सेनेटनं चारेकशे पानांचा एक अहवाल तयार केला. चौकशी समितीच्या अहवालातलं पहिलं वाक्य होतं, ''राष्ट्रपती भवनात एक खुनी लपलाय.'' बोल्सेनारो यांच्यावर हत्याकांडाचा गुन्हा दाखल करावा अशी शिफारस या कमीटीनं केली.
ब्राझीलची न्याय व्यवस्था आणि सेनेट यांच्यात आता संघर्ष उद्भवला आहे. सेनेटनं स्वतंत्र चौकशी करून प्रेसिडेंट बोल्सेनारो यांच्यावर कोविड हाताळणी संदर्भात खटला भरावा अशी मागणी केली. ब्राझीलच्या प्रॉसिक्युटरनं सेनेटची मागणी धुडकावली, सेनेटनं केलेले महत्वाचे आरोप फेटाळून लावलेत.
सेनेटला आता प्रॉसिक्यूटरवरच खटला भरून त्यांची हकालपट्टी करायची मोहीम चालवावी लागणार असं दिसतंय.
ब्राझीलमधे सात लाखापेक्षा जास्त माणसं कोविडनं मेली, कोविडचा प्रकोप अजूनही थांबायला तयार नाही.
बोल्सेनारोना हर्ड इम्युनिटी यायला हवी होती. म्हणजे असं की कोविडची लागण सर्व जनतेला होईल. सर्वानाच लागण झाल्यानतर प्रसाराचा संबंधच उरणार नाही, सर्वांना यथावकाश इम्युनिटी येईल आणि आपोआप साथ आटोक्यात येईल. ब्राझीलची लोकसंख्या २० कोटी. सत्तर टक्केंना बाधा होईल आणि एक टक्का मृत्यू होतील हे गृहीत धरलं तर १४ लाख माणसं मरणार होती. बोल्सेनारोंना मंजूर होतं.
भारत, अमेरिका यांच्यानंतर कोविड मृत्यूत ब्राझिल तिसऱ्या नंबरवर होता. बोल्सेनारो म्हणाले, ”माणसं मरतच असतात. काही माणसं मरणारच. तेच तर जीवन आहे, त्याला इलाज नाही.”
बोल्सेनारोंना मुळात कोविड हे थोतांड आहे असं वाटत होतं. कोविड हे डाव्यांचं, कम्युनिस्टांचं कारस्थान आहे, आपल्याला बदनाम करण्यासाठी कोविड ही अफवा कम्युनिस्टांनी पसरवली असं त्यांचं मत होतं आणि आहे.
त्यांचं म्हणणं अंतर ठेवणं म्हणजे मूर्खपणा होता, मास्क ही कवी कल्पना आहे. एका भाषणात ते म्हणाले, “लस घेतली तर एचआयव्ही होऊ शकतो.” एकदा म्हणाले की लस घेतली तर तुम्ही मगर व्हाल.
हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे मलेरिया प्रतीबंधक औषध आहे. त्याचा कोरोनावर उपयोग होत नाही असं सिद्ध झालेलं आहे. आजी आणि माजी आरोग्य मंत्र्यांनीही सल्ला दिला की क्लोरोक्वीनचा प्रसार करू नका.
बोल्सेनारो यांनी प्रिवेंट सीनियर नावाच्या संस्थेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे उपयुक्त औषध आहे अशी माहिती तयार करण्याचं कंत्राट दिलं. पेशंटना ते दिलं आणि ते बरे झाले असं खोटं रेकॉर्ड ही कंपनी तयार करत होती. औषध निर्माण करणारी कंपनी आणि प्रचार यात बोल्सेनारो आणि मंत्री गुंतले होते.
अध्यक्षाच्या कार्यालयातून एक प्रचार मोहीम चालवण्यात आली. मोहिमेचं शीर्षक होतं, ‘ब्राझील थांबू शकत नाही’. मोहिमेत सांगण्यात आलं, की कोविड मांजरं, कुत्रे, जनावरं यांच्यामुळं पसरतो. कोविडनं तरूण आणि प्रौढ मरत नाहीत. कुत्रे मांजरं इत्यांदीमधील रोग कसा रोखणार. लोकांनी आपापली कामं सुरु ठेवावीत.
माणसाला सर्दी होते, फ्ल्यू होतो, त्यातलाच हा प्रकार आहे, कोविड नाही. पत्रकार खोट्या बातम्या देऊन लोकाना घाबरवत आहेत असं त्यांचं म्हणणं पडलं. आपलं म्हणणं लोकांवर ठसवण्यासाठी बोल्सेनारो जाहीर सभा घेत, मिरवणुकीमधे जात, लोकांमधे मास्क न लावता बिनधास्त फिरत. हे सर्व टीव्हीनं दाखवावं यासाठी विशेष प्रयत्न करत.
बोल्सेनारो यांच्या विचारांना भीक न घालता लोकांच्या दबावामुळं काही राज्यांच्या गव्हर्नरांनी त्यांच्या राज्यात लॉकडाऊन लावला. बोल्सेनारो यांनी त्या गव्हर्नरांच्या बदनामीची मोहिम चालवली. त्यांनी त्या राज्यात जाऊन गव्हर्नरांच्या विरोधात निदर्शनं केली, मोर्चे काढले. देशाचा राष्ट्रपती आपल्याच गव्हर्नरांच्या विरोधात मोर्चे काढतो. घरी रहा या गव्हर्नरांच्या आदेशाला विरोध करण्यासाठी, लोकांना घराबाहेर काढून कामावर पाठवण्यासाठी लष्कराच्या तुकड्या बोल्सेनारोंनी पाठवल्या.
बोल्सेनारो अमेरिकेत ट्रंप यांना भेटायला गेलो. ट्रंप यांच्या मारेलागो या रिझॉर्टवर. सगळं मंत्रीमंडळ घेऊन गेले. तिथून परतल्यावर त्यांच्या सोबतच्या २४ जणांना कोविड झाला. बोल्सोनारो यांची तपासणी झाली पण तपासणीचा निकाल त्यांनी जाहीर केला नाही.
त्यांचा खोकला काही थांबेना. पुन्हा तपासणी. डॉक्टर लोकांनी जाहीर करून टाकलं की त्यांना कोविड झालाय. तेंव्हा नाईलाजानं बोल्सेनारोंनी आपल्याला कोविड झालाय पण अगदीच किरकोळ आहे असं म्हटलं आणि ते फिरत राहिले. फिरणं, हस्तांदोलन, मास्क न लावणं याच्या फिल्म ट्विटरवर पोस्ट करत राहिले. शेवटी ट्विटरनं त्यांचा अकाउंटच बंद करून टाकलं.
ओलावो कार्वालो हे बोल्सेनारो यांचे राजकीय गुरु. ते हिरीरीनं कोविड अस्तित्वात नाही अशी मोहिम चालवत. त्यांना कोविड झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
एप्रिल २०२१. हॉस्पिटलबाहेर रांगा लागल्या होत्या. ऑक्सिजनचा तुटवडा होता. दररोज २००० माणसं मरत होती. बोल्सेनारो यांचे एक सहकारी, चार तारांकित जनरल रामोस यांनी गपचुप लस घेतली. एका छोट्या गटामधे गप्पा मारत असताना ते म्हणाले, काय करणार बाबा, कोणाही सामान्य माणसाप्रमाणं जगण्यासाठी मी लस घेतली. त्यांना माहित नव्हतं की त्यांच्या या गप्पा रेकॉर्ड होत होत्या. गप्पा सोशल मिडियावर व्हायरल झाल्या. बोल्सेनारोंनी रामोसना हाकलून दिलं.
फायझरची लस का घेत नाही असं पत्रकारानी विचारलं, बोल्सेनारो म्हणाले लस घेतली की माणूस मगर होतो. हसत म्हणाले खरे पण ते त्यांच्या मनात असावं असं म्हणायला जागा आहे.
बोंब झाली. एका न्यायमूर्तीनं सरकारवर टीका केली आणि सरकारच्या प्रचार मोहिमेवर बंदी घातली.
जगभर बोंब झाली. जागतीक आरोग्य संघटनेनं ब्राझिल आणि बोल्सेनारो यांच्यावर कडक टीका केली. बीबीसी इत्यादी जागतीक माध्यमांनी बोल्सेनारो यांचे उद्योग उघडे पाडले.
ब्राझिलच्या सेनेटमधे चर्चा झाली. सेनेटनं बोल्सेनारो यांची चौकशी केली.
सेनेटनं २ कंपन्या आणि ७७ माणसांच्या साक्षी घेतल्या. साक्ष देणाऱ्यांत आरोग्य मंत्री होते, मंत्री होते, अनेक नोकरशहा होते, हायड्रोक्सीक्लोरोक्विन उपाय परिणामकारक आहेत असा खोटा अहवाल तयार करणारे डॉक्टर आणि तंत्रज्ञ होते. तसंच बोल्सेनारो यांचे दोन चिरंजीवही त्यात होते. बोल्सेनारो यांच्या प्रचार मोहिमा ते चालवत, व्हॉट्सअप प्रचाराचे ते प्रमुख होते.
सेनेटच्या चौकशी समितीनं प्रचार प्रमुख मंत्र्याला विचारलं, की चुकीची माहिती देणारी प्रचार मोहिम त्यांनी कां आणि कशी चालवली. मंत्री म्हणाला की मी जरी त्या खात्याचा प्रमुख असलो तरी नेमकी कोणी मोहिम चालवली ते मला माहित नाही. सेनेटनं त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडलं तेव्हां ते मंत्री म्हणाले की आमच्या खात्यानं ती प्रचार मोहिम एक प्रयोग म्हणून तयार केली होती. पण तो ड्राफ्ट कोणी माध्यमांमधे पसरवला ते मला माहित नाही, त्यांना न विचारताच तो ड्राफ्ट प्रसिद्ध केला.
सेनेटनं चारेकशे पानांचा एक अहवाल तयार केला. चौकशी समितीच्या अहवालातलं पहिलं वाक्य होतं, ”राष्ट्रपती भवनात एक खुनी लपलाय.” बोल्सेनारो यांच्यावर हत्याकांडाचा गुन्हा दाखल करावा अशी शिफारस या कमीटीनं केली.
लवकरच निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि लोकांची नाराजी आताच निवडणूकपूर्व मतचाचणीत दिसून येऊ लागलीय. त्यामुळं निवडणुक बदनाम करण्याचा उद्योग बोल्सेनारो यांनी सुरु केलाय.
परवाच बोल्सेनारोंनी अनेक देशांच्या राजदूताना, मुत्सद्द्यांना बोलावून घेतलं आणि त्यांच्यासमोर एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी ब्राझीलमधली निवडणुक यंत्रणा सदोष आहे, तिचा गैरवापर आपल्या विरोधात केला जाणार आहे असा आरोप केला.
निवडणूक यंत्रणा, न्यायालयं यांनी बोल्सेनारो यांचे आरोप पूर्वी अनेक वेळा पुराव्यासहीत खोडून काढले आहेत. सारा प्रकार पेपरांनी वेळोवेळी प्रसिद्ध केला आहे.
बोल्सेनारो काही तरी खटपट करून निवडणूक रद्द करतील किवा पुढं ढकलतील अशी शक्यता दिसते.
निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.
COMMENTS