‘महाराष्ट्र, शिवसेनासे पंगा लिया हैं’- राऊत आक्रमक

‘महाराष्ट्र, शिवसेनासे पंगा लिया हैं’- राऊत आक्रमक

मुंबईः पीएमसी घोटाळ्यातला पैसा भाजपचे नेते वापरत असल्याचा सनसनाटी आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला. आपल्य

१० जणांच्या पोटात पिगॅससचे गुपित
कोलकाता पोलिसांची नुपूर शर्माविरोधात लुकआउट नोटीस
सामाजिक बांधिलकी निधीचा दुरुपयोग

मुंबईः पीएमसी घोटाळ्यातला पैसा भाजपचे नेते वापरत असल्याचा सनसनाटी आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला. आपल्या सुमारे तासभराच्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या, त्यांचा मुलगा नील सोमय्या, माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे मोहित कंबोज यांच्याकडून हजारो कोटी रु.चा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. पीएमसी बँकेत जेवढ्या पैशाचा घोटाळा झाला हा पैसा भाजपच्या नेत्यांकडे गेला, यांच्याकडून अनेक प्रोजेक्टमध्ये कोट्यवधी रु.ची गुंतवणूक झाली, अनेक कंपन्या निर्माण झाल्या असेही राऊत म्हणाले.

राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत ईडी, सीबीआय, ईडब्लूओ या तपासयंत्रणांच्या तपासावरही आक्षेप घेतले. हिंमत असेल तर माझ्याशी लढा माझ्या नातेवाईकांना, कुटुंबियांना, मित्रांना त्रास कशाला देता असा सवालही त्यांनी केला.

गलत आदमीसे पंगा लिया है, महाराष्ट्र, शिवसेनासे पंगा लिया हैं..असेही ते म्हणाले.

ही पत्रकार परिषद महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून घेतली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्राला त्रास देतायेत असा आरोप करत या संदर्भात आपण उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांना काही दिवसांपूर्वी पत्रही लिहिले होते, असे सांगितले.

किरीट सोमय्यांवर टीका

संजय राऊत यांनी भाजपचे नेते प्रामुख्याने किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली. पीएमसी घोटाळ्यातील पैसा किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनमध्ये गुंतवल्याचा आरोप त्यांनी केला. पीएमसी घोटाळ्यात राकेश वाधवान यांच्यावर आरोप केले जात आहेत, त्यांच्या खात्यातून भाजपच्या अकाउंटमध्ये २० कोटी रु. गेले आहेत. निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीत नील किरीट सोमय्याच्या भागीदार आहेत असेही ते म्हणाले. वाधवान यांची वसईतील ४०० कोटी रु. रकमेची जमीन लडानी याच्या नावावर केवळ साडेचार कोटी रु. घेतली गेली. उर्वरित ८० ते १०० कोटी रु. रोख रकमेत घेतली गेली, असाही आरोप राऊत यांनी केला. निकॉन इन्फ्रास्ट्रक्चरच्या दोन प्रोजेक्टमध्ये यांचे पैसे आहेत. त्यांनी पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केले आहे, त्यांची चौकशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी करावी. किरीट व नील सोमय्याला ताबडतोब अटक करावी, ईडी, सीबीआय, ईओडब्लूने यात लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली.

पीएमसी घोटाळ्याचा पैसा पत्राचाळीत

राऊत यांनी पीएमसी घोटाळ्यातील पैसा हा पत्राचाळच्या व्यवहारात गुंतला असल्याचाही आरोप केला. ही जमीन खरेदी करणारा मोहित कंबोज हा देवेंद्र फ़डणवीस यांचा ‘ब्लू आईड बॉय’ असून तो त्यांना डुबावणार असेही ते म्हणाले. राकेश वाधवान याच्याकडून कंबोज याने १२ हजार कोटी रु.ची जमीन १०० कोटी रु.त खरेदी केली. केबीजी व्हेंचर्स, केबीजी हॉटेल्स, कालभैरव व्हेंचर, अशा अनेक कंपन्यात कुठून पैसा आलाय, याची चौकशी व्हावी अशीही त्यांनी मागणी केली.

मुंबई लुटायची, महाराष्ट्राला बदनाम करायचे हे किरीट सोमय्या करतात. याची सर्व चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी अशी माझी मागणी असल्याचे राऊत म्हणाले. पीएमसी बँक घोटाळ्याचे सर्व पेपर ईडीकडे तीन महिन्यात तीन वेळा पाठवले आहेत. किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयात दही व खिचडी खातो. याच्या बापाचे राज्य आहे का? ईडीचे हे वसुली एजंट आहेत, असाही आरोप राऊत यांनी केला.

ईडी एक वसुली केंद्र असल्याची टीका करत राऊत यांनी जितेंद्र चंद्रलाल नवलानी हे नाव ऐकल्यावर ईडीच्या दिल्लीच्या ऑफिसचा श्वास घुसमटतो. चार महिने ईडीकडून वसुली सुरू आहे. मुंबईतील ७ प्रतिष्ठित बिल्डरकडून ईडीची ३०० कोटी रु.ची वसुली सुरू आहे. ईडीची अय्याशी देशाला सांगेन, अशीही धमकी दिली.

मुंबईत मराठी भाषा सक्तीची असू नये यासाठी किरीट सोमय्या हायकोर्टात गेले होते. हा ‘भ*वा’ मराठी भाषेच्या विरोधात गेला. याचे थोबाड बंद केले नाहीतर आम्ही करू, असा इशारा त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, ‘ईडीच्या धाडी पडण्याआधी मुलुंडचा हा दलाल (किरीट सोमय्या) पत्रकार परिषद घेऊन ईडीची धाड पडणार आहे, असे सांगतो, हा काय प्रकार आहे? आणि पहाटे ३-४ वाजता ईडीची धाड पडते. हे सर्व नेते महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या प्रयत्नात नेहमीच असतात’ असाही आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी भाजपचे काही प्रमुख नेते मला भेटले. त्यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. आम्हाला येथे राष्ट्रपती राजवट आणायची आहे, काही आमदार आमच्यासोबत आहेत. तुम्ही बाहेर पडून आमच्याबरोबर या.. तुम्ही मदत न केल्यास केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला ‘टाइट’ व ‘फिक्स’ करतील. तुम्हाला पश्चाताप होईल.’

ईडीच्या कार्यपद्धतीवर संशय

राऊत यांनी ईडीच्या कार्यपद्धतीवरही संशय व्यक्त केला. ते म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांवर, त्यांच्या निकटवर्तीयांवर, कुटुंबियांवर ईडीच्या धाडी टाकल्या जात आहेत. पवार कुटुंबावर धाडी टाकल्या गेल्या. त्यांना सुद्धा ‘टाइट’ करू असे ईडी म्हणते. आमच्या मुलींच्या, बहिणाच्या घरात शिरून ईडीकडून धमक्या दिल्या जातात.

आम्ही केंद्रीय पोलिस बल आणू, सगळ्यांना थंड करू, अशा धमक्या भाजपच्या दिल्या जातात अशी विधाने राऊत यांनी केली.

राऊत यांनी आपण व आपले सरकार ईडीच्या कारवाईला घाबरणार नाही, तुम्ही काही करा, हे सरकार पडणार नाही, असे सुनावले. भाजपच्या नेत्यांकडून प्रत्येकाला बदनाम करायचा प्रयत्न असून भाजपने हा नालायकपणा सुरू केला आहे, असाही आरोप केला.

‘उद्धव ठाकरे यांचे १९ बंगले दाखवा’

शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपकडून सतत भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. या आरोपांकडून स्वतः ठाकरे यांच्याकडून व शिवसेनेकडून उत्तर आले नव्हते. आता

उद्धवजींनी मला वस्तुस्थिती, सत्य येऊ द्या असे सांगितले. त्यामुळे मी तुमच्यापुढे आज उभा असल्याचे राऊत यांनी सांगितले. आजची पत्रकार ईडीच्या कार्यालयाबाहेर घेण्याचे ठरले होते. पण नंतर विचार करून आम्ही अर्धी पत्रकार परिषद शिवसेना भवनात घेतली असे राऊत म्हणाले. हे बाहेरचे लोक (ईडी) येऊन आमच्यावर दादागिरी करणार असतील, आमच्या बायकांकडे बघणार असतील, भाजपवाले टाळ्या वाजवणार असतील, तर असले राजकारण चालणार नाही, असाही इशारा त्यांनी ईडीला दिला.

उद्धव ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्यांविषयी राऊत म्हणाले, ठाकरे कुटुंबियांनी कोर्लायी गावात १९ बंगले बांधून ठेवले आहेत, असा आरोप केला जातो. माझे त्या दलालाला (किरीट सोमय्या) आव्हान आहे. आपण ४ बसेस करू व १९ बंगल्यात पिकनिक काढू.. पत्रकारांना घेऊन जाऊ. ते बंगले दिसले तर मी राजकारण सोडून देईन, नाहीतर त्या दलालाल जोडे मारू. खोटेपणाचा कळस करायचा, भंपकपणा करायचा. बंगल्यात जाऊ पार्टी करू. लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचा.. महाराष्ट्राविषयी असूया बाळगण्याचा हा यांचा हेतू असल्याचे ते म्हणाले.

राऊत यांनी पाटणकर (उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे माहेरचे आडनाव पाटणकर आहे) यांनी जमिनी घेतल्याच्या आरोपालाही उत्तर दिले. पाटणकरांनी देवस्थानच्या जमिनी विकत घेतली, ही जमीन मला दाखवावी. १२ व्या माणसाकडून पाटणकरांनी खरेदी केली. त्याचा ईडीने तपास करावा असे ते म्हणाले. माझ्या कुटुंबियांच्या ५० गुंठे जमीनाचा तपास ईडी करते. किहीम गावातल्या नातेवाईकांना ईडी त्रास देते. गरीब लोकांना उचलायचं, धमक्या द्यायच्या. संजय राऊतांविरोधात बोलण्यास सांगायचे. तिहार जेलमध्ये धाडण्याची धमकी द्यायचे ही ईडीची कार्यपद्धती असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये २५ हजार कोटी रु.चा घोटाळा झाला. त्याचा तपास ईडीकडून झाला नाही. भाजपच्या एका बड्या नेत्याच्या (माजी वनमंत्री-मुनगुंटीवार) मुलीचे लग्न झाले. त्या मुलीच्या लग्नात जंगलाचा ‘फिल’ यावा म्हणून साडे नऊ कोटी रु.चे कार्पेट टाकलं, याची चौकशी ईडीने करावी. माझ्या टेलरच्या दुकानात जाऊन किती कपडे शिवले याची माहिती ईडी घेत होती. हरयाणातला एक दुधवाला नरवर ५ वर्षात ७ हजार कोटी रु.चा मालक कसा झाला, याचे उत्तर ईडीने द्यावे. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यावर हा दुधवाला श्रीमंत झाला. याच्याकडे कुठून पैसा आला. मनी लाँडरिंग कोण करतेय, नरवरकडे भाजपच्या नेत्यांचा पैसा आहे. साडेतीन हजार कोटी रु. महाराष्ट्रातून त्याच्याकडे गेले, असा आरोपही राऊत यांनी केला.

राऊतांनी भाजपच्या राजवटीत सर्वात मोठा आर्थिक घोटाळा झाला असाही आरोप केला. हा घोटाळा महाआयटीने२५ हजार कोटी रु.चा केला. या घोटाळ्यातील संशयित अमोल काळे कुठे आहेत, त्यांच्या जवळचा विजय ठवंगाळे यांची बँक अकाउंट तपासा. पैसे कसे गेले, ते शोधा. माझ्याकडे पाच हजार कोटी रु.चा हिशेब आलाय, असाही दावा राऊत यांनी केला.

ईडीच्या एकूण कार्यपद्धतीबाबत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांना पत्र लिहिणार असल्याचे राऊत म्हणाले.

अमित शहांना फोन केला आणि त्यांना सांगितले, हे जे सुरू आहे ते योग्य नव्हे. तुम्ही मला त्रास द्या पण माझ्या मित्रांना, मुलांना, नातेवाईकांना त्रास देऊ नका असेही राऊत म्हणाले.

महाराष्ट्र, बंगाल, झारखंड ही राज्ये पाडण्याचे भाजपचे षडयंत्र असून ईडीकडून धमक्या देतात. आमचा डीएनए यांना माहिती नाही. कोणत्याही परिस्थितीत ठाकरे सरकार सत्तेत राहील. २०२४मध्ये देशात परिवर्तन होईल, असेही अखेरीस राऊत म्हणाले.

 

 

 

 

 

 

 

 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0