ही घटना रिपोर्ट करणारी मुलगी आपल्या पोस्ट मध्ये लिहिते की, आता हे केल्यानंतर माझ्या आईने भीतीने मला इन्स्टाग्राम सोडायला सांगितलय. हे ऐकून मला एकदम दिल्लीतल्या निर्भया प्रकरणावर बीबीसी या वाहिनीने केलेला ‘इंडियाज डॉटर’ या माहितीपट आणि त्यातील आरोपींची बाजू लावून धरणारे वकील महाशय आठवले. ते म्हणतात, रात्री मित्रासोबत निर्भया बाहेर फिरली नसती तर बलात्कार झालाच नसता. मुलींनी छोटे कपडे घातले म्हणून, त्या सोशल मीडिया वापरायला लागल्या म्हणून, सोशल मीडियावर स्वत:चे फोटो अपलोड केले म्हणून, मुलांशी मैत्री केली म्हणून, रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहिल्या म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात, म्हणून त्या हिंसेला बळी पडतात, म्हणून त्यांना बाहेरच्या वातावरणात असुरक्षित वाटतं असं म्हणणं म्हणजे ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ आहे हे आपल्याला का उमगत नाही? प्रत्येकवेळी असा एखादा हिंसेचा अनुभव आल्यानंतर आधी चूक मुलीचीच असेल असं म्हणून त्या चुकीवरचा इलाज करत तिच्यावर बंधनं लादणं आपण थांबवायला हवं. मुलींचं इन्स्टाग्राम वापरणं बंद करून असले ग्रुप्स बंद होणार नाही. त्यासाठी आपल्याला काही शाश्वत मार्ग शोधावे लागतील. ते अंगिकारण्यासाठी तयारी दाखवावी लागेल, प्रसंगी आपली सत्ताही सोडावी लागेल.

मी अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण मुली आणि मुलांसोबत काम करते. स्वत:सकट आपल्या गावातल्या आपल्याच वयाच्या इतर मुलांमध्ये, त्यांच्या वर्तणुकीत, विचारांत आपल्याला पितृसत्ता कशी दिसते आणि ती कमी करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील या विषयावर संशोधन करणारी ही मुलं आहेत. पण त्याच प्रकारचे सामाजिक वातावरण मिळालेल्या या सगळ्यांमध्येही ती पितृसत्ता ठासून भरलेली आहेच. फक्त बाहेरील जगाचा नाही तर स्वत:च्याही आत दडलेल्या एका पुरुषाचा अभ्यास करताना त्यांना बघणं आणि त्यांच्याशी सतत संवाद करत राहणं हे या विषयातले कितीतरी पैलू मला उलगडून दाखवणारं ठरतंय. बाहेरून टणक आवरण असलेला या कोवळ्या वयातल्या मुलांच्या आतला पुरुष वाटतो तितका टणक नाही. आपल्या वागण्या-बोलण्यावरून आपल्याला कुणी एका साच्यात बसवणार नाही किंवा लेबल लावणार नाही हा विश्वास आल्यानंतर ही मुलं आपल्यातल्या पुरुषाला ढिलं करतात. त्याच्या मानेवर पितृसत्तेने दिलेले जबाबदार्‍यांचे जोखड तरल संवादात भाषांतरित करून सांगतात. त्यावर पर्याय शोधतात. पुरुषापेक्षाही स्वत:च्या आतल्या माणसाला साद देतात. पण चार दिवसांची कार्यशाळा संपल्यावर आपल्याला पुन्हा समाजाच्या व्याख्येत बसणारं पुरुष व्हावं लागणार हे त्यांना माहिती असतं. मग पुन्हा बाहेर आल्यावर सुरू होते ती मर्दानगी सिद्ध करण्याची आपण सुरू केलेली स्पर्धा. या कोवळ्या वयाच्या मुलांच्या आत आपल्याला पुरुषापेक्षाही माणूस फुलू द्यायचा असेल तर आपल्याला बदलावं लागणार. सीमोन दी बोव्हुवार म्हणतात की, ‘स्त्री जन्माला येत नाही तर ती घडवली जाते.’ तसाच पुरुषही जन्मत नाही तर तो घडवला जातो.’ तो घडवला जातो तो आपल्या सामाजिककरणातून.

बॉइज लॉकर रूममधल्या मुलांनी आपल्याला आरसा दाखवलाय. आपण सगळे करत असलेल्या सामाजिककरणाची ही कडू फळं आहेत. त्यांची बीजं वेळीच तपासून चांगली जोपासना करण्याची जबाबदारी समाज म्हणून आपण घेत नसू तर पुढचा काळ भयंकर आहे. आपल्यालाच आपला प्रत्येक विचार, प्रत्येक कृती आणि प्रत्येक शब्द विवेकाच्या फुटपट्टीवर तपासून घ्यावा लागेल. पितृसत्तेचा आणि मर्दानगीचा विखारी विचार पेरणं थांबवलं नाही, तर चांगला माणूस उगवणार कसा? कबीर म्हणतो तसं, “बोये पेड बबूल का, आम कहाँ से पाये?”

काजल बोरस्ते, नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुलींच्या आयुष्यावर कृतीसंशोधनाचे काम करतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0