नवी दिल्लीः ट्विटद्वारे आपला अवमान झाल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा व कार्टुनिस्ट रचिता तनेजाला कारण दाखवा नोटीस बजावल
नवी दिल्लीः ट्विटद्वारे आपला अवमान झाल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा व कार्टुनिस्ट रचिता तनेजाला कारण दाखवा नोटीस बजावली आहे. न्या. अशोक भूषण, न्या. सुभाष रेड्डी, न्या. एम. आर. शहा यांच्या पीठाने या दोघांना वेगवेगळ्या नोटीस पाठवून ६ आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायालयाने अवमानाप्रकरणी अन्य दोन प्रकरणाच्या सुनावणीत गैरहजर राहण्याची दोघांना सूट दिली आहे.
अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी कामरा यांच्या ट्विटमुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला. त्यांच्या ट्विट वाईट भावनेतून लिहिले गेले होते. अशा ट्विटमुळे सर्वोच्च न्यायालयावर कुणीही हल्ला करू शकतो असा समज जनतेमध्ये जाऊ शकतो, त्यामुळे त्यांच्यावर न्यायालय अवमान १९७१ अन्वये शिक्षा व्हावी, असे मत व्यक्त केले होते.
वेणुगोपाल यांनी रचिता तनेजाविरोधातही त्यांच्या व्यंगचित्रांमुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे व जनतेचा न्यायालयावरचा विश्वास उडेल असे मत व्यक्त केले होते.
या दोघांवरचे आरोप सिद्ध झाल्यास न्यायालयाचा अवमान केला म्हणून ६ महिन्याचा तुरुंगवास किंवा २ हजार रु.चा दंड ठोठावला जाऊ शकतो.
२०१८ साली एकाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात रिपब्लिकन इंडिया या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने गेल्या ऑक्टोबरमध्ये हंगामी जामीन मंजूर केला होता. या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी सुनावणीदरम्यान निराशा व्यक्त केली होती. त्यानंतर अर्णब यांच्या प्रकरणात लावलेला न्याय अन्य अनेक पत्रकार किंवा कार्यकर्त्यांबाबत लावला गेलेला नाही, असा आरोप सोशल मीडियावर केला जात होता. यावर, भाजप सत्तेत आल्यानंतर भिन्न विचारसरणीच्या अनेक पत्रकार-कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले आहे. “या देशातील सुप्रीम कोर्ट म्हणजे सुप्रीम जोक आहे” अशा आशयाच्या ट्विट्सची मालिका कामरा यांनी पोस्ट केली होती.
या ट्विटची तक्रार एक वकील सिद्धीकी यांनी अटर्नी जनरला केली होती. कामरा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीचा फोटो भगव्या रंगात पोस्ट केला आहे, तसेच इमारतीवर भाजपचा ध्वज लावलेला फोटोही पोस्ट केला आहे. अशी ट्विट्स प्रसिद्ध झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाबद्दल लक्षावधींच्या मनात पूर्वग्रह निर्माण होईल, असा दावा सिद्दीकी यांनी केला होता. या तक्रारी दखल घेऊन वेणुगोपाल यांनी कामराविरोधता न्यायालयीन अवमानाचा खटला चालू करण्यास संमती दिली होती.
तनेजा सोशल मीडियावर मुख्यत्वे सरकार, भ्रष्टाचार आणि पुरुषप्रधान व्यवस्थेवर टीका करणारी व्यंगचित्रे नियमित पोस्ट करत असतात. त्यांच्या ट्विटर पेजला १४,०००हून अधिक फॉलोअर्स आहेत. ज्या व्यंगचित्रावरून तनेजा यांच्याविरोधात बेअदबीची कारवाई सुरू करण्यास परवानगी मागितली गेली होती, त्यात भाजप आणि सर्वोच्च न्यायालय अशा दोन आकृत्या दाखवल्या आहेत, त्यांच्या मध्ये रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख गोस्वामी यांच्यासारखी एक आकृती आहे आणि ती आकृती ‘तू जानता नही मेरा बाप कौन है’ असे म्हणत आहे. प्रक्रिया धाब्यावर बसवून गोस्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी केली जाते, याचे कारण त्यांच्या पाठीशी भाजप आहे असा अर्थ यातून निघतो. कामरा यांच्यावरील बेअदबीच्या कारवाईला वेणूगोपाल यांनी संमती दिली, त्याच तारखेचे हे व्यंगचित्र होते.
मूळ बातमी
COMMENTS