नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेपुढे बळी पडलेला पक्ष

नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेपुढे बळी पडलेला पक्ष

उदयपूरचे चिंतन शिबीर संपते ना संपते तेवढ्यात हार्दिक पटेल व सुनील जाखड या दोन काँग्रेस नेत्यांनी राजीनामे देत काँग्रेसला धक्का दिला. काँग्रेसमधील ढासळत चाललेली अंतर्गत संरचना व नेत्यांच्या वैयक्तिक स्वरुपाच्या महत्त्वाकांक्षा याने पक्ष बेजार झाला आहे.

हार्दिक पटेल यांचा गुजरात काँग्रेसचा राजीनामा
काँग्रेस हरली – बरं झालं!
काँग्रेस ‘प्रभारी’ अवस्थेतून कधी बाहेर पडणार?

उन्हाळ्याने कहर केलेल्या राजस्थानातील उदयपूर मुक्कामी काँग्रेसचे बडे बडे नेते आपल्या सध्याच्या स्थितीबद्दल चिंतन करून दिल्लीला परतत नाहीत तोवर पक्षाला दोन जबर झटके बसले. गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेल आणि पंजाबचे सुनील जाखड या दोन माजी प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसला टाटा, बाय बाय केले. दोघेही अस्वस्थ होते, पक्षनेतृत्व आपले ऐकून घेत नाही, आपल्याला समजून घेत नाही, पक्षात, म्हणजे राज्य शाखेत आपल्याला विचारले जात नाही, आपल्या शब्दाला काही मान नाही, किंमत नाही अशा तक्रारी ते वारंवार करत होते. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

दिल्लीतील काँग्रेस हायकमांड म्हणजे सध्या राहुल गांधी प्रत्यक्षात जी भूमिका करत आहेत, त्यांनी हार्दिक व जाखड यांच्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी दोघांनीही पक्षत्याग केला आणि नरेंद्र मोदीप्रणित ‘काँग्रेसमुक्त भारत’ मोहीम आणखी दोन पावलं पुढे गेली ! जाखड दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये आले आणि हार्दिक त्याच वाटेवर असल्याचं सांगितलं जातंय. त्यांच्यावरील देशद्रोहाचे व इतर गुन्हे मागे घेण्यासाठी तोच पर्याय त्याच्यासमोर आहे. मात्र काँग्रेस सोडल्यानंतर हार्दिक यांनी आणखी एक धाडस केले तर त्यांच्यासमोर पर्याय असेल तो अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा. कारण जेथे काँग्रेस सत्तेबाहेर जाते तेथे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे म्हणजे आपचे फावते, हा अलीकडे पंजाबात आलेला पूर्वानुभव आहे. दिल्ली, पंजाबात ते दिसले आहे आणि छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, गुजरातेतही काँग्रेसला पर्याय म्हणून आप झपाट्याने पुढे येत आहे.

हार्दिक पटेल पाटीदार आंदोलनातून पुढे आलेले नेतृत्व. या आंदोलनाने मोदी-शहा यांच्या भाजपला २०१७च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलाच घाम फोडला होता. पाटीदार समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी असलेल्या या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं. मोदींनी व नंतर शहांनी गुजरात सोडल्यावर त्या राज्याची राजकीय घडी विस्कटली असे चित्र समोर येऊ लागले. त्या निवडणुकीत हार्दिक यांचा भाजपने इतका धसका घेतला होता आणि त्यांच्याबद्दल भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाच्या मनात इतका राग होता की दिल्लीपासून सर्वत्र तमाम भाजप नेत्यांनी अभिनंदन करतानाही हार्दिक शब्द वापरण्याचे जाणीवपूर्वक टाळायला सुरवात केली आणि हृदय की गहेराईयों से, असा शब्दप्रयोग सुरू केला ही बाब राजकीय जाणकारांच्या बारीक नजरेतून सुटली नव्हती…! तेच हार्दिक १८ मे रोजी राजीनामा देतात, राजीनामापत्र सोनिया गांधींना पाठवतात आणि त्यात राहुल गांधींवर तुफानी आरोप करतात हे काँग्रेससाठी चांगले लक्षण नाही. हार्दिक यांनी केलेले चिकन सँडविचसारखे आरोप भाजप प्रवक्ते काँग्रेसवर हल्ला चढविण्यासाठी देशभरात वापरू लागले आहेत. गुजरातेतील अनेक काँग्रेस नेतेही पक्षावर नाराज आहेत, हा सूचक बॉम्ब हार्दिकने पेरून ठेवला आहेच. काँग्रेस सर्वात मोठा जातीयवादी पक्ष असल्याचेही सांगून हार्दिक यांनी पक्षाचे नेतृत्व (म्हणजे राहुल गांधी) गंभीर नाहीत. त्यांचे लक्ष गुजरात समोरील अडचणी सोडवण्यापेक्षा मोबाइल व बाकी गोष्टींवरच जास्त आहे. गुजरात दौऱ्यावर आलेल्या नेत्यांनी चिकन सँडविच खाल्ले की नाही याचीच काळजी पक्षाच्या गुजरातेतील नेत्यांना लागून राहिलेली असते, असे आरोप केले.

इतका घणाघाती हल्ला चढविणाऱ्या हार्दिक पटेल यांच्या मागे -भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, अशी तेवढीच जबरदस्त शक्ती गुजरातेत उभी राहिली असणार हे उघड आहे. त्यांच्या पत्रातील भाषा भाजपची आहे असाही आरोप केला जातो. पण तो खरा मानला तरी काँग्रेसमधील जनाधार असलेल्या नेत्यांचं हे आउटगोईंग थांबवणार कसं, त्यासाठी राहुल गांधी यांना त्यांची कार्यशैली बदलण्यास सांगण्याची हिंमत कोणी दाखवणार की नाही आणि तशी कोणी दाखवलीच तरी त्याचा काही परिणाम होईल का, यासारखे प्रश्न अनुत्तरीत राहतात.

काँग्रेसमधील असंतुष्ट समजल्या जाणाऱ्या जी-२३ गटाच्या नेत्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न यापूर्वी करून पाहिला होता. पण जे पक्षनेतृत्वावर बोलतात त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं हा अनुभव त्यांनाही घ्यावा लागला. हार्दिक, सुनील जाखड व त्यांच्याआधी ज्योतिरादित्य शिंदे, आरपीएन सिंग, जितीन प्रसाद अशा अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडताना राहुल गांधी यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते काही भजन कीर्तन करायला भाजपवासी झाले नाहीत. त्यांच्या भाजप प्रवेशामागेही ईडीच्या संभाव्य ससेमिऱ्यापासून अनेकानेक कारणे असतीलही पण त्यांनी पर्याय भाजपचाच निवडला हे कसे दुर्लक्षित करता येईल.

तुम्हाला आठवतंय? आसामचे सध्याचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनीही काँग्रेस सोडताना राहुल गांधींवर अशाच प्रकारचे आरोप केले होते. जेव्हा जेव्हा ते दिल्लीत पक्षाच्या काही मुद्यांबद्दल चर्चा करायला यायचे तेव्हा राहुल गांधी मोबाइल किंवा आपला लाडका कुत्रा यांच्यात दंग असत. आपण काय बोलतोय याकडेही त्यांचे लक्ष नसे असे हेमंता यांचा आरोप होता. पुढे ते भाजपमध्ये गेले, पाच वर्षे आसामातील भाजप सरकारमध्ये क्र. २ चे मंत्री म्हणून राहिले व आता मुख्यमंत्री बनले. त्यांच्या आदीचे सर्बानंद सोनोवाल हेही भाजपचे नव्हतेच. आसाम गण परिषदेतून ते भाजपमध्ये आले होते. ईशान्य भारतात तर भाजपचे बहुतांश मुख्यमंत्री माजी काँग्रेस नेते आहेत. तिकडे भाजपकडे पक्षसंघटनाही नव्हती तेव्हा शहा यांनी काँग्रेस नेते फोडण्याचा सपाटा लावला. अरुणाचल प्रदेशात पेमा खांडू सारा काँग्रेस पक्षच सोबत घेऊन भाजपवासी झाले. मेघालयात काँग्रेसला हरविणारे कोनरेड संगमा यांच्यावर भाजप नेतृत्व प्रसन्न झाले. निवडणुका तोंडावर आलेल्या त्रिपुरात नुकताच खांदेपालट करताना मोदी-शहा यांनी बिप्लब देब या आपल्या कार्यकर्त्याला हटवून काँग्रेसमधून आलेले माणिक साहा यांना मुख्यमंत्री केलं.

मुळात मोदी-शहा यांच्यासारख्या ट्वेंटी फोर बाय सेव्हन राजकारण आणि तेही सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याचे राजकारण करणाऱ्या  नेत्यांसमोर गंभीरपणेच मैदानात उतरले पाहिजे असे ममता बॅनर्जींनीही पश्चिम बंगाल विजयानंतर सांगून ठेवले आहे. राजकारण राहुल गांधी यांचा प्रांत नाही व ते कोणतेही सत्तापद घेण्यास बिलकुल तयार नाहीत असे वारंवार सांगितले जाते. काँग्रेस नेत्यांच्या मते तो कौतुकाचा विषय आहे. मात्र राजकारणातच काय कोणत्याही क्षेत्रात राहायचे, करियर म्हणून त्यात उतरायचे आणि आपल्याला त्यात रस नाही असे म्हणायचे हे जगात कोठे चालते आणि असे कोण करतो? ही अशी भूमिका म्हणजे भारतात वापरल्या जाणाऱ्या ब्रिटिश इंग्रजीसारखी आहे. इंग्रजीत काही अक्षरं ‘सायलेंट’ असतात. उदा. पार्लमेंटमधला ‘एल’ किंवा तत्सम अनेक शब्दांत ही सायलेंट अक्षरांची भानगड असते. दिवंगत सुषमा स्वराज म्हणायच्या की अशा सायलेंट शब्दांना विचारावे की बाबा तू सायलेंट आहेस तर या शब्दात उगाच का घुसलास ? बाजूला हो तिथून ! राहुल गांधी यांच्याबाबतीत तसे होऊ नये असे वाटत असेल तर याचा निर्णय त्यांना स्वतःलाच करावा लागेल.

उदयपूरच्या तीन दिवसांच्या चिंतन शिबिरात काँग्रेसने मोठे मोठे निर्णय घेतले. एक कुटुंब-एक पद, युवा चेहऱ्यांना झुकते माप देणे इत्यादी. पण त्या साऱ्या नियमांना गांधी घराण्याचा अपवाद केला गेला. या स्थितीत कोण काँग्रेसकडे पाहणार हाही सवाल आहे. उदयपूरच्या शिबिरात हार्दिक किंवा जाखड का दिसत नाहीत, याबद्दल राहुल-प्रियांका सोडा पण सोनिया गांधींनी तरी जाणण्याचा प्रयत्न केला असेल का? राजकारण हा उगवत्या सूर्याची व टोकाच्या अशक्यतेची कला (आर्ट ऑफ द इंपॉसिबल) आहे असं म्हणतात. ज्या किल्ल्याचे एकामागोमाग एक बुरूज राज्याराज्यात ढासळत आहेत त्या किल्याच्या आसऱ्याला कोण जाईल, भाजपच्या या वादळात काँग्रेस पुन्हा कशी उभारी घेईल यासारखे प्रश्न या पक्षाच्या हितचिंतकांना भेडसावत आहेत ते स्वाभाविक आहेत. कारण सशक्त विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरजच असते. तसे नसतील तर नोटाबंदी, कोरोनाच्या पहिल्या लाटेतील अचानक घोषित केलेली टाळेबंदी-लॉकडाऊन किंवा अर्ध्या कच्च्या जीएसटी कायद्यासारखे निर्णय जनतेवर अक्षरशः लादले जातात हे आपल्या देशाने अनुभवले आहे.

काँग्रेस आजही देशभरात कार्यकर्त्यांचे जाळे असलेला पक्ष आहे. भाजप नेतृत्व आणि त्यांच्या मातृसंस्थेलाही व त्यांच्या नेत्यांनाही हे नेमके माहिती आहे. त्यामुळेच त्यांचा हल्ला काँग्रेसवरच राहतो. भाजपला आजही मोठी धास्ती काँग्रेसचीच वाटते हे सत्य आहे. प्रश्न काँग्रेसचा आहे! या पक्षात फिनिक्स झेप घेण्याची पुरेपूर क्षमता आहे. ती जागविणारा नेता पक्षाला कधी मिळेल यावर देशातील सध्याचे एकचालकानुवर्तित्व संपणे अवलंबून आहे. सध्या मस्तीत भाजप नेते, त्यांचे पीए वगैरे आहेत. किंबहुना ते असतीलही. सत्तेची मस्तीच तशी असते ! पण देशाची सत्ता हातून गेलेल्यालाही आता ८ वर्षे झाली तरी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची गुर्मी कायम असल्याचा अनुभव दिल्लीत येतो त्यावर उतारा काय, या प्रश्नाची उकल कधी होणार व ती कोण करणार हा सवाल आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0