ब्राझीलमध्ये कोवॅक्सिन घोटाळा; डावे -उजवे रस्त्यावर

ब्राझीलमध्ये कोवॅक्सिन घोटाळा; डावे -उजवे रस्त्यावर

साओ पावलोः कोवॅक्सिन लस खरेदी व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार आढळल्यानंतर ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांची चौकशी करण्याचे आदेश ब्राझीलच्या सर्वोच्च

अ‍ॅमेझॉनवर आलेले मानवनिर्मित संकट
ब्राझील- भारत बायोटेक (कोवॅक्सिन) करार रद्द
उद्दाम माणूस आणि नव्या व्यवस्थेची गरज

साओ पावलोः कोवॅक्सिन लस खरेदी व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार आढळल्यानंतर ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांची चौकशी करण्याचे आदेश ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले होते. या आदेशानंतर शनिवारी देशातल्या सुमारे ३५० शहरांत नागरिकांनी रस्त्यावर येऊन बोल्सोनारो यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. बोल्सोनारो यांच्या सरकारविरोधातली नागरिकांची ही मोठ्या प्रमाणात निदर्शने समजली जात आहेत. या निदर्शनात ब्राझीलमधील सर्व डावे व उजवे पक्ष एकत्रित आले होते.

शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रोसा वेबर यांनी बोल्सोनारो सरकारवर भारतीय कंपनी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीच्या खरेदीवर संशय व्यक्त केला. आणि या व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिले.

ब्राझीलमध्ये कोविड-१९ची लाट पसरल्यानंतर सरकारने कोवॅक्सिनचे सुमारे २ कोटी खुराक मागवल्या संदर्भात सुमारे ३०० कोटी डॉलर्सचा करार भारत बायोटेक कंपनीशी केला होता. पण या करारात अनेक स्तरांवर अनियमितता दिसून आली होती. आणि तशी माहिती संबंधित यंत्रणांनी अध्यक्ष बोल्सोनारो यांना दिली होती. पण त्यांनी या यंत्रणांच्या इशार्याकडे दुर्लक्ष केले व हा व्यवहार पुढे नेण्यास परवानगी दिली असा मुख्य आरोप आहे. ब्राझीलच्या घटनेनुसार भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा जेव्हा अध्यक्षांना भ्रष्टाचारासंदर्भात इशारे, माहिती देतात तेव्हा त्यावर कारवाई करणे बंधनकारक आहे. पण कोवॅक्सिन खरेदीत बोल्सेनारो यांनी या इशार्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्याविरोधात महाभियोगही चालू होऊ शकतो.

बोल्सोनारो यांच्यावर संशयाची सुई जाते कारण त्यांनी हा करार होण्यासाठी आपले राजकीय वजन खर्च केले होते व त्यांच्या दबावाखाली हा करार अंतिम करण्याकडे भर दिला जात होता, असाही आरोप लावला जात आहे.

भारत बायोटेकने ब्राझिलला कोवॅक्सिनची लस प्रति खुराक १५ डॉलरला विकली होती. ही लस अत्यंत महागडी असल्याने विरोधकांनी सरकारवर हल्ले करण्यास सुरूवात केली.

भारत बायोटेक व ब्राझील सरकारदरम्यान चार पातळ्यांवर लस करार झाला होता. यात आर्थिक घोटाळा दिसून आला आहे. ब्राझीलच्या तपास यंत्रणेनुसार करारातील दोन टप्प्यांतील व्यवहार संशयास्पद असून त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. या चौकशीच्या निर्णयानंतर ३० जूनला बोल्सोनारो सरकारने हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला.

डावे-उजवे रस्त्यावर

कोवॅक्सिन घोटाळ्यानंतर ब्राझीलमधील डाव्यापासून उजव्या विचारसरणीचे सर्व राजकीय पक्ष बोल्सोनारो यांच्या हकालपट्टीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या महिन्यात १९ तारखेला अनेक संघटना व नागरी संघटना सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यानंतर ३ जुलैला शनिवारी लाखोच्या संख्येने नागरिक बोल्सेनारो हटावोच्या घोषणा देत विविध भागात रस्त्यावर उतरले होते. शनिवारच्या निदर्शनांत वर्क्सर्स पार्टी हा डावा पक्ष व पीएसडीबी हा उजवा पक्ष रस्त्यावर एकत्रपणे निदर्शनासाठी उतरले होते. हे दोन्ही पक्ष एकमेकांचे पारंपरिक शत्रू समजले जात आहे. २००४ ते २०१४ या काळात डाव्यांनी चार वेळा उजव्यांना पराभूत केले आहे.

ब्राझीलमध्ये कोविड-१९ची लाट अद्याप नियंत्रणात आलेली नसून आजघडीला सुमारे ५ लाख २२ हजार नागरिक कोविडमुळे मरण पावले आहेत. देशात दररोज सरासरी २ हजार मृत्यू कोविडमुळे होत आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0