काव्य-संगीताचे आदानप्रदान

काव्य-संगीताचे आदानप्रदान

हिंदू-मुस्लिम संवाद - भारतातील अनेक राजवटींचे बगदादमधील खलिफा आणि उत्तरकालीन सुलतान यांच्याशी राजनैतिक संबंध होते. बगदादमध्ये जी अनेक ग्रंथालये आणि विद्याकेंद्रे निर्माण झाली त्यांमधून अनेक भारतीय विद्वान आणि कलाकारांना आमंत्रित केले जात होते. यातून विद्या आणि विचारांचे आदानप्रदान सुरू झाले होते.

केरळ : मुस्लिम असल्याने मंदिराने नृत्यास परवानगी नाकारली
‘लौंडा डान्स’चे जनक रामचंदर मांझी यांचे निधन
महाराष्ट्राची ‘कला’ का नाही?

इस्लामने अगदी सुरुवातीपासून काव्य, संगीत, नृत्य अशा कलांच्या सादरीकरणाला निषिद्ध ठरविले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या कला त्या काळी मक्का आणि मदिना परिसरातील श्रीमंत लोक आणि व्यापारी इतक्याच मर्यादित असत. नृत्यामध्ये अंगप्रदर्शन आणि उत्तान हावभाव प्रामुख्याने असत. या नृत्याबरोबर जे संगीत असे ते मात्र तत्कालीन अरबी संगीत असे. या बरोबरचे जे प्रासंगिक काव्य असे ते बहुतेक वेळा कुणाच्या तरी स्तुतीचे वा निंदेचे असे. इस्लामच्या सुरुवातीच्या काळात या सर्व गोष्टींचा इस्लामला आणि स्वतः पैगंबरांना अतिशय त्रास झाला होता. मदिनेला स्थलांतर झाल्यावर मात्र उत्तरोत्तर पैगंबरांचा काव्य आणि संगीत या कलांबाबतचा दृष्टिकोन हळूहळू बदलत गेला. कबिलेवाले बदाऊन अरब या भटक्या टोळ्या असत. अशा टोळीजीवनात संगीताचे स्वतःचे एक वेगळे स्थान असते. स्वतः पैगंबरांची काव्य आणि संगीत या बाबतची अभिरूची उच्चप्रतीची होती. या मुळे काव्य आणि संगीत या दोन्ही कला प्रकारांबाबत पैगंबरांचा आणि इस्लामचा जो तीव्र निषेधाचा सूर होता तो मवाळ झाला असे संकेत प्रमुख मुसलमानांना मिळाले. इस्लामची सुरुवातीची शंभर वर्षे जरी कुठल्याही कलांना राजाश्रय मिळाला नसला तरी नंतर मात्र सूफी संप्रदायाच्या प्रभावाने बगदाद या राजधानीच्या शहरातले चित्र हळूहळू बदलत गेले. आणि सादरीकरणाच्या कलांना राजाश्रयही मिळत गेला.

इराणमध्ये स्वतंत्र पर्शियन संगीत त्या आधी दीड हजार वर्षे तरी अस्तित्वात होते. बगदाद काळात बगदादमध्ये या दोन्ही संगीत परंपरांचा मिलाफ होत होता. या नंतर बगदाद परिसरातील इस्लामी राज्य आणि इराणमधील इस्लामी राज्य या दोहोंवर मध्य आशियातून हल्ले सुरू झाले. या हल्ल्यांचा चोख बीमोड दोन्हीकडे होत होता. मध्य आशियातून येणारे लोक मंगोल, मंगोल-तुर्क आणि इतर मध्य आशियायी टोळ्या असत. त्यांनी आपल्या बरोबर मध्य आशियाचे संगीत आणले. अरबी, पर्शियन आणि मध्य आशियायी अशा मिश्र संकरातून एक अगदीच निराळी परंतु स्वतंत्र शैली इस्लामी संगीतात प्रस्थापित झाली. इसवीसनाच्या अकराव्या आणि बाराव्या शतकात नाव घेण्याजोगी एकही मुसलमान राजवट भारताच्या मुख्य भूमीवर उदयास येऊ शकली नाही. परकीय लोकांना लढाया किंवा मोठ्या लढाया स्वतःच्या सैनिकी ताकदीवर जिंकता येतात. परंतु एखादा भूप्रदेश काबीज करून तिथे राज्य स्थापन करण्यासाठी नुसतेच सैन्य कामाचे नसते. सुमारे दोनशे वर्षे परकीय मुसलमान राज्य स्थापनेच्या विचाराने तयारी करीत होते आणि एतद्देशीय हिंदू राज्ये प्रतिकार करीत होती. या संपूर्ण दोन शतकातील राजकारणाचा थोडक्यात विचार पुढे स्वतंत्र करूयात. मुघलांच्या आधी सुमारे सव्वातीनशे वर्षे दिल्ली परिसरात दिल्लीला केंद्र मानून ज्या मुसलमान राजवटींनी राज्य केले त्यांना भारताच्या मध्ययुगीन इतिहासात दिल्ली सल्तनती म्हणले जाते. कालानुक्रमे ग़ुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद आणि लोदी या त्या पाच सल्तनती होत. मुहम्मद घोरीचा विश्वासू ग़ुलाम कुतुबुद्दीन ऐबक हा भारतातल्या पहिल्या मुसलमान सल्तनतीचा संस्थापक समजला जातो.

भारताचा आणि भारताच्या समृद्धीचा आणि सुबत्तेचा दबदबा भारताव्यतिरिक्त उर्वरित जगावर त्या आधी किमान दीड ते दोन हजार वर्षे होता. आज ज्या प्रमाणे सर्व लोक अमेरिकेत जाण्यासाठी तळमळत असतात अगदी तसेच भारतात येण्यासाठी उर्वरित जगातील लोक तळमळत असत. भारतातील अनेक राजवटींचे बगदादमधील खलिफा आणि उत्तरकालीन सुलतान यांच्याशी राजनैतिक संबंध होते. बगदादमध्ये जी अनेक ग्रंथालये आणि विद्याकेंद्रे निर्माण झाली त्यांमधून अनेक भारतीय विद्वान आणि कलाकारांना आमंत्रित केले जात होते. यातून विद्या आणि विचारांचे आदानप्रदान सुरू झाले होते. बाराव्या आणि तेराव्या शतकातील मध्य आशियायी आणि मंगोल आक्रमणांमुळे बगदादमधील सत्ता खिळखिळी होऊन संपून गेली आणि अरबी या भाषेचे प्रमुख स्थान पर्शियनला प्राप्त झाले. मध्य आशियातील लोकांना अरबीहून पर्शियन स्वीकारणे सोपे होते. कारण त्यांच्या स्वतःच्या बोलीभाषा भारोपीय वर्गातील होत्या.

ग़ुलाम सल्तनतीच्या आधी कुणाही परक्या मुसलमान राजवटीला भारतात स्थिरस्थावर जम बसविणे शक्य झाले नव्हते. राज्य करायचे तर प्रजेला कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असणे आणि प्रशासन तेवढेच उत्तम आणि बऱ्यापैकी न्यायप्रिय असावे लागते. ग़ुलाम आणि नंतरची खिलजी सल्तनत या दोन्ही राजवटींनी मिळून सुमारे शंभर वर्षे भारतात दिल्लीमध्ये अतिशय स्थिर सत्ता निर्माण केल्या आणि बरीच वर्षे टिकवल्या. याच काळात मंगोलांनी मध्य आशियातून भारतावर अनेक आक्रमणे केली. परंतु सुदैवाने ही सर्व आक्रमणे दिल्लीतील या दोन्ही सल्तनतींनी हुसकावून लावली.

स्थिर राजवट मिळाल्यानंतर राज्यकर्ते कलांना प्रोत्साहन देतात आणि प्रजेच्या कल्याणाचे काम करण्याचा प्रयत्न करतात. अकराव्या आणि बाराव्या शतकात जरी प्राथमिक संपर्क झाला असला तरी तेराव्या शतकापासून पर्शियन विद्वान आणि भारतातील एतद्देशीय संस्कृत आणि लोकभाषांमधील विद्वान यांच्यामधील संपर्क उत्तम स्थापित झाला होता. उत्तर भारतात अनेक महत्त्वाच्या शहरांमधून पर्शियन आणि संस्कृत महाविद्यालयांचे जाळे निर्माण झाले होते. सांस्कृतिक देवाण-घेवाण सुरू झाली होती. भारताच्या तेराव्या शतकातील सांस्कृतिक जीवनावर अमीट ठसा उमटविणारा बहुभाषाकोविद विद्वान, साहित्यकार आणि कलाकार म्हणजे अमीर खुसरो (जन्म : इ. स. १२५२) होय. आपण भारतीय असल्याचा स्वाभाविक अभिमान स्पष्ट शब्दांत याने वेळोवेळी व्यक्त केलेला आढळतो. याने पर्शियन वाङ्मयाची एक स्वतंत्र शैली विकसित केली. जी सबक-ई-हिंद या नावाने ओळखली जाते. अमीर खुसरोला बरेच जण उर्दूतील पहिला लेखक म्हणतात. कारण याने हिंदवी या एतद्देशीय भाषेत आणि खड़ी बोली अशा भारतीय भाषांमधूनही साहित्य लिहिले. उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील गज़ल, खयाल, कव्वाली, रुबाई आणि तराणा या प्रकारांचे जनकत्व अमीर खुसरोंकडे जाते. यांनी भारतीय आणि इराणी रागांचे सुंदर मिश्रण करून एक नवीन रागशैली इमान, जिल्फ़, साजगरी इत्यादींना जन्म दिला. आजच्या भारतीय शास्त्रीय संगीतात साथीची वा स्वतंत्र वाद्ये म्हणून ज्यांना अविभाज्य स्थान आहे अशा सतार आणि तबला या दोन्ही वाद्यांचे जनकत्वही अमीर खुसरोंना दिले जाते. वास्तविक असा कुठलाही ऐतिहासिक आधार मात्र दोन्ही वाद्यांबाबत आजपर्यंत सापडलेला नाही.

पर्शियन-अफगाण संस्कृतीने आपल्या बरोबर इथे येत असताना किमान दहा-वीस तऱ्हांची तंतुवाद्ये आणि तालवाद्ये सोबत आणली होती. या संगीताचा पहिला संपर्क आणि मुकाबला पंजाब प्रांतात पंजाबी संगीताशी झाला. पंजाबातील लोकसंगीत, सूफी संगीत आणि शास्त्रीय संगीतातील पतियाळा घराणे अशा तीन भिन्न शैली आजच्या संगीतात सापडतात.

या नंतर वर उल्लेख केलेली इराणी-अफगाणी संगीत परंपरा हळूहळू भारतात पूर्वेकडे पसरू लागली. अमीर खुसरोच्या काळात होळीसारखे इतर काही उत्सव सूफी संप्रदायाचे लोक भारतीय संगीतासह साजरी करीत असत. सूफी संप्रदाय आणि एतद्देशीय भक्ती संप्रदाय यांची मूलतत्त्वे बहुतेक समान होती. त्यामुळे हिंदू आणि मुसलमान यांच्या सामाजिक संबंधांपुरता भारतातील सर्वच राजकारणी लोकांनी, सामाजिक सौहार्द टिकविण्यासाठी वापर करून घेतला.

उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासात ग्वाल्हेरच्या राजा मानसिंह तोमर यांचे नाव आणि सांगीतिक कर्तृत्व याचे तपशील जाणून घेणे अपरिहार्य आहे. सुप्रसिद्ध तोमर राजघराण्यातील ऐतिहासिक पुरुष राजा मानसिंह यांनी इ. स. १४८६ ते इ. स. १५१८ पर्यंत ग्वाल्हेर येथे राज्य केले. मानसिंह स्वतः उत्तम संगीतकार होते. त्यांनी ‘मानकुतूहल’ या ग्रंथाची रचना केली. ध्रुपद, धमार, टप्पा, तराणा, ठुमरी वगैरे सांगीतिक प्रकार यांनी निर्माण केले. आजही शास्त्रीय संगीतात ग्वाल्हेर घराणे हे एक सुस्थापित घराणे आहे. भारतीय संगीतातील अनेक रागांचा उगम हा राजा मानसिंह यांच्या काळापासून सुरू झालेला दिसतो.

भारतीय शास्त्रीय संगीतात आज प्रामुख्याने दोन शैली प्रचलित आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय जी प्राधान्याने उत्तर भारतीय आहे. आणि कर्नाटकी (carnati) म्हणजे दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीत. दिल्ली सल्तनतींपासून वेगळे होऊन मुसलमानांनी दक्षिण भारतात बहामनी राजवट निर्माण केली. तो पर्यंत इसवीसनाचे चौदावे शतक उजाडले होते! इस्लामी संगीत आणि दक्षिण भारतीय संगीत यांच्या मिलाफाविषयी पुढच्या लेखात.

राजन साने, हिंदू-मुस्लिम संवादाचे अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0