पेटन जेंड्रन. वय वर्षे १७. दोनशे मैलांचा प्रवास करून १३ मे रोजी बफेलो या गावात पोचला. टॉप्स या वाणसामानाच्या दुकानात जाऊन त्यानं रेकी केली. किती मा
पेटन जेंड्रन. वय वर्षे १७.
दोनशे मैलांचा प्रवास करून १३ मे रोजी बफेलो या गावात पोचला. टॉप्स या वाणसामानाच्या दुकानात जाऊन त्यानं रेकी केली. किती माणसं येतात, कसकशी येतात, गाड्या कुठं थांबवतात वगैरे.
१४ मे रोजी दुपारी २.५ च्या सुमाराला तो टॉप्स दुकानाशी पोचला. त्यानं अंगावर लष्करी कपडे घातले होते आणि बुलेट प्रूफ जॅकेटही घातलं होतं. त्याच्याकडलं एक पिस्तूल आणि एक गन त्यानं गाडीतच ठेवली. बुशमास्टर ही सेमी ऑटोमॅटिक गन हातात घेतली.
दुकानाच्या बाहेरच त्यानं गोळीबाराला सुरवात केली. दुकानात घुसून गोळीबार सुरु ठेवला. ५० गोळ्या झाडल्या.
सुरवातीला एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्यानं त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बुलेट प्रूफ जॅकेट असल्यानं तो सुरक्षीत राहिला. दुकानात गेल्यावर सुरक्षा अधिकाऱ्यानी त्याच्यावर बंदुका रोखल्या, त्याला शरण यायला लावलं.
१० माणसं मेली. सगळे काळे होते.
पेटन जेंड्रन गोरा आहे.
।।
जेंड्रननं वर्षभर तयारी चालवली होती.

पेटन जेंड्रन
२०२१ च्या मे महिन्यात जेंड्रनला शाळेनं एक अभ्यास दिला होता. तुम्हाला कोणता प्रोजेक्ट करावासा वाटेल या विषयावर निबंध लिहायचा होता. जेंड्रननं निबंध लिहिला. त्याचा मथळा होता- हत्याकांड आणि आत्महत्या. माणसं मारायची आणि नंतर स्वतःचा जीव घ्यायचा.
मास्तर चक्रावले. अन्यथा शांत असणारा जेंड्रन असं का लिहितो ते त्यांना कळेना. त्यांनी जेंड्रनला बोलावून घेतलं. जेंड्रन म्हणाला की त्यानं गंमत केली होती.
शाळेनं पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तीनेक दिवस जेंड्रनची जबानी घेतली. डॉक्टरकडून त्याची सायकिॲट्रिक तपासणी केली. सोडून दिलं.
जेंड्रननं गंमत केलेली नव्हती. ‘गोरेच सर्वश्रेष्ठ असतात’ या पंथाचं साहित्य तो वाचत असे. या पंथाची लोकं रिप्लेसमेंट सिद्धांत मानतात. म्हणजे असं की ज्यू, काळे, मुसलमान, बाहेरून आलेले इत्यादी लोकांची संख्या एव्हढी होईल की ते आपली जागा घेतील. गोरे, कंझर्वेटिव ख्रिस्ती, इवँजेलिकल ख्रिस्ती या विचारांचे असतात.
जेंड्रननं न्यू यॉर्कमधल्या एका दुकानातून बुशमास्टर ही गन विकत घेतली. १७ वर्षाच्या मुलाला ही बंदुक कां हवीय ते दुकानदाराला कळेना. त्यानं कायद्याला अनुसरून चौकशी केली, की या मुलाच्या नावावर काही हिंसा वगैरेची नोंद आहे काय. तशी नोंद नव्हती.
अमेरिकेतल्या कायद्यानुसार एकाद्या माणसानं समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्या नावाखाली लाल रेष मारण्यात येते. अशा माणसाला शस्त्रं विकायला कायद्यानं बंदी आहे.
जेंड्रननं हत्याकांड करायचं ठरवलं होतं ही गोष्ट खरं म्हणजे त्याच्या नावाखाली लाल रेघ मारायला पुरेशी होती. पण पोलिसांनी नुसतीच चौकशी करून त्याला सोडलं होतं त्यामुळं त्याचं नाव स्वच्छ होतं.
जेंड्रन बाजारात गेला. एक ६० डॉलरचं किट विकत आणलं. घरातलं गिरमिट वापरून, त्या किटचा वापर करून त्यानं बुशमास्टर गनमधे सुधारणा केल्या. बुशमास्टर गनच्या मॅगझीनमधे जास्त गोळ्या साठवता येतील अशी सोय त्यानं करून घेतली.
माणसं मारायला बफेलो ही जागा योग्य आहे असं त्यानं अभ्यासांती ठरवलं. कारण त्या गावात काळ्यांची बहुसंख्या आहे. तिथला मेयरही काळा आहे.
बफेलोत जायच्या काही दिवस आधी त्यानं १८० पानांचा एक निबंध लिहिला. त्यात रिप्लेसमेंट सिद्धांत, काळे कसे वाईट असतात वगैरे मजकूर होता. निबंध इंटरनेटवर टाकला.
रिप्लेसमेंट सिद्धांत मानणाऱ्या गोऱ्यानी आजवर केलेल्या हत्याकांडांची माहिती या निबंधात होती. नावानिशी सारा तपशील निबंधात होता. त्यांचं कौतुक होतं. त्या पैकी काही लोकांची नावं आणि हत्याकांडाच्या तारखा त्यानं बुशमास्टर बंदुकीवर कोरल्या.
।।
२०२२ सालच्या मे महिन्यात अमेरिकेत सेनेट आणि काँग्रेसच्या मध्यावधी निवडणुका व्हायच्या होत्या. उमेदवार प्रचार करत होते. पैकी रिपब्लिकन पक्षाचे कित्येक उमेदवार आडून आडून रिप्लेसमेंट सिद्धांत मांडत होते. डोनल्ड ट्रंप उमेदवारांचा प्रचार करत असताना बाहेरून आलेले लोकं, इमिग्रंट्स, कसा अमेरिकेचा ताबा घेत आहेत आणि त्यांना डेमॉक्रॅट्स कशी मदत करत आहेत असा मुद्दा ठळकपणे मांडत होते.
सारा मामला उघड होता.
अलाबामाच्या गव्हर्नर रिपब्लिकन आहेत. गव्हर्नर म्हणजे भारताच्या हिशोबात राज्याचा मुख्यमंत्री. नागरिकांना भीती घालताना त्या म्हणाल्या, ”जो बायडन बाहेरची माणसं देशात घुसवत आहेत. इतके मेक्सिकन, लॅटिन अमेरिकन अमेरिकेत येत आहेत की काही दिवसांनी अमेरिकेची भाषाही स्पॅनिश होईल, आपली इंग्रजी भाषा नष्ट होईल.”
ट्रंप सुरवातीपासूनच म्हणत आहेत की मुसलमान आणि लॅटिन अमेरिकन लोकं स्मगलर असतात, गुन्हेगार असतात, बलात्कार करणारे असतात.
रिप्लेसमेंट सिद्धांत रेनॉ कॅम्यू या फ्रेंच लेखकानं २०१२ साली मांडला होता. ट्रंप आदी लोकांनी तो उचलून धरलाय. या विचाराचे लोक जाहीर सभा घेऊन, निदर्शनं करत, मंचावर जाहीरपणे म्हणतात की आम्ही आमची जागा ज्यूंना घेऊ देणार नाही.
।।
गोऱ्या ख्रिस्ती लोकांमधे ज्यू द्वेष ख्रिस्ती धर्माच्या निर्मितीपासून मुरलेला आहे. साऱ्या ख्रिस्ती जगात तो आहे, अमेरिकेतही आहे. जगभर ससेहोलपट झाल्यावर ज्यू अमेरिकेत गेले. विशेषतः हिटलरच्या कारकीर्दीत खूप ज्यू अमेरिकेत स्थलांतरीत झाले. अमेरिकन ख्रिस्तीनी त्याना स्वीकारलं नाही, आजही.
काळ्यांचा द्वेष ते अमेरिकेत गुलाम म्हणून आल्यानंतर सुरु झाला. तीनेक शतकं खूप अमेरिकन गोरे त्यांना माणसंच मानत नव्हते. विसाव्या शतकात त्यांना माणूस म्हणून मानू लागले पण आर्थिक दृष्ट्या ते गुलामच राहिले, त्यांना नागरीकत्वाचे किंवा आर्थिकतेचे अधिकार द्यायला अमेरिका तयार नव्हती, आजही नाही.
दक्षिण अमेरिकेत, शेती प्रधान राज्यात, काळ्यांचा द्वेष राजकीय विचारांत घुसला. मोठे शेतकरी, धनिक, इवँजेलिकल ख्रिस्ती रिपब्लीकन पक्षात घुसले. त्यांनी द्वेषाचं राजकारण केलं.
अंधश्रद्धा, पूर्वग्रह आणि आर्थिक हितसंबंध हे तीन घटक रिपब्लिकन पक्षाच्या एका गटात केंद्रीत झाले. आर्थिक हितसंबंधानी काळ्यांच्या द्वेषाला मुक्त अर्थव्यवस्थेची जोड दिली.
त्यातूनच साधारणपणे ट्रंपवादी गट अमेरिकेत आकाराला आलाय.
काळे गरीब असतील, साधनहीन असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यानी मेहनत करावी, बाजारात टिकावं, आपापलं पहावं. भले ते गुलाम राहिल्यानं मागास राहिले असतील. पण हे त्यांचं नशीब आहे, ते त्यांचं त्यानी पाहून घ्यावं. समजा गोऱ्या उद्योगपतीला त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करायची असेल तर तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न झाला. धोरण म्हणून सरकारनं किंवा उद्योगानं कोणावरही उपकार करण्याच्या भानगडीत पडू नये. बाजार बाजाराच्या नियमानुसार चालतो, मानवता वगैरे बाजाराच्या तत्वात बसत नाही.
साधारणपणे अमेरिकेतले ट्रंपवादी रिपब्लिकन असा विचार करतात.
बफेलोत काळे बहुसंख्य आहेत. त्यांची आर्थिक कुवत कमी आहे. ते फूडबँकेसारख्या उपकारक संस्थेच्या मदतीवर जगतात.
अशी माणसं कशाला जगवायची?
त्यांना मदतही करू नका. मारूनच टाका.
।।
हा होता पेटन जेंड्रनचा विचार.
।।
पेटन जेंड्रन वेडा नाही किवा विकृतही नाही.
जेंड्रन नीट विचार करूनच वागला आहे.
डोनल्ड ट्रंप यांच्या लाखो करोड साथीदारांचा त्याला पाठिंबा आहे.
।।
माझा पंथ, माझा कातडीचा रंग, माझी भाषा, माझा देश.
यातला एखादा घटक किवा सगळे घटक मिळून तयार झालेला मी आणि माझ्या गटातली माणसं.
आम्ही जगातली सर्वात श्रेष्ठ माणसं आहोत. इतर माणसं कमी प्रतीची आहेत. ती असल्यामुळं आमच्या जगण्यात अडचणी येत आहेत, त्यांच्या असण्यामुळं आमच्या श्रेष्ठ जगण्यात अडथळे येत आहेत.
ती माणसं मेली तर बरी.
समजा जिवंत रहाणार असतील तर त्यांनी आमचं ऐकलं पाहिजे. त्यानी दुय्यम स्थान स्वीकारलं पाहिजे. त्यांचे श्रम, त्यांचं कसब, त्यांचं अख्खं जगणंच आमच्या हिताचं असायला पाहिजे.
।।
हे आहे पेटन जेंड्रनचं म्हणणं.
।।
असं म्हणणारी माणसं अफगाणिस्तान, पाकिस्तान, रशिया, तुर्कस्तान इत्यादी देशात आहेत.
भारतातही आहेत.
।।
निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.
COMMENTS