चॉकलेट, लाइमज्यूस, आइस्क्रीम, टॉफिया

चॉकलेट, लाइमज्यूस, आइस्क्रीम, टॉफिया

स्वातंत्र्यानंतर या देशाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एकत्र ठेवण्यात लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यांचे फार मोठे योगदान आहे. आपला देश हे एक विलक्षण आणि तरीही विचित्र रसायन आहे.

डिजिटल शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य
सरकार, सिद्धार्थ आणि अभिमन्यू…!!
१०० कोटींवर १५ कोटी भारी पडतील : वारिस पठाणही बरळले

लता मंगेशकर यांचा आवाज पहिल्यांदा नक्की कधी ऐकला हे माझ्यासारख्या अनेकांना आठवणार देखील नाही. जीवनावश्यक गोष्टी पहिल्यांदा आपल्या आयुष्यात कधी आल्या हे आपल्याला आठवत नाही. कारण त्यांचे असणे गृहीत धरलेले असते. त्यांची सवय होते. सगळं सुरळीत सुरु असतं. आणि अचानक लक्षात येतं की उद्यापासून यात खंड पडणार आहे. साहजिकचं, एक पोकळी तयार होते. आणि मग त्या गोष्टीचं महत्त्व लक्षात येऊ लागतं. आपण एखाद्या लोकोत्तर घटनेचे किंवा पर्वाचे साक्षीदार होतो हे लक्षात येतं. कृतज्ञता वाटते. लता मंगेशकर यांची आठवण काढताना आज सर्वांना असंच वाटत असेल यात शंका नाही. शिवाय त्यांचा प्रभाव हा अनेक पिढ्यांवर झाला असल्यामुळे ही कृतज्ञतेची भावना देशभर पसरली असेल असं म्हणणं अजिबात अतिशयोक्तीचे ठरणार नाही. चाळीसच्या दशकापासून ते अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत अखंडित गाणारा हा आवाज आपण पहिल्यांदा कधी ऐकला हे कुणालाही सांगता येणार नाही.

पण तरीही पहिली आठवण शोधायचा प्रयत्न होतोच. आणि तसा प्रयत्न मी ही केला. आणि १९९४ हे वर्ष डोळ्यासमोर आले. ‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. कॅसेट्सचे युग होते. आमच्याकडेही या सिनेमाची कॅसेट आणली होती. त्यातील ‘चॉकलेट, लाईमज्यूस, आईसक्रीम, टॉफिया’ हे गाणं मला (तेव्हा वय वर्ष ७) फार गंमतशीर वाटलं होतं. असंच एकदा ते ऐकताना आईला प्रश्न विचारला होता, “हे कुणी गायलं आहे?” आणि बहुदा पहिल्यांदा ‘लता मंगेशकर’ हे नाव ऐकलं होतं. त्याच संभाषणात ही व्यक्ती (तेव्हा) गेली चाळीस वर्ष गात आहे असं आईने सांगितलं होतं. परंतु खरी गंमत पुढे होती. या आवाजाची व्यक्ती आपल्या आजी-आजोबांच्या वयाची आहे हे ऐकून थोडी गंमत व थोडे कुतूहल निर्माण झाले होते. परंतु पुढे जसे वय आणि सांगीतिक समज वाढत गेली तेव्हा मात्र याचे रूपांतर आश्चर्य व अविश्वासात झाले!

तेव्हा वय वर्ष ६५ असलेल्या लता मंगेशकर यांनी तारुण्यात पदार्पण करून प्रेमाचे वेध लागलेल्या मुलीचे गाणे गायले होते, त्या पात्राला आवाज दिला होता हीच त्यांच्या आवाजाची व गाण्याची महानता म्हणता येईल. खरं तर हे लता मंगेशकर यांचे प्रचंड गाजलेलं किंवा कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणू असं गाणं नाही. परंतु ९० च्या दशकात जिथे तरुण गायिका प्रस्थापित होऊ लागल्या होत्या किंवा झाल्या होत्या तिथे ६५ वर्षांच्या या गायिकेचा आवाज ‘तरुण’च राहिला होता हे विलक्षण आहे! किंबहुना, बॉलिवूडमध्ये पुरुषांच्या आवाजात बरीच स्पर्धा होती. काही दशकं गाजलेला आवाज गाण्यांच्या नवीन चाली, नवे अभिनेते यांच्यामुळे मागे पडला व नवीन आवाज उदयास आला याची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. परंतु लता मंगेशकर गातंच राहिल्या. आणि ती गाणी लोकप्रिय ठरली हे ही तितकंच महत्त्वाचं.

‘हम आपके हैं कौन’ नंतर पुढच्याच वर्षी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा सिनेमा आला. त्यातही ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ हे गाणं ऐका. त्यात एका कडव्यात लता मंगेशकर यांनी ‘ला ला ला ला ला’ इतकं म्हटलं आहे ते पुन्हा एकदा ऐका! साठीतून सत्तरीकडे प्रवास करणाऱ्या गायिकेने विशीतल्या मुलीच्या पात्राला इतक्या सहजतेने दिलेला तो आवाज खूप काही सांगून जातो. कुठून येत होती ही सहजता? वय वाढतं तेव्हा आवाज ही त्रास देऊ लागतो. साठीच्या पुढे तर त्यात कंपनही तयार होते. पण तरीही लता मंगेशकर गातंच राहिल्या. पुढे ‘दिल से’ मधील ‘जिया जलें’ आलं व ‘रंग दे बसंती’च्या ‘लुका छुपी’ पर्यंत हा सिलसिला सुरु राहिला. हा अर्थात माझ्या लहानपणापासून मोठं होईपर्यंतचा प्रवास आहे. असाच लहानपणापासून मोठं होईपर्यंतचा प्रवास माझ्या आजी-आजोबांच्या व माझ्या आई-वडिलांच्या पिढीचा देखील आहे.

आणि हा प्रवास या देशाचा देखील आहे. मी हे फार जवाबदारीने म्हणतो आहे. याचे कारण असे की स्वातंत्र्यानंतर या देशाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एकत्र ठेवण्यात लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यांचे फार मोठे योगदान आहे. आपला देश हे एक विलक्षण आणि तरीही विचित्र रसायन आहे. इथे एखाद्या व्यक्तीची ‘ओळख’ ही अनेक प्रकारे व्यक्त होत असते. १९४७ या वर्षी देशाला परकीय सत्तेकडून स्वातंत्र्य मिळालं खरं पण ते मिळाल्यानंतर दशकभरातंच आपल्यापैकी बहुतांश हे आपापल्या भाषिक ओळखीसाठी भांडू लागले होते. आणि अनेक ठिकाणी ही भांडणं संघर्ष आणि हिंसेचं रूप धारण करत होती. लता मंगेशकर यांनी ४०च्या दशकात गायला सुरुवात केली व त्यांची आणि स्वतंत्र देशाची कारकीर्द ही एकाचवेळी सुरु झाली. आणि पुढील जवळजवळ दोन दशकांनंतर देश आपल्या अंतर्गत वाद आणि भाषिक संघर्षातून बऱ्यापैकी स्थिर झाला आणि लता मंगेशकर हे नाव देखील घराघरात पोचले. इथे ‘राष्ट्रीय’ प्रतिमा मिळालेल्या बॉलीवूड आणि हिंदी भाषेची त्यांना मदत झालीच. परंतु इतकं पुरेसं नाही. लता मंगेशकरांनी देशातील बहुतेक सर्व भाषांमध्ये गाणी गायली व त्यांची स्वतःची एक राष्ट्रीय प्रतिमा निर्माण झाली. इतकी गुंतागुंत असलेल्या देशाला काही राष्ट्रीय प्रतिमा लागतात. अशा प्रतिमांद्वारे देशातील प्रत्येक भागातील, राज्यातील व भाषेतील लोक स्वतःला व्यक्त करतात, त्या व्यक्तीमध्ये स्वतःला पाहतात व अशा व्यक्ती त्यांच्या आनंदाचा स्रोत बनून जातात. एरवी आपापल्या स्थानिक ओळखी सांभाळणारी ही लोकं अशा व्यक्ती किंवा प्रतिमांद्वारे राष्ट्रीय पातळीवर एकत्र येतात.

साहजिकच, एकीकडे हिंदी सिनेमातील गाणी आणि दुसरीकडे स्वतःच्या भाषेतील गाणी ऐकताना लोकांच्या मनात नकळतपणे आपल्या स्थानिक ओळखीच्या पलीकडे जाऊन एक राष्ट्रीय ओळख तयार होण्यास मदत होते. या पार्श्वभूमीवर लता मंगेशकर यांचे कार्य फार मोठे म्हणावे लागेल. राष्ट्र निर्मितीच्या काळात जेव्हा देशातील विविध भागातील लोकं एकमेकांना नव्याने ओळखू लागली होती, एकमेकांशी संबंध स्थापित करू लागली होती (ती प्रक्रिया अजूनही सुरु आहे आणि पुढे देखील सुरु राहील) आणि संघर्षही करू लागली होती त्याकाळात लता मंगेशकर या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होत्या असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.

उदाहरण द्यायचेच झाले तर, १९६० मध्ये लता मंगेशकर यांनी ‘मेहंदी ते वावी’ हे गुजराती गाणं गायलं होतं. त्यादरम्यान महाराष्ट्र आणि गुजरात यांचा भाषिक संघर्ष सुरु होता आणि त्याचवर्षी या दोन राज्यांची निर्मिती ही झाली. कदाचित त्यावेळेस सामान्य गुजराती व्यक्तीला आपल्या भाषिक ओळखीबद्दल अधिक आत्मीयता  वाटून समोरच्या मराठी व्यक्तीबद्दल मनात अविश्वासही वाटला असेल. अशावेळेस एक महाराष्ट्रीयन गायिका तिथल्या भाषेतील गाणं म्हणून एक वेगळ्या प्रकारची आत्मीयता निर्माण करते याच शंका नाही.

परंतु हे केवळ राष्ट्रीय पातळीवर घडत होतं असंही नाही. एरवी भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या, भारताशी युद्धाचा इतिहास असलेल्या आणि सध्या राजकीय संबंध तणावाचे असल्याचा पार्श्वभूमीतही पाकिस्ताचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लता मंगेशकर यांचे निधन म्हणजे भारतीय उपखंडाचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटलं आहे. त्यांना पाकिस्तानचे इतर मंत्री, तिथला मीडिया, विरोधी पक्ष नेते सर्वांनी याला दुजोरा दिला. ‘भारतीय उपखंडाचे नुकसान झाले’ अशी प्रतिक्रिया बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देखील व्यक्त केली आहे. अशाच प्रकारची भावना नेपाळ, श्रीलंका या देशांनी देखील त्यांच्या राष्ट्रप्रमुखांद्वारे व्यक्त केली आहे. याचा अर्थ असा की आपल्या राष्ट्रीय ओळखीच्या, आत्मीयतेच्या पलीकडे जाऊन या सर्व देशांना व तिथल्या लोकांना लता मंगेशकर या भारतीय उपखंडाची ओळख वाटतात. मी सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे माझ्या लहानपणीपासून मोठं होण्यापर्यंतच्या प्रवासात लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा समावेश होता. ही प्रक्रिया जशी देशातील अनेकांची तशी ती विदेशातील अनेकांचीही होती हेच यातून सिद्ध होतं.

लता मंगेशकर यांनी किती गाणी गायली किंवा त्यांच्याबद्दल सतत सुरु असलेले वाद किंवा चर्चा या मला अजिबात महत्त्वाच्या वाटत नाहीत ते या कारणामुळे. त्यांनी आपल्याला एक ओळख प्रदान केली हे सर्वात महत्त्वाचे आहे. आणि ही ओळख अनेक पातळींवर आहे. आपल्यापैकी बहुतांश लोकांसाठी ती ओळख भारतीय म्हणून आहे. काहींना ती त्यांच्या भाषे किंवा राज्यापर्यंत मर्यादितही वाटेल. अनेकांसाठी ती भारतीय उपखंडाच्या पातळीवर आहे, तर अनेकांसाठी तो एक वैश्विक, सांगीतिक दुवा आहे. परिणामी, कोणत्याही क्षणी जगातील कुठल्यातरी कोपऱ्यात लता मंगेशकरांचे गाणे ऐकले जात असेल असं मानायला वाव आहे. आणि याचा अर्थ असा की अनेक प्रकारच्या भावना आणि आठवणी या स्वराच्या व गाण्यांच्या माध्यमातून स्वतःशी व इतरांशी सामायिक होत असतात.

इंटरनेट आणि सोशल मीडियाने दिलेला ‘शेअर’चा (share) पर्याय येण्याआधीपासून जगात हे असंख्य भावनांचे ‘शेअरिंग’ लता मंगेशकर यांच्यासारख्या कलाकारामुळे वर्षानुवर्षे सुरु आहे. आताही ते सुरु राहील. त्यात एक अनामिक पोकळी मात्र भर घालेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0