झांग झानला ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’चा साहस पुरस्कार

झांग झानला ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’चा साहस पुरस्कार

चीनमधील सिटीझन पत्रकार झांग झान हीने कोविड साथीच्या सुरवातीच्या काळात २०२० मध्ये वुहान शहरात सर्व धोक्यांना तोंड देत खरी परिस्थिती जगासमोर आणली होती आणि सध्या ती चीनच्या तुरुंगात आहे.

नव्या सरकारपुढील सामरिक आव्हाने व संरक्षण अजेंडा
चिनी मालावर बहिष्कार आत्मनिर्भरतेचा मार्ग नव्हे!
भारताने चीनकडून शिकले पाहिजे

कोविड काळातील रिपोर्टिंगमुळे अटक करण्यात आलेली आणि सध्या चिनच्या तुरुंगात असलेली चीनी सिटीझन पत्रकार झांग झान हिला रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (आरएसएफ)ने साहस आणि धैर्य यासाठीचा पुरस्कार आज जाहीर केला.

रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सतर्फे माध्यम (प्रेस) स्‍वातंत्र्य पुरस्कार दरवर्षी पत्रकारांना किंवा प्रसारमाध्यमांना दिले जातात. ज्यांनी जगातील वृत्तस्‍वातंत्र्याच्‍या संरक्षणात किंवा संवर्धनासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे, त्यांना हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कारांचे हे २९ वे वर्ष आहे.

२०२१ चे पुरस्कार पत्रकारितेतील धैर्य, प्रभाव आणि स्वातंत्र्य या तीन श्रेणींमध्ये देण्यात आले आहेत. एकूण ११ देशांतील सहा पत्रकार आणि सहा माध्यम संस्था (मीडिया आउटलेट्स) यांना नामांकन देण्यात आले होते.

रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सचे अध्यक्ष पीएरे हास्की याणणे हे पुरस्कार जाहीर केले.

पत्रकार, प्रसारमाध्यमे किंवा स्वयंसेवी संस्थांनी प्रत्यक्षात पत्रकारीतेमध्ये दाखविलेल्या धैर्याला पाठींबा देण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी २०२१ चा साहस आणि धैर्य चीनी पत्रकार झांग झान यांना प्रदान करण्यात आला.

‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ने पुरस्कार जाहीर करताना म्हटले, की सततच्या धमक्या असूनही, वकील बनलेल्या या पत्रकाराने फेब्रुवारी २०२० मध्ये वुहान शहरातील कोविड-१९ चा उद्रेक कव्हर केला. तिचे सोशल मिडियावरील व्हिडीओ हेच माहिती मिळविण्याचे मुख्य स्रोत होते. तिचे मित्र आणि कुटुंबीयांना आता तिच्या जीवाची भीती वाटत आहे. अलिकडच्या आठवड्यात तिची तब्येत खूपच खराब झाली आहे.

व्यावसायिक पत्रकार नसलेले नागरिक हे वेबसाइट, ब्लॉग आणि सोशल मीडिया वापरून माहिती प्रसारित करतात, त्यांना सिटीझन जर्नलिस्ट (नागरिक पत्रकार) म्हणतात. असे सिटीझन जर्नलिस्ट आता अनेक देशांत महत्त्वपूर्ण काम करताना दिसतात. अमेरिकेत डार्नेला फ्रेझियर हीने जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येचा व्हिडीओ काढून सोशल मिडियावर पोस्ट केला होता. तिला यावर्षीचा पुलित्झर सायटेशन पुरस्कार मिळाला आहे. जरी पत्रकार नसली तरी तिने पत्रकार करतात तेच महत्त्वाचे काम केले.

असेच काम चीनमध्ये झांगने केले. मुळची वकील असलेली आणि नंतर सिटीझन पत्रकार बनलेली झांग झान हीला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘वादांना आमंत्रण देणे आणि सार्वजनिक त्रास देणे’, असे आरोप ठेऊन दोषी ठरविण्यात आले. आरोपाचा हा प्रकार चीनमध्ये सार्वत्रिकरित्या पाहायला मिळतो. भारतात जसा पत्रकार कार्यकर्ते आणि मानवी हक्क वकिलांवर यूएपीए हा कायदा लावून अटक केली जाते, तसाच हा आरोप चीनमधील पत्रकार, वकील आणि कार्यकर्त्यांवर वारंवार लावण्यात येतो.

‘ग्रेट वॉल ऑफ चायना’ जगातील आश्चर्य म्हणून ओळखली जाते. अशीच एक पोलादी भिंत चीनमध्ये उभी आहे. जी अदृश्य आहे, पण तिचा प्रत्यय वारंवार चीनमधल्या लोकांना येतो. विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही हक्कांची मागणी करणाऱ्या लोकांना आणि पत्रकारांना या भिंतीवर डोके आपटावे लागते. बऱ्याच वेळेला त्यांची डोकी फुटतात.

झांग झान या ३८ वर्षीय वकील आणि सिटीझन पत्रकार सध्या या पोलादी भिंतीवर आपले डोके आपटताना दिसते. चीन सगळी माहिती सातत्याने दडपतो. जे ही माहिती उघड करण्याचा प्रयत्न करतात त्यांना तुरुंगात टाकले जाते, किंवा ते लोक गायब होतात.

अशी माहिती फोडण्याचा प्रयत्न झांगने केला. झांगने कोविडच्या सुरवातीच्या काळामध्ये वुहानमधून केलेल्या पत्रकारितेमुळे तिची जगात ओळख निर्माण झाली. परिणामी ती तुरुंगात आहे. तिच्या सुटकेसाठी जगभरातून चीनवर सातत्याने दबाव वाढत आहे.

झांग झानचा जन्म २ सप्टेंबर १९८३ झियानयांग शांखी या चीनच्या वायंव्य भागात झाला. तिने चेंगडू सिच्यून या प्रदेशात असणाऱ्या ‘साऊथवेस्टर्न युनिव्हर्सिटी ऑफ फायनान्स अँड इकॉनॉमिक्स’मधून पदवी घेतली आहे.

झांग मुळची वकील आहे. परंतु ती ‘वेईकुआन’ चळवळीत सहभागी झाल्याने शासकीय यंत्रणांनी तिचा वकिलीचा परवाना रद्द केला. ‘वेईकुआन’ हा चीनमधील वकील, कायदेतज्ज्ञ आणि बुद्धिजिवींचा एक गट आहे. हा गट याचिका आणि कायदेशीर प्रक्रियेद्वारे सक्रियपणे नागरिकांच्या नागरी हक्कांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो. २००० सालाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या या चळवळीने कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकार्‍यांच्या विरोधाला न जुमानता, कायदेशीर प्रणाली आणि माध्यमांद्वारे सुधारणांची मागणी केली.  मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या बळींचा बचाव केला. ‘वेईकुआन’ वकिलांनी पुढे नेलेल्या मुद्दयांमध्ये मालमत्ता आणि गृहनिर्माण हक्क, एड्स पीडितांसाठी संरक्षण, पर्यावरणाचे नुकसान, धार्मिक स्वातंत्र्य, भाषण आणि माध्यमांचे स्वातंत्र्य आणि बंदिवास किंवा तुरुंगवास भोगत असलेल्या इतर वकिलांच्या हक्कांचे रक्षण करणे, यांचा समावेश आहे.

मात्र ‘वेईकुआन’ चळवळीत सामील असलेल्या लोकांना चिनी अधिकार्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांच्यावर अनेळवेळा सूड उगवला गेला. ताब्यात घेणे, पोलिसांकडून बंदिस्त करणे आणि त्यांना कठोर छळाला तोंड द्यावे लागले आहे.

ऑगस्ट २०१८ मध्ये, झांगला, ती विध्वंसाला चिथावणी देत असल्याचा पोलिसांनी इशारा दिला होता. थोडक्यात तो झांगला धोक्याचा इशारा होता.

२०१९-२० मध्ये हाँग काँगमध्ये लोकशाही हक्कांसाठी आंदोलन सुरू होते. त्याला झांगने चीनमध्ये राहून पाठिंबा दिला. सप्टेंबर २०१९ मध्ये, ती शांघायच्या नानजिंग रोड आणि पीपल्स स्क्वेअरवर उभी राहिली आणि तिने एक छत्री डोक्यावर धरली होती. फलक धरण्यासारखाच हा प्रकार आहे. त्या छत्रीवर तिने लिहिले होते, ‘समाजवाद संपला, कम्युनिस्ट पक्षाचा निषेध’. कल्पना करता येऊ शकेल, की चीनमध्ये राहून असा निषेध केला, की काय होऊ शकेल. तिला ९ सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. ती १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिसांच्या ताब्यातच होती. ‘सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याच्या’ संशयावरून तिला ताब्यात घेण्यात आले होते. त्या काळात तिने दोनदा उपोषण केले. तिला त्यावेळी सोडून देण्यात आले.

२०१९ संपता संपता चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा विषाणू सापडला आणि कोविड-१९ या आजाराची साथ सुरू झाली. फेब्रुवारीपर्यंत ही साथ जगभरात पोहोचली. पण चीनमधून कोणतीही माहिती बाहेर येत नव्हती. त्याचवेळी १ फेब्रुवारी २०२० ला झांग, शांघाय इथून वुहान येथे गेली. तिथे जाऊन जे दृश्य दिसत होते, ते तिने जमेल तसे शूट करायला सुरुवात केली. एक नागरिक कसा पत्रकार होऊ शकतो, याचे तिने प्रात्यक्षिकच दाखवले.

छोटे-मोठे, हलणारे असे अनेक व्हिडीओ तिने तयार केले आणि ते ट्विटर, यूट्यूब आणि व्ही चॅट सारख्या सोशल मीडियावर लाइव्ह-स्ट्रीम केले किंवा अपलोड केले. ओसंडून वाहणारी रुग्णालये, रिकामी दुकाने, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, स्मशानभूमी, स्वतंत्र पत्रकारांना कसे ताब्यात घेण्यात आले आहे, असे सगळे त्या व्हिडीओमध्ये आले. साथीच्या रोगात बळी पडलेल्या कुटुंबांना झालेला त्रास पुढे आला. तिने त्या सगळ्या परिस्थितीवर एक लेखी रिपोर्ताज तयार केला. त्यात संसर्ग आणि मृत्यूची खरी संख्या लपविल्याचा आरोप तिने केला. माध्यमांना नियंत्रणात ठेवल्याचा आणि अधिकारी हिंस्रपणे वागत असल्याचा तिने आरोप केला. लादलेल्या कडक लॉकडाऊनचा तिने विरोध केला.

झांगच्या म्हणण्यानुसार, वुहानमधील स्मशानभूमी रात्रंदिवस चालू होती. त्या काळात राज्याच्या नियंत्रणात असलेल्या माध्यमांनी दावा केला होता की महामारी नियंत्रणात आहे. एका व्हिडिओमध्ये पोलिस स्टेशनमध्ये ली वेनलियांग या डॉक्टरला पोलिस कसे दम देत आहेत, ते तिने प्रसारित केले. अटक होण्यापूर्वीच्या तिच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये, तिने वुहानवरील लॉकडाऊन अवाजवी कठोर असून, सरकार धाक आणि धमक्या देऊन, शहराचे व्यवस्थापन क्से करत आहे, हे दाखवले होते.

तिच्या या महितीमुळे चीनमधील साथीच्या रोगाविषयीची माहिती बाहेर आली.

१३ मे २०२० मध्ये झांगने हॅन्काऊ रेल्वे स्टेशनजवळून व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यानंतर म्हणजे १४ मेला ती बेपत्ता झाल्याचे ‘द नेटवर्क ऑफ चायनीज ह्युमन राइट्स डिफेंडर्स’ या चिनी मानवाधिकार गटाने जाहीर केले. तिचा पाठलाग केला जात असल्याचे, तिने आपल्या मित्रांना कळवले होते. हॅन्काऊ रेल्वे स्टेशनजवळच असणाऱ्या हॉटेलमध्ये ती राहत होती. तिथूनच तिला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे नंतर उघड झाले. तिला शांघायला परत नेण्यात आले. त्याच काळामध्ये ली झेहुआ, चेन क्युशी आणि फॅंग ​​बिन हे सिटीझन पत्रकार एकाच वेळी बेपत्ता झाले होते.

झांगला १९ जून २०२० मध्ये औपचारिकरित्या अटक करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. पुडोंगच्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने तिला अटक करण्यात आले आणि तिला पुडोंग डिटेन्शन सेंटरमध्ये तुरुंगात ठेवण्यात आले. पुडोंग हा शांघायमधील एक भाग आहे.

‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’च्या म्हणण्यानुसार, शिक्षेपूर्वी झांगचा तीन महिने छळ करण्यात आला. तिला संपूर्ण वेळ, दिवसाचे २४ तास बेड्या आणि हातकड्यांमध्ये ठेवण्यात आले होते. झांगने जूनपासून तुरुंगात उपोषण सुरू केले. तिला जबरदस्तीने खायला दिले जात होते. ती खायला नकार देत असल्याने तिला फीडिंग ट्यूबमधून जबरदस्तीने खायला दिले जात होते. फीडिंग ट्यूब तिने काढू नये म्हणून तिचे हात बांधण्यात आले होते.

तिच्या एका वकिलाने सांगितले, की तिची तब्येत खालावल्यानंतर तिने काही आहार घेण्यास सुरुवात केली होती. तिच्या आईने तिच्या या उपोषणाचे वर्णन ‘आंशिक उपोषण’ असे केले. ज्यामध्ये झांगने फळे आणि कुकीज खाल्ले, परंतु मांस, भात किंवा भाज्या खाल्ल्या नाहीत. तिचे वकील रेन क्वान्नियू म्हणाले, की झांगने त्यांना एका भेटीमध्ये सांगितले, की तिचे उपोषण, हे तुरुंगातून सुटण्यासाठी नसून, चीनमधील भाषण स्वातंत्र्यावर जी बंधने आहेत, त्याच्याविरोधात आहे.

डिसेंबर २०२० मध्ये ती अतिशय अशक्त झाल्याचे तिचे वकील रेन क्वानियु यांनी सांगितले. त्यावेळी न्यायालयात सुनावणीच्या वेळी ती व्हीलचेअरवर आली होती. तिची आणखी एक वकील झांग केके, म्हणाली, “डोकेदुखी, चक्कर येणे आणि पोटदुखी व्यतिरिक्त, तिच्या तोंडात आणि घशात देखील वेदना होत होत्या.” गॅस्ट्रिक ट्यूब टाकल्यामुळे तिला त्रास होत होता. केके त्यावेळी म्हणाली होती, की कदाचित ती जगू शकणार नाही.

झांगवर सार्वजनिक ठिकाणी अशांतता निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, या आरोपाखाली चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरोपपत्रात झांगवर ‘रेडिओ फ्री एशिया’ आणि ‘द इपॉक टाईम्स’ यांसारख्या परदेशी माध्यमांशी बोलण्याचा आणि वुहानमधील कोविड-१९  साथीच्या आजाराबाबत चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप आहे.

झांगच्या भावाचे ट्विट

झांगच्या भावाचे ट्विट

कोविड-१९ च्या चाचण्या करण्यासाठी रहिवाशांना शुल्क आकरण्यात आले. तसेच विलगीकरणामुळे घरांमध्ये बंदिस्त असलेल्या रहिवाशांना शेजारच्या समित्यांनी कुजलेल्या भाज्या पाठवल्या. अशा गोष्टी झांगने आपल्या रिपोर्टिंगमध्ये मांडल्या होत्या. त्यामुळे सरकार चिडले होते. या गोष्टींवर झांग ठाम राहिली.

२८ डिसेंबर २०२० रोजी शांघाय न्यायालयासमोर सुनावणी झाली. साधारण तीन तास चाललेल्या या सुनावणीच्या वेळी कार्यकर्ते, परदेशी पत्रकार आणि ब्रिटिश मुत्सद्दी (डिप्लोमॅट) यांना कोर्टरूममध्ये प्रवेश करण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. तिला ४ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

पाश्चिमात्य जग ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या धामधुमीत व्यस्त असताना ही सुनावणी मुद्दामहून घेण्यात आली. पाश्चिमात्य देश आणि जगाचे लक्ष जाऊ नये म्हणून चीनमध्ये अशा प्रकारच्या सुनावण्या घेतल्या जातात.

चीनमध्ये साथीच्या रोगाचे वार्तांकन केल्याबद्दल शिक्षा सुनावण्यात आलेली ती पहिली सीटीझन पत्रकार आहे. रेन क्वानियु आणि झांग केके यांच्यासह अनेक वकिलांनी तिचे प्रतिनिधित्व केले. तिने शिक्षेच्या विरोधात अपील करण्यास नकार दिला. कायदेशीर प्रक्रिया कायदेशीररित्या अवैध असल्याचे तिचे मत आहे.

झांगने उपोषण सुरूच ठेवल्याने तिला ३१ जुलै २०२१ रोजी शांघायमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले. २ ऑगस्टला तिचे आईवडील आणि भाऊ यांना तिला भेटण्यास परवानगी देण्यात आली. पण प्रत्यक्षात भेटू दिले गेलेच नाही, तर फोनवर बोलण्यास सांगण्यात आले. ११ ऑगस्टला तिला परत तुरुंगात पाठवण्यात आले.

याच वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिच्या भावाने जू झांग याने ट्विटरवर सांगितले की तिचे वजन खूपच कमी झाले आहे आणि ती जास्त काळ जगू शकत नाही. झांग, सुमारे ५ फूट १० इंच (१७७ सेमी) उंच आहे, मात्र तिचे वजन फक्त ४० किलो झाले आहे.

तिच्या आईने तिच्याबरोबर २८ ऑक्टोबरला पुन्हा एकदा व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर ‘रेडिओ फ्री एशिया’शी बोलताना तिच्या आईने सांगितले की, तिची मुलगी, कोणीतरी मदत केल्याशिवाय चालूही शकत नाही तिची तब्येत आणखी बिघडत आहे. तिचे डोकेही खाली झुकत होते.

कोरोना व्हायरस रिपोर्टिंगसाठी चीनमध्ये डिसेंबर २०२० मध्ये किमान ४७ पत्रकारांना ताब्यात घेण्यात  आले. तुरुंगातील झांगला ‘आरएसएफ’ने नामांकन देऊन या पत्रकारांचा प्रश्न आणि चीनचा क्रूर चेहरा जगासमोर आणला आहे. आपल्या नामांकनात, ‘आरएसएफ’ने म्हटले आहे, की कोविड – १९ रूग्णांच्या कुटुंबांना कोणत्या छळाचा सामना करावा लागला, याचे व्हिडीओ झांगने वुहानच्या रस्त्यावरुन आणि रुग्णालयांमधून थेट प्रसारीत केले. त्यासाठी अधिकार्‍यांकडून आलेल्या धमक्या सहन केल्या. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले गेले. तिचे रिपोर्टिंग हेच त्या वेळी वुहानमधील आरोग्य परिस्थिती सांगणारे स्वतंत्र माहितीचे मुख्य स्त्रोत होते. ”

झांगला बेड्या ठोकून कोठडीत टाकण्यात आले आणि जबरदस्तीने खायला दिले गेले, या झांगच्या वकिलाने केलेल्या दाव्याची नोंदही ‘आरएसएफ’च्या नामांकनात करण्यात आली आहे. “तिचा आणखी छळ केला जाऊ शकतो आणि वाईट वागणूक दिली जाऊ शकते, याची सध्या खूप चिंता असल्याचे, ‘आरएसएफ’ने म्हटले आहे.

‘आरएसएफ’च्या पूर्व आशिया ब्यूरोचे प्रमुख, सेड्रिक अल्वियानी म्हणाले, की झांग हे चीनमधील वाढत्या सरकारी दडपशाही आणि नियामक निर्बंधाखाली असणाऱ्या पत्रकारितेचे प्रतीक आहे.

“झांग झान हे चिनी लोकांच्या त्या आशेचे प्रतिनिधित्व करतात, की काही लोक पत्रकारिता करत आहेत. जेथे काहीतरी घडत असते, तिथे ते जातात आणि पत्रकारिता करतात. चिनी लोकच काय, पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला, त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे याची माहिती हवी असते,” असे अल्वियानी म्हणाले.

तात्काळ झांगच्या सुटकेची मागणी करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांमध्ये ‘आरएसएफ’चा समावेश आहे. अल्वियानी म्हणाले, की ही शिक्षा रद्द करावी. परंतु कमीतकमी, आरोग्याची चिंता लक्षात घेता, तिला मानवतावादी आधारावर तात्काळ सोडले पाहिजे.

अमेरिका, युरोपियन युनियन, बीजिंगमधला ब्रिटनचा दूतावास, संयुक्त राष्ट्र संघटनेचे मानवी हक्क कार्यालय, आणि जगभरातल्या ४५ आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटनांनी झांगच्या सुटकेसाठी वारंवार आवाहन केले आहे. मात्र चीन सरकारने त्याला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

झांग अजूनही तुरुंगातच आहे. जीवन मरणाची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई लढत आहे!

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0