बाय बाय टाईपरायटर

बाय बाय टाईपरायटर

२०१२ साली अखेरच्या टाईपरायटरचे उत्पादन करून त्याला मूठमाती देण्यात आली. सायक्लोस्टाईल तंत्र केव्हाच इतिहासजमा झाले. त्यावर आधारित छपाईयंत्रांची जागा आता प्रिंटर्स, फोटोकॉपी मशीन्स आणि संगणक-नियंत्रित ऑफसेट उपकरणांनी घेतली आहे.

संगणकानां सर्व्हरोऽहम्
संगणकाचे भाऊबंद – १
इलेक्ट्रॉनिक्सच्या युगात संगणक

‘पीसी’चे आगमन हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात मोठा बदल करणारी घटना ठरली. वैयक्तिक पातळीवरील अनेक कामांचा उरक वाढला नि त्यात अधिकाधिक बिनचूकता आणणे शक्य होऊ लागले. संगणकांची निर्मिती जरी गणिती प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी झाली असली, तरी त्याच्या निर्मात्यांनी त्याची कुवत ध्यानात घेऊन शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी त्याला अन्य वैयक्तिक कामांसाठी वापरून घेता येईल यासाठी बदल करण्यास सुरूवात केली.

PDP -१  मध्ये प्रथमच मिळालेली मजकूर लिहिण्याची (Text Editing) ची सोय ही संगणकाचा वापर दस्त-निर्मितीसाठी करण्याची सुरूवात होती. यापूर्वी असा मजकूर तयार करण्यासाठी टाईपरायटर या यंत्राचा वापर केला जात असे. दस्त तयार करण्यासाठी प्रथम त्याला एक कागद जोडावा लागत असे. यंत्रावर इंग्रजी मुळाक्षरे, आकडे आणि विरामचिन्हे यांच्यासाठी प्रत्येकी एक कळ (Key) असलेला एक कळफलक (Key-board) असे. आज केवळ अधिकृत दस्त ऐवजांवर मोहोर उमटवण्यापुरते उरलेले ‘शिक्के’ ज्या पद्धतीने शाई लावून दाबून उमटवले जातात, त्याच तंत्राने या कळफलकावरील प्रत्येक कळ ही कागदावर दाबून उमटवली जात असे. त्यासाठी कागद आणि कळ यांच्यामध्ये एक सुक्या शाईची एक पट्टी असे. शिक्क्याची जागा निश्चित असल्याने, एक अक्षर उमटले की कागद पुढे सरकवावा लागे. अशा तऱ्हेने एक ओळ पुरी झाली, की नव्या ओळीसाठी कागद एक ओळ वरच्या दिशेने सरकवणे गरजेचे असे. एका कागदाची छपाई पुरी झाली, की तो यंत्रातून काढून दुसरा कागद त्यात सरकवावा लागे. या छपाई तंत्राचा तोटा हा, की या प्रकारे एका वेळी एकच कागदाची छपाई होत असे. आणि दुसरे म्हणजे एकाच मजकुराच्या एकाहून अधिक प्रती तयार करायच्या असल्या, तरी प्रत्येक कागद स्वतंत्रपणे छापावा लागे.  या यंत्रातील सुक्या शाईच्या पट्टीचा भाईबंद असलेल्या ‘कार्बन-पेपर’चा वापर करून एकाच वेळी दोन दोन प्रती तयार करणे शक्य झाले. पण त्याहून अधिक प्रती एकाच वेळी बनवणे शक्य नव्हते. (टाईपरायटर्सच्या इतिहासाबाबत अधिक माहितीसाठी)

टाईपरायटर्स पूर्वी शिक्क्यांचे हेच तंत्र पुस्तके छापण्यासाठी वापरले जात असे. हे तंत्र अठराव्या शतकाच्या अखेरीस अल्वा सेनेफेल्डर या जर्मन लेखकाने वापरायला सुरूवात केली होती. ज्याप्रमाणॆ शिक्क्यांमध्ये मजकूराचा भाग रबरी उंचवट्याच्या स्वरूपात तयार केला जातो, त्याचप्रमाणॆ मजकुराचे एक पूर्ण पान दगडावर कोरले जात असे. मग त्यावर शाई वा तत्सम रसायन फासून त्याचे कागदावर ठसे उमटवले जात. यांत्रिक छपाई यंत्राचा शोध लागण्यापूर्वी एकाच मजकुराच्या अनेक प्रती करण्यासाठी हे तंत्र वापरले जाई. हे किचकट तर होतेच, शिवाय प्रत्येक पान छापून पुरे झाले की त्या दगडाला पुन्हा सपाट करून पुढचे पान नव्याने कोरावे लागे. (किंवा प्रत्येक पानासाठी नवा दगड वापरणे गरजेचे असे, जे अधिक खर्चिक होते.) अशा तऱ्हेने दगडाची झीज होत जाऊन हे ‘छपाई यंत्र’ नष्ट होऊन जाई. पहिला दगड झिजला की दुसरा शोधावा लागे. दगडाला ग्रीक भाषेत ‘Lithos’ म्हटले जाते. त्यावरून या तंत्राला लिथोग्राफी म्हटले जात असे.

पुढे दगडाऐवजी धातूच्या प्लेट्स वापरल्या जाऊ लागल्या. यांचा फायदा असा की जुन्या प्लेटचा धातू वितळवून पुन्हा नवी प्लेट तयार करता येत होती. त्यामुळॆ दगडाप्रमाणॆ पुन्हा पुन्हा नवी प्लेट शोधण्याचा त्रास नाहीसा झाला. नुकत्याच अस्तंगत झालेल्या फिल्म कॅमेऱ्यातील फिल्म ज्याप्रमाणे ‘निगेटिव’ तयार करे, त्या धर्तीवर ही प्लेट तयार करण्यासाठी साचा बनवण्याचे तंत्र विकसित करण्यात आले. हे साचा बनवण्याचे तंत्र मेणाचा पातळ थर दिलेल्या कापडावर वापरून, हलके आणि सहज वापरता येण्याजोगे ‘सायक्लोस्टाईल’ तंत्र विकसित करण्यात आले. या कापडावर मजकुराच्या जागी मेण काढून टाकलेले असे तर उरलेल्या कापडावरचे मेण तसेच राही. यामुळे फक्त मजकुराच्या ठिकाणी वरून लावलेली शाई कापडातून पार होत खालच्या कागदापर्यंत पोचे आणि त्याचा शिक्का उमटत असे. (संगणकाच्या जमान्यात फोटोशॉप किंवा तत्सम फोटो एडिटरमध्ये ‘फ्लिप कलर’ नावाचा एक प्रकार असतो. ज्यात काळ्याच्या जागी पांढरा नि पांढऱ्याच्या जागी काळा रंग येतो, तसाच प्रकार.) हा कापडी साचा एका लाकडी चौकटीवर बसवून त्याखाली कागदांचा गठ्ठा ठेवला जाई. साच्यावरून शाईचा एक रुळ फिरवला की खालच्या कागदावर साच्याच्या उलट (निगेटिव फिल्म पासून फोटो छापला जाई तसे) मजकूर छापला जाई. जरी यातही प्रत्येक पानाचा स्वतंत्र साचा बनवणे आवश्यक असले, तरी एकदा तो तयार झाला की काही मिनिटात अनेक प्रती बनवणे शक्य झाले. हे साचा बनवण्याचे तंत्र टेक्स्टाईल उद्योगात प्रथम वापरले गेले आणि तिथूनच पहिल्या काही पिढ्यांच्या संगणकांना आज्ञावली पुरवणाऱ्या ‘पंच कार्डस्’ आणि छपाई करणाऱ्या सायक्लोस्टाईल तंत्रामध्ये आले.

’A Cyclostyle copying machine by the Gestetner Manufacturing Company,1890’

’A Cyclostyle copying machine by the Gestetner Manufacturing Company,1890’

सायक्लोस्टाईल प्रक्रियेमध्ये टाईपरायटरप्रमाणे प्रत्येक प्रत स्वतंत्रपणॆ तयार करावी लागत नसली, तरी प्रत्येक पान स्वतंत्रपणेच तयार करावे लागत असे. शिवाय प्रत्येक प्रतीचे मुद्रण अथवा छपाई स्वतंत्रपणेच करावी लागत असे.  प्रत्येक कागदाची छपाई पुरी झाली, की वरचा कागद काढून साच्यावरून पुन्हा नव्याने रुळ फिरवून पुढची प्रत तयार करावी लागे. हे काम माणसालाच करावे लागत असे. सुधारित यंत्रांमध्ये रुळ एका जागी ठेवून कागदच त्यावरुन फिरवला जाई. यामुळे कागद बदलणॆ आणि छपाई ही दोन्ही कामे एकाच क्रियेने पुरी होऊ लागली. हेच तंत्र पुढे संगणकाचा सोबती म्हणून आलेल्या प्रिंटरमध्ये आणि पुस्तके तसेच वृत्तपत्रीय छपाई यंत्रांमध्ये वापरले जाते. प्रत्येक प्रत स्वतंत्र टाईप करण्यापेक्षा याचा वेग अधिक असल्याने या प्रकारात प्रतींची संख्या अनेक पटीने वाढवणे शक्य झाले. पुढे या तंत्रावर आधारित लिथोग्राफ नावाचे यंत्रच तयार करण्यात आले, ज्यात प्रत्येक प्रतीनंतर छापलेला कागद काढून घेण्याचे आणि नवीन प्रतीसाठी शाईचा रुळ फिरवण्याचे काम यंत्राने केले जाऊ लागले. विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत हेच तंत्र – सुधारित, अधिक कार्यक्षम यंत्रांसह- पुस्तकांच्या आणि वृत्तपत्रांच्या छपाईसाठी वापरले जात असे.

या साऱ्या तंत्रांना अजूनही काही मर्यादा होत्या. एकदा तयार केलेल्या मजकुरात अथवा साच्यामध्ये बदल करणे शक्य नव्हते. त्यासाठी जुना साचा मोडून नवा बनवावा लागे. अपवादात्मक चुकांसाठी टाईपरायटरवर तयार केलेल्या प्रतीवर चुकीच्या मजकुरावर पांढरी शाई (‘White Ink’)  लावून योग्य तो मजकूर हाताने लिहिला जात असे. भविष्यात या मजकुराची आणखी एखादी प्रत आवश्यक असेल तर ती पुन्हा नव्याने तयार करावी लागे. (धार्मिक पुस्तकांसारख्या वारंवार छापाव्या लागणाऱ्या पुस्तकांसाठीचे दगडी अथवा धातूचे साचे जपून ठेवावे लागत.) याशिवाय एकाच प्रकारच्या मजकुरासाठी वारंवार टाईप करण्याची गरज पडे. उदाहरणार्थ, एकाच मजकुराचे पत्र एकाहून अधिक व्यक्तींना पाठवण्याची गरज असेल, तर केवळ त्या व्यक्तीचे नाव अथवा मायना यासाठीच नव्या छपाईची आवश्यकता पडे. पत्राचा मजकूर तोच ठेवून फक्त मायना बदलणे शक्य नव्हते. एका व्यक्तीकडे असलेल्या मजकुराची प्रत अन्य व्यक्तीलाही हवी असल्यास पहिल्या व्यक्तीने आपली प्रत तिला देणे गरजेचे होते, किंवा तिची आणखी एक प्रत बनवणे गरजेच होते, जे सामान्य व्यक्तीच्या कुवतीचा भाग नव्हते.

PDP -१  ने पहिला Text Editor उपलब्ध करुन दिल्यामुळे माणसाला आवश्यक अशा दस्ताऐवजांच्या निर्मितीचे कामही आता संगणकाद्वारेच करता होऊ लागले. तयार झालेली प्रत ही संगणकाच्या साठवण केंद्रात साठवून ठेवता येत असल्याने तिचा पुनर्वापरही शक्य होऊ लागला. संपूर्ण मजकूर तयार झाल्यावरही त्या दस्तऐवजातील चुकांची दुरुस्ती करणे, अथवा बदल करणे सोपे झाले. त्यासाठी पुरा मजकूर नव्याने भरण्याची गरज उरली नाही. उदाहरणार्थ, एका व्यक्तीला लिहिलेल्या पत्रांमध्ये किरकोळ बदल करुन अन्य व्यक्तीला पाठवण्याची सोय झाली. यातून दस्तांच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. हे साधारणपणॆ सायक्लोस्टाईलमधील कापडी साच्याप्रमाणे असले, तरी त्याहून एक पाऊल पुढे टाकणारे होते. सायक्लोस्टाईलचा साचा एकाच मजकुराचा अनेक प्रतींसाठी असे; तर हा प्रमाणित साचा पत्रांच्या धाटणीच्या वेगवेगळ्या मजकुरांसाठी असतो. उदाहरणार्थ, प्रेषकाचे नाव, पत्ता, प्रेषकाचे नाव, तारीख, सही इत्यादि मजकूर बहुतेक पत्रांत येत असल्याने, त्यांच्यासाठी निश्चित जागा असलेला दस्ताची एक प्रत कायमस्वरूपी साठवून ठेवली जाऊ लागली. पुढे या प्रती असे दस्त तयार करण्यासाठी विकसित झालेल्या आधुनिक Text Editor  मध्ये समाविष्ट केल्या जाऊ लागल्या. कालांतराने त्यांचे प्रमाणीकरण होऊन अशा वारंवार वापरल्या जाणाऱ्या पत्रव्यवहाराचे, कायदेशीर दस्तऐवजांचे  नमुने तयारच मिळू लागले. यांना ‘टेम्प्लेट्’ (Template) म्हटले जाते.

टाईपरायटरचा आणखी एक तोटा असा, की त्यावरचा कळफलक हा केवळ एकाच भाषेपुरता मर्यादित होता. त्यामुळे त्यावर एकाहून अधिक भाषा असलेला मजकूर टाईप करणे शक्य नव्हते. अन्य भाषेतील मजकुरासाठी स्वतंत्र यंत्र तयार करावे लागे. संगणकामध्ये ही मर्यादाही दूर करण्यात आली. मूळ कळफलकावरील Keys ना अन्य भाषेतील मुळाक्षरे अथवा विरामचिन्हांशी जोडून त्याच संगणकावर इंग्रजीखेरीज अन्य भाषेतील मजकूर तयार करता येऊ लागला. याचा आणखी एक फायदा म्हणजे एकाचा दस्तऐवजात एकाहून अधिक भाषांतील मजकूरही समाविष्ट करता येऊ लागला. एकाच आकाराच्या मजकुराऐवजी जाड अथवा तिरपा ठसा वापरणॆ, कमी-जास्त आकाराच्या ठशातील मजकूर वापरणे शक्य झाले. पुढे संगणकाचा पडदा अथवा मॉनिटर रंगीत झाला तेव्हा त्यात रंगही समाविष्ट झाले. त्याही पुढे जाऊन निव्वळ मुळाक्षरे, अंक वा आकडे, विरामचिन्हे यांच्यापलिकडे जाऊन नव्या चिन्हांची निर्मिती करून भाषेतही भर घालणे शक्य झाले. संगणकीय संवादभाषेमध्ये भावचित्रांचा (emoticon) समावेश झाला. शब्दांऐवजी भावनादर्शक चित्रच मुळाक्षराप्रमाणॆ वापरता येऊ लागले (माणूस पुन्हा आदिम चित्रभाषेशी नाते सांगू लागला.)

संगणकाने दस्तनिर्मिती इतकी सुलभ नि संपृक्त केल्यामुळे अपरिहार्यपणे टाईपरायटर या प्रस्थापित यंत्राची गरज संपत आली. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकापर्यंत टायपरायटर आणि टायपिंग हा माणसाच्या व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दस्तनिर्मिती हा एक मोठा व्यवसाय होता. पदवीधर होऊन किंवा न होता देखील केवळ टायपिंगचे प्रशिक्षण देणार्‍या ‘इन्स्टिट्यूट्स’ जागोजागी उभ्या होत्या. त्यातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान पोटापुरता रोजगार मिळेल याची खात्री असे. इंग्रजी भाषेशी फारसे सख्य नसलेला एखादा मराठी भाषिक केवळ मराठी टायपिंग शिकून रोजगार मिळवू शकत असे. पण आज संगणकाचा वापर करण्यासाठी त्या रोजगारासाठीही त्याला किमान जुजबी इंग्रजीची आवश्यकता असते. केवळ भाषिक ज्ञानासोबतच अनेक पट गुंतागुंतीच्या झालेल्या संगणकीय एडिटर्समध्ये उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांचीही माहिती करून घेण्याची, त्यांच्या वापराचे कौशल्य विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ भाषिक असलेला रोजगार तांत्रिक क्षेत्राकडे सरकला आहे आणि निव्वळ कौशल्याला आता बौद्धिक जोडही आवश्यक बनली आहे…

२०१२ साली अखेरच्या टाईपरायटरचे उत्पादन करून त्याला मूठमाती देण्यात आली. सायक्लोस्टाईल तंत्र केव्हाच इतिहासजमा झाले. त्यावर आधारित छपाईयंत्रांची जागा आता प्रिंटर्स, फोटोकॉपी मशीन्स आणि संगणक-नियंत्रित ऑफसेट उपकरणांनी घेतली आहे. संगणकयुगाने यंत्रयुगाच्या अस्ताची केलेली ही सुरूवात आहे. संगणकाच्याच कुळातले त्याचे अनेक भाईबंद त्याच्या या कामात हातभार लावत आहेत.

डॉ. मंदार काळे, संख्याशास्त्रज्ञ संगणकतज्ज्ञ आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0