नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन

नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन

मुंबईः गेली ४ दशके हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणार्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त

‘वन्स अपॉन…इन हॉलिवूड’ – हॉलीवूड सुवर्णयुगाची दुरुस्ती
‘ऑस्कर’नंतर हिंदी सिनेमे मिळणे बंद झाले: रसुल पूक्कुटी
बॉलिवुडच्या नजरेतून काश्मीर

मुंबईः गेली ४ दशके हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणार्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सरोज खान गेले काही काळ आजारीच होत्या. गेल्या आठवड्यात शनिवारी श्वसनास त्रास होत असल्याच्या कारणाने त्यांना वांद्रे येथील गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोविड-१९ चाचणी केली होती पण ती निगेटिव्ह आली होती. गुरुवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले व पहाटे अडीचच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांचे मालाड येथील कब्रस्तानात दफन करण्यात आल्याचे त्यांची कन्या सुकैना खान यांनी सांगितले.

४ दशके हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली

सरोज खान यांनी आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत सुमारे २ हजाराहून अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले. या चार दशकांमधील ८० व ९० चे दशक तर त्यांनी गाजवले. या काळात त्यांच्या नृत्यदिग्दर्शनातून श्रीदेवी व माधुरी दीक्षित यांच्यासारखे उत्तम अभिनयासोबत उत्तम नृत्य करणारे कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाले.

भारताची फाळणी झाल्यानंतर सरोज खान यांचे कुटुंबीय भारतात आले होते. त्यांचे मूळ नाव निर्मला होते. पण त्यांच्या कुटुंबाने इस्लाम धर्म स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून सरोज ठेवले.

सरोज खान यांनी लहान वयातच हिंदी चित्रपटसृष्टीत बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. नृत्यदिग्दर्शक बी. सोहनलाल यांच्या सोबत त्यांनी काम सुरू केले. वयाच्या १३ व्या वर्षीच त्यांनी ४१ वर्षाच्या सोहनलाल यांच्याशी विवाह केला. या विवाहानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सोहनलाल यांचा हा दुसरा विवाह होता.

१९७४मध्ये ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटासाठी सरोज खान यांनी नृत्यदिग्दर्शन म्हणून काम सुरू केले. पण १९८७मध्ये ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातील श्रीदेवी यांनी साकारलेले ‘हवा हवाई’ या गाण्याने सरोज खान यांना एका रात्रीत तुफान प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांनी एकाहून एक गाणी हीट देण्यास सुरूवात केली.

श्रीदेवी यांचे ‘नगीना’ व ‘चांदनी’ हे चित्रपट उत्तम संगीत व कलाकारांच्या अभिनयाने गाजले असले तरी त्यातील नृत्यदिग्दर्शनही प्रेक्षकांना भावले होते.

पण सरोज खान यांना त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक प्रसिद्धी माधुरी दीक्षित यांच्या गाण्यातून मिळाली. ‘एक दो तीन’, ‘तम्मा तम्मा लोगे’, ‘धक-धक करने लगा’, ‘चोली के पीछे क्या है’, ‘डोला रे डोला’ अशी अनेक हीट गाणी सरोज खान यांनी दिली.

‘बाजीगर’, ‘मोहरा’, ‘डर’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘ताल’, ‘वीर जारा’, ‘परदेस’, ‘सोल्जर’, ‘डॉन’, ‘सावरिया’, ‘लगान’, ‘तनू वेड्स मनु रिटर्न्स’, ‘मणिकर्णिका’ अशा अनेक चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन म्हणून काम केले.

‘देवदास’, ‘जब वी मेट’, ‘गुरू’, ‘खलनायक’, ‘चालबाज’ या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार मिळाले. ‘नच बलिये’, ‘उस्तादो का उस्ताद’, ‘बूगी वूगी’, ‘झलक दिखला जा’, अशा डान्स रिअलिटी शोमध्ये त्यांनी परीक्षकांचे काम केले.

२०१९मध्ये त्यांनी माधुरी दीक्षित यांच्या ‘कलंक’ या चित्रपटातल्या ‘तबाह हो गए’ या चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन केले. ते अखेरचे होते.

सरोज खान यांच्या निधनावर संपूर्ण बॉलीवूडने शोक प्रकट केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0