हाथरस आरोपींवर बलात्कार व खूनाचे आरोप निश्चित

हाथरस आरोपींवर बलात्कार व खूनाचे आरोप निश्चित

नवी दिल्लीः हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयने आपल्या आरोपपत्रात ४ आरोपींवर सामूहिक बलात्कार व खूनाचे आरोप निश्चित केले आहेत. हे आरोपपत्र हाथरसम

सोहराबुद्दीन: आरोपीने खुनाची कबुली दिली, तरी न्याय नाहीच
मोदी सरकारच्या हाती आर्थिक ‘गुन्ह्यां’चे शस्त्र
सुशांत सिंगची आत्महत्याच: एम्सचा अहवाल

नवी दिल्लीः हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयने आपल्या आरोपपत्रात ४ आरोपींवर सामूहिक बलात्कार व खूनाचे आरोप निश्चित केले आहेत. हे आरोपपत्र हाथरसमधील एका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या आरोपींची नावे संदीप, लवकुश, रवी व रामू अशी आहेत. या चौघांवर अनु.जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही आरोप लावण्यात आले आहेत.

हे आरोपपत्र दाखल केल्यानंतर मृत मुलीच्या भावाने सत्य नेहमीच शेवटी येते, अशी प्रतिक्रिया देत सीबीआयने अखेर गुन्हेगारांवर आरोप दाखल केले असे मत व्यक्त केले.

या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप ठाकूर याने उ. प्रदेश पोलिसांना लिहिलेल्या पत्रात त्याच्यासह अन्य तिघांना विनाकारण अडकवले जात असल्याचा आरोप केला आहे. पीडित मुलीच्या आईने व तिच्या भावाने उलट आमच्यावर हल्ले केले, त्यांच्याविरोधात सरकारने काहीच कारवाई केली नाही, असा आरोप केला आहे. आम्हाला न्याय हवा आहे, अशी मागणी संदीप ठाकूरने केली आहे.

नेमके प्रकरण काय घडले ?

ही घटना १४ सप्टेंबर रोजी दिल्लीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावरील हाथरस येथे घडली होती. या तरुणीचे सर्व कुटुंबीय गवत कापण्यासाठी शेतावर गेले होते. तिचा मोठा भाऊ लवकर घरी परतला, तर आई व बहीण (पीडित तरुणी) एकमेकींपासून बऱ्याच अंतरावर गवत कापत होत्या. त्यावेळी चार-पाच जणांनी या तरुणीला मागून येऊन पकडले. मुलगी दिसत नाही हे लक्षात आल्यानंतर आई तिला शोधू लागली असता, बेशुद्धावस्थेत त्यांना आपली मुलगी सापडली.

बेशुद्धावस्थेतील ही तरुणी नंतर ९ दिवसांनंतर २१ सप्टेंबरला शुद्धीवर आली. त्यानंतर तिने घडलेली घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली व २३ सप्टेंबरला पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला होता.

आरोपींनी या मुलीला गळा दाबून मारायचा प्रयत्न केला होता. तरुणीवर झालेल्या नृशंस हल्ल्यात तिला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर्स झाली होती, पाठीचा मणका मोडला होता, तिची जीभही छाटलेली होती. तिचे पाय अधू झालेले होते, तसेच हातही अंशत: अधू झालेले होते. मणका मोडल्याने तिचे शरीर अधू होत चालले होते व नंतर तिला श्वास घेताना त्रास होत होता.

या मुलीला नंतर दिल्लीतल्या सफदरजंग इस्पितळात हलवण्यात आले होते, तिथे तिचा मृत्यू झाला. पण तिचे शव कुटुंबियांना देण्याऐवजी उ. प्रदेश पोलिसांनी पहाटे अडीचच्या सुमारास मृत तरुणीवर अंत्यसंस्कार केले. हे अंत्यसंस्कार करताना पोलिसांनी मृत मुलीच्या कुटुंबियांना घरात कोंडून ठेवले होते. मुलीच्या आईने, वडिलांनी व अन्य नातेवाईकांनी मुलीचे शव ताब्यात घेण्यासाठी अम्ब्युलन्स रोखण्याचा प्रयत्न केला होता पण पोलिसांनी तो हाणून पाडला. मुलीची आई रस्त्यावर बसली होती पण पोलिसांनी आपले बळ वापरत तिला बाजूला करत अम्ब्युलन्सला वाट करून दिली होती. आपल्या मुलीचा मृतदेह ताब्यात न मिळाल्याने असहाय्य आई आक्रोश करत होती. या घटनेची दृश्ये सोशल मीडियावर, न्यूज चॅनेल्सवर प्रसारित झाल्याने देशभर संतापाची लाट उमटली होती.

ही घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उ. प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना दूरध्वनी करून प्रकरणाचा योग्य तपास करावा अशा सूचना दिल्या. त्यानंतर उ. प्रदेश सरकारने एसआयटी नेमण्याचा निर्णय घेतला. नंतर हा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयकडे सोपवण्यात आला.

घटनेचे वृत्तांकन करणार्या पत्रकारावर यूएपीए

या प्रकरणामुळे उ. प्रदेश सरकार व पोलिसांच्या बेजबाबदारपणावर देशभरातून टीका होत असताना या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी हाथरसला जाणारे मल्याळी पत्रकार सिद्धीकी कप्पान यांच्यासह तीन अन्य जणांना ऑक्टोबरमध्ये उ. प्रदेश पोलिसांनी मथुरेतून अटक करून त्यांच्यावर यूएपीए व देशद्रोहाचे आरोप लावले होते.

या चार जणांकडे हाथरस प्रकरणातील मृत तरुणीला न्याय द्या अशा स्वरुपाची छापील पत्रके होती व हे चौघे शांततेचा भंग करण्यासाठी हाथरसला जात होते. त्यांचे घटनास्थळी जाणे हाच कटाचा भाग असल्याचे आरोप पोलिसांनी या चौघांवर लावले होते.

कप्पान यांच्या अटकेवर देशातील अनेक पत्रकार संघटनांनी निषेध व्यक्त केला होता व तो आजही केला जात आहे.

कप्पान हे मल्याळी पत्रकार दिल्लीत राहात असून ते केरळ युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट संघटनेचे दिल्ली शाखेचे सचिव आहेत. तर अन्य तिघांची नावे अतिक उर रहमान, मसूद अहमद व आलम अशी आहेत. या तिघांपैकी रहमान व अहमद हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या विद्यार्थी शाखेचे सदस्य असून आलम हा गाडी चालवत होता.

स्त्रियांवरील अत्याचारांची आकडेवारी

नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने (एनसीआरबी) जानेवारीत प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतात उत्तर प्रदेश हे राज्य स्त्रियांसाठी सर्वांत असुरक्षित आहे, तर त्या खालोखाल मध्य प्रदेशाचा क्रमांक लागतो. २०१८ मध्ये स्त्रियांविरोधात झालेल्या गुन्ह्यांचा आकडा ३,७८,२७७ होता, त्यातील ५९,४४५ गुन्हे एकट्या उत्तर प्रदेशात घडले होते. मध्य प्रदेशात सर्वाधिक बलात्कारांची नोंद झाली. राज्यात वर्षभरात ५,४५० म्हणजे सुमारे १५ दिवसांमागे एक बलात्काराची घटना झाली आहे. स्त्रियांविरोधात झालेल्या गुन्ह्यांची संख्या हळुहळू वाढत आहे. २०१६ मध्ये हा आकडा ३,२२,९२९ होता, २०१७ मध्ये ३,४२,९८९ होती, तर २०१८ मध्ये ३,७८,२७७ झाली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0