शांघाय कॉर्पोरेशन बैठकीसाठी इम्रान खानला निमंत्रण

शांघाय कॉर्पोरेशन बैठकीसाठी इम्रान खानला निमंत्रण

नवी दिल्ली : यंदाच्या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) परिषदेसाठी भारताकडून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निमंत्रण पाठवले जाणार आहे. हे

लॉकडाऊनमध्ये श्रमिकांना पगार देण्याचा आदेश गृहखात्याकडून मागे
चीनच्या नागरिकांना पर्यटक व्हिसा बंद
४ कोटींनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ

नवी दिल्ली : यंदाच्या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) परिषदेसाठी भारताकडून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निमंत्रण पाठवले जाणार आहे. हे निमंत्रण एससीओमध्ये सामील असणाऱ्या सर्व देशांच्या प्रमुखांना पाठवले जाणार असल्याची माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी दिली.

सध्या एससीओमध्ये आठ देश असून त्यामध्ये अन्य चार देश निरीक्षक म्हणून काम करतात. या सर्वांना नवी दिल्लीत होणाऱ्या परिषदेसाठी बोलावण्यात येणार आहे. एससीओमध्ये सध्या भारत, कझाकस्तान, चीन, किरगिझीस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजाकिस्तान व उझबेकीस्तान हे ८ देश आहेत. तर अफगाणिस्तान, बेलारुस, इराण व मंगोलिया हे अन्य देश निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत.

२०१४मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क सदस्यांना बोलावले होते. त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ उपस्थित राहिले होते. त्यानंतर पाकिस्तानचा एकही पंतप्रधान भारतात आलेला नाही. त्यामुळे इम्रान खान यांनी भारताचे निमंत्रण स्वीकारल्यास भारत-पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांना सकारात्मक वळण लागेल अशी शक्यता आहे.

सध्या भारत-पाकिस्तानदरम्यान द्विपक्षीय चर्चा पूर्णपणे बंद असून दहशतवादावरून दोघांमध्ये कमालीचा तणाव आहे. गेल्या वर्षी पुलवामा येथे दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोटमध्ये हवाई हल्ले केले होते. त्या घटनेने सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव झाली होती. त्यानंतर गेल्या सहा महिन्यात काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्यावरूनही दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानने काश्मीरप्रश्न उपस्थित केल्याने दोन्ही देशांमधील संवादही कडवट झाला होता. आरोप प्रत्यारोपच सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांची निमंत्रण स्वीकारण्याबाबतची भूमिका कशी असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जून २०१७मध्ये भारत व पाकिस्तानला शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ)मध्ये अधिकृत सदस्य म्हणून स्वीकारले गेले. डिसेंबर २०१७मध्ये झालेल्या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाक्वन अब्बासी व भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज उपस्थित होत्या. पण २०१८मध्ये दुशान्बे येथे झालेल्या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ)च्या बैठकीला दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी जाण्याचे टाळले व तेथे परराष्ट्रमंत्र्यांना पाठवण्यात आले.

नोव्हेंबर २०१९च्या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ)च्या बैठकीला भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहिले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0